Saturday, June 11, 2016

शरद पवारांच्या हाती चाव्या



पावणे दोन वर्षापुर्वी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका संपल्या होत्या आणि मतमोजणी सुरू होती. योगायोगाने तेव्हा मी एबीपी माझा या वाहिनीवर सुरू असलेल्या विश्लेषणात सहभागी झालो होतो. भल्या सकाळी सुरू झालेल्या त्या विश्लेषणात मी उशिरा सहभागी झालो आणि दोन डझनहून अधिक मान्यवरही त्यात सहभागी होते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अर्धेही निकाल स्पष्ट झाले नसताना, मी त्यात भाग घेतला. तेव्हा मला पहिला प्रश्न विचारणार्‍यालाच मी उलट प्रश्न केला होता, की निकाल कुठले लागत आहेत? महाराष्ट्राचे की हरयाणाचे? कारण सहा तासाहून अधिक चालू असलेल्या त्या चर्चेत कुठेही शरद पवार यांचा नामोल्लेखही मला ऐकू आला नव्हता. मग प्रश्न विचारणारा थक्क होऊन उत्तरला, पवारांचा पक्ष पराभूत होतो आहे. माझा त्याला उलटा प्रश्न होता, पवारांचा पक्ष कुठला? त्याने अर्थातच राष्ट्रवादी कॉग्रेस असे उत्तर दिले होते. त्यावर माझा खुलासा ऐकून बहुतांश उपस्थित हसू लागले होते. कारण मी उत्तरलो होतो. शरद पवारांचा कुठला पक्ष नाही. प्रत्येक पक्षात त्यांचे उमेदवार असतात आणि सहकारीही असतात. किंबहूना महाराष्ट्राच्या राजकारणाचे विश्लेषण पवारांना बाजूला ठेवून करता येत नाही. मग ती मतमोजणीवरची चर्चा असो, किंवा राजकीय घडामोडीचे विश्लेषण असो. अनेकांना ते पटलेही होते आणि हसूही फ़ुटले होते. पण तो हसण्यावारी नेण्याचा विषय नाही. कोणाला आवडो किंवा नावडो, मागल्या तीन दशकापासून पवारांना वगळून महाराष्ट्रातल्या राजकीय सामाजिक घडामोडीची चर्चा होऊ शकत नाही. पवारांचे मत विचारात न घेता घडामोडीकडे बघता येत नाही. अशा पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे प्रकरणी दोन आठवडे काहुर माजले असताना, पवार गप्प बसलेत किंवा त्यांची कुठलीही प्रतिक्रीआ नसावी, हीच सर्वात मोठी ब्रेकिंग न्युज होत नाही काय? खरे तर तेच महाराष्ट्राच्या विद्यमान राजकीय घडामोडीतले गंभीर रहस्य आहे.

पाच वर्षापुर्वी भाजपामध्ये एक असे़च वादळ उठलेले होते. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन गडकरी विराजमान झाले आणि महाराष्ट्र भाजपामध्ये उलथापालथ सुरू झाली होती. प्रमोद महाजन यांच्यानंतर महाराष्ट्रात भाजपाचे सर्वेसर्वा मानले गेलेले गोपिनाथ मुंडे, विविध नेमणूकांमुळे नाराज होते आणि त्याचा स्फ़ोट पुण्याच्या पक्षाध्यक्ष नेमणूकीवरून झाला होता. आपल्याला अंधारात ठेवून ती नेमणूक झाल्याची नाराजी उघडपणे बोलून दाखवत मुंडे यांनी बंडाचे निशाण उभारले होते. तेव्हाही काहीही थेट संबंध नसताना, शरद पवार यांनी सुचक प्रतिक्रीया दिलेली होती. ‘मुंडे यांना देण्यासारखे आपल्या पक्षाकडे काही नाही’, असे पवार जाहिरपणे म्हणाले होते. आज काहीशी तशीच स्थिती असतानाही पवारांनी चकार शब्द उच्चारलेला नाही. खरे तर अशा तळ्यात गळ टाकून बसणे, हा पवारांचा राजकारणातील जुना छंद आहे. मग खडसे प्रकरणावरून इतके वादळ उठले असताना पवारांनी अण्णा हजारेंना लाजवणारे मौन धारण करावे, ही नवलाची गोष्ट नाही काय? अर्थात विधानसभा निवडणूक व निकालापासून पवारांनी अतिशय थक्क करून टाकणार्‍या भूमिका वेळोवेळी घेतलेल्या आहेत. आधी अकस्मात युती पाठोपाठ काही तासात कॉग्रेस आघाडी मोडीत काढून त्यांनी भाजपाचे शत-प्रतिशत राजकारण यशस्वी होण्याला हातभार लावला होता. मग निकालाच्या वेळी सर्व आकडे हाती येण्यापुर्वीच भाजपाला बाहेरून पाठींबा दिलेला होता. पुढे शिवसेनेशी भाजपाची तडजोड झाल्यावर हे सरकार टिकवणे ही आपल्या पक्षाची जबाबदारी नाही, असेही विधान केले होते. सेना भाजपात धुसफ़ुस सुरू असताना सेनेने ठाम भूमिका घेऊन सरकार पाडावे, असेही आवाहन पवारांनी अनेकदा केलेले आहे. अलिकडेच भुजबळांच्या अटकेची किंमत भाजपाला मोजावी लागेल, असाही इशारा त्यांनीच दिला होता. मग खडसे प्रकरणी साहेब गप्प कसे?

