Thursday, October 12, 2017

नेता आणि महत्वाकांक्षा

raj thackeray के लिए चित्र परिणाम

२००० सालात ममता बानर्जी यांनी भाजपाच्या एनडीए आघाडीतून बाहेर पडल्या होत्या. तेव्हा त्या केंद्रात रेल्वेमंत्री होत्या. पण त्या पदाचा मोह सोडून त्यांनी बंगालच्या विधानसभा निवडणूकीत कॉग्रेस सोबत जाऊन डाव्या आघाडीला पराभूत करण्याचा चंग बांधला होता. तेव्हा भाजपाची बंगालमध्ये फ़ारशी ताकद नव्हती. मात्र नवख्या तृणमूल कॉग्रेसपेक्षाही मुळच्या कॉग्रेसपाशी थोडीफ़ार संघटना तरी होती. म्हणूनच कॉग्रेस व अन्य स्थानिक पक्षांना सोबत घेऊन ममतांनी ‘महाजोत’ म्हणजे महाआघाडी स्थापन केली होती. त्यात त्या यशस्वी होऊ शकल्या नाहीत की नंतर आलेल्या लोकसभा निवडणुकीतही यशस्वी होऊ शकल्या नाहीत. डाव्या आघाडीविषयी कमालीचा राग धरून राजकारण करणार्‍या ममता एकाकी पडत गेल्या होत्या. त्यांच्या अशा वागण्याने त्यांचे अनेक ज्येष्ठ सहकारीही त्यांना सोडून गेलेले होते. पण कुठल्याही मार्गाने व कोणाचीही सोबत घेऊन डाव्या आघाडीला नेस्तनाबुत करण्याचा मुद्दा ममता सोडायला राजी नव्हत्या. त्याची किंमत त्यांना २००४ सालात मोजावी लागली. त्या लोकसभेत एकट्या निवडून आल्या आणि राजकारणात खुपच एकाकी पडलेल्या होत्या. सहाजिकच ममता संपल्या, अशीच भाषा प्रत्येकजण बोलू लागला होता. पण अवघ्या एका वर्षात त्यांनी पुन्हा एकजुटीचे प्रयास केले आणि विधानसभा निवडणूकीत आपला ठसा उमटवला. मात्र डाव्यांची सत्ता नेस्तनाबुत करणे ममतांना शक्य झाले नाही. मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य नवखे असूनही त्यांनी बहुमताचा पल्ला गाठताना अधिकच मोठे यश मिळवले होते. तरीही ममता झुंजत राहिल्या. त्याचे फ़ळ त्यांना २००९ च्या निवडणूकीने दिले. कारण त्या निवडणूकीत कॉग्रेसला सोबत घेतलेल्या ममतांनी डाव्या आघाडीला बंगालमध्ये धुळ चारून दाखवली. कुठलाही स्वयंभू नेता जेव्हा जिद्दीला पेटलेला असतो, तेव्हा त्याला प्रासंगिक पराभव संपवू शकत नसतात.

२००५ चा विधानसभेतील पराभव पचवलेल्या ममतांनी पुढल्या काळात डाव्या सरकारच्या विरोधातील एक एक संधी शोधून काहूर माजवलेले होते. त्यातच २००८ सालात अणुकराराचा विषय पुढे आल्याने डाव्यांनी मनमोहन सरकारचा पाठींबा काढून घेतला आणि बंगलमधील डाव्यांशी कॉग्रेसची मैत्री संपुष्टात आली. त्यामुळेच कॉग्रेसला बंगालमध्ये ममताच्या जोडीने उभे रहाणे भाग पडले. त्याचा लाभ उठवित ममतांनी मुसंडी मारली. बंगालमध्ये रोजगार निर्मिती व उद्योगाला बळ देण्याच्या नादामध्ये मुख्यमंत्र्यांनी टाटांना आमंत्रित केले. अशा उद्योगांना जमिन देण्याचा विषय चिघळला होता. सक्तीने जमिनी ताब्यात घेण्याचा विषय शेतकर्‍यांना बिथरवणारा ठरला. तेव्हा सिंगुर येथे धरणे धरून बसलेल्या ममतांना मोठी प्रसिद्धी मिळाली आणि तीच डाव्यांची मोठी चुक ठरली होती. त्यांची किंमत त्यांना २००९ च्या लोकसभा मतदानात मोजावी लागली आणि ममतांचा पक्ष जोमात आला. २००९ ची लोकसभा व दिड वर्षात आलेल्या विधानसभेने बंगाली राजकारणाचा चेहरामोहरा बदलून टाकला. विधानसभेत कॉग्रेस तृणमूल आघाडीने इतके मोठे यश मिळवले, की त्यात एकट्य़ा ममतांच्या पक्षालाही बहूमत मिळून गेले होते. थोडक्यात २००४ साली मतदानाचे आकडे वा निकाल बघून ज्यांना ममता संपली असे वाटत होते, त्यांना ममतांनी चांगलाच धडा शिकवला होता. यातला मुद्दा इतकाच, की राजकारणात कुठलाही चिकाटीचा वा जिद्दी नेता इतक्या सहजासहजी संपत नसतो. प्रतिकुल काळातही आपली झुंजण्याची प्रवृत्ती टिकवून धरू शकेल, त्याच्या बाजूने यश येणारच असते. तोपर्यंत टिकून रहाण्याचा संयम त्या नेत्यापाशी असावा लागतो. त्याचप्रमाणे येणार्‍या संधीचा व प्रतिकुल काळाचाही चतुराईने वापर करण्याची क्षमता त्याच्याकडे असावी लागते. तरच त्याचे पुनरुज्जीवन शक्य असते.

