Thursday, October 12, 2017

राहुल नावाचा सापळा

संबंधित चित्र

गेल्या वर्षभरात वृत्तवाहिन्यांच्या जगात फ़ार मोठे बदल झालेले आहेत. गेल्या पाच वर्षात प्रथम क्रमांकाची मानल्या जाणार्‍या टाईम्स नाऊ या वाहिनीचा संपादक अर्णब गोस्वामी तिथून बाहेर पडला व त्याने सहा महिन्यांपुर्वी रिपब्लिक नावाची स्वतंत्र वृत्तवाहिनी सुरू केलेली आहे. ज्या मोजक्या इंग्रजी वाहिन्या भारतात आहेत, त्यामध्ये आता दोनच वाहिन्यांचे वर्चस्व आहे. टाईम्स नाऊ व रिपब्लिक अशा दोन वाहिन्यांनी बहुताश इंग्रजी प्रेक्षक बळकावला आहे. अन्य वाहिन्या त्यांच्या तुलनेत जवळपास नगण्य झालेल्या आहेत. मजेची दुसरी गोष्ट अशी, की या दोन वाहिन्यांनी देशातील माध्यमांचा अजेंडाही बदलून टाकला आहे. आजवर दिल्लीतल्या पत्रकारितेने देशात पसरलेल्या एकूण हिंदी व प्रादेशिक भाषेतील पत्रकारितेवर कायम वर्चस्व गाजवलेले आहे. त्यांनी एक विषय वा मुद्दा लावून धरायचा आणि मग बाकीच्या पत्रकारांनी व माध्यमांनी त्यांचे अनुकरण करायचे. ही बाब एकदम उलटून गेली आहे. आता या दोन प्रमुख इंग्रजी वाहिन्यांकडे माध्यमांचे नेतृत्व आले असून, त्यांच्यामुळे राजधानीत बसून पत्रकारितेला दिशा देणार्‍या मुठभरांची मक्तेदारी संपुष्टात आलेली आहे. अगदी स्पष्ट शब्दात बोलायचे, तर गेल्या दोन दशकात ज्यांनी पुरोगामीत्वाच्या नावाखाली पत्रकारितेला ओलिस ठेवलेले होते, त्यातून पत्रकारिता मुक्त झाली आहे. त्या मुक्तीलाच असंहिष्णूता ठरवण्याचे नाटकही रंगून निकालात निघालेले आहे. अशा राष्ट्रीय माध्यमांवर कॉग्रेसने सध्या बहिष्कार घातला आहे आणि त्यांच्याऐवजी पुरोगामी डावे किंवा अन्य लोक कॉग्रेसच्या समर्थनाला हजेरी लावताना दिसतात. हे सर्व आपोआप घडले आहे की तो एक सापळा आहे, अशी आता शंका येऊ लागली आहे. किंबहूना राहुल गांधींचा पोरकट बचाव करणार्‍या पुरोगामी डाव्यांची कसरत बघितली, मग तर हा जाणिवपुर्वक योजलेला सापळा आहे याची खात्रीच पटू लागते.

