Monday, June 20, 2016

शिवसेनेला पवारांचा सल्ला



नुकताच राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा स्थापनादिन मोठ्या थाटामाटात पार पडला. मुंबईच्या भव्य षण्मुखानंद सभागृहात हा सोहळा पार पडला. त्यात बोलताना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांपेक्षा शिवसेनेला मार्गदर्शन करण्याचा उदारपणा दाखवला. सत्तेत शिवसेना सहभागी झालेली असली, तरी भाजपा आणि सेना यांच्यातला कलगीतुरा अखंड चालू असतो. सत्तेतली शिवसेनाच भाजपाच्या सरकारवर सतत टिकेची झोड उठवत असते. त्यासाठीच अशा नालायक भाजपा सरकारमध्ये राहू नका, हा पवारांचा सल्ला आहे. ज्येष्ठ नेता म्हणून तो सल्ला दिलेला आहे आणि सेनेने त्याचा विचार करायला हरकत नाही. पण हाच सल्ला शिवसेनेला देण्यापुर्वी दस्तुरखुद्द पवारांनी आपल्याच बाबतीत तो कशाला अंमलात आणला नव्हता, असाही प्रश्न साहेबांना विचारायला हरकत नसावी. दोनच वर्षापुर्वी राज्यात कॉग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे संयुक्त सरकार सत्तेत होते आणि आज उद्धव ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणावर तोफ़ा डागतात, तशाच तोफ़ा खुद्द पवार साहेब डागत होते. एकदा तर पवार इतक्या टोकाला गेले होते, की त्यांनी सरकार म्हणजे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाताला लकवा मारला आहे काय, असा सवाल खुलेआम विचारला होता. कारण पृथ्वीराज अनेक फ़ायलींवर सह्याच करीत नाहीत, म्हणून मोठमोठी कामे अडून पडल्याच्या तक्रारी होत्या. पृथ्वीराज सह्या कशाला करीत नव्हते, हा विषय स्वतंत्रपणे मांडावा लागेल इतका गहन आहे. पण तेव्हा तेही सरकार पवारांना नाकर्ते म्हणजे ‘पक्षाघात’ झाल्यासारखे वाटत होते आणि त्यांनी तसे बोलून दाखवले होते. मग त्या नालायक सरकारमधून बाहेर पडण्याचा सल्ला त्यांनी आपल्याच पुतण्याला कशाला दिलेला नव्हता? तेव्हा जी अडचण साहेबांची होती, तीच आज उद्धव ठाकरे यांची असेल ना? मग आपल्याला पाळणे शक्य नसलेले सल्ले दुसर्‍यांना द्यावेच कशाला?

या निमीत्ताने आणखी एक प्रश्न पडतो. जे सरकार नालायकांचे आहे असे उद्धवप्रमाणेच पवार साहेबांनाही वाटते, असे सरकार सत्तेत येण्यासाठी दिड वर्षापुर्वी पवारच कशाला उतावळे झालेले होते? आक्टोबर २०१४ मध्ये विधानसभेचे निकाल स्पष्ट झाले नव्हते. पण भाजपाचे बहूमत हुकणार हे स्पष्ट झाले होते. मग विनाविलंब पवार यांनी आपला भाजपाला बिनशर्त पाठींबा जाहिर केला होता. जणू भाजपाचे नालायक ठरणारे सरकार स्थापन करण्याची घाई भाजपा नेत्यांपेक्षा पवारांनाच झालेली होती. अर्थात भाजपाने उघडपणे पवारांचा पाठींबा घेतला नाही. एकट्यानेच सत्तेसाठी भाजपाने दावा केला आणि बहूमत सिद्ध करताना तारांबळ झाल्यावर शिवसेनेशी जुळते घेऊन सत्तेचा सौदा सेनेशीच केला. मग दोनच महिन्यात पवारांनी पक्षाच्या चिंतन शिबीरात भाजपा सरकार टिकवणे ही आपली जबाबदारी नसल्याचे सांगून टाकले. निकाल लागताना मध्यावधी निवडणूका नकोत म्हणून त्यांनी भाजपाला पाठींबा जाहिर केला होता. पण दोनच महिन्यात सरकार पडले तरी वाचवणार नाही म्हणत पवार मध्यावधीला तयार झाले होते. विचारलेले वा मागितलेले नसताना सल्ले वा पाठींबे देण्यातली पवार साहेबांची ही तत्परता मोठी चमत्कारीक आहे. तेव्हा भाजपाने पाठींबा मागितला नाही, तरी पवार तो देऊन मोकळे झाले. आता शिवसेनेने वा उद्धवनी सल्ला मागितलेला नाही, तरी पवार साहेब नालायकांची साथ सोडण्याचा सल्ला देतच आहेत. म्हणून प्रश्न असा पडतो, की दोन वर्षापुर्वी हेच नालायक सरकार स्थापन करण्यासाठी पाठींबा देण्याचा उतावळेपण पवारांनी कशासाठी केला होता? तेव्हा गुणी असणार वाटलेला भाजपा, आज अकस्मात नालायक कशापायी ठरला आहे? की भुजबळ गजाआड जाऊन पडलेत, त्यांना सोडवण्याच्या चिंतेने पवारांना ग्रासले आहे काय? ह्या सल्ल्यामागची नेमकी प्रेरणा काय?

