Monday, October 2, 2017

मरणम शरणम गच्छामी!

 Related image

होय माझ्या लाडक्या बेशरम्यांनो!

दोन दिवसांपुर्वी आम्हा मृत्यूमुखी पडलेल्या तेविसजणांसाठी अश्रू ढाळायला धावत पुढे आलेल्या माझ्या सर्व बेशरम लाडक्यांनो, आता तुमचे अश्रू सुकले असतील, तर थोडे शांतपणे उरलेल्या मुंबईकरांना सुखरूप करण्याचा विचार सुरू करा. कारण आम्ही तर त्यातून मुक्त झाले आहोत. पण तीच मृत्यूची टांगली तलवार तुमच्या प्रत्येकाच्या डोक्यावर तशीच टांगलेली आहे. ती घटना घडण्यापर्यंत आम्हीही तुमच्यासारखेच ढोंगीपणाने आधी मेलेल्या प्रत्येक मुंबईकरासाठी अश्रू ढाळण्यात गर्क होतो. नसेल तर आम्हीही तशा ढोंगाला आक्षेप घेण्याची हिंमत केलेली नव्हती. चेंगराचेंगरी वा अफ़ाट गर्दीत घुसमटून मरण्याचा हा पहिलाच प्रसंग मुंबईकरांवर आलेला नाही. कधी गाडीखाली चिरडून तर कधी ब्रेक निकामी झालेल्या वहानाखाली सापडून आपण मरतच असतो. कारण मुंबईत आजकाल मरणाची लॉटरी लागत असते. ज्यांचा नंबर लागतो, ते निमूट त्यात बळी होतात. उलट आपली लॉटरी लागली नाही, ते स्वत:ला नशीबवान समजून मरणार्‍यांसाठी अगत्याने अश्रू ढाळतात. कधी आपण कसाबकडून किडामुंगीसारखे मारले जातो, तर कधी कोणी पिशवीत दडवून ठेवलेल्या स्फ़ोटकांच्या फ़ुटण्याने मृत्यूच्या जबड्यात ढकलले जात असतो. कधी मोडकळीस आलेल्या इमारतीच्या ढिगार्‍यातून आपल्यातल्या काहीजणांना मुक्ती मिळत असते, तर कधी कोणी बेकायदा दुरूस्तीसाठी इमारतीची मोडतोड करून आपल्या जीवाशी खेळत असतो. अखंड मरणाचा उत्सव साजरा करणारे शहर अशी आता मुंबईची ओळख झालेली आहे. तरीही आपण ती ओळख मान्य करून त्यावर उपाय शोधायला कुठे तयार आहोत? तेवढ्यापुरते रडायचे आणि पुढल्या अपघात घातपातापर्यंत गुण्यागोविंदाने मृत्यूशी लपंडाव खेळण्यात आपण आता वाकबगार झालेले आहोत. सगळे कसे अस्सल बेशरम मुंबईकर झालेले आहोत ना?

