Monday, January 4, 2016

गुलाम अलीची गझल आणि पझलगेल्या दोन दिवसात पाकच्या जिहादी हल्लेखोरांनी पठाणकोट येथील हवाई तळावर हल्ला केल्यावर गादारोळ सुरू झाला आहे. त्यात भारतीय गुप्तचर व सुरक्षा यंत्रणा यांना नालायक ठरवण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. त्यात काही नवे नाही. कारण सुरक्षा जितकी माध्यमातून बकवास करणार्‍यांना कळते, तितकी सैनिकांना वा हेरांना उमजत नसावी. जिहादी भारतात घुसूच कसे शकतात, इथपासून गुप्तचर विभाग झोपा काढत होता काय, असे सवाल विचारले जात आहेत. पण हेच सवाल करणार्‍यांना पाकिस्तानच्या घातपाती धोरणांबद्दल इतका राग कशाला? घातपात करणे हा पाकिस्तानचा अधिकारच आहे, अशीच त्यांची समजूत आहे ना? भारत-पाक नागरिकांना दोस्ती हवी म्हणून सतत प्रवचन करणारे, आता कशाला हातपाय आपटत आहेत? काही महिन्यांपुर्वी कसुरी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत होण्याच्या विरोधात मुंबईत शिवसेनेने निदर्शने केली होती. आयोजक सुधींद्र कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फ़ासले होते. तेव्हा शिवसेनेच्या नावाने शिव्याशाप देणारेच आता पाक नागरिकांना घातपाती म्हणत आहेत. जे कोणी पठाणकोट येथे आले ते पाक सैनिक नाहीत, तर पाकिस्तानी नागरिक आहेत. त्यांना भारतीय नागरिकांशी ‘मैत्री’ साधायची आहे. त्यातूनच मग पठाणकोटची घटना घडत असते. कारण पाकिस्तानात भारत मैत्री कधीच शिकवली जात नाही. कोवळ्या वयातल्या मुलांना शाळकरी अभ्यासक्रमातून भारतद्वेष शिकवला जात असतो. त्यापासून जे वंचित रहातात त्यांना मदरश्यातून भारताशी शत्रूत्व शिकवले जात असते. म्हणूनच भारताशी प्रेमाचे संबंध ठेवायचे म्हणजे भारत व तिथल्या नागरिकांना रक्तबंबाळ करायचे, अशी मानसिकता पाकिस्तानात जोपासली जात असते. त्याच मानसिकतेचे चोचले करणार्‍यांना पठाणकोटच्या हल्ल्यापेक्षा अन्य काय अपेक्षित असू शकते? गुलाम अलीची गझल हा त्यावरचा निव्वळ मुखवटा असतो.

सुधींद्र कुलकर्णीच्या दरम्यानच मुंबईत गुलाम अली यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्याच्या आयोजकांशी बोलून शिवसेनेने तोही रद्द करायला भाग पाडले. तेव्हा अनेक कलाप्रेमी संगीतप्रेमी रडकुंडीला आलेले होते. केजरीवाल सारख्यांनी तर गुलाम अलीला दिल्लीत आमंत्रित करायला पुढाकार घेतला होता. गुलाम अली हा पाकिस्तानचा चेहरा नव्हे तर मुखवटा असतो. त्याच्या मागे कसाब वा तत्सम कोणाचा हिडीस चेहरा असतो. गझल गावून तुम्हाला गुंग करायचे आणि गाफ़ील झालात मग तुम्हाला रक्तबंबाळ करायचे, ही रणनिती त्यामागे आहे. आज ज्यांनी माध्यमात लेफ़्टनंट कर्नल निरंजन याला श्रद्धांजली वहाण्याचे नाटक चालविले आहे. त्यांनाच कालपर्यंत गुलाम अलीची गझल ऐकायची होती ना? ती गझल ऐकून दोन देशातले संबंध सुधारू शकतील काय? तसे असते तर अशा पाकिस्तानी गायकांनी आपल्या देशात हिंसेचे कारखाने चालवणार्‍यांचा खुलेआम निषेध तरी नक्कीच केला असता. इथले तथाकथित कलावंत गुलम अलीच्या समर्थनाला उभे राहून शिवसेनेचा निषेध करताना आपण नेहमी बघतो. पण ज्याच्यावर मुंबई हल्ला वा अन्य घातपाताचे शेकडो आरोप आहेत, त्या सईद हाफ़ीजचा गुलाम अलीने एकदा तरी निषेध केल्याचे कोणी ऐकले आहे काय? नसेल तर त्याचे वा त्याच्यासारख्या पाकिस्तानी कलावंताचे मौनच त्या जिहादी हिंसेचे समर्थन करीत नसते काय? ज्यांना साधा हिंसाचाराच्या निषेधाचा सूर आळवता येत नाही, त्याच्याकडून कुठले गाणे वा गझल गायली जाऊ शकते? त्याच्या गाण्यातून कुठली संस्कृती जोपासली जाऊ शकेल? पठाणकोटच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाहोर दौर्‍याचे हेच काय फ़लित, असा प्रश्न विचारणारे कित्येक आहेत. पण गुलाम अलीच्या गझलेला मिळालेली हीच दाद आहे काय, असा प्रश्न त्यांच्या मनात कशाला आलेला नाही?

