Monday, October 23, 2017

बेचाळिस वर्षापुर्वीची ब्रेकिंग न्युज (पुर्वार्ध)

indira emergency के लिए चित्र परिणाम

तारीख होती २५ जुन १९७५! मी आणि प्रदीप रात्रपाळीला होतो. तेव्हा मी दैनिक ‘मराठा’त उपसंपादक म्हणून कार्यरत होतो. मला रात्रपाळी आवडायची. कारण सूर्य मावळून गेल्यावर आठ वाजता सुरू होणारे काम मध्यरात्री बाराला संपत असे. रात्री एक वाजेपर्यंत पहिले व तिसरे पान उरकून घ्यावे लागायचे. पुढे दोन वाजेपर्यंत सकाळचा वाचकाच्या हाती पडणारा अंक छापला जाऊन हाती यायचा आणि तो बघून तिथेच तात्पुरती झोप काढायची. टेबलावरच आम्ही पथारी पसरत असू. मला कधीच सकाळी लौकर उठायची सवय नव्हती आणि प्रदीप वर्मा उजाडता उठून निघून जायचा. पण इतक्या सकाळी त्याने कधी माझी झोपमोड करीत मला जागवले नाही. ती रात्र तशीच गेली आणि आम्ही अपरात्री दोननंतर टेबलावरच लवंडलो होतो. दुसर्‍या दिवशी सकाळ उजाडली तेव्हा प्रदीपने नियम मोडला आणि अपवाद म्हणून माझी झोपमोड केली. तो घरी निघण्यापुर्वी टेलीप्रिंटन्टरवर नेहमी नजर टाकायचा. त्या काळात जगभरच्या बातम्या वर्तमानपत्रांना तात्काळ पुरवणारी एकच सुविधा होती, ती खडखडणारा टेलीप्रिन्टर! त्यात भल्या पहाटे येऊन पडलेल्या बातम्या बघून प्रदीप थक्क झाला होता. म्हणूनच त्याने मला उठवण्याचा प्रमाद केला.

भावड्या उठ! बाईने राडा केलाय! दिल्लीत मोरारजी, जयप्रकाशांना अटका झाल्यात. अनेक वृत्तपत्रांचे छापखाने सील केलेत. काही संपादकांनाही अटक झालीय.

अर्धवट झोपेतच प्रदीपचे ते शब्द ऐकत जागणार्‍या माझी झोप क्षणार्धात उडाली. तसाच उठून बसलो टेबलवर. डोळे चोळत पुन्हा प्रदीपला म्हटले भंकस करू नकोस! त्याने टेलिप्रिन्टरवरचा लांबलचक कागद फ़डकावत मला पुरावाच दिला. इतके बोलून प्रदीप निघाला. माझ्या हातात तो कागद तसाच होता आणि मी पुन्हा पुन्हा वाचून बघत होतो. खरेच इंदिराजींनी अपरात्री वटहुकूम काढून देशात आणिबाणी घोषित केली होती. विरोधात आंदोलन पुकारणार्‍या नेत्यांची धरपकड झालेली होती. दिल्लीतल्या अनेक वर्तमानपत्राच्या छापखान्यांत पोलिस गेले व त्यांनी कामे बंद पाडले होते. काही संपादकांनाही अटक झाल्याचे वृत्त त्यात होते. मी तसाच उठलो आणि कॅन्टीनमध्ये गेलो. दोन चहाची ऑर्डर देऊन बाथरूमला गेलो. नुसती चुळ भरून टाकली आणि आधी पेलाभर चहा ढोसला. एक सिगरेट शिलगावली आणि कंपोज खात्यात गेलो. रात्रपाळी केलेले काहीजण गेलेले असले, तरी सहासातजण रेंगाळलेले होते. तिथला रात्रपाळीचा प्रमुख झारापकरला उठवले आणि ‘सांजमराठा’चे काम सुरू करायची सूचना दिली. तोही डोळे चोळत उत्तरला, सकाळच्या पाळीतले लोक येऊन करतील. कशाला घाई करताय? तर त्याला स्थिती समजावली. दिल्लीतली कहाणी सांगितली आणि दुपारनंतर आपल्याही ऑफ़ीस छापखान्याला टाळे लागण्याची शक्यता पटवली. त्यानेही झटपट उठून इतर सहकार्‍यांना जागे केले. अवघ्या अर्ध्या तासात ‘मराठा’च्या कंपोज विभागात आणिबाणी लागू झाल्याची ब्रेकिंग न्युज देणारा अंक तयार करण्याची तारांबळ सुरू झाली. मग लुंगी गुंडाळून मी तसाच संपादक खात्यात आलो आणि कोरे कागद घेऊन बातम्या खरडू लागलो. पुढला अर्धा पाऊण तास घाणा घालत होतो. मध्येच गॅलरीतल्या टेलिप्रिन्टरचा खडखडाट विचलीत करत होता. पण पुढल्या घटनांचा गोषवारा त्यातून येत होता. ते कागद फ़ाडून त्याचेही मराठीत भाषांतर करण्याचा सपाटा लावला होता.

‘मराठा’तले शिपाई कंपोझिटर वा एकूण कर्मचारी आजच्या वाहिन्यांवरील पत्रकारांपेक्षाची तत्पर व प्रसंगावधानी होते. कंपोजचा फ़ोरमन झारापकर इतका हुशार, की त्याने एक मुलगा माझा लिहीलेला प्रत्येक कागद तात्काळ उचलून आणण्यासाठी तैनात केलेला. अनेक नेत्यांच्या अटकेसोबत कुणाकुणाच्या प्रतिक्रीयाही येत होत्या. त्यातून जितके काही भाषांतरीत करून घेता येईल, तितके मी भरभरा लिहून काढत होतो. साडेसातच्या सुमारास झारापकरचा फ़तवा आला. मजकूर पुरे झाला. आता फ़क्त हेडलाईन सांगा. ‘सांज मराठा’ टॅब्लॉईड्ची चार पाने असायचा. त्यात आतली दोन पाने आदल्याच दिवशी सज्ज केलेली असत. सहाजिकच सकाळी येणार्‍याने महत्वाच्या गुन्हे बातम्या वा अन्य काही घडले असेल तर, पहिल्या पानाचा मजकूर देण्याची जागा शिल्लक ठेवलेली असे. पण परिस्थितीचे गांभिर्य ओळखून झारापकर या फ़ोरमनने दोन पुर्ण पाने मजकूर कंपोज करण्याची धावपळ चालवली होती आणि मी अथक लिहिण्यात गढून गेलेला होतो. मजकुर पुरे म्हटल्यावर मी चहा बिस्किटे खाल्ली आणि डोक्यात विचार आला, नुसता अंक छापून काय होणार आहे? तो विकण्यासाठी बाजारात जायला हवा ना? कारण दुपारच्या संध्यापत्रांची छपाई व विक्रीची वेळ सूर्य कलंडल्यानंतरची होती. वितरक त्याच आसपास छापखान्यात यायचे. म्हणजे चारपाच तास बाकी होते. ही गोष्ट लक्षात आल्यावर मी तशाच अवतारात वितरण विभागात झोपलेल्या वाक्कर व अंबेरकर या दोघांना उठवले आणि त्यांच्या कानी घडामोड घातली. त्यांनीही तात्काळ उठून कामाला आरंभ केला. तेव्हा दादर स्थानकाच्या बाहेर स्टॉल लावणारा तावडे नावाचा विक्रेता ‘सांज मराठा’चा घाऊक विक्रेता होता. तासाभरात त्याला हजर होण्याचे आदेशच वाक्कर यांनी दिले आणि मग मी दात घासायला व प्रातर्विधी करायला मोकळा झालो होतो.

पण सकाळचे विधी उरकण्यापुर्वीच झारापकरने मजकूर तयार आल्याचे सांगत मला पुन्हा कंपोज खात्यात खेचून नेले आणि दहा मिनीटातच त्याचे काम उरकून घेतले. आठ वाजून दहा मिनीटे होण्यापुर्वीच ‘सांज मराठा’ हे २६ जुन १९७५ रोजीचे संध्यापत्र छापायला पाठवण्यात आले होते. तोंड धुवून व प्रातर्विधी उरकून मग मी शांत चित्ताने संपादकीय विभागातल्या खुर्चीवर विसावलो होतो. बाहेरच्या जगाला देशात काय राजकीय उत्पात घडला आहे, त्याचा थांगपत्ता नव्हता. अगदी माझ्या अनेक ज्येष्ठ सहकारी व संपादक व्यवस्थापकांनाही देशात अणिबाणी लागू झाल्याची माहिती मिळालेली नव्हती. सकाळी येऊन सांजपत्राचे पहिले पान बनवणारा माझा सहकारी प्रभाकर राणे साडेआठला नेहमीप्रमाणे पोहोचला, तेव्हा मी पीटीआयचे भेंडोळे घेऊन बातम्या चाळत बसलो होतो. त्याने मिश्किलपणे मला डिवचले, ‘भाऊराव सूर्यवंशी उठा, जागा रिकामी करा. ‘सांज मराठा’ काढायचाय आजसुद्धा!’ ही नेहमीचीच गोष्ट होती. तो साडेआठला पोहोचला तरी मी मुख्य टेबलावर लोळत पडलेला असायचा. रोज प्रभाकरच मला उठवायचा! आज मी उठून बसलेला बघून तोही किंचीत चकित झालेला होता. पण त्याने टोमणा मारलाच. मीही मग त्याची गंमत करण्यासाठी म्हटले, उठलेलाच आहे. जागा रिकामी करायला किती वेळ लागणार? जरा कंपोजमध्ये जाऊन मजकूर किती हवा, ते तरी फ़ोरमनला विचारून घे.’ हातातले सामान टेबलवर ठेवून राणे आत गेला आणि थक्क होत माघारी परतला. कारण आणिबाणी लागली वा जगात काय घडले आहे, त्याचा त्यालाही पत्ता नव्हता. अंक छापायला गेला हे कंपोजमधून कळल्यावर गंभीर चेहर्‍याने तो मला विचारू लागला काय काय झालेय. त्याच्या समोर पीटीआयच्या कागदांचे भेंडोळे फ़ेकले आणि हसू लागलो.

इतक्यात वाक्कर आले आणि तावडे अर्ध्या तासात येत असल्याची खबर त्यांनी दिली. त्यांनीच एव्हाना व्यवस्थापक संपादकांनाही आणिबाणीची बातमी कळवली होती. मात्र यापेक्षा इतरांना काही कळवण्याची सोय त्या काळात नव्हती. बहुतांश पत्रकार उपसंपादकांच्या घरी साधे लॅन्डलाईनचेही फ़ोन नव्हते. रेडिओ किंवा दुरदर्शन सरकारी यंत्रणा होत्या आणि सामान्य लोकांसाठी रस्त्यावर उपलब्ध असणारे व दहा पंधरा पैशात मिळणारे वर्तमानपत्र, हीच बातमी कळण्याची एकमेव सुविधा होती. सहाजिकच ती सुविधा रोखली, म्हणजे बातमी लोकांपर्यंत पोहोचणेच अशक्य होते. अविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी इतकी सोपी होती. प्रचार, प्रसार व संपर्काची साधनेच खुप अपुरी होती आणि ९९ टक्के लोकांसाठी त्यापैकी कुठलेही साधन उपलब्ध नसायचे. आज मोबाईल, डेटा, सोशल मिडीया, व्हाटसप अशा जमान्यात जगणार्‍या पिढीला अशी त्रुटी वा मर्यादा समजून घेणेही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. दिल्लीतल्या संपादकांना अटक व अनेक वृत्तपत्रांच्या छापखान्याला पोलिसांनी सील ठोकल्याचे वृत्त इशारा होता. कुठल्याही क्षणी मुंबईतल्याही वर्तमानपत्रांची गळचेपी होणार हे गृहीत होते. म्हणूनच मी घाईगर्दीने आपल्या अधिकारात चार तास आधीच ‘सांज मराठा’ प्रसिद्ध व्हावा आणि लोकांपर्यंत ही बातमी पोहोचावी, असा आटापिटा केलेला होता. सकाळी नऊ वाजण्यापुर्वीच छापखान्यातील रोटरी मशीन धडधडू लागले आणि ‘सांज मराठा’ची छपाई सुरू झाली होती. पण ते अंक छापून उपयोग नव्हता. कुठल्याही क्षणी पोलिस येऊन छापलेल्या प्रति जप्त करण्याचा धोका कायम होता. म्हणून तर तावडेला थेट शिवशक्तीवर बोलावले होते. जितक्या प्रति छापल्या जातील, तशा पाचसात हजार घेऊन वितरणाला आरंभ करण्याचा आग्रह त्याच्याकडे धरला होता. त्यानेही उत्तम साथ दिली होती. दिसेल ती वा मिळेल ती टॅक्सी अडवून तावडे व त्याचे सहकारी ‘सांज मराठा’च्या दादरला घेऊन जात होते. देशात हुकूमशाहीची आणिबाणी लागू, अनेक राष्ट्रीय नेत्यांना अटक, असे काहीसे शीर्षक मी दिलेले होते. 

अकरा वाजण्यापुर्वीच वरळी पोलिस ठाण्याचे पथक ‘मराठा’चे कार्यालय व छापखाना असलेल्या शिवशक्ती वास्तुत दाखल झाले आणि त्यांनी छपाई रोखली. मात्र तोपर्यंत तावडे व वाक्कर यांच्या चतुराईमुळे पन्नास हजारापेक्षाही अधिक प्रति बाजारात गेलेल्या होत्या. हळुहळू माझे अनेक ज्येष्ठ सहकारी व व्यवस्थापकीय स्टाफ़ शिवशक्तीमध्ये जमा होऊ लागला होता. व्यवस्थापकीय संचालक व्यंकटेश पै, संपादिका शिरीष पै आलेले होते आणि याच दरम्यान दिल्लीतल्या घडामोडीची खबरबात देशभर पोहोचती करणारा टेलिप्रिन्टर थंडावला. घंटी वाजून थांबला म्हणून तिकडे धावलो, तर त्यात शेवटची माहिती आलेली होती. इंदिरा सरकारने वर्तमानपत्रांना सेन्सॉरशिप लागू केली असून पुढले आदेश मिळण्यापर्यंत कोणीही काहीही प्रसिद्ध करून नये, असा फ़तवा जारी केला होता. त्याच आदेशान्वये पीटीआयचा टेलिप्रिन्टर थंडावला होता. मात्र दरम्यान मी दाखवलेल्या चतुराई व तत्परतेसाठी हजर झालेल्या प्रत्येक ज्येष्ठाने माझे अगत्याने अभिनंदन केले होते. मग २६ जुनच्या सकाळी साडेअकराच्या सुमारास मी रात्रपाळी संपवून घरी निघालो. अर्थात घरी येऊन करण्यासारखे काहीच नव्हते. आपल्या सत्तेला आव्हान मिळाल्याने विरोधकांसह विरोधी आवाज दडपून टाकण्यासाठी इंदिराजींनी देशात अंतर्गत आणिबाणी लागू करून, संपुर्ण देशालाच तुरूंग बनवून टाकलेले होते. पण अंधोळ व इतर गोष्टी उरकून दुपारचे जेवून मी परत ‘मराठा’त हजर झालो. वरळी नाका येथे शिवशक्तीचे कार्यालय होते आणि मी लालबागला तेव्हा रहात होतो. मुद्दाम चालत घरी गेलो आणि येतानाही वरळीपर्यंत चालतच आलो.

सकाळी प्रदीपने झोपेतून जागे करून मला जगातली सर्वात मोठी बातमी सांगितली आणि खडबडून जागा होत मी घाईगर्दीने ती बातमी लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून इतका आटापीटा केला होता. पण आभाळ कोसळल्यासारखी जी माझी वा माझ्यासारख्या मूठभर लोकांची धारणा होती, त्याचा मागमूसही कुठे रस्त्यावर वस्त्यांमध्ये वा जनतेमध्ये दिसत नव्हता. लोकशाही वा लोकशाही मूल्यांचा र्‍हास विनाश, असले शब्द मी बातमीतही वापरले होते. पण ज्यांच्यावर या लोकशाहीचा भार सोपवलेला आहे, त्या सामान्य माणसाला त्याचे कुठले सोयरसुतक असल्याची खुण मला दिसली नाही. सर्वकाही नित्याप्रमाणे चालू होते आणि कोणाला कसलीही फ़िकीर नव्हती. ज्या सामान्य जनतेच्या नावाने पत्रकार म्हणून आपण टाहो फ़ोडत असतो, तिला कुठल्याही मूलभूत अधिकार वा मानवी अधिकाराची जाणिवच नसल्याचा तो अनुभव खुप दाहक होता. त्याची दोन कारणे संभवत होती. एक म्हणजे लोकांना असे काही घडल्याचे ठाऊकही नसावे. किंवा ठाऊक असेल, तर त्याविषयी लोकांना कसलीही कदर वाटत नसावी. आपल्याला लिखाण, मनातले बोलण्याचा अधिकार इतका मोलाचा वाटत असताना, ह्या सामान्य माणसाला त्याच अधिकाराच्या संकोचाविषयी काहीच कसे वाटत नाही, याचे मला राहुन राहुन नवल वाटत होते. पण ती वस्तुस्थिती होती आणि ती धडधडीत माझ्यासमोर होती. आज वाहिनीवर चर्चा करणारे कोणी शहाणे संपादक वा विचारवंत अविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी असे शब्द वापरतात, तेव्हा मला त्यांची म्हणूनच कींव करावीशी वाटते. कारण त्या दिवशी जो दाहक अनुभव मी ‘सांज मराठा’ची चार पाने काढताना वा छापून त्याचे वितरण होण्यापर्यंत घेतला, त्याच्या तुलनेत आजचे स्वातंत्र्य अफ़ाट अथांग व अमर्याद आहे. ते मूठभर पत्रकार विचारवंत वा माध्यम समुहांच्या मालकांसाठी मर्यादित राहिलेले नाही. ते तळागाळापर्यंत पोहोचलेले आहे. त्यासाठी पैशाची भांडवलाची अगतिकता उरलेली नाही. हातात एक संगणक व इंटरनेट वापरू शकणारा मोबाईल फ़ोन असेल, तरी तुम्ही अविष्कार स्वातंत्र्याचा आनंद मनमुराद लुटू शकत असता. जगाच्या कुठल्याही कानाकोपर्‍यात तुमचा आवाज पोहोचू शकतो. इतके अमर्याद अविष्कार स्वातंत्र्य असू शकते वा उपभोगता येऊ शकेल असे, तेव्हा चार दशकांपुर्वी आमच्या कुणाच्या स्वप्नातही नव्हते. आज मी घरात बसून एखादा लेख लिहीतो आणि ब्लॉगवर टाकतो, तर दूर अमेरिकेत वा आणखी कुठे दुबईत बसलेला कोणी मराठी माणूस दोन मिनीटात ते वाचून प्रतिक्रीयाही व्यक्त करू शकतो. हे म्हणूनच आजही स्वप्न वाटते.   (अपुर्ण)

(अक्षर मैफ़ल दिवाळी २०१७ लेख)


18 comments:

  1. Taking the instant decision and implementing to the final is the real breaking news for the emergency.

    ReplyDelete
  2. 🙏 उत्तम चित्रण... Emergency एका क्षणात डोळ्यासमोर उभी राहिली..

    ReplyDelete
  3. aamchya pidhine aanibani pahili nahi.. pan tumhi uttkrushta chitran ubhe kele. Dhanyavad

    ReplyDelete
  4. छान भाऊ... महत्वपूर्ण माहिती दिलात. धन्यवाद!! वाचताना अगदी स्वतः अनुभवल्या सारख वाटलं. तथाकथित लिबरल / सिक्युलर पोपटपंचांची तोंडं बंद करायला ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल.

    - एक प्रतिक्रिया कुवैत वरुन

    ReplyDelete
  5. वृत्तपत्रा लगोलग छापण्याचा घेतलेल्या निर्णया बद्दल अभिनंदन .

    तसचं तुम्ही आणिबाणी वर सर्वसामान्या लोकांच्या प्रतिक्रिया बद्दल जी खंत व्यक्त केलीत त्यावरून जाणीव होते की सर्वसामन्य लोकांना दिल्ली मधे किवा राजकारणात काय घडतं याची बिलकुल चिंता नसते. यामुळेच आपल्यावर 150 वर्ष इंग्रज आणि मुघल 800 वर्ष राज्य करू शकले. बाकी आणीबाणी सारख्या गोष्टी तुमच्या सारख्या काही स्वाभिमानी पत्रकारांसाठी आणि ठराविक देशभक्त नेत्यांसाठी महत्वाच्या असतात.

    ReplyDelete
  6. सध्याची पत्रकारिता निष्पक्ष नाही. इतके लेखन स्वातत्र्य मिळूनही लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरती घाला अशी अकारण हाकाटी करत असतात

    ReplyDelete
  7. अप्रतिम वास्तव डोळयासमोर उभ राहील.

    ReplyDelete
  8. भाऊ,
    माझ्या पिढीनं काही आणीबाणी अनुभवली नाही, मात्र इथे Sir Winston Churchill आठवतात.ते म्हणले होते लोकशाही ही एक प्रक्रिया आहे.प्रत्येक देशाच्या लोकशाहीला त्यातून जावेच लागते.मी आणीबाणीची वर्णनं ऐकली की हा विचार नक्की येतो की १९७७ मधला काँग्रेसचा दारुण पराभव यानं आपली लोकशाही अधिक प्रगल्भ झाली.नेहरू-गांधी घराण्याच्या गारुडापलीकडे जाऊन भारतीय जनतेने विचार केला व मतपेटीतून सत्यात उतरवला, हे खचितच विशेष आहे.

    ReplyDelete
  9. जबरदस्त अनुभव. भाऊ रात्रीपाळीची मजा खरेच औरच असते. प्रेसमधले सगळे वातावरण आनंद देऊन गेले. तुमचा चिंतनशील स्वभाव कसा नेहमी कार्यरत असतो तेही समजले. हा लेख पत्रकारितेच्या पुस्तकात टाकायला हवा आहे. पत्रकारितेच्या विद्यार्थांना सांगायला, शिकवायला आम्हाला चांगला धडा दिलात. धन्यवाद.

    ReplyDelete
  10. भाऊ, यासर्वाचा मी पण साक्षीदार आहे जेमतेम १७ वर्षाचा होतो, कॉलेजला गिरगावात व रहायला भायखळा गिरणगावात पण सुरवातीला काहीच जाणवले नाही. आकाशवाणीचा बदलेला सूर किशोरकुमारच्या गाण्यांवरची बंदी, बंद झालेले अथवा सरकारचे व इंदिरा गांधीचे गुणगान करणारे पेपर, चित्रपटातील मारामारीवर आलेली बंदी,कट केलेले सिन्स त्यामुळे संदर्भ नसलेले प्रसंग. पोलिसांची दादागिरी, कोणालाही उचलून नेत होते यामुळे थोडफार जाणीव होत होती पण आजच्यासारखी व्यक्त व्हायला साधने नव्हती. आमच्या कॉलेजच्या एकाला रेल्वे बॉम्ब स्फोटाचा आरोपी म्हणून पकडल्यावर मात्र हादरा बसला व आणीबाणी काय आहे हेलक्षात आले मग कोणाजवळ बोलायची पण भिती वाटू लागली. आता एवढे स्वातंत्र्य आहे की पंतप्रधानाना चोर, नीच, फेकू यासारख्या शब्दानी अपमान करूनसुद्धा कारवाई होत नाही आणि तीच माणसे अघोषित आणीबाणी म्हणून बोभाटा करतात त्यांंच्या खोटेपणाचा पहिल्यांदा राग यायचा पण आता कीव येते.

    ReplyDelete
  11. धन्यवाद नविन पिढीला या गोष्टींची जाणीव झाली पाहिजे

    ReplyDelete
  12. होय मी अमेरिकेतुन comment टाकत आहे

    ReplyDelete
  13. भाऊसाहेब, लेख वाचून आणिबाणीच्या परिस्थितीचे चित्रण समक्ष अनुभवले, धन्यवाद.

    ReplyDelete
  14. ती एक काळ रात्रच होती.जळगा॑वातील आमचे स्नेही डॉ.अविनाश आचार्य (स॑घाचे कार्य वाहक)आणि इतरांना अटक करून येरवडा जेलमध्ये ठेवले होते. त्या सगळ्या स्मृती आज जागरूक झाल्या. आज असं परत स॑घवाले भाजप सरकार करेल म्हणून खोटी भीती दाखविली जातेय ..पर॑तू आज मतदार फार जागरूक झालाय.

    ReplyDelete
  15. Teva mi Shalet hoto ani hi ghatana thodi athvat ahe. Amhala 20 kalmi karyakram path karyala lavla hota ani tyvar Pariksha pan ghet asat. 77 sali Thanayat Rambhau Mahalhi yanchya pracharachya miravnukit samil zalaycha mala athvat ahe

    ReplyDelete
  16. भाऊ तुमचे लिखाण मला नेहमीच वेगळे वाटते आणि त्याचे कारण तुमचे उमेदीचे दिवस. तेव्हाची कामाची पद्धत, ज्या पद्धतीने तुम्ही सटासट निर्णय घेतले आणि पेपर बाहेर पाठवले सलाम तुम्हाला.जनता मात्र अजूनही तशीच आहे . काळा प्रमाणे साधने बदलली पण व्रुत्ती नाही. नाही म्हणायला सावरकर यांच्या वरून abp माझा ला जनतेकडून बसलेला दणका अपवाद म्हणता येईल.

    ReplyDelete