महाराष्ट्रातल्या राजकारणाचा सुत्रधार मानल्या जाणार्‍या शरद पवार यांचे यातील राजकीय नाते ओळखले पाहिजे. त्यांनी सत्तेत भाजपा स्वबळावर सत्तेत यावा, म्हणून आपल्या उमेदवारांची फ़ौज तिकडे पाठवली. अधिक मतविभागणीची सुविधाही भाजपाला उपलब्ध करून दिली. त्यापैकी दोनतीन डझन पवारनिष्ठ विजयी होऊन आज भाजपाच्या बाकावरही बसत आहेत. १९९३ सालात दिल्लीतून मुंबईला मुख्यमंत्रीपदी परतलेल्या पवारांना विधान परिषदेतील जागा मोकळी करून देणार्‍या विनायक मेटे, यांनाही पवारांनी भाजपाच्या गोटात धाडून दिले. अशा पवारांना आज त्याच भाजपा सरकारमध्ये चाललेल्या उलथापालथीशी काडीचे कर्तव्य नसेल, असा कोणाचा समज आहे काय? दुसरी बाब म्हणजे राष्ट्रवादीतून अशा उमेदवारांची आयात करण्यात खडसे आघाडीवर होते आणि युती तोडण्यातही तेच पुढे होते. त्यामुळेच दोन वर्षातल्या एकूण महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीत, याच दोन ज्येष्ठ नेत्यांचा समान सहभाग लपून राहिलेला नाही. अशा पार्श्वभूमीवर खडसे गोत्यात सापडले आहेत आणि देवेंद्र सरकारच्या भवितव्याचा विषय चर्चिला जात आहे. त्यावेळी पवारांचे मौन चमत्कारीक आहे, की ‘अर्थपुर्ण’ म्हणायचे? मला ते कमालीचे अर्थपुर्ण वाटते. कारण बाकी काही असले, तरी केव्हा बोलू नये आणि केव्हा नेमके बोलावे, हा चाणाक्षपणा पवारांइतका अन्य कोणापाशी नसेल. जेव्हा सरकारला धोका नव्हता, तेव्हा हे बोलत होते आणि आज सरकार धोक्यात असताना गप्प बसतात, ही गुढकथा नाही काय? कारण पवारांचा गोट हा अशाच नाराजांसाठी कायम ट्रांझीट कॅम्प बनून राहिला आहे. मग पवारांचे खडसेंवर बारीक लक्ष नसेल का? या घडामोडींविषयी त्यांना किंचीतही आपुलकी नसेल का? याक्षणी पवारांच्या डोक्यात काय शिजते आहे, त्याला म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणात खुप महत्व आहे.

