Sunday, October 8, 2017

मेलेलं कोंबडं

yashwant sinha advani joshi के लिए चित्र परिणाम

यशवंत सिन्हा यांनी आता पक्षात राहूनच मोदी विरोधातली आघाडी उघडलेली आहे. त्यांचा पक्षाच्या मार्गदर्शक मंडळात समावेश असूनही त्यांनी पक्षाच्या भूमिकेला छेद देणार्‍या अनेक कृती मागल्या दोन वर्षात केलेल्या आहेत. खरे तर अशा कृतीसाठी त्यांची भाजपातून केव्हाच हाकालपट्टी व्हायला हवी होती. विशेषत: ज्या पक्षात आजकाल हुकूमशाही व एकाधिकारशाही असल्याचा सातत्याने दावा होत असतो, तिथे तर सिन्हा यांना कधीच बाहेरचा रस्ता दाखवला जायला हवा होता. भाजपा कशाला, कॉग्रेससह कुठल्याही पक्षात नेतॄत्वाच्या विरोधात वा भूमिकेला छेद देणारे वक्तव्यही पक्षशिस्त मोडल्याचे ठरवायला पुरेसे कारण असते. कालपरवाच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसभेतील सदस्य ऋतूब्रत बानर्जी यांची अशीच हाकालपट्टी करण्यात आलेली आहे. त्याहीपुर्वी २००९ च्या सुमारास लोकसभेचे सभापती असलेल्या सोमनाथ चॅटर्जी यांनीही युपीए विरोधात जाऊन त्यांनी पदाचा राजिनामा दिला नाही, म्हणून त्या ज्येष्ठ नेत्याला डाव्या आघाडीने बाहेरचा रस्ता दाखवलेला होता. मग यशवंत सिन्हा यांनी तर पक्षाच्या केंद्रातील सरकारी धोरणावरच तोफ़ा डागल्या असताना पक्षशिस्तीचा बडगा उचलला जाण्याला काहीही हरकत नव्हती. पण अजून तरी तसा संकेतही भाजपातून मिळालेला नाही वा मोदी-शहांच्या गोटातून तसे काही ऐकायला मिळालेले नाही. त्यामुळे आपल्या पक्षातल्या लोकशाही मूल्याचे तरी कौतुक सिन्हा यांनी करायला हरकत नव्हती. पण त्याऐवजी सिन्हा यांचाच धीर सुटत चाललेला दिसतो. त्यांनी वाटेल तसे आरोप करणारे लिखाण केले आणि वक्तव्येही केली आहेत. मात्र त्यांच्या मताविषयी मोदींनी केलेल्या खुलाशाने सिन्हा विचलीत झालेले दिसतात. मोदींनी सिन्हांचा पुरता अपेक्षाभंग केलेला दिसतो. तो अर्थव्यवस्थेविषयीचा नसून पक्षशिस्तीविषयीचा असावा. अन्यथा त्यांनी आपल्यावर कारवाई करण्याचे आव्हान कशाला दिले असते?

यशवंत सिन्हा हे ज्येष्ठ राजकारणी व नेता आहेत. राजकारण व सत्ताकारणातील त्यांचा अनुभवही दांडगा आहे. जेव्हा मोदी साधी निवडणूक लढलेले नव्हते, तेव्हापासून सिन्हा केंद्रात मंत्री व त्यापुर्वी नोकरशहा म्हणून वावरलेले आहेत. सहाजिकच त्यांना अधिक कुटीलपणे डावपेच खेळता येत असतील, असे गृहीत धरायला हरकत नाही. पण इथे तसे होताना दिसलेले नाही. किंबहूना नरेंद्र मोदींच्या बाबतीत अनेक ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांची तिथेच गोची होत असते. मोदी कधीही प्रचलीत वा प्रस्थापित राजकीय व्याख्येतून काम करीत नाहीत. त्यांनी आपली वेगळीच कार्यशैली विकसित केलेली आहे. आपल्या विरोधकांना दुखावणे वा त्यांच्या विरोधात लोकांच्या नजरेत भरेल अशी कुठली कारवाई करणे, ही मोदींची कार्यपद्धती नाही. ते लोकांना दिसेल व आपल्या विरोधकाविषयी सहानुभूती निर्माण होईल, असे काहीही करीत नाहीत. उलट आपल्यावरचे हल्ले होऊ देतात आणि त्यातून मोदीच सहानुभूती मिळवत असतात. मात्र त्याच कालखंडात मोदी अशा काही खेळी करतात, की त्यातून विरोधक व्यक्तीला फ़टका जरूर बसतो. पण त्याचे खापर कधी मोदींच्या माथी येत नाही. यशवंत सिन्हा किंवा अडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठांना अंगावर घेऊन वा त्यांच्यावर कुठली कठोर कारवाई करून मोदींनी आपण कोणाचा उपमर्द करणारे आहोत अशी आपली प्रतिमा केव्हाही होऊ दिलेली नाही. उलट अशा ज्येष्ठांनी सतत अपमानित करूनही मोदी त्यांचा सन्मान राखताना दिसलेले आहेत. परिणामी ज्येष्ठ व विरोधकच आक्रस्ताळे वा उर्मट असल्याची जनधारणा होऊ शकली. मोदींच्या विरोधात ज्येष्ठ किंवा विरोधक असे फ़िके कशाला पडतात, याचा मात्र अजून कोणाला अभ्यास करावासे वाटलेले नाही. सहाजिकच मोदींच्या अशा चतुर व धुर्त खेळीला प्रत्युत्तर देणेही यापैकी कोणाला शक्य झालेले नाही.

२००१ सालात मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा सत्तेच्या राजकारणात व प्रशासनात पुर्णतया नवखे होते. पण त्यानंतर पदोपदी त्यांना अपेशी ठरवण्यासाठी ज्या कारवाया व कारस्थाने झाली, त्यातून आपली कातडी बचावण्याच्या नादात मोदी कुटीलपणा शिकत गेले. केशूभाई पटेल, हे गुजरातचे सर्वात ज्येष्ठ भाजपा नेता होते आणि त्यांच्या पाया पडूनच मोदींनी गुजरातची सत्तासुत्रे आपल्या हाती घेतलेली होती. पण केशूभाई वगळता काशिराम राणा, सुरेश मेहता असे अनेक ज्येष्ठ अनुभवी भाजपा नेतेही गुजरातमध्ये होते आणि त्यांना झिडकारून मोदी यशस्वी होऊ शकले नसते. पण नंतरच्या काळातला घटनाक्रम बारकाईने अभ्यासला, तर क्रमाक्रमाने या सर्व ज्येष्ठांना किंचीतही न दुखावता मोदींनी नामोहरम करून टाकले. मात्र असे करताना कुणालाही शब्दानेही दुखवायचे नाही, हे व्रत मोदींनी पाळलेले आहे. दिल्लीच्या राजकारणात येण्यासाठी वाटचाल सुरू केल्यावरही अडवाणी, जोशी वा सुषमा स्वराज अशा अनेक ज्येष्ठांना डावलून त्यांनी मुसंडी मारलेली होती. त्यामुळे असे सर्व ज्येष्ठ नाराज व निराश होते. त्यांनी मोदींना झिडकरण्याची एकही संधी वाया जाऊ दिलेली नव्हती. पण त्याविषयी मनात किल्मीष बाळगून मोदींनी त्यापैकी कुणाचा जाहिर अवमान केला नाही. मात्र त्यांचा प्रभाव महत्ता कमी होईल याची पद्धतशीर काळजी घेतली. दिल्लीकडे प्रयाण करण्यापुर्वी गुजरातच्या अखेरच्या निवडणूकीत तर केशूभाईंना आपली आयुष्यभराची प्रतिष्ठा मोदी विरोधासाठी पणाला लावण्याचा प्रसंग आला. वेगळा पक्ष स्थापन करून त्यांनी मोदींना आव्हान दिलेले होते. पण केशूभाईंनी कितीही अपशब्द वापरले तरी मोदींनी त्या ज्येष्ठाविषयी कोणाला अपमानकारक शब्द वापरू दिलेला नव्हता. आज ते राणा, मेहता वा केशूभाई कुठे आहेत? यशवंत सिन्हा यांनी अर्थव्यवस्थेपेक्षा या मोदीनितीचा अभ्यास केला असता, तर अधिक चांगले आव्हान मोदींना देता आले असते.

आपल्याला आव्हान देण्य़ासाठी पुढे येणार्‍याला खुले प्रतिआव्हान देण्यापेक्षा त्यालाच अतिरेक करू द्यायचा आणि त्याच्यावरच तोंडघशी पडायची वेळ आणायची, अशी मोदीनिती राहिलेली आहे. तेच केशूभाई, अडवाणी इत्यादींच्या बाबतीत झाले आणि अन्य पक्ष नेत्यांच्याही बाबतीत तीच मोदीनिती राहिलेली आहे. त्यात मोदी कधीही फ़सलेले नसतील, तर त्याच मार्गाने जाण्यासारखा मुर्खपणा असू शकत नाही. मोदीनितीला शह देण्यासाठी मोदीनितीच त्यांच्यावर उलटवणे हा पर्याय असू शकतो. पण त्यासाठी कमालीचा संयम आवश्यक आहे. तिथेच मोदींचे विरोधक तोकडे पडत असतात. त्यापैकी कोणाकडेही संयम नाही की धूर्तपणाने कार्यभाग साधण्याची निती नाही. विरोधक जितका उतावळा, तितका मोदीनितीचा परिणाम अधिक असतो. गेल्या साडेतीन वर्षातील मोदींचे सर्वात मोठे यश कुठले असेल, तर त्यांनी विरोधकांना आपल्या विरोधात एकही दिवस शांत बसू दिलेले नाही. मोदी पंतप्रधान झाल्याच्या पहिल्या दिवसापासून विरोधक त्यांना सत्ताभ्रष्ट करण्याची कारस्थाने शिजवण्यात गर्क आहेत आणि धोरणात्मक पातळीवर मोदी सरकारची कोंडी करण्यात कुणालाही यश आलेले नाही. त्यामुळे मोदी मोठी मजल मारू शकलेले नसले, तरी त्यांनी आजपर्यंत चाललेल्या कारभारापेक्षा वाईट कारभार होऊ नये, इतकी मजल मारलेली आहे. तिथेच त्यांची लोकप्रियता टिकून राहिलेली आहे. विरोधकांच्या टिकेपेक्षाही जनमानसातील प्रतिकुल प्रतिक्रीयेची मोदी तात्काळ दखल घेतात आणि कामात धोरणात सुधारणा करतात. बाकी विरोधकांच्या टिकेने चटके बसतात, असे मोदींनी कधी मानलेले नाही व तीच त्यांची ताकद राहिलेली आहे. पंतप्रधान होण्यापुर्वीची बारा वर्षे हे कोंबडे विरोधकांनी कधीच मारून झालेले आहे. ते आता कुठल्या आगीला भिऊ शकते? आपले विरोधक काय करतील, ते आधीच ताडणार्‍याला संपवण्याच्या वल्गना जरूर होतात, पण तो कधी संपत नसतो.

5 comments:

  1. परवाच एका कार्यक्रमात मोदीजी नी सिन्हांना उत्तर दिल पन ते जनतेला उद्देशुन होत. काही शहाने पत्रकार ट्विट करत होते की ते कोनाशी बोलतायत कारन प्रश्न सिन्हांचे होते व उत्तर जनतेला त्यामुळ त्यांची गोची झाली नेहमीप्रमाने.

    ReplyDelete
  2. Uttam lekh. Paristitiche yogya vishleshan.

    ReplyDelete
  3. खरय भाऊ. मोदींना संपवण्यासाठी सध्या विरोधकांनी कुठल्यातरी मार्केटिंग एजन्सी चा पॅकेज program घेतलेला दिसतो कारण इतक्या कमी वेळात सोशल मीडियामध्ये इतकी बदनामी जेव्हा होते तेव्हा नक्कीच त्यात काहीतरी काळेबेरे असते परंतु सर्वसामान्य जनता मोदींच्या सोबत असल्यामुळे त्यांना काहीही टेन्शन नाही

    ReplyDelete
  4. वाट पाहत होते तुमच्या लेखाची यशवंत सिन्हा प्रकरणात. अपेक्षेप्रमाणे लेख आहे. आवडला

    ReplyDelete
  5. जागे व्हा आता शेतकरी विरोधात गेलेला आहे मोदीच्या

    ReplyDelete