दोन शेजारी देश शत्रू असले तरी तिथल्या नेत्यांना परस्परांशी बोलचाल ठेवावीच लागते. तो राजशिष्टाचार असतो. पण जेव्हा शत्रूत्व इतक्या टोकाला गेलेले असते, तेव्हा त्यांच्यात कुठलीच सांस्कृतिक कलात्मक देवाणघेवाण व्हायला काही कारण नसते. प्रामुख्याने जेव्हा एका देशातले लोक नुसताच द्वेष करतात आणि शत्रुत्वानेच वागतात, तेव्हा कला-संस्कृतीशी त्यांचा संबंध उरलेला नसतो. म्हणूनच गुलाम अली वा अन्य कोणी पाकिस्तानी कलावंत कितीही उत्तम गायक असला, तरी त्याला मुखवटाच म्हणावे लागते. गुलाम अली त्याला अपवाद नाही. मोदींच्या लाहोर भेटीने काय साधले हा प्रश्न ज्यांना पडतो, त्यांना गुलाम अलीच्या गझलेतून आजवर काय साध्य झाले, त्याचे उत्तर अजून का देता आलेले नाही? दोन देशात क्रिडा वा कलेची इतकी देवाणघेवाण होऊनही घातपाती कृत्ये कशाला थांबू शकलेली नाहीत? कारण स्पष्ट आहे. कला हा पाकिस्तानचा मुखवटा आहे. तर जिहाद हाच चेहरा आहे. त्यावर राजकीय उत्तर सापडत नाही, तोपर्यंत पाकिस्तानच्या कलात्मक मुखवट्याला भुलणे, हा मुर्खपणा नव्हे तर आत्मघात असतो. म्हणून कसुरी वा गुलाम अली यांना इथे मिरवायला येऊ देता कामा नये. चांगुलपणाची कदर होत नसेल, तर असला चांगुलपणा हे संकटाला दिलेले आमंत्रण असते. हे खरेच कलावंत असतील आणि कलेला सीमेच्या व राजकारणाच्या मर्यादा नसतील, तर पाक कलावंतांना नावे घेऊन ह्सईद हाफ़ीज वा तत्सम जिहादींचा निषेध करता आला पाहिजे. कोणी एक क्रिकेटपटू वा पाक कलावंताने आजवर शब्दाने तरी अशा जिहादी संघटनांचा निषेध कशाला केलेला नाही? करणार कसे? मुखवटा कधी अस्सल चेहर्‍याचा निषेध करीत नसतो. तसे केल्याच हिडीस चेहराच मुखवटा उतरून त्याला पायदळी तुडवू शकतो. गुलाम अलीचा तोच खरा चेहरा आहे.