त्या दिवसापासून आमच्या मृत्यूचा झकास सोहळा रंगलेला आहे. आमचे नातेवाईक वा आप्तस्वकीय काय टाहो फ़ोडून रडतील, इतकी रडारड इतरांनीच आरंभलेली आहे. आमच्या कुटुंबातल्या कोणी बघितले व ऐकले, तर आमचेच आप्तस्वकीय बुचकळ्यात पडतील. कारण अजून त्यांच्या तोंडातून हुंदका फ़ुटला नाही, तेवढ्यात बाकीच्यांनीच आक्रोश मांडलेला होता. आमच्या कुटुंबापेक्षाही सुतक इतरांनाच लागलेले होते. मग त्यात मुलुंडमध्ये कुठे तिथला खासदार किरीट सोमय्या डांडिया खेळताना दिसला म्हणून इतरांनी त्याच्यावर हल्ले चढवले आणि त्याला निर्दय ठरवले. तर दोन दिवस होत असताना त्यांच्यावरच महापौर बंगल्यात त्याच रात्री मेजवान्या झडल्याचा आरोप उलट्या बाजूने आला. प्रत्येकाला आपापल्या दु:खाचे प्रदर्शन मांडायची घाई झालेली आहे. पण दु:ख म्हणजजे काय असते आणि ते कसे अनुभवास येते; त्याची कोणालाही किंचीत जाणिव दिसली नाही. मेलो आम्ही! जीवानिशी इहलोकाचा निरोप घेतला आम्ही आणि आरोप प्रत्यारोपाची आतषबाजी भलतेच कोणी करीत आहेत. त्यात आम्हाला काय म्हणायचे आहे, तेही ऐकून घेण्याची कोणाला गरज वाटलेली नाही. आमच्या मृत्यूचे निदान करणार्‍या कितीजणांना एल्फ़िस्टन नावाचे स्थानक ठाऊक आहे? जिना अपुरा वा अरूंद असल्याचे प्रवचन देण्याची स्पर्धा रंगली, त्यापैकी कितीजणांना तो जिना कुठे जाण्यासाठी वा येण्यासाठी असतो, त्याची माहिती घेतली आहे? त्या जिन्याने उतरला मग कुठल्या मार्गाने दादर वा प्रभादेवीच्या कुठल्या भागात पोहोचता येते? त्यासाठी किती रुंद मार्ग रस्ता वा बोळ उपलब्ध आहे? याचीही माहिती नाही, असे लोक कल्लोळ करताना बघून मरणयातना सोसतानाही मनोरंजन झाले. विनोद किती क्रुर असू शकतो वा किती क्रौर्य अशा राजकीय विनोदात असते, त्याचा हा अनुभव जितका दाहक आहे, तितकाच बेशरम सुद्धा आहे.

त्याच जिन्याने उतरले मग सेनापती बापट मार्गावर जाण्यासाठी जी चिंचोळी गल्ली उपलब्ध आहे, त्यातून एकदा तरी अशा कॅमेरावाल्यांनी वा अन्य कोणी चालण्याचा प्रयास केला आहे काय? जितका अरूंद तो जिना आहे तितकाच अरुंद रस्ता पुढे रेल्वेहद्दीतून बाहेर पडण्यासाठी आहे. पन्नास चाळीस वर्षापुर्वी त्या भागात गचाळ बकाल वस्ती होती आणि तिचा विकास करून उंच टोलेजंग इमारती उभा राहिल्या. त्या वस्तीने परेलला जाण्याचा सोपा मार्ग म्हणून कुंपणाची भिंत तोडून रस्ता काढला होता. त्या पटरी ओलांडणार्‍या लोकांना येजा करता यावी, म्हणून तितक्याच लोकसंख्येसाठी पुल व जिना उभारला. त्यावरून आज शंभरपटीने लोक येजा करीत आहेत. ती वस्ती पाडून जे उंच टोलेजंग कार्याकलीन बांधकाम झाले, त्यात हजारो लोक आले. पण त्यांच्यासाठी हा पुल बांधलेलाच नव्हता. अशा उंच इमारती उभ्या करून तिथे हजारोच्या संख्येने रोजगार देणार्‍यांनी, कधी रेल्वेकडे जाण्याचा मार्ग रुंद असावा किंवा तिथला पादचारी पुल अपुरा असेल याची चिंता, त्या इमारती बांधताना केली होती काय? अशा इमारतींना परवानगी देणार्‍यांनी किंवा चटईक्षेत्र वाढवून देणार्‍यांनी उंचीचा विचार केला, पण त्या उंचीवरून शेवटी जमिनीवर यावे लागते आणि रस्तेही जमिनीला व्यापूनच असतात, याची चिंता केली होती काय? त्यांचे सोडा, त्यांनी उभारलेल्या या मृत्यूच्या सापळ्यात शिरताना आपण तरी, किती विचार केला वा आपल्याच जीवाची किती  काळजी घेतली? मोडकळीस आलेल्या इमारतीत वास्तव्य करताना चटईक्षेत्राची प्रत्येक फ़ुटाला वाढणारी किंमत बघून हुरळून जाणारे आपण, त्यात मृत्यूचा वास असल्याचे कधीच विसरून गेलोय ना? मग दुसर्‍याकडे बोट दाखवण्यात काय अर्थ आहे? आज ढोंग करणारे तुम्ही वा मेलेले आम्ही नुसते बेशरम होऊन गेलोय ना? कोणी कोणावर आळ घेतला आरोप केला म्हणून आपण सुखरूप होणार आहोत काय?