यातली एक बाजू अशी, की भाजपातले पवारनिष्ठ नाथाभाऊ खडसेंच्या मागून तिथे आलेले आहेत. त्यामुळेच त्यांचे भाजपातील नेते नाथाभाऊच आहेत. पण त्यांची प्रेरणा पवारांकडून येत असते. म्हणूनच योग्यवेळी काय करायचे, त्याची प्रतिक्षा असे भाजपातले ‘राष्ट्रवादी’ आमदारही करीत असतील. कारण जो घटनाक्रम आहे त्याकडे बघता भाजपातील घडामोडींनी पुन्हा राज्यातील राजकारणाची सुत्रे पवारांच्या हाती सोपवली आहेत. त्यांच्यापाशी आपला पक्ष आहेच. पण भाजपातील त्यांच्याशी निष्ठा ठेवणार्‍यांना कुठल्या बाजूने ऐनवेळी उभे करायचे, ते पवारच ठरवू शकतात. खडसेही एकाकी नाहीत. नितीन गडकरीही त्यांचेच आहेत. निकालानंतर भावी मुख्यमंत्री म्हणून गडकरी नागपूर विमानतळावर उतरले आणि त्यांचे भव्य स्वागत झालेले होते. मग दिल्लीतून चाव्या फ़िरल्या आणि आपण उमेदवार नसल्याचे नितीनभाऊंनी स्वत:च जाहिर करून टाकले होते. त्यानंतरच मुक्ताईनगर व अन्य खानदेशी तालुक्यातून विविध देवांना साकडे घालण्याच्या मिरवणूका निघू लागल्या होत्या. नितीनभाऊ केंद्रिय मंत्रीपदाची शपथ घेण्यापुर्वी पवार साहेबांच्या पाया पडूनच मंचावर गेलेले आपण बघितलेले आहेतच. सहाजिकच अशा आपुलकीच्या विषयात पवारांचे मौनव्रत अधिकच गंभीर होऊन जाते. तब्बल दहा दिवस खडसे विरोधी गदारोळ झाल्यावरही पवारांनी आपले बहूमोल मतप्रदर्शन केले नाही, ही बाब दुर्लक्षणिय म्हणूनच नाही. सवाल इतकाच आहे, की खिचडी कुठे व कशी पकते आहे? पवार एकटेच खिचडी पकवत आहेत, की नाथाभाऊसोबत नितीनभाऊही त्यात आपापल्या डाळी घालून बसलेले आहेत? एकूणच महाराष्ट्राचे राजकारण वाघेला-केशूभाई अशा गुजराती मार्गाने वाटचाल करताना दिसते आहे. मुख्यमंत्री व्हायला उतावळे झालेल्या शंकरसिंह वाघेलांनी केशूभाईंचा पट उधळून लावला होता आणि त्या राज्यातील भाजपाला घरघर लागण्याची पाळी आणलेली होती ना?

शत-प्रतिशत भाजपा हा मंत्र घेऊन कामाला लागलेल्यांनी आपल्याच पक्षात कुठली मानसिकता आणली, त्याची प्रचिती आता येत आहे. सत्तालंपटता त्या पक्षाला भेडसावू लागली आहे. एकदा खडसे राजिनाम्याला राजी झाले, त्यानंतरच त्यांच्यामागे पक्षाचे अन्य नेते उभे राहिले. पण काहीजणांनी गुपचुप मधल्या काळात काय विधाने केली वा मतप्रदर्शन केले, त्याची बाहेर फ़ारशी जाहिर वाच्यता झालेली नाही. ज्यांना त्या गोष्टी ठाऊक आहेत, त्यांना आज भाजपात कसली खळबळ माजली आहे, त्याची थोडीफ़ार कल्पना असू शकते. गोपिनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनी हा राजिनामा घेतला गेला. खडसे यांनी स्मृतीदिनाच्या जाहिराती दिल्या, पोस्टर्स झळकली. त्यात कुठेही पक्षाचे नाव किंवा चिन्हही दिसले नाही. त्यातून चाणाक्ष नजरेला सत्य उमजू शकते. शिवाय खडसे यांना जे जवळून ओळखतात, त्यांना ते किती काळ संयम राखतील, याची शंका येणे स्वाभाविक आहे. मग याची परिणती कशी व कशात होईल, त्याचा अंदाज बांधणे अवघड आहे. त्याच्याच जोडीला खडसे यांच्या बहुजन समाजाचे नेते अशा पार्श्वभूमीचा उल्लेख येऊन गेला आहे. जो पवारांसाठी परवलीचा शब्द असतो. अशा प्रसंगी पवारांनी मौन धारण करणे म्हणूनच नजरेत भरणारे आहे. पण कुणा पत्रकाराने वा विश्लेषकाने पवारांच्या मौनाची दखलही घेऊ नये, याचे अधिक नवल वाटते. कोणी काय केले हा विषय सर्वांनीच चघळला आहे आणि दोषारोपही खुप झाले आहेत. पण परिणाम काय होतील, त्याविषयी गुढ आहे. त्याचा निष्कर्ष काढायचा तर एकच निघतो. पुन्हा एकदा राज्यातील राजकीय उलाढालीच्या चाव्या भाजपानेच पवारांच्या हवाली केल्या आहेत. आता मध्यावधी निवडणूकीला पोषक वातावरण जेव्हा वाटेल, तेव्हा देवेंद्र सरकारला अडचणीत आणायचा पवारांचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यात पवार कधीही खडसे यांचा मोहरा असल्याप्रमाणे वापर करणार नाहीत, याची कोणी हमी देऊ शकतो काय?

आठवते? शंकरसिंह वाघेलाही काहीकाळ गप्प बसले होते. मग त्यांनी पक्षात फ़ुट पाडली आणि अखेरीस तेही कॉग्रेसमध्ये गेले होते. सुडाला पेटलेला आणि डोक्यात राख घालून घेणारा माणूस काय करू शकतो, हे कधी सांगता येत नाही. युती तोडण्याची हिंमत आपल्याशिवाय कोणात नव्हती, ही खडसेंची भाषा त्यांच्या मनोवृत्तीची साक्ष देते. आपल्याला नापसंत असलेल्या गोष्टींना संपवण्यासाठी चिरडीला आलेला माणूस कुठल्याही थराला जात असतो. युती तोडण्याचे धाडस असलेल्यांना पक्षात दुफ़ळी माजवायचे धाडस करायला कितीसा वेळ लागू शकतो? कारण अशी माणसे आपल्या भवितव्य किंवा भविष्यापेक्षा, अन्य कुणाचे नुकसान करायला उतावळे झालेले असतात. अशा माणसांच्या मनात धगधगणार्‍या आगीत तेल ओतणार्‍यांची कमतरता नसते. नेमक्या अशा कालखंडात शरद पवार यांचे मौन म्हणूनच शंकास्पद आहे. कारण पवारांना अशाच राजकीय खेळीत कायम स्वारस्य राहिलेले आहे. दिसायला तरी आज देवेंद्र फ़डणविस यांचा मार्ग सुकर झाला आहे. पण नजिकच्या काळात सत्तेबाहेरचे नाथाभाऊ किती संयम राखू शकतील आणि किती सुडभावनेने प्रवृत्त होतील, त्यावर सरकार व भाजपाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. दहा महापालिका निवडणुका त्यातले अवघड वळण आहे. सत्तेत सहभागी असूनही शिवसेना मित्रपक्षाच्या वेदनांचे लचके तोडण्याची मजा लुटते आहे. तर सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय सेनेने घ्यायचा आहे असे अजितदादा, सुप्रियासह विविध पवार मंडळींनी अनेकदा आवाहन करून झालेले आहे. विभाजित युतीचा पालिका निवडणूकीत भाजपाला कितीसा फ़टका बसतो, यावर पुढल्या खेळी खेळल्या जाणार आहेत. तेव्हाच उत्तरप्रदेश या महत्वाच्या विधानसभा निवडणूका ऐन रंगात येणार असल्याने भाजपा श्रेष्ठींना महाराष्ट्राकडे बघायला वेळही कमी असणार आहे. म्हणून म्हटले या घडामोडींनी महाराष्ट्राच्या राजकीय चाव्या पुन्हा पवारांच्या हवाली केल्या आहेत.

2 comments:

  1. पवार साहेब अशा प्रकारचं राजकारण करतात हे तर त्यांचा इतिहास सांगतोच. अनेकदा दोन होड्यांवर पाय ठेऊन बुडणार्‍या होडीवरील पाय अखेरच्या क्षणी काढून घेऊन काठापर्यंत पोचणे हा राजकीय चतुरपणा पवार साहेब दाखवतात. पण अशा भानगडी केल्यानेच त्यांच्यासारख्या क्षमता असलेल्या नेत्यावर मराठी माणूसही कधी पुर्णपणे विश्वास ठेऊ शकला नाही तर दिल्ली दूरच आहे. जरा विश्वासार्हता बाळगून राखून राजकारण केलं असतं तर महाराष्ट्रातील मराठी माणूस दिल्लीतील सर्वोच्च पदावर विराजमान झाला असता. असल्या काटा-काटीच्या राजकारणामुळेच पवार यांच्या पक्षाची अवस्था बिकट आहे.
    खडसे प्रकरण हे पुढे भाजपाला जड जाणार यात शंका नाही. भाजपकडे किरीट सोमय्या सारखे न्यायालय मंत्री ह्या प्रकरणात गप्प का होते? नागपूरच्या विद्यापीठातून नैतिकतेच्या पदव्या घेतलेले भाजप नेते दुसर्‍यांचा भ्रष्ट-आचार दिसला की गल्ली ते दिल्ली ओरडत सुटतात अन स्वतःच्या पक्षावर वेळ आली की बिळात लपतात. खडसे, तावडे, पंकजा मुंडे, मुंबईचा पांडे, लोढा, येडियूरप्पा वगैरे लोकांच्या कृत्याकडे नैतिकतेचे महामेरू मौन का धारण करतात? बर, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी खडसेंचा नैतिकतेच्या आधारे राजीनामा घेणे म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे. कारण हेच अमित शाह स्वतःच्या राज्यातून विविध आरोपांमुळे तडीपार होते. मध्यंतरी किरीट सोमय्या नी वांद्र्याच्या पीए चा उल्लेख केला होता... ते कदाचित खडसेंच्या पीए बद्धल तर बोलत नव्हते न याची माहिती घेतली पाहिजे.
    पवार साहेब अन खडसेंना भविष्यातील 'गेट टुगेदर' साठी शुभेच्छा!!!

    ReplyDelete
  2. Exactly BJP in mess with the lot of hassles...... Will Nitin Gadkari will be CM.

    ReplyDelete