Saturday, January 2, 2016

मधाचे गद्दार सापळे



रणजित के. के. नावाचा एक हवाई दलाचा अधिकारी पाकिस्तानी हस्तक म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. अर्थात असा पकडला गेलेला तो पहिलाच भारतीय सुरक्षा दलाचा अधिकारी नाही. आजवर अनेकदा असे हस्तक पकडले गेले आहेत आणि भारताखेरीज अनेक देशातले असे घरभेदी पकडले जात असतात. त्यांना घरभेदी म्हणता येईल, पण गद्दार म्हणणे कितपत रास्त होईल याची शंका आहे. कारण हे लोक मतलबासाठी देशाशी गददारी करीत नसतात, तर कुठल्या तरी सापळ्यात अडकून वापरले जात असतात. रणजित ज्या सापळ्यात अडकला होता त्याला हेरगिरीच्या भाषेत हनी ट्रॅप म्हणचे मधाचा सापळा म्हटले जाते. पुरूषाचे स्त्रीविषयक आकर्षण ओळखून मोक्याच्या जागी असलेल्या अधिकार्‍यांना गुंतवायला आकर्षक व्यक्तीमत्वाच्या महिलांचा त्यात वापर होत असतो. कुठलीही तरूण देखणी स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाली, तर पुरूषाला त्याच्या मर्दानगीचा तो पुरावा वाटतो आणि अनेकदा ते मायाजाल असते. खाजगी जीवनात किंवा महत्वाच्या जागी बसलेल्या व्यक्तींसाठी असे सापळे लावले जात असतात. कधी त्यांचा वापर गुन्हे करून घेण्यासाठी होतो, तर कधी ब्लॅकमेल करून त्यांना गद्दार व्हायला भाग पाडले जात असते. कधीकधी उलटेही होत असते. महत्वाच्या महिला अधिकारी व्यक्तीलाही प्रेमाच्या जाळ्यात ओढून भावनांच्या खेळात गद्दारी करायला भाग पाडले जात असते. हवाई दलाचा अधिकारी रणजित त्याचाच बळी आहे. आपण कधी अशा सापळ्यात अडकलो आणि भरकटत गेलो, याचा त्याला अंदाजच आला नाही. जेव्हा अंदाज आला तेव्हा मग ब्लॅकमेल सुरू झाला होता. जाळ्यात फ़सलेली शिकार जशी जीवाच्या आकांताने त्यातून निसटण्याचा प्रयत्न करते आणि अधिकच त्यात गुंतत जाते; तशीच त्याची अवस्था झाली. त्याचे प्रकरण महत्वाचे नाही इतका असा सापळा समजून घेण्य़ाची गरज आहे.

