Tuesday, October 31, 2017

साप हीच सत्तेची शिडी


संबंधित चित्र
राजकारण हा सापशिडीचा खेळ असतो. यात दान योग्य पडले तर शिडी हाती लागते आणि विनाविलंब माणूस थेट उच्चस्थानी जाऊन विराजमान होतो. याच्या नेमकी उलट स्थिती त्याच खेळातल्या सापाची असते. एखादे दान चुकीचे पडले आणि जिथे जाऊन पोहोचाल तिथे साप फ़णा उभारून बसलेला असेल, तिथे तात्काळ जबरदस्त घसरण होऊन उच्चस्थानी बसलेली व्यक्ती कुठल्या कुठे फ़ेकली जाते. अर्थात हा खेळाचा नियम आहे आणि जगातल्या प्रत्येक खेळाडूला तो लागू होतो. पण राज्याचे जाणता नेता म्हणून ओळखले जाणारे शरद पवार; अशा कुठल्याही नियमाला अपवाद असतात. तसे नसते तर त्यांना सापाने थेट मुख्यमंत्रीपदी कशाला नेवून बसवले असते? सध्या पवार साहेब एकतर आपला सत्कार करून घेण्यात मग्न आहेत, किंवा शक्य झाल्यास इतरांच्या सत्कार समारंभात सहभागी होत असतात. त्यांचेच तरूण सहकारी व माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, अलिकडेच साठीच्या पार झाले. त्यांच्या सत्कार समारंभात बोलताना पवारांनी आपल्या मुख्यमंत्री होण्यातले रहस्य जाहिरपणे उलगडून उपस्थितांना सांगितले. नशीब, तेव्हा तिथे कोणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता हजर नव्हता. अन्यथा तिथेच आंदोलनाचा भडका उडाला असता. कारण शरद पवार यांना त्यांच्या गुणवत्ता वा कर्तृत्वामुळे नव्हे, तर दैवी चमत्कारामुळे प्रथम मुख्यमंत्रीपद लाभले; असे त्यांनी खुल्या दिलाने कबुल केले. भीमाशंकर येथे एका विश्रामधामात झोपलेले असताना मध्यरात्री एक साप पवारांच्या अंगावरून सरपटत निघून गेला आणि त्यांना खडबडून जाग आली. त्यानंतर त्यांचे नशिब उजळले, असा तो किस्सा आहे. खरेतर असा किस्सा त्या सत्कार समारंभात त्यांनी श्रोत्यांना सांगण्यापेक्षा किमान पाचसहा वर्षापुर्वी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना सांगायला नको होता काय? त्यातून जगाच्या ज्ञानामध्ये किती बहूमोलाची भर पडली असती ना?

दाभोळकर पवारांचे खुप निकटवर्तिय होते आणि त्यांनी अशा दैवी चमत्कार व साप वगैरे भोंदूगिरीवर खुप झोड उठवली होती. त्यामुळे असे काही झाले असेल, तर पवार साहेबांनी त्याची थोडी खातरजमा करून घ्यायला हवी होती. कारण त्यानंतर ते कधी भीमाशंकरला फ़िरकलेले नसले, तरी त्यांच्या पत्नी प्रतिभाताई अजून अगत्याने तिथे जाऊन कसली तरी पूजा करीत असतात. असे काही कितपत शक्य आहे? ते फ़क्त दाभोळकरच सांगू शकले असते. मग आपल्या पत्नीला तशा अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचे अगत्य कोणी दाखवायला हवे होते? पण त्यापैकी कुठलेही काम साहेबांनी केले नाही. कदाचित त्यासाठी दिलीप वळसे पाटील यांच्या षष्ठ्यब्धीचा मुहूर्त योग्य ठरेल, असे कोणा ज्योतिषाचा सल्ला घेऊन त्यांनी ठरवले असावे. अन्यथा हा किस्सा जाहिरपणे सांगायला एकोणचाळीस वर्षे कशाला लागली असती? दाभोळकर विज्ञानवादी होते. बाकीचे जग तितके विज्ञानवादी नाही. म्हणूनच आता राजकारणातले अनेकजण कुठल्या विश्रामधामातल्या खोलीत साप मध्यरात्री अंगावरून सरपटत जातो, याचा शोध घ्यायला लागले असतील. म्हणजे असा किस्सा सांगून व त्याची प्रचिती आपल्याला आलेली कथन करून, साहेबांनी इतरांना सापाच्या नादी लावलेले नाही काय? पण यातली एक गोष्ट अंधश्रद्धेची वाटली तरी दुसरी गोष्ट सापशिडीच्या खेळातील अंधश्रद्धा संपवणारी आहे. ती म्हणजे त्या खेळात साप गिळतो आणि खालच्या पदावर आणुन टाकतो, असा समज होता. साहेबांनी हा किस्सा सांगून सा्पच उच्चपदी घेऊन जात असल्याची नवी विज्ञानश्रद्धा निर्माण केली आहे ना? मात्र अशी कथा वा अनुभव सांगताना तो साप पुढे कुठे गेला व कोणला डसला, म्हणून अकस्मात पवारांना मुख्यमंत्रीपद लाभले, त्याचा कुठलाही खुलासा झालेला नाही. कारण पवार मुख्यमंत्री झाल्याने इतर अनेकांची पदे व सत्ता गेलेली होती.

