Thursday, June 2, 2016

भाजपातला ‘आदर्श’ खडसे



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला दोन वर्षे पुर्ण होत असताना भाजपाने केलेला सर्वात मोठा दावा होता भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा! पण महाराष्ट्रात त्यालाच तडा गेला. कारण त्या दुसर्‍या वाढदिवसाचे सूर हवेत विरून जाण्यापुर्वीच, ज्येष्ठ नेते व मंत्री एकनाथराव खडसे यांच्या विरोधातले वादळ घोंगावू लागले. आधी त्यांना थेट कराचीतून दाऊद इब्राहीमने फ़ोन केल्याची खळबळजनक बातमी आली आणि तिचा इन्कार होत असतानाच त्याचे कागदोपत्री पुरावे समोर आणले गेले. त्यावरून खुलासे दिले जात असताना, पुण्यानजिक भोसरी या औद्योगिक नगरीमध्ये करोडो रुपयांचा भूखंड खडसे यांनी आप्तस्वकीयांच्या नावाने बळकावल्याचा धक्कादायक आरोप सुरू झाला. यात गंमत अशी, की खडसे व भाजपाच्या प्रवक्त्यने एका आरोपाचा इन्कार करावा आणि दुसर्‍या दिवशी भक्कम पुरावे समोर आणले जावेत, अशा गतीने नाटक रंगले आहे. कोळ्याच्या जाळ्यात जसा किटक सुटायची धडपड करताना अधिकच गुरफ़टत जातो, तशी अवस्था खडसे यांची होऊन गेली आहे. दिड वर्षापुर्वी हेच गृहस्थ कुठल्याही आरोपासाठी सत्ताधार्‍यांचे राजिनामे मागत होते आणि खुलासे फ़ेटाळून लावत होते. आज त्यांच्याच पक्षाचे खासदार व माजी पोलिस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनाही त्याची लाज वाटते आहे. इतरांकडून सतत राजिनामे मागणार्‍या नाथाभाऊंनी विनाविलंब आत्मपरिक्षण करून राजिनामा द्यायला हवा. त्यातून राजकारणातला आदर्श निर्माण करायला हवा, अशी सिंग यांची मागणी आहे. पण खडसे यांना नवा आदर्श निर्माण करायची गरज वाटत नाही. बहुधा त्यांच्या मते पाच वर्षापुर्वी अशोक चव्हाणांनी ‘उभा’ केलेला ‘आदर्श’ पुरेसा आहे. म्हणूनच मग मुंबईतून खडसे तडकाफ़डकी जळगावला निघून गेले. तिथूनच त्यांनी सर्व सुत्रे हलवित भाजपात सुंदोपसुंदी असल्याचे चित्र निर्माण केले आहे.

तसे बघितले तर खडसे यांच्या एकूण कार्यपद्धतीत त्यांनी काहीही वेगळे केलेले नाही. विरोधी नेता म्हणून त्यांनी जे कर्तृत्व गाजवले होते, त्यानुसारच सत्तेत आल्यावर त्यांची कार्यशैली राहिलेली होती. गेल्या विधानसभा निवडणूकीत माजी गृहमंत्री, दिवंगत आर आर आबा पाटिल यांनी नाथाभाऊंच्या कार्यशैलीचे विश्लेषण जाहिर सभेतच केलेले होते. नाथाभाऊ विधानसभेत भ्रष्टाचारावर जीव तोडून बोलतात आणि रात्री बंगल्यावर फ़ायली घेऊन येतात, असे आबांनी कशासाठी म्हटले होते? खडसे विरोधी नेते असताना राज्यात प्रचंड भ्रष्टाचार झाला आणि त्यासंबंधी विधानसभेत गदारोळही खुप झाला. पण नाथाभाऊंनी कधी त्यावर अन्य आक्रमक आमदारांना बोलूही दिले नाही. खडसे यांच्या अशा विरोधी कार्यामुळे सत्ताधारी निर्वेधपणे गैरकारभार करत होते. त्यावर मनसेचे राज ठाकरे यांनी नेमके बोट ठेवले होते. विधानसभेत खडसे प्रत्येक वेळी वादाच्या विषयात उभे राहून इतका वेळ घेतात, की विरोधी आमदारांना कुठल्याच विषयावर बोलण्याची संधी मिळत नाही. अधिकाधिक वेळ खाऊन खडसे प्रत्यक्षात सत्ताधार्‍यांचा भ्रष्टाचार पठीशी घालतात, असा आक्षेप राजनी घेतला होता. अर्थात त्याची परतफ़ेडही राष्ट्रवादी कॉग्रेसने ऐन निवडणूकीत केलेली होती. मतदान विरोधात जाणार हे ओळखलेल्या राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांना भाजपात आणून पुन्हा निवडून आणायची व्यवस्था नाथाभाऊंनीच केली. इतक्या राष्ट्रवादी आमदारांना सामावून घेण्यासाठी शिवसेनेशी असलेली युती मोडण्याला पर्याय नव्हता. पण तितकी हिंमत भाजपाच्या अन्य कुणा नेत्यामध्ये नव्हती. ती हिंमत आपण दाखवली, अशी शेखी खडसे त्यांनी अनेकदा मिरवलेली आहे. पण ज्यांच्या संगतीत खडसे रमलेले होते, त्यांचा थोडाफ़ार तरी प्रभाव नाथाभाऊंवर पडणारच ना? मग भूखंड बळकावणे अपरीहार्य होत नाही काय? युती मोडण्यामागचे हेतू असे उघड होत आहेत.

