Monday, June 27, 2016

पेशवे, छत्रपती आणि जाणता राजा




कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी राजे यांची राज्यसभेत नेमणूक झाल्यापासून बर्‍याच उलटसुलट राजकीय प्रतिक्रीया आलेल्या आहेत. त्या अपेक्षितच होत्या. कारण त्यांची नेमणूक भाजपा सरकारने केली आहे आणि त्यांची राजकीय पार्श्वभूमी राष्ट्रवादी कॉग्रेसची आहे. यापुर्वी एकदाच त्यांनी निवडणुक लढवली आणि ती राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फ़े! त्यांचा कोल्हापूरातच पराभव झाला होता. पण त्यांची वर्णी नंतर अन्य मार्गाने राज्यसभेत करण्यात काही अडचण असण्याचे कारण नाही. पण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तसे काही केले नाही. कोल्हापूरात निवडून येण्याची शक्यता असल्याने छत्रपतींना उमेदवारी देण्यापुरता उपयोग जाणत्या राजाने करून घेतला होता. पण तसा काही उपयोग झाला नाही. मग नंतरच्या काळात सातार्‍यात तिथले छत्रपतींचे वारस उदयन राजे स्वबळावर लोकसभेला उभे रहाणार होते, तर त्यांनाच पक्षाची उमेदवारी बहाल करण्याचे औदार्य पवारांनी दाखवले होते. अन्यथा उअदयन राजे उभे राहून निवडून आले असते नसते, तरी त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला नक्कीच धुळ चारली असती. म्हणून आपले तात्कालीन (१९९९ सालात निवडून आलेले खासदार) बाजूला सारून उदयन राजेंना राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेली होती. मात्र तितके औदार्य संभाजी राजांच्या बाबतीत पवारांनी कधी दाखवले नाही. म्हणजे असे, की दर दोन वर्षांनी राज्यसभेची एक जागा तरी राष्ट्रवादीच्या वाट्याला येत होती. पण तिथे संभाजी राजांना संधी देण्याची सुबुद्धी साहेबांना कधी झाली नव्हती. थोडक्यात पवारांनी त्यांना खड्यासारखे बाजूला टाकलेले होते. आता त्यांना राष्ट्रपतींच्या यादीतून भाजपाने नेमणूक दिल्यावर पवारांची प्रतिक्रीया म्हणूनच महत्वाची ठरते. त्यातच ती खोचक म्हणावी अशा शब्दातली असल्याने, तिची दखल घेणे भाग आहे. या संदर्भात कोल्हापूरात आलेल्या पवारांनी काय मल्लीनाथी केली?

‘पेशव्यांकडून छत्रपतींची नेमणूक पहिल्यांदाच होत आहे’, असे साहेबांचे शब्द आहेत. अर्थात त्याला पवारांचा मिश्कीलपणा म्हणून सारवासारव केली जाणार हे उघड आहे. पण जे कही साहेब बोललेत, त्यात मिश्कीलपणा अजीबात नसून, ती मनातली मळमळ नक्कीच आहे. आपण हे करू शकलो नाही, ही बोचरी जाणिव त्यामागे असावीच. कारण गेल्या सोळासतरा वर्षात राष्ट्रवादीने अनेकांना राज्यसभेत पाठवले आहे. त्यात आपण छत्रपती संभाजी राजांना पाठवू शकलो नाही, याची वेदना की कबुली यात असेल? जे काम आपण ग्रेट वा स्ट्रॉंग ‘मराठा’ म्हणून खुप पुर्वी़च करायला हवे होते, ते देवेंद्र फ़डणवीस यांच्यासारख्या कोवळ्य़ा पोराकडून व्हावे, याची पोटदुखी म्हणायची की मळमळ? हे काम करण्यापासून साहेबांना कोणी रोखले होते काय? नसेल तर इतके टोकाचे भाष्य कशासाठी? अर्थात त्याला जातीचा संदर्भ आहेच, त्यात पेशवे हा उल्लेख फ़डणवीसांची जात अधोरेखीत करण्यासाठी आहे. पेशवे ब्राह्मण होते म्हणून प्रत्येक ब्राह्मण पेशवाच म्हणायचा, ही स्टाईल पवारांनी खुप पुर्वीपासून प्रस्थापित केलेली आहे. मनोहरपंत हे आपले जीवलग मित्र मुख्यमंत्री असतानाही पवारांनी हेच शब्द अनेकदा उच्चारलेले आहेत. तेव्हा आज फ़डणवीसांचा उल्लेख पेशवे म्हणून सहजगत्या व ओघाने झालेला नाही. त्यातून एक संकेत पाठवण्याचा पवारांचा प्रयास आहे. पेशवाईच्या काळात मराठेशाहीची सत्ता व्यवहारात पुर्णपणे पेशव्यांच्या हाती गेलेली असली, तरी त्यांना पेशवाईची वस्त्रे छत्रपतींकडूनच घ्यावी लागत. म्हणजेच पेशवाईचा सत्ताधीश हा छत्रपतींकडून नेमला जाई. पण पेशवे सत्ताधीश असूनही कधी त्यांच्या पसंतीचा छत्रपती नेमला जाऊ शकला नव्हता. थोडक्यात छत्रपती पेशवा नेमू शकतात. पण पेशव्याला छत्रपतीची नेमणूक करण्याचा अधिकार नाही, असे जाणत्या राजांना या निमीत्ताने सांगायचे व सुचवायचे आहे.

