Tuesday, June 21, 2016

अमेरिकन हत्याकांडाचे पोस्टमार्टेम



You may not be interested in war, but war is interested in you.  - Leon Trotsky

सध्या अमेरिकेत भावी राष्ट्राध्यक्ष निवडण्याचा फ़ड रंगला आहे. त्यात रिपब्लिकन पक्षाचे आक्रमक उमेअ्दवार डोनाल्ड ट्रंप यांनी धमाल उडवून दिली आहे. उदारमतवाद म्हणून जी राजकीय भूमिका जगभर ओळखली जाते, तिला लाथ मारून बिनधास्त खरे बोलण्याचे धाडस हा माणुस दाखवतो आहे. त्यामुळेच विरोधी पक्षातले सोडाच, त्याच्याच पक्षातले अन्य नेते त्याच्यावर नाराज आहेत. त्याला उमेदवारी मिळू नये, म्हणून त्याच्याच पक्षात धावपळ सुरू होती आणि विरोधी गोटातही त्यावर टोकेची झोड उठलेली आहे. कारण तोंडदेखले गोडगोड बोलण्याची ट्रंप यांची शैली नाही. अमेरिकेत कुणाही मुस्लिमाला प्रवेश देऊ नये किंवा असतील त्यांनाही माघारी पाठवून द्यावे, इतकी टोकाची भाषा ट्रंप बोलतात. अर्थात त्याचेही कारण आहे. मात्र ते सत्य बोलण्याला आजच्या राजकारणात शहाणपण मानले जात नाही. काही अरबांनी विमाने मनोर्‍यावर आदळून न्युयॉर्कचा ऐतिहासिक घातपात घडवला, तरी दहशतवादाला धर्म नसतो, असली पोपटपंची सुरूच राहिली आहे. ट्रंप यांनी त्यापुढे झुकायला नकार दिला आहे. म्हणूनच बुद्धीवादी वर्गापासून तमाम राजकीय वर्तुळात त्यांना कडाडून विरोध होत आहे. पण मजेची गोष्ट अशी, की त्याच ट्रंप यांना जनसामान्यांचा उत्स्फ़ुर्त पाठींबा मिळालेला आहे. अन्य रिपब्लिकन उमेदवारांना मागे टाकून ट्रंप यांनी पहिल्यापासून आघाडी मारलेली आहे. सहाजिकच जगभरच्या बुद्धीमंताना ट्रंपला मिळणारा पाठींबा हे गुढ वाटले तर नवल नाही. त्यांना पडलेल्या प्रश्नाला आता न्युयॉर्कमध्ये जन्मलेल्या एका मुस्लिमानेच सविस्तर उत्तर दिले आहे. उमर मत्तीन नामे या मुस्लिमाने ऑरलॅन्डो या शहरात बेछूट गोळीबार करून पन्नास निरपराधांना ठार मारले आणि ट्रंप खरे बोलतात, याचीच ग्वाही दिलेली आहे. अमेरिकेतील ताजी जिहादी हिंसेची घटना, ट्रंप यांच्या लोकप्रियतेची खरी कारणमिमांसा आहे.

ट्रंप काय म्हणत आहेत आणि कुठल्या समस्या मांडत आहेत, ते समजून घ्यायचे नाही. त्यासाठी त्यांना माथेफ़िरू ठरवायचे. पण ट्रंप जे बोलतात, तो समान्य माणसाचा अनुभव असेल, तर दुसरे काय होणार? ट्रंप खोटारडे असते तर फ़्लोरिडा राज्यातील ताजी घटना कशाला घडली असती? उमर मतीन याने असे का वागावे? त्याने निरपराधांना आपल्या हिंसेचे बळी कशाला बनवले? त्यापैकी कोणालाही मतीन ओळखत नव्हता, की त्यांनी कुठलाही गुन्हा केलेला नव्हता. पण मतीनला त्याच्याशी कुठलेही कर्तव्य नव्हते. त्याच्या ज्या धार्मिक समजुती व श्रद्धा आहेत, त्याला संबंधित बळी जुमानत नव्हते. थोडक्यात इस्लामला मान्य नसलेल्या रितीने ही माणसे जगतात, त्याचा मतीनला टिटकारा आलेला होता. म्हणून त्यांना शिक्षा देण्याचा अधिकार त्याने आपल्या हाती घेतला. सरळ त्यांना ठार मारून टाकणे हाच त्याला न्याय वाटला. त्यापैकी कोणी मतीनला त्याच्या मनाविरूद्ध जगायला सांगितले नव्हते. पण तरीही त्यांना मतीन आपले शत्रू मानून वागत होता आणि वागलाही. इथे मतीनची मानसिकता विचारात घेण्याची गरज आहे. तो कुठल्या संघटनेचा वा संस्थेचा सदस्य आहे, याला महत्व नाही. अशी मानसिकता असलेल्या संघटना जगात कुठे कशा कार्यरत आहेत, किंवा त्यांच्याशी मतीनचा थेट संबंध आहे किंवा नाही, ही बाब दुर्लक्षणिय आहे. मतीन असा का वागला किंवा कोणत्या मानसिकतेमुळे वागला, याला प्राधान्य आहे. कारण असे हजारो लक्षावधी मतीन जगभर पसरलेले आहेत आणि हाताशी हत्यार असले तर ते काय करतील, याचा थेट सामान्य नागरिकांच्या सुरक्षित जगण्याशी संबंध आहे. कुठल्याही क्षणी अशी मानसिकता उफ़ाळून आली, मग काय घडेल याचा विचार करूनच उपाययोजना आखणे भाग आहे. कारण सामान्य लोकांच्या सुरक्षेची हमी सरकार व कायद्याने घेतलेली आहे.

ट्रंप त्याकडेच लोकांचे लक्ष वेधत असून, त्याची जाणिव खुद्द विद्यमान राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही आहे. म्हणूनच विनाविलंब त्यांनी मतीनच्या या कृत्याला माथेफ़िरू म्हणण्यापेक्षा दहशतवादी कृत्य असे संबोधले आहे. पण तसे म्हटले आणि पुन्हा दहशतवादाला धर्म नसतो, अशी बिरूदावली जोडली, मग पुढे काहीच होत नाही. मतीनने व्यक्तीगत रागाने हे कृत्य केलेले नाही, तर त्याच्या धर्मश्रद्धांनी जी मानसिकता त्याच्यामध्ये जोपासली आहे, त्यामुळे तो कार्यप्रवण झाला आहे. त्याचे कृत्य भले कायद्याला गुन्हेगारी स्वरूपाचे वाटेल. पण त्याच्यालेखी ते धर्माचे पवित्र कृत्य होते आणि असते. ज्या मनोवृत्तीतून मतीन घडतो, त्यातूनच अजमल कसाब क्रियाशील झालेला असतो. म्हणूनच अशा घटना टाळण्याचे उपाय योजताना, त्यांच्या मानसिकतेची चिरफ़ाड करण्यावर परिणाम अवलंबून असतात. हत्येसारखे पाशवी कृत्य करणार्‍यामध्ये ती वृत्ती अकस्मात येत नाही. त्याला ज्या गोष्टीविषयी पराकोटीचा द्वेष व तिटकारा शिकवला जात असतो, त्याचा परिपाक त्याच्या कृत्यामध्ये प्रतिबिंबीत होत असतो. समलिंगी लोक एकत्र येऊन जे कृत्य करीत आहेत, ते धर्मबाह्य आहे. म्हणुनच खरा श्रद्धावान असणार्‍यावर ते पाप थोपवण्याची कामगिरी इश्वराने सोपवली आहे. याच भावनेने मतीन व कसाब प्रवृत्त होत असतात. म्हणुनच तशी श्रद्धा वा भावना यामागचे कारण नाही, ही शुद्ध दिशाभूल असते. तिथूनच मग गुन्हा करणार्‍याला वा त्याची पाठराखण करणार्‍यांची हिंमत वाढत असते. म्हणूनच गेल्या दोन दशकात मध्यपुर्वेत मर्यादित असलेला हा सार्वत्रिक हिंसाचार जगभर पसरत गेला आहे. कारण त्या मानसिकतेला पायबंद घालण्यापेक्षा चुचकारण्यातच धन्यता मानली गेली. ट्रंप त्याच दुबळ्या वा पलायनवादी भूमिकेला आव्हान देत उभे ठाकले आहेत. लोकांना त्या दुबळ्या मनोवृत्तीचीच आता भिती वाटू लागली आहे.