थोडीही तो पी ली है, हंगामा है क्यु बरपा? असा सवाल तोच गुलाम अली विचारतो. त्याचा अर्थ आपण कधी उलगडून बघितला आहे काय? इतका मोठा तुमचा देश हिंदूस्तान, त्यातली शेदोनशे माणसे आमच्या जिहादींनी मारली, तर कल्लोळ कसला करता? सव्वाशे कोटीतली सव्वासे माणसे मेली, तर हंगमा कशाला माजवता? हाच त्या गायकाचा सवाल नाही काय? गुलाम अलीच्या गझलचे हे पझल म्हणजे कोडे, कुणा बुद्धीमंताला कधी सोडवावे असेही वाटू नये? क्रिकेटपटू असोत की गायक कलावंत कुणा पाकिस्तान्याने त्याच्याच देशबांधवाने भारतात माजवलेल्या हिंसेचा चुकून निषेधही कशाला करू नये? हे पझल आजवर का सुटलेले नाही? शिवसेनेने हुल्लड माजवली तर निषेधाला आमचे एकाहून एक बुद्धीमंत कलावंत सज्ज असतात. पण त्याचे प्रतिबिंब पाकिस्तानच्या कला सांस्कृतिक क्षेत्रात पडताना का दिसत नाही? सेनेच्या हुल्लडबाजीच्या शेकडो पटीने पठाणकोटची घटना भयंकर आहे. पण एका तरी पाक मान्यवराने त्यासाठी नाव घेऊन जिहादी संघटनेचा निषेध अजून केलेला नाही. हेच ते गझल मागचे पझल आहे. पण ते सोडवायची बुद्धी इथल्या बुद्धीवादी प्रांतात नाही. त्यापेक्षा त्यांची अक्कल गुलाम अलीची गझल ऐकायला उतावळी आहे. जोवर असे बुद्धीमंत भारतात आहेत, तोवर कुठलाही जिहादी हिंसाचार भारतीयांचे बळी घेतच रहाणार आहे आणि त्यात जवानांचे हकनाक बळी पडतच रहाणार आहेत. शत्रू सीमेपलिकडे नाही, की जिहादी छावण्यामध्ये नाही. शत्रू इथे आपल्यातच उजळमाथ्याने वावरत आहेत. पाकिस्तानशी दोन हात करण्यापेक्षा गुलाम अलीच्या गझला ऐकत मरणाला शरण जावे, हा आपला सेक्युलर मंत्र झालेला आहे. मग आपल्याला कुठला सैनिक वा सुरक्षा यंत्रणा वाचवू शकणार? हजार सैनिकांना एक गुलाम अलीचा गझलभक्त मारत असतो ना?

7 comments:

 1. भाऊ आपले लिखान मी इतरत्र कॉपी पेस्ट करू शकतो का? कारण माझ्या काही मित्रांना अशा जमालगोट्याची नितांत गरज आहे. आपल्या परवानगी शिवाय आपल्या पोस्ट वापरणे मला अप्रस्तुत वाटते.
  आपल्या परवानगीच्या प्रतीक्षेत ...

  ReplyDelete
 2. नेमकं काय म्हणताय?
  भाजप सरकार आहे मग पाकवर हल्ला करायला काय हरकत आहे?
  .
  .
  .
  "दोन शेजारी देश शत्रू असले तरी तिथल्या नेत्यांना परस्परांशी बोलचाल ठेवावीच लागते. तो राजशिष्टाचार असतो. "असे तुम्ही म्हणताय
  आता जर मनमोहन पंतप्रधान असते तर तुम्ही काय लिहले असते बरे?

  ReplyDelete
 3. अरे, तो मनमोहन स्वत:चा एक शब्द ही बोलत नव्हता. त्याची बोलविती धनिण वेगळीच होती. शिवाय तो कांग्रेसी होता.
  तो पाकशी काय बोलणे करणार.

  ReplyDelete
 4. गुलाम अलीचे जाऊ द्या. पण भारतात त्याचे कार्यक्रम आयोजित करणारे जे आहेत, कसूरीला नोबेलप्राईझ द्या असे सांगणारे जे (भारतातील) लोक आहेत, अवार्ड-वापसीवाले जे लोक आहेत, त्यांच्यापैकी कुणीही या हल्लयाचा निषेध केला आहे का? अमीर खानला बाबारे खरच, मुलाबाळांची काळजी असेल तर तू पठाणकोटला कधीही रहायला जाऊ नकोस असा सल्ला त्यांच्यापैकी कुणी दिला आहे का ?

  ReplyDelete
 5. Bhau.. Tumcha mhanana yogya age pan apan Pakistan madhil samajik paristhiti lakshat ghetali pahije.. Tithe dharmik netyancha prabhav pahta jahir ritya konich atankvadacha nishedh karnaar nai.. Jeevachi bhiti pratyekala ahe.. Ekhadach Tarek Fateh asato jo jahir bhumika gheu shakato.. Yacha artha bakichya kalakar kheladunna tithali paristhiti pasant ahe asa hot nai..

  ReplyDelete