काही महिन्यापुर्वी दक्षिण मुंबईत भेंडीबजार येथे एक इमारत ढासळली आणि काही लोकांचा जीव गेला, तेव्हाही यापेक्षा वेगळा दुखवटा झाला होता काय? त्यातले मृत दुर्दैवी ठरवून आम्ही ‘परळनाथ तेविसकर’ हळहळलो होतो. आज तुम्ही उर्वरीत दादरकर वा बांद्रेकर रडण्याचे ढोंग करीत आहात. आपल्या सर्वांना अशा मृत्यूगोलात सर्कशीच्या जनावराप्रमाणे खेळवणारेही डोळ्यात अश्रू आणुन उभे आहेत. पण कोणालाही सत्य बघायचे नाही, की सत्य बोलायची हिंमत राहिलेली नाही. मुंबई मृत्यूच्या कडेलोटावर येऊन उभी आहे आणि आपण सगळे कसे ढोंगी अश्रू ढाळणार्‍यांच्या कठपुतळ्या होऊन नाचण्यात धन्यता मानत आहोत. एका अशा चमत्कारीक लॉटरीची तिकीटे घेऊन आपण खुशीत जगण्याचे नाटक रंगवत असतो. त्यात आपल्या तिकीटाला कधीच लॉटरी लागणार नाही, अशा भ्रमात आपण रमलेलो आहोत. म्हणून याला बेशरमपणा म्हणणे भाग झालेले आहे. ठाण्यातल्या नव्या बांधकामात लोक बळी गेले, मुंबईत जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीत लोक बळी गेले. रोजच्या रोज धावत्या गाडीतून पडून लोकल प्रवासी मरत असतात आणि कुठल्याही रस्त्यावर चिरडून पादचारी मरत असतात. रोगराईने वा घातपाताने मरणे, ही आता आपली शान झाली आहे. मरेपर्यंत मृत्यूला हुलकावणी देण्याची शर्यत करत जगण्याला आता मुंबई म्हणायची वेळ आली आहे. संगीत खुर्चीच्या खेळात जशी एक एक खुर्ची काढून खेळाडू बाद होत जातात, तसे आपल्यातल्या कोणाचा तरी रोज नंबर लागत असतो. कारण त्याचीच या मुंबईत वा कुठल्याही भारतीय महानगरात शाश्वती देता येत असते. त्या मृत्यूच्या चिमटीतून निसटण्याचा सोहळा रोजच्या रोज साजरा करण्यात आपण गर्क होऊन गेलेलो आहोत. उगाच इतर कोणाच्या नावाने बोटे मोडायचे कारण नाही. त्यापेक्षा बेशरमपणे एक मंत्रजप करावा. मरणम शरणम गच्छामी!

आपला लाडका
परळनाथ तेवीसकर

9 comments:

  1. ’मरेपर्यंत मृत्यूला हुलकावणी देण्याची शर्यत करत जगण्याला आता मुंबई म्हणायची वेळ आली आहे. संगीत खुर्चीच्या खेळात जशी एक एक खुर्ची काढून खेळाडू बाद होत जातात, तसे आपल्यातल्या कोणाचा तरी रोज नंबर लागत असतो’
    ....आणि ती जागा भरून काढण्यासाठी रोजच्या रोज नवनवीन कित्येक खुर्च्यांची बेगमी होतच असते !....चुकून सुध्दा खंड पडायला नको ना !

    ReplyDelete
  2. Eka Bhayanak Vastvyachi jaaniv karun dili aahe bhau

    ReplyDelete
  3. https://myanimelist.net/featured/1162/Neo-Tokyo__The_Dystopian_Cyberpunk_Wonderland_of_Akira

    ReplyDelete
  4. भाऊ यावर एकच उपाय आहे इतर शहरात नवीन रोजगार निर्माण करायला हवेत जेणेकरून मुंबई चा ताण कमी होईल

    ReplyDelete
  5. मुंबईकर रोज मरण्यासाठीच जन्माला आलाय . हिंदुस्वभावाचा आरसा म्हणजे मुंबईकर . काहीही पचवणारा