२००२ नंतरच्या दहा वर्षात गुजरातचे मुख्यमंत्री सतत आपल्या मतदारांचा पाठींबा मिळवत असतानाही एकूण देशातील वातावरण त्यांच्या कमालीचे विरोधात होते. त्यामुळे हा माणूस राजकारणात फ़ार काळ टिकू शकणार नाही, याची राजकीय पंडितांना खात्रीच पटलेली होती. खुद्द भाजपामध्येही अनेकांना नरेंद्र मोदी हा पक्षावरचा बोजा वाटू लागलेला होता. अशाही स्थितीत आपल्या जमेच्या बाजू व दुबळ्या बाजू ओळखून मोदींनी राजकारणात टिकून रहाण्याचा कसोशीने प्रयास केला आणि २०१२ नंतरच्या काळात तोच देशाचा सर्वात लोकप्रिय नेता म्हणून उदयास आला. प्रामुख्याने परिस्थिती प्रतिकुल असते, तेव्हा आपले अस्तित्व टिकवण्याची क्षमता व संयमाने ही माणसे यशस्वी होऊ शकत असतात. त्यातल्या तडजोडी व डावपेच खेळण्याची चतुराई त्यांच्यापाशी असावी लागते. कुठलीही गोष्ट अभिमान वा प्रतिष्ठेची करायला जाऊन कपाळमोक्ष ओढवण्याचा धोका कायम असतो. ममता यांना अलिकडल्या काळात त्याचे भान उरलेले नाही. तर मोदी मोठे यश पचवूनही लोकप्रियतेच्या शिखरावर टिकून राहिले आहेत. महाराष्ट्रात अलिकडल्या कालखंडात अशा दोन नेत्यांचे राजकारण तपासून बघणे म्हणूनच महत्वाचे ठरेल. त्यात राज ठाकरे यांचा समावेश होतो, तसाच नारायण राणे यांचाही समावेश करावा लागेल. किंबहूना ज्याला नेता म्हणतात, तो कुठल्याही पदामुळे वा अधिकारामुळे नेता होत नसतो. त्या व्यक्तीपाशी महत्वाकांक्षा व त्यासाठी झुंजण्याची प्रवृत्ती असावी लागते. जिद्द असावी लागते. राणे व राज ठाकरे यांच्यात तशी वृत्ती आहे. म्हणूनच लागोपाठचे अपयश पचवून त्यांनी आपला ठसा मराठी राजकारणावर उठवलेला आहे. गेल्या तीनचार वर्षात त्यांना प्रतिकुल स्थितीला सामोरे जावे लागलेले आहे. पण या महिन्यात त्यांनी सिमोल्लंघन करून दाखवलेले आहे. दोघांची शैली वेगळी आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या अज्ञातवासातून बाहेर येण्यासाठी रेल्वेतील आपत्तीच्या संधीचा पुरेपुर लाभ उठवलेला आहे आणि दणदणित मोर्चा काढून आपल्या अस्तित्वाची ओळख मुंबईकरांना करून दिलेली आहे. खरेतर अशावेळी सर्वात आधी शिवसेनेने रस्त्यावर येऊन लोकक्षोभाला तोंड फ़ोडण्याची गरज होती. तर राजना अशी संधी मिळाली नसती. राजच्या मोर्चाला लोकांचा मिळालेला उत्स्फ़ुर्त पाठींबा बोलका आहे. दुसरीकडे नारायण राणे यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर नव्या राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा केलेली आहे. त्यांना तात्काळ मुख्यमंत्र्यांनी एनडीएत दाखल होण्याचे आमंत्रण दिलेले बघता, त्यातला राजकीय डाव लपून रहात नाही. पण भाजपात थेट दाखल होण्यापेक्षा वेगळा पक्ष बनवून एनडीएत समाविष्ट होणे, राणे यांच्या राजकीय स्वभावाला योग्य आहे. इथे त्यांना अन्य कुणाच्या नेतृत्वाखाली दबून रहावे लागणार नाही. शिवाय महाराष्ट्राच्या राजकारणात जी अस्थिरता आहे, त्यात ट्रांझीट कॅम्प नावाची एक सोय अनेकांना हवी आहे. त्यांच्यासाठी राणे यांचा नवा प्रादेशिक पक्ष महत्वाची कामगिरी पार पाडू शकतो. त्यात आज किती आमदार आहेत किंवा कुठल्या पक्षातून कोण नेते राणेंकडे येतील, असा प्रश्न गैरलागू आहे. नेतागणाला राजकीय पक्ष निवडणूकीच्या काळात हवा असतो. ती सुविधा राणे यांनी उभी केली आहे. खरेतर त्यांनी २००५ सालात शिवसेना सोडतानाच अशी काही आपली व्यवस्था वेगळी उभी केली असती, तर त्यांना परिस्थितीचा अधिक राजकीय लाभ उठवता आला असता. कॉग्रेसमध्ये दहा वर्षे घालवल्यानंतर त्यांना अनुभवाने काही शिकवले असल्याने बहुधा त्यांनी तो पर्याय आता स्विकारला आहे. त्यांच्या नव्या पक्षाची खरी शक्ती व गरज किती, त्याचे उत्तर निवडणूका जवळ आल्यावर अनेकांना समजू शकेल. मात्र दरम्यान राणे आपल्या पद्धतीने एनडीएत राजकीय वादळे निर्माण करत रहातील.