हा सल्ला पवारांनी स्थापनादिनाच्या सोहळ्यात दिलेला आहे. तो मुळचा स्थापना सोहळा किती लोकांना आठवतो? तेव्हा पवारांना सोनिया गांधी परदेशी नागरिक आहेत असा शोध लागला होता. म्हणूनच त्यांच्या हाती देशाची सत्ता जाऊ नये, अशी त्यांची मागणी होती. तसा सल्ला त्यांनी मुळातच कॉग्रेस कार्यकारीणीला दिलेला होता. तो मानला जाण्यापेक्षा पवारांचीच कॉग्रेसमधून हाकालपट्टी झाली. म्हणून त्यांनी पर्यायी पक्ष स्थापन केला. तोच तो राष्ट्रवादी कॉग्रेसचा स्थापनादिन होय. पवारांचा सल्ला कोणी जुमानत नाही आणि सल्ला त्यांच्यावरच उलटतो, हा त्यातला अनुभव आहे. अर्थात आरंभी सोनियांसह अन्य कुणा मोठ्या कॉग्रेस नेत्यांने पवारांचा सल्ला मानला नाही आणि काही महिन्यातच पवारांनीही त्याकडे पाठ फ़िरवली होती. पाच वर्षांनी पवारांनी तोच सल्ला चक्क पायदळी तुडवून सोनियांना पंतप्रधान करण्यापर्यंत मजल मारली होती. पण सोनियांनी तोही धोका पत्करला नाही. थोडक्यात पवारांचा सल्ला फ़ेटाळण्यातूनच ज्या पक्षाची स्थापना झाली, त्याला राष्ट्रवादी कॉग्रेस म्हणून ओळखले जाते. अशा पक्षाच्या स्थापनेचे मुंबईतील भव्य आयोजन नियोजन कोणी केले होते? छगन भुजबळ त्या स्थापना सोहळ्याचे यजमान होते. विधान परिषदेत पवार गटाचे नेतृत्व करणारे भुजबळ तेव्हा या नव्या पक्षाचे महाराष्ट्रातील पक्षाध्यक्ष होते. म्हणूनच स्थापना सोहळ्याची जबाबदारी त्यांनीच उचलली होती. आता १७ वर्षांनी जो स्थापनादिन साजरा झाला, तेव्हा भुजबळ त्यात सहभागी नव्हते. कारण ते सध्या गजाआड जाऊन पडलेले आहेत. त्यांना सोडवून आणण्यात पवारसाहेब अपेशी ठरले आहेत. पण त्याची साधी आठवणही कोणाला उरलेली नाही. सात वर्षापुर्वी असाच स्थापनादिन सोहळा त्याच षण्मुखानंद सभागृहात पार पडला होता आणि तेव्हा भुजबळांनाच सावधानतेचा सल्ला देण्याची वेळ पवारांवर आलेली होती.

तेव्हा म्हणजे २००९ साली भुजबळ आजच्या सारखेच सत्तेला पारखे झालेले होते. त्यांना मंत्रीपद सोडावे लागले होते. तेलगी नावाचा एक घोटाळा तेव्हा खुप गाजत होता. त्यात भुजबळांवर बालंट आलेले होते. त्यावरून भुजबळ बावचळले होते. त्यावरून एका वाहिनीने विडंबन केलेले होते. त्यावर प्रतिक्रीया देताना पत्रकार परिषदेत भुजबळांनी चपलेने मारीन, अशी धमकी दिली आणि त्यांना महागात पडली होती. त्यानंतर भुजबळ पक्षातच एकाकी पडले होते आणि ते राष्ट्रवादीला रामराम ठोकून ओबीसी पिछड्यांचे राजकारण करण्यासाठी बहूजन समाज पक्षात जाणार अशी वदंता होती. त्यांचे नाव घेतल्याशिवाय त्या स्थापनादिन सोहळ्यात पवारांनी भुजबळांनाही सल्ला दिला होता. निवडणूकांचा मोसम आला, मग काही लोक पक्षांतराच्या आहारी जातात, असे विधान पवारांनी त्या सोहळ्यात केलेले होते. आज त्याच भुजबळांना तुरूंगात पाठवल्याबद्दल पवार संताप व्यक्त करीत होते. काळ किती बदलतो आणि त्यानुसार बुद्धीमान धुर्त राजकारण्यांनाही कसे रंग बदलावे लागतात ना? पवार अशा बदलत्या काळाचे व रंगाचे राजकारणातील प्रतिक होऊन राहिले आहेत. मजेची गोष्ट अशी, की त्यांनी जे बारामतीत काम केले आहे, त्याचे कौतुक पंतप्रधानांसह अर्थमंत्री अरूण जेटलीही बारामतीत येऊन करतात. उलट पवार मात्र त्याच सत्ताधार्‍याला नालायक म्हणतात. त्यांच्यापासून मतदाराला सावधानतेचे इशारे देतात. भाजपाच्या सहकारी पक्षाला नालायकांची साथ सोडून बाहेर पडायचे सल्ले देतात. असे सल्ले देण्यापेक्षा आपण नेमके काय करावे, म्हणजे आपले राजकीय डावपेच यशस्वी होतील, याकडे पवारांनी लक्ष दिले तर अधिक लाभदायक ठरेल ना? राज ठाकरे यांनी पवारांवर केलेले एक विधान आठवते. ते आपल्या घरातल्यांना सल्ले आमच्या नावाने कशाला देतात, ते समजत नाही, अशी मल्लीनाथी राजनी एकदा केलेली होती. लहान असला तरी राजच्या सल्ल्याचा विचार पवारांनी करून बघावा.

2 comments:

  1. क्रिया करण्याचा काळ संपला आता प्रतिक्रिया देण्याचा काळ आला .काही दिवसांनी प्रतिक्रियाही विचारली /छापली /ऐकली जाईल की नाही कोण जाणे

    ReplyDelete
  2. कुत्तेकी पूंछ हमेशा टेढ़ी रहती हैं

    ReplyDelete