Wednesday, October 11, 2017

आवघे पाऊणशे वयमान

KBC के लिए चित्र परिणाम

कालपरवा ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात एक महिला अमिताभसमोर होती आणि त्यात प्रश्न आला होता एका चित्रपटाच्या संबंधातला. सत्यजित राय यांच्या एकमेव हिंदी चित्रपटाविषयी तो प्रश्न होता. त्या महिलेले त्याचे चोख उत्तर देऊन काही रक्कम जिंकली आणि नंतर अमिताभने तिला अन्य काही विचारले. चित्रपटाच्या
आरंभीच एक निवेदन आहे आणि तेच ऐकवून चित्रपटाचे नाव ओळखण्याचा प्रश्न होता. त्या स्पर्धक महिलेले चित्रपटाचे नाव नेमके ओळखले. तेव्हा अमिताभ म्हणाला हा आवाज व निवेदन एका व्यक्तीने केलेले आहे. तो आवाज तुम्ही ओळखला काय? ती हसून उत्तरली सर, तुमचाच तर आवाज आहे. त्यावर अमिताभमे मनातली व्यथा बोलून दाखवली. सत्यजित राय यांच्यासारख्या मोठ्या दिग्दर्शकाच्या सोबत काम करण्याची इतकीच मामूली संधी मिळाली. आपली त्यांच्याविषयीची आठवणही त्याने अगत्याने सांगितली. असे शेकडो स्पर्धक या कार्यक्रमाच्या निमीत्ताने त्याच्यासमोर आजवर बसून गेलेत. त्यापैकी अनेकजण अगदीच सामान्य घरातले व स्थितीत वाढलेले आहेत. एखाद्या सेलेब्रिटीविषयी त्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता असते आणि तशी महान व्यक्ती समोर आल्यावर काय कसे बोलावे हेच सुचत नाही. अनेकांनी तशी कबुलीही तिथेच दिलेली आहे. तेही खरेच आहे. ज्याला दिर्घकाळ सुपरस्टार म्हणून आशिया ओळखतो, त्याच्या प्रत्यक्ष दर्शनानेही अनेकांच्या डोळ्याचे पारणे फ़िटत असते. त्याच्याशी खराखुरा मनमोकळा संवाद ही केवळ कल्पना असू शकते. अनेकांना तर नुसती त्याची थेटभेट सुद्धा कोट्यवधीचे बक्षिसच वाटते. अशा मनस्थितीत प्रश्न व त्याचे उत्तर देण्यात कोणीही डळमळीत होऊन जाणे स्वाभाविक आहे. पण अशा दबून जाणार्‍यांना बोलते करण्याची अमिताभची किमया खरेच वाखाणण्यासारखी आहे. दिवसभर टिव्हीचे पडदे व्यापून बसलेल्या शेकडो संयोजकांना त्यापासून काही शिकण्याची गरज आहे.

वास्तविक अमिताभच्या समोर बसून मनमोकळ्या गप्पा करणे वा त्याच्या भुलभुलैया करणार्‍या प्रश्नाचे नेमके उत्तर देणे अवघड गोष्ट आहे. पण त्यासाठी स्पर्धकाला प्रवृत्त व प्रोत्साहित करण्याची अमिताभची कला निदान भारतीय टिव्हीवर तरी एकमेवाद्वितीय आहे. आपण अन्य वृत्तवाहिन्यांवरच्या मुलाखती वा चर्चा बघितल्या तर हा फ़रक नजरेत भरणारा आहे. एकाहून एका वाहिन्यांवर अनेक जाणते अभ्यासक व राजकारणी वक्ते नित्यनेमाने हजेरी लावत असतात आणि त्यांच्यासारख्या अस्खलीत वक्ते प्रवक्त्यांची बोलती बंद करणारे संयोजक आपण नेहमी बघत असतो. कधी आपण केबीसी व अन्य वाहिन्यांच्या चर्चा यांची तुलना करून बघितली आहे काय? इथे मुखदुर्बळ स्पर्धकाला बोलता करणार आमिताभ आणि बाकी वाहिन्यांवर अनेकांना बोलूही न देणारे संयोजक संवादक यातला जमिन अस्मानाचा फ़रक सहज लक्षात येऊ शकतो. कुठल्याही वृत्तवाहिनीच्या चर्चेत संयोजक कोणाला तरी प्रश्न विचारतो. त्याचा प्रश्नच इतका लांबलचक असतो की त्यात काही मिनीटे खर्ची पडलेली असतात. पण चर्चेत सहभागी झालेल्या पाहुण्याने तोंड उघडण्याची खोटी, तात्काळ दोनचार शब्दही ऐकण्यापुर्वी संयोजक त्याच्या बोलण्यात व्यत्यय आणू लागतो. त्या पाहुण्याला बोलूच द्यायचे नाही, असा चंग बांधून हे संयोजक आखणी करतात किंवा कसे, असा नेहमी प्रश्न पडतो. सहाजिकच संपुर्ण चर्चा म्हणजे एक गोंधळ गोंगाट अशी काहीशी स्थिती होऊन जाते. पाहुणा आपल्या परीने बोलत रहातो आणि संयोजक वा अन्य पाहुणे त्यात व्यत्यय आणत रहातात. असे कार्यक्रम हे प्रेक्षकाने ऐकावे व त्यातून काही ज्ञान प्राप्त करावे, ही अपेक्षाच नसल्याचा अनुभव त्यातून येतो. अमिताभचा कौन बनेगा करोडपती हा म्हणूनच एक अपवाद ठरलेला आहे. मुलाखत घेताना समोरच्याला बोलते करायचे असते, हे त्यातून लक्षात येते.