इथवर आले, मग त्याच तर्काने पवारांच्या त्या ‘मिश्किल’ विधानाचा समाचार घेणे भाग आहे. पेशव्यांनी छत्रपतीची नेमणूक पहिल्यांदाच केली, ह्या विधानामागचा तर्क कोणता? संभाजी राजे हे जन्मत: वारसा हक्काने छत्रपती आहेत. त्यांची कोणी अन्य कुठल्याही पदावर नेमणूक करू शकतो. पण छत्रपती म्हणून कुणाचीही नेमणूक करण्याचा कोणालाही अधिकार नाही. म्हणूनच छत्रपतींची पेशव्यांनी प्रथमच नेमणूक केली, हा तर्क नसून तर्कदुष्टता आहे. संभाजी राजे यांची छत्रपती म्हणून कोणी नेमणूक केलेली नसून, राज्यसभेचे सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. ती करण्यामागे भले मुख्यमंत्री फ़डणवीस यांची प्रेरणा वा प्रयास असू शकतील. पण राज्यसभेत कुणालाही फ़डणवीस नेमू शकत नाहीत. तो अधिकार मुख्यमंत्र्याला कोणी दिलेला नाही, किंवा राज्यघटना त्याला मंजुरी देत नाही. म्हणूनच कुठल्याही तर्काने छत्रपती संभाजी राजेंची नेमणूक पेशव्यांनी करण्याचे तर्कशास्त्र गैरलागू आहे. मात्र नुसते गैरलागू नसून, त्यातून जातीय भावनांना खतपाणी घालण्याचे पाप पवार करीत आहेत. काही वर्षापुर्वी राजू शेट्टी यांच्याही बाबतीत असे़च जातीय विधान पवारांनी केलेले होते. शेट्टी ऊस दरासाठी साखर कारखाने बंद पाडत असताना, ते मराठ्य़ांच्या हाती असलेल्या कारखान्यांनाच टाळी लावत आहेत आणि वैश्य समाजाच्या हाती असलेलेल कारखाने जोमाने चालू आहेत, असे पवारांनी एका सभेत खुलेआम बोलून दाखवले होते. इथेही तोच संदर्भ आहे. मिश्कीलपणा म्हणून त्याकडे काणाडोळा करता येणार नाही. की ज्यांनी संभाजी राजे यांची राज्यसभेवर नियुक्ती केली, त्यांच्यावरच पवार यांचा रोख आहे? ती नेमणूक राष्ट्रपती प्रणबकुमार मुखर्जी यांनी केली आहे आणि योगायोगाने तेही बंगाली असले, तरी ब्राह्मणच आहेत. मग पेशवाई आजकाल बंगाली ब्राह्मणांकडे गेली आहे, असे पवारांना सुचवायचे आहे काय?