गेल्या सहा आठ महिन्यात टाईम्स वा रिपब्लिक या वाहिन्यांवर सहसा कोणी अधिकृत कॉग्रेस पक्षीय प्रवक्ता येत नाही. तहसिन वा शहजाद पुनावाला हे बंधू कॉग्रेस समर्थक म्हणून येतात किंवा प्रकाश झा, अलिमूद्दीन खान वा तत्सम कोणी अनधिकृत कॉग्रेसचे लोक असतात. अनेकदा कॉग्रेसने आपल्यावर बहिष्कार घातल्याचेही या वाहिन्या बोलून दाखवतात. कारणही स्पष्ट आहे, या दोन्ही वाहिन्यांनी युपीए व कॉग्रेसच्या नेत्यांची दहा वर्षाच्या राजकीय कारकिर्दीतली पापे चव्हाट्यावर आणायची मोहिमच हाती घेतलेली आहे. त्यातले आरोप वा तपशील खोडून काढणे शक्य नसल्याने, त्याला राजकीय सूडबुद्धी ठरवून पळणे कॉग्रेसला भाग आहे. पण याच्याही पलिकडे अनेक विषय असे असतात, की त्यात राहुल गांधींच्या वेडगळ व पोरकट बडबडीने वाद निर्माण होत असतात. तेव्हाही त्याचे तर्कशुद्ध समर्थन अशक्य असते. सहाजिकच कॉग्रेस त्यापासून कटाक्षाने दूर रहात असेल, तर गैर नाही. पण हे निमीत्त साधून त्याच वाहिन्या अन्य पुरोगामी पक्ष वा विचारवंतांना सहभागी करून घेतात. त्यातली गंमत गुंतागुंत समजून घेण्यासारखी आहे. विषय कितीही हास्यास्पद असो किंवा राहुलनी कितीही बाष्कळ बडबड केलेली असो, त्याचा भाजपाच्या प्रवक्त्याने विरोध केला, मग बिगरकॉग्रेसी पुरोगामी त्याचे हिरीरीने समर्थन करतात. त्यांना भाजपा विरोधात बोलण्याची खुमखुमी असल्यानेच असे पुरोगामी वक्ते प्रवक्ते राहुल गांधींचे खुळचट समर्थन करताना दिसता्त. हा आता मागल्या काही महिन्यांचा परिपाठ झाला आहे. त्यात आयुष्यभर कॉग्रेसला शिव्याहाप मोजण्यात घालवलेले डावे नेते व प्राध्यापकही सहभागी होतात, याचे नवल वाटते. पण ती नुसती नवलाईची गोष्ट आहे, की त्यामागे काही लबाड हेतू आहे? भाजपाच्या विरोधात पुरोगामी मंडळी किती पोरकट व निरर्थक टोकाला जाऊ शकतात, हेच यातून सिद्ध करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना?

परवा एका वाहिनीच्या चर्चेच भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी समाजवादी प्रवक्ते घनश्याम तिवारी यांना विचारले, तुम्ही कॉग्रेससाठी कशाला सती जात आहात? त्याचा अर्थ असा, की कॉग्रेस आपल्या मुर्खपणाने संपते व मरते आहे. तुम्ही आपल्या पक्षाचा बचाव करायचे सोडून कॉग्रेसबरोबर सती कशाला जाता, असाच होतो ना? यात सति जाणे म्हणजे तरी काय? आपले आयुष्य शिल्लक असताना मेल्या पतीसोबत मृत्यूला कवटाळणे, असा असतो. राहुल गांधी हे पुरोगाम्यांचे नेता नाहीत, तर कॉग्रेसच्या घराणेशाहीच्या परंपरेने पक्षाला मिळालेले नेता आहेत. त्यांच्या प्रत्येक कृतीने व उक्तीने ते पक्षाला रसातळाला घेऊन चाललेले आहेत. त्यातून अधिकाधिक मतदार व कार्यकर्ते कॉग्रेसपासून दुरावत चालले आहेत. किंबहूना अडचणीचे विधान वक्तव्य असेल, तर त्याचे समर्थनही कॉग्रेसवाले करायला मागे रहातात. पण त्यातही भाजपाला झोडण्य़ाची संधी घेण्यासाठी अन्य पुरोगामी जो उत्साह दाखवतात, त्याला यातून मुद्दाम प्रोत्साहन दिले जात असावे काय? म्हणजे असे, की या वाहिन्या त्यात पुरोगाम्यांना ओढून राहुलच्या समर्थनाला उभे करत असाव्यात काय? जाणिवपुर्वक असे विषय चर्चेला घेतले जातात, की त्यात राहुल वा कॉग्रेस विरुद्ध भाजपा अशी विभागणी व्हावी. मग त्यात भाजपाची बाजू खरी ठरू नये, म्हणून अन्य पुरोगामी हिरीरीने बोलत जातात. पण त्यांच्या युक्तीवाद व मांडणीतून राहुल व कॉग्रेस यांचे समर्थन केले जाते. निदान चित्र तरी तसे तयार होते. ते चित्र तयार व्हावे असाच त्या वादविषयाचा हेतू असेल काय? कारण त्या चर्चा व वादात अखेरीस असे पुरोगामी हास्यास्पद होत जात असतात. तितकेच नाही तर ते वेगळे कोणी नसून कॉग्रेस व राहुलचेच समर्थक असल्याची धारणा निर्माण होत असते. तशीच धारणा तयार व्हावी, हा त्यातला सापळा कशावरून नाही?

