Thursday, January 14, 2016

सोनिया, राहुल आणि आसारामराम जेठमलानी हे राजकारणा इतकेच कायद्याच्या क्षेत्रातील वादग्रस्त व्यक्तीमत्व आहे. १९७५ सालात जेव्हा इंदिराजींनी देशात आणिबाणी लागू केली, तेव्हा ज्या दोन व्यक्तींनी परदेशी जाऊन आश्रय घेतला होता, त्यात त्यांचा समावेश होता. दुसरे होते डॉ. सुब्रमण्यम स्वामी! पुढे आणिबाणी उठल्यावर त्या दोघांनी मायदेशी येऊन लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि लागोपाठ दोनदा मुंबईतून ते लोकसभेत निवडून गेलेले होते. जनता पक्षात असतानाही ते दोघे तेव्हा जनसंघ वा भाजपाचे म्हणून ओळखले जात होते. मात्र भाजप स्थापन झाला तेव्हा स्वामी त्यात आले नाहीत. पण जेठमलानी भाजपाच्या स्थापनेवेळी पक्षाचे उपाध्यक्ष होते. दोघांची खासियत अशी, की कुठल्याही पक्षात असले तरी त्यांनी कधीही पक्षाची शिस्त पाळलेली नाही. पक्षादेशापुढे मान झुकवलेली नाही. वाजपेयी पंतप्रधान असताना जेठमलानी कायदामंत्री होते आणि त्यांचा तात्कालीन प्रमुख सरकारी वकील सोली सोराबजी यांच्याशी खटका उडालेला होता. तेव्हा त्यांना मंत्रीपदावरून बाजूला करणे वाजपेयींना भाग पडले होते. त्याचा सूड घेण्य़ासाठी जेठमलानी पुढल्या खेपेस वाजपेयी विरोधातील कॉग्रेस पुरस्कृत उमेदवार झाले होते. त्याच काळातील स्वामींचेही कर्तृत्व वेगळे नव्हते. वाजपेयी सरकार पाडण्यासाठी त्यांनी सोनिया व जयललिता यांना एकत्र आणून ‘चायपे चर्चा’ घडवली होती. त्याच्या परिणामीच जयललितांनी पाठींबा काढून घेत असल्याचे पत्र राष्ट्रपतींना दिलेले होते. म्हणून वाजपेयींना विश्वासमत प्रस्ताव आणावा लागला व एक मताच्या फ़रकाने त्यांचे सरकार पराभूत झाले होते. म्हणजेच भाजपाचे ते सरकार स्वामींनी पाडले आणि वाजपेयींच्या विरोधात लखनौ येथून जेठमलानी उमेदवार झाले होते. भाजपाशी या दोघाची मैत्री वा जवळीक ही अशी चमत्कारिक आहे. आपले मत मान्य झाले नाहीतर त्यांना पक्षाची महत्ता वाटत नाही, किंवा पक्ष आपल्या अटीवर चालावा, अशीच त्यांची मनोवृत्ती राहिली आहे.

अडीच वर्षापुर्वी नरेद्र मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार व्हावेत, अशी आघाडी पक्षात उघडल्याने जेठमलानी वादग्रस्त झाले होते आणि त्याच कारणास्तव तेव्हाच्या भाजपा नेतृत्वाने त्यांना पक्षातून काढून टाकण्याचा पवित्रा घेतला होता. तेव्हा पक्षाच्या संसदीय बैठकीत अडवाणी गटावर खुलेअम टिका करण्यापर्यंत जेठमलानी यांची मजल गेली होती. पण अखेर त्यांची इच्छा फ़ळली आणि मोदी उमेदवार झाले. त्यामुळेच जेठमलानी पक्षात कायम राहिले. पण आता पंतप्रधानाने आपल्याच सल्ल्याने चालावे, अशी त्यांची अपेक्षा असेल तर ती पुर्ण होणार नव्हती. त्यात पुन्हा अरूण जेटली ह्यांच्याशी जेठमलानी यांचे अघोषित वैर आहे. जेटलींच्या कलाने सरकार चालत असेल, तर जेठमलानी अस्वस्थ होणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे त्यांनी पक्षाला गोत्यात आणण्यापर्यंत मजल मारली तर नवल नाही. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सहा महिन्यातच जेठमलानी यांनी पक्षाला अडचणीत आणायच्या कारवाया सुरू केलेल्या आहेत. त्या तर्कशुद्ध असल्या तर गोष्ट वेगळी! पण जेठमलानी काहीसे सूडबुद्धीने वागतात असे मानावे लागते. उदाहरणार्थ केजरीवाल यांनी जेटली यांच्यावर आरोप करताच जेटली विरोधात केजरीवाल यांची वकीली करायला जेठमलानी पुढे सरसावले. बदनामीच्या खटल्यात त्यांनी हे वकीलपत्र घेतले आहे. आता त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी नॅशनल हेराल्ड खटल्यात सोनिया व राहुल यांचे वकीलपत्र घेण्याची ऑफ़र दिलेली आहे. तसे पत्रच त्यांनी सोनियांना पाठवले होते. मात्र त्यांना सोनियांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. म्हणजे पत्र पाठवले तरी सोनियांनी त्यांना वकील नेमले नाही, की साधे उत्तरही लगेच पाठवले नाही. काही दिवस उलटून गेल्यावर पत्र मिळाल्याची साधी पोच सोनियांनी पाठवली. याचा अर्थ कोणालाही कळू शकतो. जेठमलानी यांच्या सुडबुद्धी राजकरणासाठी सोनिया बळी जायला तयार नाहीत, इतकाच त्याचा अर्थ आहे.