ती घटना घडली त्यानंतर सकाळी दिलीप वळसे पाटील यांच्या पित्याच्या आग्रहाखातर पवारांनी कुठली तरी पूजा केली. ज्या दिवशी पूजा केली, त्याच दिवशी मुंबईला परतल्यावर त्यांनी उद्योगमंत्री पदाचा राजिनामा दिलेला होता. अशी कोणती घटना वा घडामोड त्या कालखंडात घडत होती? अचानक कोणी मंत्री आपल्या पदाचाहीराजिनामा देऊ शकत नाही. किंबहूना पवारांनी एकट्याने मंत्रीपदाचा राजिनामा टाकलेला नव्हता. त्यांच्यासोबत सुशीलकुमार शिंदे, सुंदरराव सोळंके व दत्ता मेघे अशा आणखी तीन मंत्र्यांनीही राजिनामे दिलेले होते. त्यापैकी कोणा कोणाच्या अंगावरून आदल्या रात्री कुठल्या विश्रामधामात साप सरपटत गेला होता? नसेल तर त्या अन्य तिघांनी कशासाठी राजिनामे दिले? एकाच्या अंगावरून साप सरपटला तर कितीजण राजिनामे देतात? अंगावरून साप सरपटत गेल्यामुळे कोणत्या प्रकारच्या राजकीय घडामोडी घडू शकतात? त्याही दिवशी अशी कोणती घटना घडलेली होती, की पवारांनी थेट मंत्रीपदाचा राजिमाना देण्याची पाळी आली? पुढल्या आठ दिवसात कोणकोणते साप-नाग व त्यांचे गारूडी मुंबईत वा अन्यत्र पुंगी वाजवत होते? अशा शेकडो प्रश्नांची मग गर्दी होते. कारण तेव्हा आपले मुख्यमंत्रीपद गेले असले म्हणून वसंतदादा पाटील यांनी त्यानंतरच्या काळात कुठल्या साप मुंगूसाचा किस्सा कधी कोणाला सांगितल्याचे कोणाच्या ऐकीवात नाही. त्याचाही काही खुलासा आवश्यक नाही काय? कारण घटना व घडामोडींनी पवारांना मुख्यमंत्रॊपद दिले, ते रिकामे नव्हते. साप पवारांच्या अंगावरून गेला तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा होते व त्याच दिवशी दादांचे मुख्यमंत्रीपद रिकामे करण्यात आले होते. मग त्या सापाने डुख धरल्यासारखे दादांचे मुख्यमंत्रीपद कशाला गिळंकृत करावे? पुराणात सर्पदंशाच्या अनेक कथाकहाण्या आहेत. पण नुसता अंगावरून साप सरपटला म्हणून कोणी उच्चस्थानी पोहोचतो, अशी दैवीकथा कुठल्या पुराणात आढळत नाही.