म्हणूनच ऑरलॅन्डोची घटना घडल्यावर तात्काळ ट्रंप यांनी आपले शब्द खरे ठरल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यांचे मत खरे ठरले नसून, तीच वास्तविकता आहे. तीच कोणी मान्य करत नव्हता, म्हणून त्याला मत म्हणता येत नाही. ही मानसिकता धर्माच्या आहारी जाण्याने येत असेल, तर तिचा वेध घेतला पाहिजे. जगभर इस्लामी दहशतवाद म्हणून ओळखला जातो, त्याची प्रेरणा धर्मस्थानातून येत असेल, तर तिथे काय शिकवले व जोपासले जाते, त्याचा वेध घ्यावा लागेल. धार्मिक स्वातंत्र्याचा आडोसा घेऊन हे उद्योग चालू असतील, तर अशा धर्मस्वातंत्र्याला लगाम लावण्याची गरज आहे. एकाचे धर्मस्वातंत्र्य हा दुसर्‍याच्या सामान्य जगण्यासाठी गळफ़ास होता कामा नये. पण तसेच होते आहे आणि वर्षामागून वर्षे गेली तरी त्यावर उपाय शोधला गेलेला नाही. धर्माचेच नाव घेऊन सिरीया व इराकमध्ये हिंसेच थैमान सुरू आहे आणि त्यापासून जीव मुठीत धरून युरोपात आश्रय घेणारे पुन्हा तिथेही त्याच धर्माच्या स्वातंत्र्याचा आग्रह धरत असतील, तर कुठेतरी गफ़लत होते आहे. म्हणूनच ताज्या हल्ल्यात किती मेले आणि किती जखमी झाले, त्याची गणती करण्यात अर्थ नाही. मतीनची मानसिकता व त्यामागची प्रेरणा यांचा कसून अभ्यास करण्याची गरज आहे. तसे झाले नाही तर अन्य धर्मश्रद्धा वा बिगरमुस्लिम लोकसंख्या आपापल्या बचावासाठी कायद्यावर विसंबून रहाणे सोडून देतील. आपल्या सुरक्षेसाठी स्वत: सज्ज रहाणे लोकांना आवश्यक वाटू लागेल आणि ते यादवीला आमंत्रण ठरू शकेल. किंवा दुसरा पर्याय म्हणजे खुलेआम सत्य बोलत सत्ता हस्तगत करणारे डोनाल्ड ट्रंप प्रत्येक देशात उदयाला येतील. सामान्य जनताही हसतखेळत अशा उथळ नेत्यांकडे सत्ता सोपवू लागतील. कारण दगडापेक्षा वीट मऊ, या न्यायाने कसाब मतीनपेक्षा ट्रंप सुसह्य असेल. हा सामान्य माणसाचा निकष असतो.

5 comments:

  1. पंतप्रधान मोदींच्या उदयाच्या इतिहासाची अमेरिकन आवृत्ती वाटावी म्हणजे ट्रम्प असे या लेखाच्या वाचनाने वाटले . यापुढे बघूया काय होते ते ! केवळ व्हाईट हाऊसमध्ये जाण्याच्या शक्यतेच्या काडीचा आधार धरून हिलरी क्लिंटन , क्लिंटन राहिली असा तर्क व्यक्त केला जातो त्यात कितपत तथ्य आहे हेही लवकरच ठरेल

    ReplyDelete
  2. छान भाऊ मस्त

    ReplyDelete
  3. तुमच्या ह्या बातमीबाबतच्या लेखाची आतुरतेने वाट पहात होतो. नेहमीप्रमाणे रोखठोख भाषा वापरल्याबद्दल अभिनंदन. त्याचबरोबर तुम्ही “मात्र ते सत्य बोलण्याला आजच्या राजकारणात शहाणपण मानले जात नाही” हे जे लिहिले आहे, त्याचे १००% अनुमोदन. ह्याबाबत अापल्या सेक्युलर पंडीतांनी अजुनही काही प्रतिक्रिया कशी दिली नाही?

    ReplyDelete
  4. Will Trump successfully run his government with his toght thought. Will US Babu allow him to act..... No....

    ReplyDelete