Thursday, June 2, 2016

सोहळे आणि सुतकाची गोष्ट



आपल्या सरकारची दोन वर्षे पुर्ण झाली, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतल्या एका भव्य समारंभात नव्या सरकारच्या योजना व घोषणांचे प्रदर्शन मांडले. त्यात अमिताभपासून अनेक कलावंतांचा सहभाग आहे. त्यावरून कॉग्रेसने गदारोळ माजवण्याचा प्रयास केला. मात्र त्याला फ़ारसा प्रतिसाद मिळू शकला नाही. तेव्हा खुद्द सोनिया गांधी मैदानात आल्या आणि त्यांनी मोदी हे एका देशाचे पंतप्रधान असून शहेनशहा नाहीत, असा साक्षात्कार माध्यमांना घडवला. देशात दुष्काळ व शेतकर्‍यांची दुर्दशा असताना मोदी कसला सण साजरा करीत आहेत, असाही खडा सवाल सोनियांनी विचारला. पण त्याच्याही पुढे जाऊन या देशात असे यापुर्वी कधी झाले नसल्याची ग्वाही दिलेली आहे. मग काय मोदी विरोधातील ब्रिगेडला अकस्मात देशातली गरीबी व दुष्काळ दिसू लागला तर नवल नव्हते. पण त्याच गर्दीत कोणा पत्रकाराने सोनिया गांधींना नको असलेला प्रश्न विचारून ‘जावईशोध’ लावला. रॉबर्ट वाड्रा हे सोनियांचे लाडके जावई आहेत आणि त्यांनी लंडनमध्ये भव्य आलिशान घर खरेदी केल्याची भानगड समोर आलेली आहे. पण ती भानगड मोदी सरकारने आणलेली नसून, कुठल्या वृत्तवाहिनीनेच समोर आणलेली आहे. सरकारने सोनियांच्या जावयाविषयी कुठला आरोप केलेला नाही, की त्याची चौकशी चालविलेली नाही. दुसर्‍याच एका तपासकामात अकस्मात सोनियांच्या जावयाचे ‘पाय पाळण्यात’ हलताना दिसले, अशी ही भानगड आहे. त्याचा गवगवा सरकारने केलेला नसून माध्यमांनी केलेला आहे. तर त्या संबंधित प्रश्नाने सोनियांनी विचलीत व्हायचे काही कारण नव्हते. कारण त्यांचा जावई राजकीय व्यक्ती नाही, की कॉग्रेसचा कोणी नेता सदस्य वगैरे नाही. मग सोनियांनी चवताळण्याचे कारणच काय? दुध का दुध पानी का पानी, अशी भाषा सोनियांनी कशाला करावी? त्यासाठी मोदींच्या समारंभाला शहेनशाही ठरवण्याची मल्लीनाथी कशाला करावी?

लोकशाहीत सत्ताधार्‍यांना विरोधकांनी जाब विचारावा, हे ओघाने आले. पण शहेनशहा ही भाषा कुठून आली? पंतप्रधान हा शहेनशहा नाही, असे सोनियांना कशाला म्हणावे लागले? मोदी हा सामान्य घरातून आलेला उमेदवार आहे आणि तो कितीही उच्चपदावर आरूढ झाला, म्हणून त्याने शहेनशहा असल्यासारखे वागू नये, असाच आग्रह सोनियांचा दिसतो. मग शहेनशहा बादशहाप्रमाणे कोणी वागावे किंवा जगावे, असे सोनियांचे म्हणणे आहे? त्यांचा जावई रॉबर्ट वाड्रा कुठल्या खानदानातून अवतरला आहे? त्याची जीवनशैली सामान्य माणसाची आहे काय? त्यासाठी उधळला जाणारा पैसा कुठून येतो? त्याचे उद्योग काय आहेत? कुठून इतकी खर्चिक जीवनशैली हा जावई जगु शकतो? त्याचाही खुलासा सोनियांनी करायला हरकत नव्हती. त्याविषयी वारंवार प्रश्न विचारले गेले आहेत. पण सोनियांनी वा जावयाने त्याचे उत्तर कधीही दिलेले नाही. नवनव्या महागड्या गाड्या वहाने खरेदी करून मौजमजा करणारा तो जावई, शहेनशहा आहे काय? सोनिया वा राहुल यांच्यासह त्यांचे आप्तस्वकीय शहेनशहा नसतील, तर त्यांच्यावर होणारा खर्च कशासाठी होत असतो? त्यांच्याच खानदानाच्या नावे देशातील बहुतांश स्मारके व वास्तु कशाला असतात? त्याला काय म्ह्णायचे? ॠषिकपूर नावाच्या माणसाने असाच एक प्रश्न विचारला होता. संजय गांधी यांचे देशासाठी समाजासाठी कोणते योगदान आहे, की त्यांच्या नावाने अभयारण्य असावे? त्यांच्या नावाने अनुदानाची खिरापत वाटणारी योजना शहेनशाही नव्हती काय? की सोनियांना एक सामान्य घरातला माणूस पंतप्रधानपदी आरूढ झाल्याची पोटदुखी सतावते आहे? दिल्ली ही नेहरू-गांधी खानदानाची मालमत्ता आहे आणि तिथे सत्तेवर बसणारा शहेनशहा त्याच खानदानात जन्मलेला असावा. त्यांच्याच आशीर्वादाने बसलेला असावा, असा आग्रह आहे काय? शहेनशहा ही उपाधी आली कुठून?