अशा गोष्टी आपल्याला नव्या नाहीत. कुठल्याही सिनेमा, मालिका वा कथाकादंबर्‍यात आपण अनेकदा वाचल्या बघितलेल्या या गोष्टी आहेत. आपण त्यापासून अलिप्त प्रेक्षक वाचक असतो, म्हणून त्यात फ़सणारा आपल्याला गाफ़ील वा मुर्ख वाटतो. पण व्यवहारी जगात आपण सगळेच तितके गाफ़ील वा बेफ़िकीर असतो. म्हणूनच अगदी सहज अशा शिकारी जाळ्यात ओढल्या जात असतात. रणजित सोशल माध्यमातून गंमत करत असताना एका ब्रिटीश महिलेने त्याला मैत्रीची विनंती पाठवली, तिचे व्यक्तीमत्व बघून हा पाघळला आणि मैत्री स्विकारून गप्पा करू लागला. ठराविक गप्पा झाल्यावर तुम्ही गाफ़ील होत जाणे अपरिहार्य असते. समोरच्या व्यक्तिवर डोळे झाकून विश्वास ठेवण्यापर्यंत घसरण होते. तो मानवी स्वभाव आहे. पण जेव्हा समोरची व्यक्ती; मग ती महिला असो किंवा पुरूष असो, चमत्कारीक अपेक्षा करू लागते, तीच सावध होण्याची संधी असते. मानवी मनात संशय निर्माण करण्याची जी व्यवस्था उपलब्ध आहे, तिच्यावर विश्वास ठेवणे भाग असते. पण विवेकापेक्षा माणूस मित्र परिचितांवर विश्वास करू लागला, मग त्याला कोणी वाचवू शकत नाही. रणजितसारख्या लोकांची तीच समस्या असते. ते आपल्या विवेकबुद्धीला नाकारून कुणावरही विश्वास ठेवायला सज्ज असतात. कितीही जवळचा मित्र वा आप्तस्वकीय ज्या गोष्टी आपल्यासमोर मांडतो, तेव्हा त्या खर्‍याच असतात असे नाही. आपण काय मान्य करावे असे त्याला वाटत असते, त्यानुसारच समोरची व्यक्ती आपल्याला माहिती सांगत असते किंवा काही माहिती-तपशील लपवितही असते. जिथे खर्‍या मित्र परिचितांची ही स्थिती असते, तिथे तुम्हाला जाळ्यात ओढण्यासाठीच जवळ आलेल्यांची काय कथा? ते तुम्हाला आवडणार्‍या व चटकन पटू शकणार्‍या तर्कानेच माहिती वा तपशील पेश करीत असतात. तुमच्या भल्यासाठीच बोलल्याचा आव आणत असतात.

आपण रोजच्या रोज लाखो फ़सलेल्या गुंतवणूकदार वा ग्राहकांच्या कहाण्या बातम्या ऐकत असतो. व्यवहार बघितले तर त्यांना कोणी धाकदपटशा करून लुटलेले नसते. तर स्वेच्छेनेच या लोकांनी आपली कष्टाची कमाई भामट्याकडे सोपवलेली दिसेल. त्याचे कारण काय असते? तर त्याने तुमच्या मनातल्या हव्यास व लोभी मनोवृत्तीला साद घातलेली असते. काही महिन्यात दुप्पट रक्कम करणारी योजना आपल्याला भुरळ घालणारी असते. पण त्यात तथ्य किती असते? खरेच अशा रकमा अल्पावधीत दुप्पट तिप्पट होऊ शकत असतील, तर टाटा वा अंबानी यांच्यासारखे दिग्गज कंपन्या उभ्या करून सरकारी कायद्याच्या कचाट्यातून व्यवसाय करून कित्येक वर्षे का खर्ची घालतील? त्यांनाही अशा झटपट योजनांमध्ये पैसे ओतून झटपट अब्जाधीश होता आले असते ना? पण ते तिकडे पाठ फ़िरवतात आणि कष्टप्रद मार्गानेच उद्योग करतात. कारण दुप्पट चौपट पैसे करून देणार्‍या योजना ही शुद्ध भामटेगिरी असते. पण त्यात फ़सणारे कोण असतात? ते निव्वळ मुर्ख असतात का? तसेही नसते. दुकानात बाजारात किरकोळ वस्तुंच्या किंमतीवरून हुज्जत करून पैसा पैसा वाचवणारे लोकच डोळे झाकून लाखो रुपयांची गुंतवणूक फ़सव्या योजनांमध्ये करतात. कारण त्यांना त्याची भुरळ पडलेली असते. नेमक्या त्याच मानवी वृत्तीचा उपयोग अशा सापळ्यात केलेला असतो. महिलांना प्रेमात ओढून फ़सवले जाते आणि पाप करायला भाग पाडले जाते. आईवडीलांना झुगारून प्रियकरासोबत पळून जाणारी मुलगी आणि प्रेमाच्या आहारी जाऊन आपल्या कर्तव्याशी गद्दारी करणारी महिला अधिकारी, यांच्यात तिळमात्र फ़रक नसतो. यालाच हनिट्रॅप म्हणले जाते. भावनांचा गुंता निर्माण करून त्यात माणसे ओढली जातात आणि त्यांना आप्तस्वकीय किंवा देश समाजाच्या विरोधात हत्याराप्रमाणे वापरले जात असते.