कॉग्रेस नामशेष होत चाललीच आहे आणि त्यासाठी राहुल गांधी अहोरात्र धडपडत आहेतच. पण म्हणून भाजपा मजबूत झाला असे कोणी म्हणू शकत नाही. सहाजिकच कॉग्रेस जी शक्ती गमावते आहे, त्याची जागा अन्य पुरोगामी पक्षही भरून काढू शकतात. कॉग्रेसचा मतदार ठराविक कारणासाठी त्यापासून दुरावत असला, म्हणून तो भाजपाकडेच येतो असे अजिबात नाही. तो अन्य पर्याय बघू शकतो, स्विकारू शकतो. त्याला मार्क्सवादी वा जनता दल, समाजवादी असेही पर्याय उपलब्ध असू शकतात. पण ज्याला कॉग्रेसचा तिटकारा आलेला आहे, तो पुन्हा कॉग्रेस जिंकूच नये ,यासाठी कटिबद्ध झालेला असतो. सहाजिकच उद्या पुरोगाम्यांच्या मदतीने राहुल वा कॉग्रेस यांचा जिर्णोद्धार होण्याची शक्यता दिसली, तर तो मतदार कटाक्षाने पुरोगाम्यांनाही झिडकारू शकतो. सध्या डाव्या व पुरोगामी पक्षांनी जशी भूमिका घेतली आहे, ती त्यांचे पक्ष वा संघटना जनमानसात रुजवण्याची नसून कॉग्रेसला वाचवण्याची आहे. सहाजिकच त्यांनी आपल्याविषयी जनमानसात आशंका निर्माण केलेली आहे. त्या शंकेला अशा चर्चा वा युक्तीवादातून खतपाणी घातले जात असते. त्यातून डावे व अन्य पुरोगामी म्हणजे छुपी कॉग्रेसच असल्याचा आभास उभा केला जात आहे. भाजपाला झोडण्यासाठी अनवधानाने हे पुरोगामी राहुलचेही समर्थन करीत आहेत. पण पर्यायाने तेही पक्ष राहुलचे अनुयायी होत चालले आहेत. की त्यांना राहुलच्या गोठ्यात आणून बांधण्याची पद्धतशीर योजना यामागे कार्यरत झालेली आहे? रा. स्व. संघाच्या शाखेत अर्ध्या चड्डीतल्या मुली कधी दिसत नाहीत, या राहुलच्या वक्तव्यानंतर पुरोगामी प्रवक्त्यांनी मांडलेल्या भूमिका त्याची साक्ष देणार्‍या आहेत. हे अतिशहाणे भाजपाने लावलेल्या राहुल नावाच्या सापळ्यात फ़सल्याचे त्यातून स्पष्ट होत आहे. भाजपाला झोडण्यासाठी हे त्या चर्चेत सहभागी होतात. पण जनमानसात तेच राहुल समर्थक ठरून जातात ना?

11 comments:

  1. भाऊ नमस्कार ,
    आपल्या दिलखुलास शैलीमध्ये आपण ज्याप्रमाणे पुरोगामी विचारसरणी व तिच्या पुरस्कर्त्यांना वास्तवाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करता आहेत तो पाहूनही जर त्यांना जग येत नसेल तर खरोखरच त्यांचा अंत अटळ आहे.
    मागच्या आठवड्यामध्ये राहुल गांधी परदेशामध्ये अमेरिकेतील एका विद्यापीठामध्ये बोलताना म्हणाले होते कि गांधी, नेहरू, पटेल, आंबेडकर सगळे जण एन आर आय ( अनिवासी भारतीय ) होते. या वक्त्यव्यावर चर्चा रिपब्लिक या वाहिनीवर आयोजित करण्यात आली होती. या चर्चेत ज्येष्ठ पत्रकार व संपादक श्री कुमार केतकर यांनी सहभाग घेतला होता.
    त्या दिवशीचा त्यांचा अवतार, बोलणे वागणे एकूणच देहबोली पाहून मी फार उद्विग्न झालो.
    एक होतकरू पत्रकार म्हणून आम्ही जी या क्षेत्रातील मोठी नवे पहिली त्यात श्री केतकर हे एक आहेत. त्यांची हि अवस्था पाहून मनाला अत्यंत क्लेश झाले. आपणही त्यांच्याच पिढीचे पत्रकार आहात आपण हि चर्चा पहिली असेल तर ठीक नसेल तर मी लिंक पाठवतो आपण तो पाहून आपली प्रतिक्रिया द्यावी हि विनंती. आपणास योग्य वाटल्यास यावर एखादा लेख लिहावा हि नम्र विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. कुमार नव्हे "सुमार" केतकर

      Delete
    2. पाठवा लिंक...

      Delete
  2. ithale marathi patrkar tar rahul gujrat madhe ladies toilet madhe ka gele,yache samrthan karat twit kartayat.he tar congrss pan karat nahi.hadda zali

    ReplyDelete
  3. डिबेट २२-०९-२०१७ सर्वच एका तासाच्या काळामध्ये कुमार केतकर फारच विचित्र वागले विशेष ०५:५४ ते १२:०० मिनिटे
    https://www.youtube.com/watch?v=GLqJMh5CQ_w

    ReplyDelete
  4. २७:०० ते ३२:००
    ३३:३० ते ते३५:००
    ४२:२० ते ४३:३०
    ५१;०० ते ५२:४०

    ReplyDelete
  5. भाऊ आपण व्यक्त केलेली शंका रास्त आहे.
    मिडियावर विश्वास ठेवणं अशक्य आहे. कारण दशकांनुदशके यांनी आपल्या लाॅजवासी देशवासियांची दिशाभूल केली आहे. भारतीय नागरिक (लाॅजवासी) जागृत असते तर ही वेळ देशावर आली नसती.
    इंदिरा गांधी सारख्या कणखर नेतृत्वाला पण पाकिस्तानचा मानहानीकारक पराभव करुन सुद्धा देशावर सलग 10 वर्षं राज्य करू दिलं नाही हा ईतिहास आहे.
    याच मिडियाने पाकिस्तान विजयाच्या वेळी डोक्यावर घेतले. पण याच कणखर व दुरदर्शी ईंदिरा गांधी नी नसबंदी आणल्यावर याच मिडियाने इंदिरा गांधीना बदनाम केलं. यामुळे लोकसंख्या प्रचंड वाढली जी 1973 ला 60-65 करोड होती ती आज दुप्पट झाली आणि त्यामुळे आज देशावर प्रचंड ताण पडलाय.
    याच आर्णब गोस्वामी यांनी गेली 5-6 वर्षे काँग्रेस सोडुन इतर सर्व पक्षांना टिकेचे लक्ष केले. काॅमनवेल्थ, कोल, 2जी घोटाळ्याच्या वेळी येडुरआप्पा यांनी काय केलं अस भाजपला विचारुन सर्वच पक्ष भ्रष्टाचारी आहेत असे चित्र निर्माण केले. मनमोहन सिंग सारख्या बाहुल्याला चांगला सभ्य व ज्ञानी म्म्हणुन पेश केले.. व इतर अनेक घोटाळे होऊ दिले.
    भारतीय लाॅजवासी नागरिकाची सहज दिशाभूल केली..
    त्याचमुळे आपण उपस्थित केलेली शंका बरोबर आहे.
    आजही राहुल व सोनिया गांधीच्या सुमार व देशाच्या महत्वाच्या ढाच्याला नुकसान पोहोचवणार्या नेतृत्वाला कधीही धारदार टिकेचे लक्ष केलं नाही. ही वर वरुन साधीसुधी वाटणारी गोष्ट आहे परंतु याचा खोलवर विचार भाजप सारख्या संघाच्या विचारी पक्षाने पण केलेला वाटत नाही.
    हाच मिडिया मोदी शहा यांच्या एखाद्या पण चुकीच्या वाक्याचा पण किती मोठा गाजावाजा करेल हे पण पहायला मिळेल.. परंतु राहुलच्या पोरकट (विधेयक फाडुन खाली फेकून देणे) कृतींचा कधीही गाजावाजा टार्गेट केलं नाही. हा दुटप्पी पणा कोणी सिरियसली घेत नाही व खडा सवाल विचारणारा माय का लाल या भारतवर्षात अजून जन्माला यायचा आहे.. (अनेक जण आहेत पण मिडियाच्या बागुल बुवा ला घाबरुन आहेत कारण भारतीय लाॅजवासिय नागरिक खंबीर पणे अशा नेतृत्वाच्या पाठी ऊभे राहणार नाहीत ) त्यामुळे हे असेच चालू राहणार व कधी मधी काँग्रेस सोडुन इतर पक्षांना 2-5 वर्षे राज्य करायला मिळेल व गेल्या 70 वर्षाच्या पापाचे धनी व्हायला लागेल.
    हाच मिडिया 60-70 वर्षांत काय केलं म्म्हणुन आजही काँग्रेसला विचारत नाही पण विरोधी पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यावर वारंवार विचरुन अनुनभवी सरकारला भांबावून चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडतात व लाॅजवासी जनता आप आपल्या नादात मश्गुल आहे.
    मोदी सारखा मुर्रबी नेता पण स्वछता अभियान (कारण या खंडप्राय देशात टोपली भर कचरा कोणीही टाकुन अभियानाची व मोदींची धजीया ऊडवु शकतो.. तसेच रस्ते बांधणी वर या सरकारने करोडो रुपये गुंतवणूक केली आहे त्याला खड्डे पडलेकी परत हाच मिडिया व बुमर जागोजागी कॅमेरा फिरवून सत्ता फिरवु शकतो..? ( कदाचित गडकरी सारख्या महत्वाकांक्षी व संपन्न नेत्याला गुंतवून ठेवण्यासाठी ची चाल असु शकते असे सामान्यांना वाटते) यातील काही गुंतवणुक धरण व पाण्यावरील विज प्रकल्पात करुन शेती व शेतकरीची शतकानुशतके शतकांची तहान व भुक भागऊ शकतो. रेल्वेमध्ये रेल्वेडबे व रेल्वेस्थानकांचे प्लॅटफॉर्म लांबी व संख्या व अनेक ठिकाणी साइड रेल्वेलाईन टाकून गाडी पास करुन फेर्या वाढवु शकते. स्टेशन डेपो स्टॅन्ड च्या बाजुची बांधकाम तोडुन वेळप्रसंगी विकत घेऊन लँड अॅक्वायर करायचे नियम लावून/ नियम निर्माण करुन सामान्यांना दिलासा देऊ शकतात. तसेच एसटी गाड्या संख्या वाढवून सामान्य जनतेला दिलासा देऊ शकतात. ईनकम टॅक्सचे रेट कमी करुन भरिव लोकाभीमुक निर्णय घेतील अशी अपेक्षांची चर्चा करताना सामान्य नागरिक दिसतात.
    तुमच्या सारखे हजारो तुकाराम महाराज रामदास स्वामी जेव्हा जन्माला येतील तेंव्हाच या खंडप्राय देशात जागृती होऊ शकते.. व कदाचित भारतवर्षाचे भाग्य पलटु शकते..
    कदाचित सत्तेत पुर्ण देश सांभाळण्यात गुंतल्यावर मोदींना गुजरातमध्ये शेती विकासाला दिलेले प्रधान्य विसरायला झाले असेल. व मोदींनी सत्तेवर आल्या पासुन पत्रकारांना सामोरे जाण्याचे धाडस का केले नाही? ( मनमोहन सिंग दोन तीन वेळा तरी सामोरे जात होते हे सर्व प्रश्न मिडियावाले नी राखुन ठेवलेले वाटतात व मोदी सारखा धुर्त नेता याला कसा सामोरा जातो हे पहायला पाहिजे ) तरी आपल्या सारख्या आजच्या रामदास स्वामीनी विचारुन ( शिवाजी राजेना विचारल्या प्रमाणे) पुढील दिशा देशाच्या राजकारणाला देऊ शकतात... आपल्या अप्रतिम
    लेखा बद्दल धन्यवाद..
    एकेस

    ReplyDelete
    Replies
    1. योगेश काळेOctober 14, 2017 at 12:57 PM

      छान लिहिता... तुमचीही प्रतिक्रिया आवडली

      Delete
  6. काही वर्षांपूर्वी, समुद्रातील शिवस्मारकाच्या बद्दल बोलले म्हणून ज्या संघटनेच्या लोकांनी केतकरांच्या घरावर हल्ला केला, काळे फासले, आज त्याच लोकांना मांडीवर घेऊन तुम्ही सरकार स्थापले. तेव्हा केतकारांची ही प्रतिक्रिया स्वाभाविक आहे.

    ReplyDelete
  7. ketkar is pet of cong since when he born. so he will behave like this only. tragedy is people dont know reality of people like ketkar.

    ReplyDelete
  8. हा भाजपचा सापळा असेल कदाचित, पण असंही असू शकत ना हा तथाकथित पुरोगाम्यांचा सापळा असून तेच त्यात फसत आहेत, चार दोन पोटनिवडणुका मृगजळाप्रमाणे आभास निर्माण करतात आणि सापळा घट्ट होतो

    ReplyDelete