तुमच्या पक्षात जाणत्या हुशार वकीलांची फ़ौज तैनात आहे, याची मला जाणिव आहे. पण गरज भासली तर तुमची वकीली करायला मी फ़ुकटात तयार आहे, असा या पत्राचा मजकूर आहे. सवाल इतकाच, की फ़ुकटात सोनियांची वकीली करायची हुक्की जेठमलानी यांना कशाला आलेली आहे? केजरीवाल यांच्यावरील प्रेमापेक्षा जेटली द्वेषापायी जेठमलानी वकीलपत्र घेतात. तेच त्यांना सोनियांच्या प्रकरणातही हवे आहे. सोनिया-राहुल यांना कोर्टात आरोपी बनवणारे व समन्स काढणारे फ़िर्यादी डॉ. स्वामी आहेत. तेही जेठमलानी यांचे अघोषित शत्रू आहेत. थोडक्यात इथेही जेठमलानी सूडबुद्धीने औदार्य दाखवत आहेत. त्यांना सोनियांना न्याय देण्याची इच्छा असण्यापेक्षा स्वामींना धडा शिकवण्याची खुमखुमी अधिक आहे. कदाचित त्याचे भान असल्यानेच सोनियांनी त्यांच्याकडे पाठ फ़िरवलेली असावी. कारण जेठमलानी यांना भले आपले हिशोब पुर्ण करायचे असतील. पण त्यात आपला बळी जाऊ शकतो, याचे भान सोनियांना असावे. सूड महत्वाचा नसून आपल्या गळ्यातून नॅशनल हेराल्ड घोटाळ्याचे घोंगडे निघावे, अशी सोनियांची अपेक्षा आहे. बाकी जेटली स्वामी इत्यादींशी जेठमलानींच्या भांडणाचे चटके आपल्याला बसण्याचा धोका त्यांना नको आहे. म्हणून फ़ुकटात देवू केलेली वकीली त्यांनी विचारातही घेतलेली नाही. कारण प्रकरण साधेसुधे नाही. हायकोर्टानेही त्यात ताशेरे झाडलेले आहेत. म्हणूनच गंभीरपणे व बचावात्मक रितीने कायद्याची लढाई लढावी लागणार आहे. त्यात संयमाची आवश्यकता आहे. जेठमलानी तिथेच तोकडे आहेत. त्यांच्या नादी लागून राजकीय मार्गाने सूडाचा प्रवास केला तर आपला आसाराम बापू होईल, हे धुर्त सोनिया ओळखतात. जेठमलानी खुप नावाजलेले वकील असले तरी अनेक प्रकरणात त्यांना आरोपी सोडवता आलेले नाहीत, की खटले जिंकता आलेले नाहीत. संजय दत्त हे तसेच एक प्रकरण होते. सोनिया म्हणूनच सावधपणे त्यापासून दूर राहिल्या असाव्यात.

दोन वर्षापुर्वी अल्पवयीन मुलीवरच्या बलात्कार प्रकरणात प्रवचनकार आसाराम बापू यांना अटक झाली. अजून त्या खटल्याची सुनावणी सुरू झालेली नाही. पण त्यांना जामिन मिळावा म्हणून ज्या कायदेशीर कसरती झाल्या, त्यात जेठमलानी यांनी पुढाकार घेतला होता. टोकाचे युक्तीवाद करूनही आसाराम यांना साधा जामिन मिळू शकलेला नाही. खटला जिंकणे दूरची गोष्ट झाली. जामिन मिळण्यापर्यत जेठमलानी यश मिळवू शकले नसतील, तर त्यांच्या नादाला लागणार्‍याचा सरळ आसाराम होऊ शकतो ना? म्हणजे आगीतून सुटून फ़ुफ़ाट्यात पडल्यासारखे व्हायचे. राजकारणातले युक्तीवाद वेगळे आणि कायद्याच्या चौकटीतले युक्तीवाद भिन्न असतात. हे भले केजरीवाल यांना कळत नसतील. पण सोनियांना कळतात. म्हणूनच केजरीवाल यांनी बदनामी प्रकरणात आपले वकीलपत्र जेठमलानी यांना सोपवले आहे. त्यात जेटलींना गुंतवायला उत्सुक असलेले जेठमलानी केजरीवालना कितपत सोडवू शकतील, याची शंका आहे. सूडापेक्षा पेचात सापडलेल्या अशिलाला कायद्याच्या कचाट्यातून सोडवणे महत्वाचे असते. केजरीवाल म्हणूनच जेटलींच्या खटल्यात फ़सण्याची शक्यता आहे. उलट सावध सोनियांनी ती ऑफ़र नाकारण्यात शहाणपणा केला म्हणायचा. समन्स नाकारण्यातून हायकोर्टाचे ताशेरे ऐकण्याची नामुष्की आधीच त्यांच्या पदरी आलेली आहे. त्यात आणखी भर घालण्याची त्यांची इच्छा नसावी. स्वामी व जेठमलानी यांच्या व्यक्तीगत भांडणात बळीचा बकरा होण्याचा धोका व्हायचे सोनियांनी टाळले असले, तरी त्यामागचा राजकीय हेतू जेठमलानी यांनी साधलेला आहे. भाजपाचे सदस्य असूनही त्यांनी कॉग्रेस अध्यक्षाचे वकीलपत्र घेण्याची तयारी दाखवणे भाजपा नेत्यांना रुचणारे नाही, खुपणारे आहे. तोच तर जेठमलानी यांचा उद्देश आहे. अन्यथा वकीलपत्र घेण्यासाठी कोणी वकील लेखी पत्र पाठवत नाही. पक्षकारच त्या वकीलाच्या दारी येत असतात ना? जेठमलानी यांना आपल्या वर्तनातला बालीशपणा कधी उमजणार देवजाणे!

5 comments:

 1. भाऊ अशा लोकांमुळे भाजपवाले मातीत चाललेत खरच जनतेला ५वा पक्षाची गरज निर्माण झाली आहे का?

  ReplyDelete
 2. Bhau, Good analysis as usual. Paan ashya Jethmalani yana shiv senane kasha sathe khasdar (MP) kele hote ? Tya var aaple vichar vachayla avadtil.

  ReplyDelete
 3. कशाने का होईना, वकील म्हणजे अडचणीत असलेल्या पक्षकाराचा गैरफायदा घेणे असा सर्वसामान्य लौकिक जेठमलानी वकीलसाहेबांमुळे दूर झाला. एखाद्याच्या अडचणीत स्वतःच्या सूडासाठी का होईना वकील फुकट वकिली करायला तयार असतात. संजय दत्त, बाबा आसाराम यांचे अनुभव त्यांच्या कारकिर्दीला अडचणीत आणणारे असले तरी आता दिल्लीच्या मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अनुभवातून त्यांचे भवितव्य ठरणार आहे. कारण विरोधात केंद्र सरकार पाठीशी असलेले तुल्यबळ मंत्री जेटली आहेत. जर त्यातून ते यशस्वी झालेच तर मात्र ते सोनियांना "मी फुकटची वकिली करायला तयार होतो पण आपण स्वीकारली नाहीत" असे अगदी भाजपात राहून भाजपाविरोधातील व्यक्तीची पेशा म्हणून अन्यायाविरोधात योग्य न्यायासाठी म्हणायला कमी करणार नाहीत.

  ReplyDelete
 4. भाऊ आपन घडणार्या घटनांविशयि सत्य आणि तटस्थ विश्लेषण करण्यात प्रसिद्द आहात पन आपन आसाराम बापू खटल्याच् अचूक विश्लेषण करण्यात साफ चुकले आहात. आसरम बापूंना खोट्या बलात्काराच्या केस मधे गोवनारे सोनिया आणि राहुल ग़ांधी आहेत. राजकीय स्वार्थ आणि सुडाच हे अप्रतिम उदाहरण आहे. मई आपल्याला मेल पैन केला होता की ह्या खतल्यामागचि सत्य परिस्थिति आपन वचकांसमोर मांडावी पन आपले उत्तर अजुन आले नाही. आणि खटल्याची सुनावणी फ़ास्ट ट्रैक कोर्टात चालू आहे थोड्याच् दिवसात निकल येईल आणि केस डॉ. सुब्रमण्यम स्वामी लधताहेत. ह्या केस विषयी सत्य विश्लेषण आपन का करत नाही????

  ReplyDelete
 5. भाऊराव,

  मला वाटतं भाजप लवकरच फुटेल. हिंदुत्ववादी भाग आणि सेक्युलर भाव वेगळे होतील. सेक्युलर भाजप काँग्रेसशी चुंबाचुंबी करेल, तर हिंदुत्ववादी हिस्सा मोदींच्या अधिपत्याखाली असेल.

  आ.न.,
  -गा.पै.

  ReplyDelete