रणजित नावाचा हवाई दलाचा अधिकारी काही गोपनीय माहिती शत्रूला दिल्याने पकडला गेलेला आहे. आजवर असे अनेकजण पकडले गेले आहेत. पण म्हणून तितकेच गद्दार नसतात. अशा रितीने फ़सलेले वा गद्दार झालेले अनेकजण आपल्यातच उजळमाथ्याने वावरत असतात. त्यांचे काय करायचे, हा खरा प्रश्न असतो. खरे तर तोच अधिक गंभीर चिंताजनक प्रश्न आहे. कारण अशा गद्दारांना पकडणेही शक्य नसते. उदाहरणार्थ इशरत जहान नावाच्या तोयबा हस्तकाचा चकमकीत मृत्यू झाला, तेव्हा तिला निरागस निरपराध ठरवण्यासाठी अहोरात्र झटलेले लोक रणजितपेक्षा भिन्न असतात काय? आता हेडलीने माफ़ीचा साक्षीदार व्हायचे ठरवले आहे. त्यानेही इशरत तोयबाची हस्तक असल्याचे पुर्वीच कथन केलेले आहे. आता नव्या साक्षीत त्यावर शिक्कामोर्तब झाले मग काय? इशरतसाठी ज्यांनी भारतीय गुप्तचर खात्याला व त्याच्या अधिकार्‍यांना आरोपी बनवण्याचा घाट घातला होता, त्यांचे काय करायचे? रणजितपेक्षा त्या इशरत भक्तांचे पाप कितीसे कमी आहे? रणजितने सुरक्षास्थळे वा अन्य कुठली माहिती दिली असेल. पण ज्यांनी इशरतसाठी पोलिस व गुप्तचरांनाच आरोपी बनवण्याचा घाट घातला, त्यांनी अशा सुरक्षा कर्मचार्‍यांचे जे मनोधैर्य खच्ची केले, त्यांना कोणी पकडायचे? कशी शिक्षा द्यायची? कारण असे सर्व लोक आजही समाजात उजळमाथ्याने वावरत आहेत, रणजितसारखे पकडले जातात. पण जे खुलेआम देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा गवगवा करीत असतात, त्यांना कुठला कायदा शिक्षा देवू शकणार आहे काय? कारण विविध सापळ्यात फ़सलेले शेकडो शत्रूचे हस्तक आपल्यात प्रतिष्ठीत म्हणून वावरत आहेत. हे सगळे खर्‍या अर्थाने हनिट्रॅप आहेत. पण त्यांचा बंदोबस्त करण्याची कुठली उपाययोजना नाही.

काही महिन्यांपुर्वी पाकव्याप्त काश्मिरमध्ये स्थानिक जनतेने पाक सत्तेविरोधात उठाव केला आणि हिंदूस्तान झिंदाबादच्या घोषणा दिलेल्या होत्या. त्यांच्यावर लष्कर लादून पाकिस्तानला त्यांचा आवाज दडपावा लागला होता. पण हे व्याप्त काश्मिरी अकस्मात भारतप्रेमी कसे झाले, त्याचा कोणी शोध घेतला काय? त्यासाठी किती वर्षे छुप्या पद्धतीने भारतीय गुप्तचरांनी काम चालविले होते, त्याचा तपास कोणी केला काय? कोण होते असे भारतीय गुप्तचर आणि त्यांच्या कारवाया हाणून पाडण्याचे काम कोणी केले, कसे केले? युपीए सरकार सत्तेत असताना जनरल व्ही. के. सिंग यांचे संरक्षणमंत्र्यांशी काही वादविवाद झाले होते. त्यांना त्रास देण्यासाठी अनेक गोपनीय गोष्टी चव्हाट्यावर आणण्यात सरकार व पत्रकारांनी भाग घेतला होता. दिल्ली नजिकच्या राज्यातून सैन्याची एक तुकडी दिल्ली काबीज करायला निघल्याची अफ़वा पसरवली गेली. मग सिंग यांच्याच आदेशावरून काश्मिरच्या राजकारणात ढवळाढवळ करणार्‍या कारवाया कारण्यासाठी एक वेगळा विभाग कार्यरत होता आणि त्याच्याच मार्फ़त काश्मिरी निवडणूकात पैसा खेळवला गेला, असेही आरोप झाले होते. पु्ढे सिंग निवृत्त झाल्यावर हा खास विभाग (टेक्निकल सपोर्ट डिव्हीजन) नव्या सेनाप्रमुखांनी थेट विसर्जित करून टाकला होता. त्याचा गवगवा कशासाठी करण्यात आला? ज्या काश्मिरमध्ये रोजच्या रोज सैनिकांवर हल्ले होत असतात आणि घातपाताच्या घडामोडी नित्यनेमाने चालू आहेत, तिथल्या सैनिकी कारवाईच्या गोपनीय कारवायांना उघड्या पाडण्याचे काम भारताल्या माध्यमांनी केले. भारतीय सैन्यदलाची माहिती उघड करणे जर गुन्हा असेल, तर हा गवगवा माध्यमातून करून त्या ठराविक गोपनीय कारवाईला हाणून पाडणार्‍यांची तुलना रणजित बरोबर होते ना? सिंग यांनी निर्माण केलेली गोपनीय तुकडी कोणते देशद्रोहाचे काम करीत होती?