राजकारणात देवाणघेवाण असते. त्यात तुमचा कोणी उपयोग करीत असतो आणि बदल्यात तुम्हालाही त्याचा वापर करता येत असतो. ही व्यवस्था कायम राखून जर तुम्ही दुसर्‍याचा योग्य व अधिक लाभासाठी वापर करू शकलात, तर समोरच्यालाही काही तक्रार करता येत नाही. राज्यात भाजपाला पर्याय नाही असे म्हटले जाते कारण शिवसेना सत्तेत भागिदार असूनही विरोधकासारखी वागते आहे आणि खरे विरोधी पक्ष पुरते नामोहरम होऊन गेलेले आहेत. अशा स्थितीत मुख्यमंत्री फ़डणवीस खमके व आक्रमक नसले, तरी त्यांना आव्हान देऊ शकेल असा कोणीही नेता कुठल्याही पक्षात उरलेला नाही. अशा पार्श्वभूमीवर आजही आपली मुख्यमंत्रीपदी बसायची महत्वाकांक्षा कायम असल्याचे राणे पत्रकार परिषदेत सांगतात, याला महत्व आहे. ती आकांक्षा नुसती पदाची लालसा नसते, तर पराक्रम गाजवून जिंकण्याची अनिवार इच्छाच असते. अशी इच्छा बाळगणाराच झुंज देऊ शकत असतो आणि त्यालाच राजकारणात बाजी मारणे शक्य असते. ममता असोत किंवा मोदी नितीश असोत, या नेत्यांनी ती चिकाटी व लवचिकता अनेकदा दाखवलेली आहे. राणे यांची कॉग्रेस पक्षात कोंडी झालेली असताना व प्रतिकुल परिस्थिती असताना, त्यांनी वेगळा प्रादेशिक पक्ष काढून सत्तेत सहभागी होण्याचा शोधलेला पर्याय त्याच लवचिकतेचे प्रतिक आहे. भाजपात सहभागी होण्यापेक्षा एनडीएत दाखल होणे, त्यांच्या प्रवृत्तीला अधिक योग्य आहे. अशा राजकारणात त्यांचा वापर भाजपा करणार हे राणेंनाही कळते. पण उलट बघितले तर राणेही भाजपाचा उपयोगच करून घेणार आहेत ना? अशा महत्वाकांक्षी नेत्याला फ़ारकाळ परिस्थिती रोखून ठेवू शकत नाही. त्याला एक योग्य संधी मिळायचा अवकाश असतो. त्याचा राजकीय लाभ उठवण्याची दूरदृष्टी फ़क्त बाळासाहेबांपाशी होती. अन्य कुणाला म्हणूनच नारायण राणे पचवता आला नाही.

4 comments:

  1. नारायण राण्यांना फार अवघड पल्ला गाठायचं काम सोपवलं तुम्ही भाऊ

    ReplyDelete
  2. भाऊ मध्यंतरी तुमच्याच एका लेखात नारायण राणे हे लढवय्ये नेते आहेत असं लिहिलं होतंत. कॉंग्रेस मध्ये नक्कीच त्यांना तशी संघी मिळाली नाही. अर्थात नारायण राणेंची महत्वाकांक्षा लक्षात घेतली तर ती महाराष्ट्र चा मुख्यमंत्री होणे ही आहे. ते भाजपा मध्ये गेले असते तरी ती पुर्ण झाली नसती.

    अश्यावेळेस जर ते शिवसेनेत गेले असते तरी शिवसेनेला असलेली लढवय्या नेतृत्वाची गरज संपली असती आणि राणे हे कदाचित मुख्यमंत्री होऊ शकले असते. पण तुम्हाला असं वाटत नाही का की वेगळा पक्ष काढून त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या महत्वाकांक्षेला च सुरुंग लावला आहे?

    माझ्या मते तो पक्ष नीट उभा राहून राणे मुख्यमंत्री होणे हे खूप अवघड आहे

    ReplyDelete
  3. राणे थकलेत आता . कठीण आहे पुढचा काळ .

    ReplyDelete
  4. नारायण राणे यांच्या महत्वाकांक्षेच्या आड येणारे दोन काटे : नीतेश आणि नीलेश हे राणेंचे मनसुबे उध्वस्त करण्यास सक्षम आहेत

    ReplyDelete