कोणालाही आमंत्रण देऊन कार्यक्रमात सहभागी व्हायला बोलावलेले असेल, तर त्याने बोलणे व त्याचे मत समोर येण्याला प्राधान्य असते. पण आपल्याकडल्या वाहिन्या व त्यावर चर्चेचे संयोजन करणारे, यांना समोरच्याला अवाक करून ठेवण्यासाठीच नेमलेले असते किंवा काय, अशी शंका येते. यातल्या अनेक संयोजकांचे १९७० च्या जमान्यात जन्मही झालेले नसतील. तेव्हाचा अमिताभ सुपरस्टार होता. विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत त्याने हिरो म्हणून काम केले आणि नंतर वयाला शोभणार्‍या भूमिका करताना अजून त्याने महानायक म्हणून आपली प्रतिमा जपलेली आहे. कुठल्याही वादग्रस्त विषयात नाक खुपसण्यापेक्षा त्याने सार्वजनिक जीवनातील आपली अलिप्तता कसोशीने जपलेली आहे. पण त्याच्यातली शालीनता कुठल्याही यशालाही लाजवणारी आहे. साधा प्रश्नोत्तरांचा हा कार्यक्रम आहे. पण आपल्या समयोचित बोलण्यातून व वागण्यातून अमिताभ सामान्य स्पर्धकालाही खुलवून पेश करतो आणि कुठल्याही वृत्तवाहिनीपेक्षा अधिक ‘लाईव्ह’ कार्यक्रम सादर करतो. समोर असलेली व्यक्ती आपल्या व्यक्तीमत्वाने दबून जाऊ नये, यासाठी त्याने केलेले प्रयास लपून रहात नाहीत. त्याचे उलटे टोक आपण अन्य वृत्तवाहिन्यांवर बघू शकतो. जगातली कितीही मोठी मान्यवर व्यक्ती पाहुणा म्हणून बोलावून त्याला अपमानित करण्याचाच प्रयास किळसवाणा असतो. कालपरवा एका वाहिनीवर कॉग्रेस समर्थक म्हणून अथक गोंधळ करणार्‍या अलिमुद्दीन नामक पत्रकाराला कंटाळून रतन शारदा नावाच्या एका पाहुण्याने पुन्हा अशा व्यक्तीचा सहभाग असलेल्या चर्चेत आपल्याला बोलावू नये म्हणत सभात्याग केला. त्याच्या तुलनेत अमिताभचे ‘संवाद साधणे’ कौतुकास्पद नाही काय? बदलत्या जमान्याशी जुळवून घेणारा हा पाऊणशे वयमान गाठलेला अभिनेता, म्हणूनच महानायक मानला जातो.