खडसे यांच्या आजच्या भानगडी उकरून काढण्याच्या कामी माध्यमे लागली आहेत. पण असे आदर्श निर्माण करण्यासाठीच खडसे यांना राष्ट्रवादीचा पाठींबा हवा होता हे कोणी विसरायचे? खडसे यांनी पुरूषार्थ दाखवून ऐन मतदानाच्या दोन आठवडे अगोदर महाराष्ट्रातील दोन दशकांची युती मोडल्याचा इतिहास आज तपासून बघायला हरकत नसावी. तेव्हा नाथाभाऊंनी अन्य नेत्यांमध्ये धाडस नसताना युती मोडल्याची सिंहगर्जना केली होती. (त्यांचेच सहकारी मंत्री प्रकाश मेहता यांनी अलिकडे वाघची शिकार सिंह करतो असे काही तर्कट मांडले होते. त्यातला सिंह नाथाभाऊच नव्हेत का?) तर त्यांनी तेव्हा युती मोडल्याची सिंहगर्जना केली आणि विनाविलंब राष्ट्रवादीनेही कॉग्रेसशी असलेली आघाडी मोडीत काढली होती. मग फ़टाफ़ट राष्ट्रवादीच्या उसन्या उमेदवारांना भाजपात शुद्ध करून घेण्यात आले आणि आमदारकीची तिकीटे देण्यात आली. तितक्यावर राष्ट्रवादी खडसे युती थांबली नाही. आघाडी मोडताच नाथाभाऊंनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बहूमत गमावल्याचा दावा करून राजिनामा मागितला होता. त्याची तांत्रिकता पुर्ण करण्यासाठी अजितदादा राज्यपालांना भेटायला गेले व त्यांनी चव्हाण यांचा पाठींबा काढून घेत असल्याचे पत्रकच सादर केले होते. इतकी नाथाभाऊ व राष्ट्रवादी जवळीक झालेली होती. म्हणून तर चारपाच डझन राष्ट्रवादीचे नेते भाजपा उमेदवार होऊ शकले. तरीही बहूमत हुकले आणि जाणत्या राजांना त्यात हस्तक्षेप करावा लागला होता. निकाल पुर्ण व्हायच्या आधीच खुद्द शरद पवारांनी भाजपाला बाहेरून पाठींबा देत स्थीर सरकार बनवण्याचे आवाहन केले होते. आता इतकी जवळीक बारामतीशी केल्यावर आपले ‘भुजा-बळ’ वाढल्याचे साक्षात्कार झाल्यास नवल नाही. त्याप्रमाणे खडसे वागत गेल्यासही नवल नाही. पण भुजा-बळाचे हळुहळू भुजबळ होतात, त्याकडे कोणी बघायचे?

खडसे आज इतक्या गाळात जाऊन रुतले आहेत, की पक्षालाही त्यांची पाठराखण करणे अशक्य झाले आहे. मग आपल्या पठडीतील पाठीराख्यांना पुढे करून धमक्या देण्यापर्यंत नाथाभाऊंनी मजल मारली आहे. काही आमदार त्यांच्यासाठी पक्षाला रामराम ठोकतील असे म्हटले जाते. ही सुद्धा एक गमतीशीर बाब आहे. मागल्या दोन वर्षात अमूकाचे इतके आमदार आपण फ़ोडू, किंवा शिवसेनेचे इतके आमदार आपल्या संपर्कात असल्याच्या गमजा नाथाभाऊ सातत्याने करीत होते. सत्तेसाठी शिवसेनेत फ़ुट पडणार, अशाही गोष्टी मित्रपत्रकारांना खडसेच सांगत होते. आता त्यांच्याच पक्षातले आमदार फ़ोडण्याची नामूष्की त्यांच्यावरच आलेली आहे. मंत्रीपद वाचावे म्हणून भाजपाचेच आमदार फ़ुटतील, अशी भाषा कुठल्या गोटातून येते आहे? अन्य कुठल्या पक्षातले आमदार फ़ोडायची भाषा बोलणार्‍या खडशांचे कौतुक करणार्‍यांना त्यातले दुखणे आता उमजायला हरकत नसावी. एका बाजूला दाऊदच्या फ़ोनचे बालंट आणि दुसरीकडे जावयाच्या नावाने खरीदलेली जमिन, अशा दुहेरी सापळ्यात अडकलेल्या खडसे यांना त्यातून बाहेर काढायला पक्षातला एकही नेता किंवा आमदार पुढे आलेला नाही. किंबहूना पक्षाला स्वबळावर सत्तेपर्यंत आणायच्या गर्जना करणारे खडसे आता पक्षाला बोजा वाटू लागले आहेत. तिकडे तुरूंगात जाऊन पडलेल्या भुजबळांसाठी शरद पवार निदान दोन शब्द तरी बोलले, सुप्रियाताई मराठ्यांचा बाणा सांगत पुढे सरसावल्या. पण इथे नाथाभाऊ एकाकी पडले आहेत. त्यांनी उभा केलेला ‘आदर्श’ अभिमानाने पत्करायला भाजपातून कोणीही पुढे आलेला नाही. सिंह-वाघाचे चित्र रंगवणारे प्रकाश मेहता किंवा मुंबईचे शेलारमामाही कुठल्या कुठे गायब झालेत. आणि जखमेवर मीठ चोळण्यासाठी की काय, अजितदादा आणि सुनील तटकरे यांनीही नाथाभाऊंच्या राजिनाम्याची मागणी केली आहे.

2 comments: