Tuesday, January 19, 2016

जिहाद विरुद्ध जिहाद पुकारा

Prime Minister Nawaz Sharif in meeting with Iranian President Hasan Rouhani.─ Photo: PMO

(पाकचे पंतप्रधान इराणच्या राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांना भेटायला का धावलेत?)

‘द डॉन’ हे पाकिस्तानातील एक प्रमुख मान्यवर इंग्रजी वृत्तपत्र आहे. त्याला जगभर मान्यता आहे. त्याने शुक्रवारी लिहीलेले संपादकीय जगभरच्या मुस्लिम देशांनी गंभीरपणे वाचून विचार करण्यासारखे आहे. कारण जगाला भेडसावणार्‍या जिहादचे खरे स्वरूप कुठले उदारमतवादी सांगू शकत नाहीत, इतक्या स्पष्ट शब्दात मांडण्याचे धाडस पाकिस्तानी संपादकाने दाखवले आहे. पाकिस्तानचे बुद्धीजिवी या सत्याकडे डोळे उघडून बघू शकत नाहीत. म्हणूनच त्यांच्यावर आरोप झाला, मग इस्लामचा आडोसा घेऊन ते हिंसाचाराच्या बचावाला पुढे येतात आणि त्याचाच आडोसा घेऊन तिथले जिहादी जगभर उच्छाद मांडत असतात. इथे भारतातले सेक्युलर बुद्दीजिवी त्यापेक्षा किंचित वेगळे नाहीत. जिहादी हिंसेमागची प्रेरणा इस्लामी आक्रमकतेची असली, तरी त्याचा उच्चार केला तर हिंदू आक्रमकतेला चालना मिळेल, म्हणून इथले शहाणे जिहादींची पाठराखण करत असतात. अशा प्रत्येकाला वाटते की आपण इस्लामी मानसिकतेला चुचकारले, तर त्याला शांत करता येईल. पण त्यातूनच तो अतिरेक बोकाळत गेला आणि आता त्यांच्या जनकांनाही आवरणे शक्य राहिलेले नाही. डॉन वृत्तपत्राने त्याचीच जाहिर कबुली दिली आहे. तिथेच न थांबता मुस्लिम देशांनी व राज्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन जिहादी मानसिकतेचे निर्दालन केले पाहिजे असे आवाहन केलेले आहे. ते आवाहन जगाच्या सुरक्षेसाठी नव्हेतर मुस्लिमांच्या हित व सुरक्षेसाठी केलेले आहे. कुठलाही आडपडदा न ठेवता जगभरच्या जिहादींना संपवायचा चंग मुस्लिम राज्यकर्त्यांनी बांधला नाही, तर अवघे जगच मुस्लिमांच्या विरोधात उभे ठाकण्याचा धोका वर्तवण्यापर्यंत या संपादकीयाने मजल मारली आहे. ती वस्तुस्थितीला धरूनही आहे. कारण आता मुस्लिम राज्यकर्ते वा जिहादी यांच्यात फ़रक नाही आणि सगळेच मुस्लिम ‘तसेच’ असतात, अशी धारणा जगभर वाढीस लागत चालली आहे. त्याचे दुष्परिणाम मुस्लिम राज्यकर्त्यांना नव्हेत मुस्लिम लोकसंख्येला भोगावे लागण्याचा धोका आहे

म्हणूनच डॉन संपादकीय म्हणते, जिहाद विरोधातली लढाई जगाची नाही तर ‘आपली’ म्हणजे मुस्लिम लोकसंख्येची व मुस्लिम देशांची आहे. जिहादी हिंसाचार करणार्‍यांना आटोक्यात राखणे, आता कुठल्याही मुस्लिम राज्यकर्त्याला शक्य राहिलेले नाही. काही काळ आपल्या राजकीय खेळीसाठी उभा केलेला हा भस्मासूर आता मोकाट झाला असून, त्याचे निर्दालन मुस्लिम देश राज्यकर्त्यांनाच शक्य आहे. किंबहूना त्यात अन्य पाश्चात्य देशाची मदत घेतली जाऊ नये. अन्यथा त्याला धार्मिक तेढीचे रुप मिळेल आणि जिहादींना तेच हवे आहे. बहुतेक मुस्लिम देशांनी जिहादी गटांचा आपल्या राजकारणासाठी वापर करून घेतला. त्यासाठी जिहादींना जन्म दिला किंवा आश्रय दिला. पण त्यातून स्थानिक पातळीवर नैराश्याने घेरलेले तरूण त्यात ओढले गेले आणि स्थानिक राज्यकर्त्यांचे अपयश जिहादला आत्मघातकी लढवय्ये पुरवू लागले. विसाव्या शतकाच्या अखेरीस त्याचे भयाण परिणाम अल कायदाच्या स्वरुपात पुढे आले. इसिस व अल बगदादी यांच्या रुपाने त्यापेक्षाही भयंकर भस्मासूर उभा राहिलेला आहे. तो मुस्लिम अरबी देशांनाही गिळंकृत करत चालला आहे. कालपरवा जाकार्ता किंव जलालाबाद येथील आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी इसिसने घेतली असली, तरी प्रत्यक्षात त्यांची अफ़गाण वा इंडोनेशियात संघटना नाही. पण इसिसला तशा संघटनेची गरजही उरलेली नाही. बेकारी गरीबी व उपासमारीने बेजार असलेल्या बहुतेक मुस्लिम देशात अशा भणंगांचे तांडे मोकाट फ़िरत असतात. त्यांना जिहाद शिकवणे सोपे असते आणि त्यातून स्थानिक पातळीवर जिहादी मानसिकता पिकवली जात असते. त्यांना इसिसने निव्वळ नैतिक पाठींबा दिला, तरी ते उत्पात घडवायला पुरेसे आहेत आणि तेच सिरीया, इराक वा अफ़गाणिस्तानात घडताना दिसत आहे. आजवर अन्य देशात धुमाकुळ घालणारी जिहादी वृत्ती आता मुस्लिम देशात राज्यकर्त्यांना भेडसावू लागली आहे. म्हणूनच ती मुस्लिम देशांची समस्या झाली आहे.

पाकिस्तानात तहरीके तालिबान वा अफ़गाणिस्तानात तालिबान आपल्याच सरकारला आव्हान देत आहेत. इंडोनेशियात अबु सयाफ़ची जेमा इस्लामिया इसिसची भगिनीच आहे. त्यामुळे अशा विविध शेकडो लहानमोठ्या जिहादी गटांना प्रत्यक्ष इसिसमध्ये सहभागी व्हायची गरज नाही, की मदतीची गरज नाही. जागतिक पातळीवर सहकार्य वा नैतिक पाठींबा पुरेसा आहे. कारण त्यांनी विविध मुस्लिम देशात आपले चांगले बस्तान बसवलेले असून, अन्य कारणास्तव राज्यकर्त्यांनी त्यांना पोसलेले जोपासलेले आहे. आता स्थानिक राज्यकर्त्यांनी वेसण घालावी, इतके हे जिहादी गट दुबळे राहिलेले नाहीत. म्हणूनच राष्ट्राध्यक्ष असताना मुशर्रफ़ यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यापर्यंत जैशे महंमद संघटना मुजोरी करू शकली होती. आताही लष्करे जंघवी किंवा काही गट पाक लष्कराला आव्हान देण्यापर्यंत पोहोचले आहेत. म्हणूनच त्यातून मुस्लिम देश क्रमाक्रमाने विस्कळीत होत अराजकाच्या गर्तेत ढकलले जात आहेत. त्यांच्या आक्रमक हिंसाचाराने मुस्लिम देशातील प्रशासन व कायदा व्यवस्था पोखरून टाकलेली आहे. कुठल्याही नैराश्य वा गरीबीला पुढे करून धर्मांध चिथावणी दिली, तरी सत्ताधार्‍यांच्या विरोधात हिंसा माजवणे त्या जिहादी गटांच्या हातचा मळ झालेला आहे. म्हणूनच मुस्लिम देशांचे स्थैर्य व राज्यच धोक्यात येत चालले आहे. धर्माच्या नावाने कुठेही धुमाकुळ घालणार्‍या अशा गटांत चांगला वाईट असा भेदभाव करणे सोडून त्यांचा समूळ उच्छेद करणे हा प्राधान्याचा विषय आहे. मुस्लिम देश आणि त्यांच्या अस्तित्वालाच धोका झालेल्या जिहादींचा बंदोबस्त, म्हणूनच मुस्लिम राज्यकर्त्यांचा विषय आहे. आपापल्या देशातील जिहादी वृत्ती निर्दयपणे मोडीत काढायचे आवाहन पाकिस्तानच्या या प्रमुख दैनिकाने केलेले आहे. पठाणकोटच्या हल्ल्यानंतरचा हा सल्ला म्हणूनच महत्वाचा ठरावा. पाकिस्तान वा तत्सम देश जिहादने किती डबघाईला आलेत, त्याची ही चुणूक आहे.

सौदी अरेबियाने दहशतवाद विरोधी आघाडी उभी करताना त्यातून इराणला वगळले आहे. थोडक्यात शिया सुन्नी अशी विभागणी त्यात आहे. म्हणजेच शियापंथीय मुस्लिमांना संपवण्यासाठी सौदी सुन्नी अतिरेकाचे समर्थन करणार आणि इराण सुन्नींचे निर्दालन करणार्‍या जिहादी गटांना प्रोत्साहन देणार. त्यातून मुस्लिमांचे शिरकाण होते आहे आणि ते अधिकच वाढणार आहे. पाकिस्तानसारखे मिश्र मुस्लिम वस्ती असलेले देश, त्यामुळे रक्तपाताच्या संकटात सापडणार आहेत. त्याची भितीच डॉनसारख्या बृत्तपत्राला भेडसावते आहे. पाकिस्तानात दर शुक्रवारी मशिदीतच स्फ़ोट होतात आणि त्यात शिया मुस्लिम मारले जात आहेत. सौदी-तुर्कीने इराक सिरीयात जिहादींच्या मार्फ़त शियांचीच हिंसा चालविली आहे. दुसरीकडे शिया अतिरेकाला इराण मदत करतो आहे. हे सर्व धर्माच्या व इस्लामच्या नावानेच चालले आहे. थोडक्यात जगाला भेडसावणारा जिहाद, आता मुस्लिम जगतासाठीच एक दुष्टचक्र बनलेले आहे. त्यातून बाहेर पडण्याची चिंता डॉनसारख्या संपादक बुद्धीमंतांना भेडसावते आहे. म्हणूनच अन्य कुठल्या देशाच्या मदतीशिवाय जिहादी मानसिकता खतम करण्याची लढाई मुस्लिम राज्यकर्त्यांनीच पुकारावी असेच आव्हान केलेले आहे. धर्माचे हे धर्मयुद्धच मुस्लिम लोकसंख्या व मुस्लिम देशांच्या मूळावर येत चालले आहे. मात्र ते जगभरच्या उदारमतवादी सेक्युलर लोकांना दिसणार नाही. भारतातल्या पुरोगाम्यांना बघता येणार नाही. पण ज्यांचे अस्तित्व संकटात सापडले आहे, त्यांना त्यातला धोका जाणवला आहे्. डॉन दैनिकाने संपादकीय लिहून त्याची कबुली दिलेली आहे. पण भारतातल्या बौद्धिक शहाण्यांना रझा अकादमीची हिंसा बघता येत नाही की मालदाच्या घडामोडीतला धोका दिसत नाही. मालदानंतर भारतातील माध्यमातली चर्चा बघा आणि पठाणकोट नंतर पाकिस्तानच्या मान्यवर दैनिकातील संपादकीयाचा सूर बघा. मग जगात काय चालले आहे त्याचा अंदाज येतो. जिहाद चुचकारू नका तर जिहाद विरोधातच जिहाद पुकारा, हे डॉनचे आवाहन आहे. भारतीय संपादकांच्या डोक्यात कधी प्रकाश पडणार आहे?

6 comments:

 1. सावध ऐका पुढल्या हाका अशा प्रकारचे आपले लेख असतात. पण भारतातल्या तथाकथित पुरोगाम्यांना ते कसे पटावे?

  ReplyDelete
 2. भाऊराव,

  भारताचा पाकिस्तान करणे हे भारतीय संपादकांच्या बोलवित्या धन्यांचे ध्येय आहे. जे संपादक याविरुद्ध साधा ब्र काढतील ते सरळ दाभोलकर, पानसरे, नेमेत्सोव्ह, कलबुर्गी या मालिकेत दाखल होतील. त्यामुळे स्वत:च्या डोक्यांत प्रकाश पडलेला त्यांना परवडण्याजोगा नाही.

  आपला नम्र,
  -गामा पैलवान

  ReplyDelete
 3. नमस्कार भाऊ!

  इस्लामच्या नावावर फोफावलेल्या या तथाकथित जिहादी मानसिकतेला पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी अन्य कुठल्याही देशाच्या मदतीशिवाय संपवण्याची गरज आहे हा 'द डॉन' च्या संपादकांनी मांडलेला वास्तववाद पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या पचनी पडण्याची सुतराम शक्यता नाही. ही गोष्ट आता त्यांच्या आवाक्याबाहेर गेलेली आहे. अंतर्गत यादवीच्या उंबरठयावर उभ्या असलेल्या पाकिस्तानसारख्या देशाची यातून पूर्ण वाताहत होत जाईल यात काहीच शंका नाही. मी निराशावादी नाहीये पण आपस्वार्थी जागतिक महासत्तांच्या सत्तास्पर्धेतून जगभर पसरत चाललेले हे तथाकथित जिहादचे लोण तिसऱ्या महायुद्धाला आमंत्रण देईल अशी साधार शक्यता आहे.

  भारतीय संपादकांच्या डोक्यात राहणारा आत्मघातकी उदारमतवादाचा किडा जोपर्यंत जिवंत असेल तोपर्यंत हे भयावह वास्तव त्यांना दिसत असूनही ते मान्य करणार नाहीत. दुर्दैवाने हे कट्टरवादी इस्लाम धर्मात शांततामय सहअस्तित्वाला मान्यता नाही त्यामुळे एक तर सगळ्या काफिरांनी (मुस्लिमेतरांनी) इस्लाम स्वीकारावा वा मरणाला सामोरे जावे असा विखारी प्रचार करत, तथाकथित जिहादच्या नावावर आज इतर धर्मियांबरोबरच पंथभेदाच्या आधारावर स्वधर्मियांचीही कत्तल करताहेत हा उघडपणे दिसणारा विरोधाभास प्रसारमाध्यमातून प्रभावीपणे मांडला, दाखवला जात नाही. त्यामुळे ही मुस्लिम व मुस्लिमेतर यांच्यात चाललेली लढाई असल्याचा आभास निर्माण होत असून एकप्रकारे ही प्रसारमाध्यमे या अतिरेक्यांची मदत करत आहेत. बहुतांश भारतीय वृत्तपत्रांच्या संपादकांनी झोपेचे सोंग घेतलेले असून व्यक्तीशः त्यांच्या बुडाला झळ लागल्याशिवाय हे सोंग ते सोडतील असे वाटत नाही.

  अशा परिस्थितीत आपल्या वास्तववादी, माहितीपूर्ण व सडेतोड लिखाणाबद्दल धन्यवाद!

  ReplyDelete
 4. जे पेरलय तेच उगवत आहे

  ReplyDelete
 5. Bhau Hyderabad dalit suicide baddal kahi liha.

  ReplyDelete
 6. छान भाऊ खरे आहे

  ReplyDelete