    ReplyDelete
  6. भाऊ नविन पिढी एकीकडे आपला कामधंदा संसार सांभाळण्यात तर दुसरी कडे सोशल मिडिया, मोबाईल what's app, Twitter Facebook match अहंकार माॅल शाॅपींग मध्ये तर काही टीव्ही सिरियल, लाफटर शो, फुडमाॅल पुर्वी भारतात हिप्पी यायचे त्याप्रमाणे फिरण्या मध्ये व्यस्त/ मश्गुल आहे...
    रिटायर्ड नातवंडं, आपले राहिलेले शोक पुरे करण्यात, काही तर नुसत बसायचे नाही या गोंडस सबबीखाली परत पैसे कमवण्यात,स्वार्थासाठी लाभ मिळेल अशा संस्था/ संघटना/ मंदिरे चालवण्यात व्यस्त आहेत.. जेष्ठ नागरिक सवलती मिळाण्यासाठी मंजुरीसाठी मश्गुल आहेत (काही नगण्य खरोखरच देशासाठी काही स्तुत्य उपक्रम करत आहेत) काही खरोखरच प्रकृती मुळे हतबल आहेत काही प्रकृतीची कारणे देत आहेत..
    पण देशासाठी मुलभुत काम करण्यासाठी कोणी तयार नाही..
    तर असे जेष्ठ नागरिक एका बाजुने समस्याच आहे... कधी रस्त्यावर चालता बोलताना गाडी चालवताना सोळा वर्षाच्या तरुणाला लाजवेल असा बेकरार पणा दाखशताना दिसतील.. कारण वेल ईष्ट्याब्लिश असलेल्याना काहीच चिंता नाही..
    हे त्यांच्या चालण्या बोलण्या वागण्यातुन प्रत्ययाला येईल..
    बर अशा समाजाचा अंत्यत महत्वाचा घटक असलेल्या नागरिकांना एकत्र करुन देवकार्या साठी मोबिलाईझ उद्यपीत करणारे नेतृत्व पण तयार होत नाही.. नाना नानी पार्क फुललेले दिसतील फुरसतीत गपाष्टक चालू असतील.. पण यांना देशकार्य साठी चालना देणं आवश्यक आहे.. व निदान चार तास तरी देशाचे कार्य करण्यासाठी कंप्लशन करणे तसेच मार्ग दाखवून अशा कार्यव्रत लोकांचा सत्कार करणे आवश्यक आहे...
    हे नागरिक आपापल्या क्षेत्रात देशसेवेसाठी सरकारी कामासाठी खाली का वाटा जरुर ऊचलु शकतात...
    मोदीं सारखे अष्टपैलू नेतृत्व हे करु शकते...
    यामुळे देशात अमुलाग्र बदल होऊ शकतो...

    ReplyDelete
  7. My comments
    भाऊ अत्यंत सही शालजोडे डुकराची कातडी च्या या मुंबईकर हिंदूस्तानी निर्लज्जपणाचा कळस आहे... आपण अनेक वेळा बोकडाचे उदाहरण दिले आहे..
    खाटिका कडे एक बोकडाचा जीव जाताना दुसरा बोकड/ बकरी सहज निर्विकार पणे रवंथ करत असतो तशीच आपल्या देशवासीयांची / मूंबईकराची परिस्थिती गेली हजारो वर्षे आहे. याचाच फायदा घेऊन कधी देशी कधी विदेशी आपल्या देशवासीयांना ( लाॅजवासीयांना म्हणजे आपले बांधव लाॅजचे भाडे म्हणजे टॅक्स भरला की बाकी कशाशी देणं घेणं नाही याप्रमाणे पिढ्यांन पिढ्या रहात आले आहेत व रहात राहणार आहेत कधी स्वातंत्र्यात तर कधी पारतंत्र्यात.. आम्ही निर्लज्जपणे असेच आहोत असेच रहाणार बरं असे कोण म्हणायला सांगायला गेला तर त्याला गप्प बस मोठा आलाय शिकवणारा .. तु स्वतः काय करतोस ते सांग करुन दाखव... असे बोलुन तुम्ही परत कधी बोलणार नाही अशी ईज्जत सहज काढु शकतो व असे सांगणार्या माणसाचा परत खाटीकाच्या दुकानात बांधलेला बोकड होतो व त्याच्या बाजुने एकही बोलणार नाही की हा बरोबर बोलतोय... भाऊ अशा लोकांना आपले लेख हे शहाणपणा शिकवतायत पण मोदीना जाउन का सांगत नाही? असे पण म्हणतात (मोदी सारखा मुर्रब्बी गुजुभाई पण पेट्रोल डिझेल स्वस्त न केल्यामुळे टिकेचा धनी झाला आहे पण पेट्रोल डिझेल स्वस्त झाल्यावर ट्रांस्पोर्ट वाले रीक्शा वाले व दुकानदार फॅक्टरी वाले आणि रेल्वे वाले सरकार सुध्दा रेट कमी करेल याची खात्री ब्राह्मदेव पण देउ शकत नाही..) असे विचारायला कमी करणार नाही हे छातीठोकपणे सांगता येयील.. मोदींना मतदारांनी निवडणुन दिले कारण काँग्रेसने फसवले, महागाई केली भ्रष्टाचार केला पण मोदी नी पण पेट्रोल व डिझेल च्या किमती न करता फसवले आहे हे म्हणताना सर्रास सामान्य माणसे पावलो पावली दिसतात... अशा परिस्थितीत परत मोदी (विरोधक म्हणतात बोल बच्चनगीरी करुन) परत निवडणुकीच्या वेळी कसे पटवतात हे पाहाणे रोमांचक आहे ... )
    भाऊ तुम्ही आमच्या सारख्या या भारत भुमीत जन्म घेणार्या समान्य माणसाचे तुम्ही तुकाराम महाराज आहात का? व मोदी शिवाजी महाराज आहेत का? हे येणारी 2019 ची निवडणूक च सांगेल व कदाचित भारताचे भाग्य किंवा दुरभाग्य ठेवणारे असेल.. कारण आज मोदी शिवाय तरी दुसरा पर्याय भारताला नाही अर्थात मिडियावाले एका रात्रीत नाही पण एका वर्षात भुलभुलैया रचुन भोंदूबाबा दुसरा पर्याय निर्माण करु शकतो.. देशातील लाॅजवासीय मतदारांना सहज फसवु शकतो... कारण मिडियावाल्यांना भ्रष्टाचार करुन त्यांना व त्यांच्या देशी विदेशी मालकांना भागिदारी देणारं सरकार हंव असते व लाॅजवासी भारतीय सहज हे करु शकतात.. व परत अशाच चिखलात कितपत पडतात.. ) त्यामुळे तुमच्या सारखे आजचे तुकाराम ज्ञानेश्वर महाराजांच्या अशा लेखांचा कधी परिणाम लाॅजवासीय भारतीय नागरिकांवर झाला तर खरोखरच जादुच् झाली असे वाटेल.. व परत विलोधक ही व्होटींग मशिनची जादु म्हणतील... 2019 ची निवडणूकीत भारताचा बिहार होतो का उत्तरप्रदेश हे देव जाणे.... या भारतीयांना साक्षात विष्णुरुपी राम पण कमी पडला.. रावणाला मारुन पण त्याच्या पत्नीवर सितामाईवर अविश्वास दाखविणारा भारतीयच होता व त्याचा मुलांना सितामाईला परत आश्रमात दिवस काढायला लागले... तीथे मोदी काय चीज आहे?.. असाच प्रश्न परत परत ( आजकाल हिणवुन मोदी भक्त म्हणायची पद्धत पडली आहे.. म्हणुनच विकास .. वेडा झालाय! ..) सामान्य माणसाला पडतो...

    ReplyDelete
  8. अशा आणिबाणी प्रसंगी कसे वागायला पाहिजे, एक नागरीक म्हणुन आपली जबाबदारी काय असायला हवी अशा गोष्टींबद्दल आता लोकांना साक्षर करणे फार गरजेचे आहे.
    शासनाकडुन या बद्दल काही अपेक्षा ठेवणे व्यर्थच,यासाठी या सोशल मिडीयाचा वापर आपण करुया.

    ReplyDelete