तीनचार वर्षापुर्वी दिल्लीत निर्भयावर सामुहिक बलात्कार झाल्याने लोक रस्त्यावर उतरले होते. सर्वत्र प्रक्षोभ माजला होता. तेव्हा जयपूरमध्ये राहुल गांधी यांचा कॉग्रेस उपाध्यक्ष म्हणून राज्याभिषेक साजरा करण्यात आला होता. त्यांना दिल्लीतल्या प्रक्षोभाचे घेणेदेणे होते काय? तेव्हा देशातला शेतकरी गुण्यगोविंदाने नांदत होता आणि गरीब घरावर सोन्याची कौले घालण्यात दंगला होता, असे सोनियांना म्हणायचे आहे काय? आपल्याच पंतप्रधान व सरकारच्या मंत्रीमंडळाने संमत केलेला अध्यादेश पत्रकार परिषदेत जाहिरपणे फ़ाडून टाकण्याचा उद्योग करण्याला शहेनशाही शहाजादा म्हणतात की लोकशाहीचा पूजक म्हणतात? आपल्या सुपुत्राने देशातल्या लोकशाहीचे अशी लक्तरे केली आणि पंतप्रधानाची जगभर नाचक्की केली, तेव्हा सोनियांना लोकशाही आठवली नव्हती की दोन शब्द बोलायची गरज वाटली नव्हती. कारण राहुल हे बाळ त्यांच्या शाही खानदानात जन्मलेले आहे. त्याने कुणालाही लाथा मारल्या तरी ती लोकशाही असते. पण बहूमत मिळवून पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदींनी दोन वर्षाचा कालखंड पुर्ण केल्यावर आपल्या योजनांची प्रसिद्धी समारंभातून करणेही सत्तेचा माज असतो. किती चमत्कारीक तुलना आहे ना? पंतप्रधान असून जो माणूस आपल्या आप्तस्वकीयांना सरकारी निवासात वास्तव्य करू देत नाही, तो शहेनशाही माज असतो. आणि ज्या देशाचे नागरिकत्वही घेतलेले नाही, त्या देशाच्या पंतप्रधान निवासात कित्येक वर्षे सून म्हणून वावरणार्‍या सोनिया लोकशाहीवादी असतात. शब्दांना आपले काही अर्थ तरी शिल्लक उरलेत काय? बेशरमी किती उजळमाथ्याने चालली आहे ना? दोन वर्षाचा कारभार साजरा करण्यासारखे आहेच काय, असा प्रश्न सोनियांना पडणे स्वाभाविक आहे. दहा वर्षात त्यांनी इतके घोटाळे व अफ़रातफ़री करून ठेवल्या आहेत, की तसे काहीही करू शकले नाहीत, त्या मोदींचे कर्तृत्व शून्यच म्हणायचे नाही का?

साजरे काय करावे तर घोटाळे करावेत. कलमाडी राजा यांच्यासारखे बेछूट घोटाळे करून जनतेच्या अब्जावधी रुपयांची राजरोस लूट करणे ज्यांना साधत नाही, ते समारंभ कसले साजरे करतात? मुंबई भेटीला आलेल्या राहुल गांधींचे जोडे घेऊन त्यांच्यामागे पळणारे रमेश बागवे नावाचे मंत्री किंवा राहुलच्या प्रतिक्षेत विक्रोळी येथे दोनतीन तास ताटकळत बसणारे मुख्यमंत्री अशोक चव्हाण आठवतात? अशी हुजर्‍यांची फ़ौज पदरी बाळगता येत नाही, त्या मोदींना शहेनशहा म्हणून मिरवण्याचा अधिकार असूच कसा शकेल? अमेथीमध्ये प्रचाराला गेलेल्या प्रियंकाच्या टिफ़ीनची उठाठेव करण्याची क्षमता असलेले सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री नेमण्याचा रुबाब सोनियांपाशी असतो. तितकी गुणवत्ता असलेले लोक ज्याच्या पदरी नाहीत, त्याने शहेनशहा असल्यासारखे आपल्या सत्तेचे सोहळे साजरे करणे गैरलागू नाही काय? सोनियांचा दावा समजून घेतला पाहिजे. आपल्याला त्यांची लोकशाही संकल्पना मान्य नसेल, पण त्या कॉग्रेसच्या अध्यक्षा आहेत. म्हणूनच त्या पक्षाची लोकशाही समजून घेणे आवश्यक आहे. जिथे लाचारांची फ़ौज जमा होऊ शकते आणि श्रेष्ठींसमोर नतमस्तक होऊन उभी राहू शकते, त्याला लोकशाही म्हणतात. महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसने परक्या राज्यातील उमेदवार नको असा ठराव संमत केला असताना, त्यांच्या माथी चिदंबरम राज्यसभेचा उमेदवार म्हणून मारला जातो, त्यापुढे शरणागत होण्याला लोकशाही म्हणतात. कार्यकर्ता व संघटनेचे मत विचारात घेऊन सामुहिक निर्णय घेण्य़ाला शहेनशाही म्हणतात. ह्या नव्या व्याख्या समजून घेतल्या तर सोनिया योग्यच बोलत असल्याचे आपल्या लक्षात येऊ शकेल. सोहळे समारंभ पराभवाचे व अपयशाचे साजरे करायचे असतात. विजय किंवा यशाचे सुतक पाळायचे असते. इतकेही भाजपा वा मोदींना कळत नसेल, तर बिचार्‍या सोनियांना समोर येऊन त्यामागचे प्रयोजन समजावणे भाग पडते ना?

6 comments:

  1. वा. भाऊ. मस्त.

    ReplyDelete
  2. Shaljoditil jode uttam
    Lekh atishay chintaniy

    ReplyDelete
  3. मस्त भाऊ पण सोनिया गाँधी बरोबर आहेत शहंशाह गांधीच होऊ शकतात माहित नाहीका?

    ReplyDelete
  4. एकामागून एक किती लेख लिहणार आहात?
    अति होतयं हे आता! एखाद्या पत्रकाराला अशी बायस भूमिका शोभत नाही,हे मान्य कि काँग्रेस सरकार नालायक होतं,देश विकून खायला कमी नाही करणार ते,
    म्हणून किती धोपटणार मोदीविरोधकांना?त्याला काही
    लिमिट?

    ReplyDelete
    Replies
    1. नावाप्रमाणे "खवीस"
      भाऊंनी सांगितलेला वैधानिक इशारा वाचलास का नाही तू,
      "कुठल्याही व्यक्ती, संघटना, विचार वा भूमिकेच्या दावणीला ज्यांची बुद्धी बांधलेली आहे; त्यांच्या मानसिक आरोग्याला हा ब्लॉग वाचणे अपायकारक असू शकते."
      इथे तुझे मत जरूर मांड...पण कोणी काय भूमिका घ्यावी, कशी घ्यावी, कधी घ्यावी हे सांगायला नको बर...

      Delete
  5. काँग्रेस-मोदिविरोधक कितीही दुष्टबुद्धीने वागले तरी चालेल.
    आता त्याना हे एकच कार्य शिल्लक आहे.
    पण सामान्य माणुस व पत्रकार यांनी मर्यादेचे उलंघन करायचे नाही.
    विशेषत: काँग्रेसी नादानणा जगापुढे मांडायचा नाहीं.

    इती कुबड्या खवीस.

    ReplyDelete