एका बाजूला अनेक वाहिन्या डबघाईला आलेल्या आहेत आणि त्यांच्यात टिआरपीसाठी सतत हाणामार्‍या चाललेल्या असतात. प्रामुख्याने मराठी वृत्तवाहिन्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. त्यातून बाहेर पडून प्रेक्षक मिळवायचा कसा, अशी समस्या त्यांना भेडसावते आहे. ती सोडवायची असेल तर या वाहिन्यांच्या पत्रकार संपादकांना सक्तीने अमिताभच्या या कार्यक्रमांचे चित्रण अभ्यासाला लावले पाहिजे. असे कार्यक्रम विरंगुळा म्हणून किंवा मनोरंजन म्हणून प्रेक्षक बघत असतो. त्यातून ज्ञानवर्धन होणार असेल, तर त्यालाही हवे असते. पण विरंगुळा नाही वा मनोरंजनही नाही. ज्ञानार्जनाची शक्यताच नसेल, तर प्रेक्षक आपला वेळ वाया तरी कशाला घालवणार ना? म्हणून वृत्तवाहिन्यांकडे मोठ्या संख्येने पाठ फ़िरवली जात आहे. देश बघतो आहे किंवा देशाला उत्तर हवे आहे, असली भाषा निरर्थक झाली आहे. देशातील एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात किती टक्के लोक टिव्ही बघतात आणि त्यातली किती टक्के जनता वृत्तवाहिन्या बघते? एकदोन टक्केही लोक वाहिन्यांवरच्या बातम्या वा चर्चा बघत नसतील, तर जनमानसावर त्याचा किती परिणाम होणार? पण याच्याच तुलनेत केबीसीमध्ये एका महिलेने उत्तर देताना सांगितलेला संदर्भ मोलाचा आहे. एक प्रश्न खुप जुन्या काळातला होता आणि ते नेमके उत्तर दिल्यावर अमिताभने विचारले कुठून ही माहिती मिळाली? तर ती महिला उत्तरली याचा उल्लेख पंतप्रधानांच्या ‘मनकी बात’ या कार्यक्रमात आलेला होता. इतक्या बारकाईने लोक पंतप्रधानाचे रेडीओवरील भाषण ऐकत असतील, तर कुठल्याही वाहिनीवरचे मार्गदर्शक वा ज्ञानवर्धक कार्यक्रम कशाला बघणार नाहीत? पाऊणशे वयमान होऊन नव्या पिढीलाही अमिताभ का भावतो, त्याचे उत्तर यात सामावलेले आहे. तो काही सांगू इच्छित असेल तर लोक समजून घ्यायलाही उतावळे आहेत. नुसता गोंगाट तुम्हाला आवडत असेल, पण प्रेक्षक त्याला कंटाळला आहे.

10 comments:

  1. वा! भाऊ, अचूक विश्लेषण!

    ReplyDelete
  2. तुम्ही ज्या संयोजक लोकांबद्दल बोलत आहात त्यातले कैक जण MBA वाले असावेत. त्यांच्या कडे Group Discussion म्हणजे हाणामारी असा प्रकार असतो. रेशन दुकानावर लोक भांडतात त्याप्रमाणे. KBC सोबतच क्रिकेट मधील फोर्थ अम्पायर नामक कार्यक्रम पण छान असतो.

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर, भाऊ. अमिताभ ग्रेट आहेच यात कोणतेही दुमत नाही पण त्याच्या मोठेपणा, शालीनता कुठे..? आणि या सुमार वाहिन्यांवरील सुमार/ निवेदक/पत्रकार/मुलाखतकार कुठे? तुलनाच होऊ शकत नाही....

    ReplyDelete
  4. Dear Sir All news channel so called these type of programs are just eyewash they are least interested in taking some subject and get the discussion to some point of conclusion, their aim is to just kill the time and show to their management TRP or how the program is being beautifully conducted

    ReplyDelete
  5. श्रीनिवास जोशीOctober 11, 2017 at 10:37 AM

    अतिशय सुंदर भाऊ, अमिताभ खरच ग्रेट आहेत

    ReplyDelete
  6. भाऊराव,

    या लेखातून ज्यांनी बोध घ्यायची गरज आहे ते लोकं तो आजिबात घेणार नाहीयेत. उलट मोदी आणि अमिताभ यांनी संगनमताने मोदींची लाल केल्याचा आरोप करू पाहतील.

    रत्न कसं पारखावं हे तुमच्याकडून शिकायला मजा येते.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  7. wa bhau, tumhi patrakaritemadhil amitabh ahat

    ReplyDelete