आणखी एक मजेशीर गोष्ट आहे. जगात कुठल्याही सामान्य घरात वा समाजात अंगावरून साप गेल्याची घटना सांगितली, तर लोक आधी सापाचा शोध सुरू करतात. भयभीत होतात. साहेबांची कथा त्यातही अजब आहे. ज्याला ती घटना सांगितली तो भयभीत होण्यापेक्षा त्याला आनंदाच्या उकळ्या फ़ुटल्या, हा चमत्कारच नाही का? महाराष्ट्राच्या कुठल्याही खेड्यात वा नगरात असे काही घडल्यावरची पहिली प्रतिक्रीया काय असते? कोणी आनंदाने नाचू लागला वा त्याने त्यात शुभशकून शोधल्याचे हे बहुधा पहिलेच उदाहरण असावे. याला म्हणतात अंधश्रद्धा निर्मूलन! इथे साप अंगावरून गेला म्हणजे अपशकून नव्हेतर शुभशकून असल्याचे दिसते आणि जाणत्या व्यक्तीला त्याची प्रचिती आलेली असल्याने, आता लोकांनी गावोगावी तसे सामान्य जनतेचे प्रबोधन करायला हरकत नाही. किंबहूना ज्याला राजकीय महत्वाकांक्षा आहे, त्याने बाकी काही करण्यापेक्षा आपल्या परिसरात किंवा पर्यटनाला जाईल तिथे, सापांची वर्दळ असेल याची खातरजमा करून घ्यायची. पुढले काम काही शिल्लक रहात नाही. बाकी तुमच्या महत्वाकांक्षा सिद्धीस नेण्यास नागोबा समर्थ असतील. उगा़च खेड्यापाड्यात फ़्लेक्सचे भलेथो्रले फ़लक लावण्याची, ट्रक ट्रॅक्टरने लोकांना जमवून भव्यदिव्य सभा संमेलने घेण्याची गरज नाही. पक्षश्रेष्ठीचे उंबरठे झिजवण्याचीही गरज नाही. रोजच्या रोज कुठल्या ना कुठल्या विश्रामधामात जाय़चे आणि आपल्याही अंगावरून साप सरपटत खिडकीच्या बाहेर निसटून जाण्याची घोर तपस्या करायची. अर्थात साप खिडकीतूनही जायला हवा. अन्यथा तुमच्या कमनशीबाला कोणी जबाबदार नसेल. तेव्हा होतकरू राजकारण्यांनो तात्काळ कामाला लागा. बालीश मुख्यमंत्र्याला हटवून महाराष्ट्राच्या सत्तेत पुन्हा राष्ट्रवादी कॉग्रेसला आणून स्थानापन्न करण्याचा जालीम उपाय साहेबांनी सांगितला आहे. कामाला लागा. साप हीच सत्तेची शिडी आहे.

5 comments:

  1. सध्या शरद पवार यांना कोणीही काहीही विचारत नाहित त्याचबरोबर त्यांना जे काही अपेक्षित असते तसे काहिहि घडत नाहि म्हणून अश्या जुन्या कढिला ऊत आणायचा प्रयत्न सतत चालू आहे .

    ReplyDelete
  2. भाऊ,दुय्यम (graceless) चे हे खरे चेहरे आहेत.यानाही बहनजी प्रमाणे देवी देवतां चा साक्षात्कार होऊ लागला आहे

    ReplyDelete
  3. उत्तम विचार आणि राजकीय जाण

    ReplyDelete
  4. भाऊ,पवारसाहेबांना सापाच्या साक्षात्कार झाला तोही 39 वर्षा पुर्वी अणि त्याची माहिती आत्ता त्यांनी दिली याचा अर्थ त्यांना कार्यकर्त्यांनावर आता विश्वास बसला असेल की आता कार्यकर्ते साप सदृश्य जागा शोधणार नाहीत अणि जरी शोधणारे असलेच तर त्यांचा बळी देऊन नक्की ते कुठल्यातरी शिडीपाशी पोहोचण्याची तयारीत लागले आहेत

    ReplyDelete