जाणता राजा बोलले ते एकच वाक्य असले, तरी त्याचे किती पदर आहेत आणि त्यात किती संकेतांच्या छटा दडलेल्या आहेत, त्याचा म्हणूनच उहापोह करावा लागतो. मुखर्जी यांनीच अशी नेमणूक केली असेल, तर ते काम इतक्या उशिरा होण्याचे काही कारण नव्हते. दिर्घकाळ प्रणबदा पवारांचेच सहकारी मंत्री होते आणि दोन वर्षे तरी केंद्रीयमंत्री असताना पवारही ही नेमणूक करून घेऊ शकले असते. जिथे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची नेमणूक झाली, तिथे संभाजी राजेंची नेमणूक पवारही घडवून आणू शकले असते. पण त्यांनी राष्ट्रवादीकडून या खर्‍या छत्रपतींना राज्यसभेची उमेदवारी दिली नाही, की राष्ट्रपतींकडून त्यांची नेमणूक व्हावी म्हणून पुढाकारही घेतला नाही. सहाजिकच पेशव्यांनी छत्रपतींना नेमण्याच्या तर्काचा विस्तार कसा होऊ शकतो? पवारांनी आपल्या जमान्यात लक्ष्मणशास्त्री जोशी किंवा अनेक ब्राह्मणांच्या सत्तापदी नेमणूका केल्या. ते पेशवे होते आणि नेमणूका करणारे म्हणून पवार छत्रपती होते काय? ब्राह्मणाच्या महत्पदावर आपण नेमणूका केल्याने आपण जाणता राजा आहोत असे त्यातून सुचवायचे आहे काय? किंवा आणखी एक तर्क लढवता येतो. संभाजी राजेंकडे साफ़ दुर्लक्ष करून तारीक अन्वर किंवा मजीद मेमन अशा नेत्यांना पक्षातर्फ़े राज्यसभेवर पाठवणारे पवार; शाहिस्तेखान किंवा अफ़जल खानांच्या नेमणूका करीत होते काय? कुठलेही संदर्भ जोडून विधाने करताना त्याचे पर्यवसान कशात होईल, याचे भान इतक्या राजकीय ज्येष्ठतेनंतर ठेवता येत नसेल काय? की लोकांना हसवण्यासाठी वा राजकीय थिल्लरपणासाठी अशी विधाने करायची असतात? छत्रपती म्हणून संभाजी राजे यांचा व त्यांच्या वारश्याचा आपण अवमान करीत आहोत, याचे तरी भान असायला नको काय? कारण अशी विधाने अ‘जाणता’ नसतात. पवार तर कुठलीच गोष्ट अजाणतेपणी करीत नाहीत, असे म्हटले जाते ना?

14 comments:

  1. मुख्यमंत्री फडणीसांचे जागी दलित मुख्यमंत्री असते तर साहबांनी हाच तर्क मांडला असता काय? की साहेबांना आधुनिक राजकीय व्यवस्था मान्य नाही ?

    ReplyDelete
  2. मुख्यमंत्री फडणीसांच्या जागी दलित मुख्यमंत्री असते तर साहेब असे म्हणाले असते काय ? की साहेबांना आधुनिक राजकीय व्यवस्था मान्य नाही?

    ReplyDelete
  3. चांगले विश्लेषण..
    फक्त एक बदल सुचवावासा वाटतो, 'वैश्य' शब्दाऐवजी 'जैन' शब्द असावा.

    ReplyDelete
  4. satta geli ya peksha fadanvis mukhymantri zale hi potdukhi ahe...

    ReplyDelete
  5. पवार म्हातारे झाले आहेत -- अजून किती दिवस स्वतः ला "जाणते" म्हणवून घेतील -- त्यांचे दिवस सरत आले आहेत, ह्यच हे एक उदाहरण :-)

    ReplyDelete
  6. छान भाऊ उत्तम निरीक्षण

    ReplyDelete
  7. भाऊ सलाम तुमच्या विचार शक्तिला

    ReplyDelete
  8. फक्त एक बदल सुचवावासा वाटतो, 'वैश्य' शब्दाऐवजी 'जैन' शब्द असावा????????

    ReplyDelete
  9. अतिषय समर्पक लिहलंत भाऊ...

    ReplyDelete
  10. shanyala shabdacha mar

    ReplyDelete
  11. महाराष्ट्रातल्या संधीसाधू राजकारण्यांची जेव्हा एखादी यादी तयार केली जाईल त्यात हा जाणता (की नेणता) राजा टॉपर असेल. मुळ मसाला केव्हाच संपलाय, आता ज्याची चावी त्याची ओवी !

    ReplyDelete
  12. लक्ष्मीकांत दडपेJune 26, 2017 at 5:26 AM

    परखड लेख. भाऊ, तुम्हीच हे नेटक्या शब्दात व्यक्त करू शकता. ग्रेट..!

    ReplyDelete
  13. जाणता राजा आहे असं म्हणून त्यांना अनावश्यक मान मिळाला आहे.आता तर त्यांना फार गांभीर्याने घेऊ नये असं सांगण्याची परिस्थिती आलीयं.

    ReplyDelete
  14. छान भाऊ अतिउत्तम...

    ReplyDelete