सीमावर्ति भागात शत्रूला शह देण्यासाठी अनेक कारवाया चालू असतात. त्या फ़क्त बंदुका व तोफ़ा चालवण्याच्या नसतात. त्यात शत्रूच्या प्रदेशात वा आपल्या प्रदेशात परकीय हस्तकांना शह देण्यासाठी असतात, तशाच शत्रूला शह देण्यासाठीही असतात. सिंग यांनी निर्माण केलेली तुकडी नेमके हे काम व्याप्त काश्मिरात करीत होती आणि भारतीय काश्मिरातही पाक हस्तकांना गोत्यात आणायचे काम करीत होती. त्यांना उघडे पाडून कोणाला मदत केली गेली? हे काम पाक हेरखात्याला उपकारक होते आणि तेच करणारे भारतातले एकाहून एक मान्यवर पत्रकार होते. त्यांना आवश्यक अशी माहिती वा धागेदोरे देणारेही राजकीय मान्यवर होते. त्यांचे कर्तृत्व रणजितपेक्षा कितीसे भिन्न आहे? पण त्यांना कोणी हात लावू शकत नाही. कारण ते कायद्याच्या चौकटीत गुन्हेगार ठरवले जाऊ शकत नसतात. पण रणजितपेक्षाही गद्दार असतात. रणजितने दिलेली माहिती फ़ारशी महत्वाची नाही, जितकी हानी प्रतिष्ठीत भारतीयांकडून केली जात असते. यातले अनेकजण अशाच कुठल्या ना कुठल्या सापळ्यात ओढून शत्रूने कामाला जुंपलेले असतात. त्यात कोणाला परदेशी वार्‍या करायला मिळतात, कोणाला अन्य कुठल्या मार्गाने प्रचंड पैसे पुरवले जात असतात. काही प्रसंगी निव्वळ मैत्री वा प्रेमाचे जाळे विणलेले असते. उदाहरणार्थ बरखा दत्त ही भारताची एक आघाडीची पत्रकार आहे. ती अनेक नाजूक विषयांना हात घालत असते. पण तिचा पती कोण किंवा त्याचे कोणाशी लागेबांधे आहेत, याविषयी गुपित कशाला राखले जाते? बरखाविषयी अनेक वदंता आहेत. पण त्याबद्दल प्रश्नही विचारला, तर बरखा त्याचे उत्तर देत नाही. याला योगायोग म्हणता येईल काय? मधाचे असे सापळे जागोजागी आहेत आणि ते उध्वस्त करणे सोपे नाही. रणजित सहज पकडला जाऊ शकतो. त्याला बेड्या ठोकल्या जातात. मान्यवरांचे काय?

2 comments: