Sunday, October 1, 2017

बुद्धातला मुस्लिम जागलाय?

dalai lama के लिए चित्र परिणाम

"You may not be interested in war, but war is interested in you."   - Leon Trotsky

लिओ ट्रॉटस्की हा रशियन समाजवादी क्रांतीचा एक प्रणेता होता. पण अखेरीस त्यालाही आपला जीव वाचवण्यासाठी पुरोगामी रशिया सोडून पळून जाण्याची वेळ आली. कारण एकदा आपल्या भांडवलदारी व सरंजामदारी शत्रूंचा काटा काढून झाल्यावर कम्युनिस्टांना उदारमतवादी विचारवंतांची गरज राहिलेली नव्हती. उलट असे बुद्धीमंत नव्या कम्युनिस्ट सत्तेला धोका होऊ शकले असते. ज्या विचार स्वातंत्र्य व अविष्कार स्वातंत्र्याचा लाभ घेतला जात असतो, तेच स्वातंत्र्य सत्ता मिळाल्यावर अनेक सत्ताधार्‍यांना धोका वाटू लागत असते. जगाच्या पाठीवर त्याचा अनेकांनी अनुभव घेतला आहे आणि तरीही शहाणे म्हणून मिरवणार्‍यांना त्यातले धोके ओळखता येत नाहीत. तसे नसते तर आपल्या देशातल्या अर्धवट विचारवंतांनी रोहिंग्या मुस्लिमांना इथे आश्रय देण्यासाठी इतका बौद्धिक आटापिटा नक्कीच केला नसता. त्यांच्यापैकीच एक असा  ट्रॉटस्की काय सांगतो, हे त्यांना अजून समजलेले नाही. समजले असते तर त्यांनी रोहिंग्या निर्वासित आहेत आणि त्यांच्यापासून भारताला कुठला धोका आहे, असले मुर्ख प्रश्न विचारले नसते. धोका कसला असतो, त्याचे मोजक्या शब्दात ट्रॉटस्कीने वर्णन केलेले आहे. तुम्हाला भले कुणाशी लढण्याची इच्छा नसेल. पण समोरचा शस्त्र घेऊन अंगावर आला, तर बचावासाठी तुम्हाला त्याच्याशी लढावेच लागते. लढायचे नसेल, तर मरून नामशेष व्हायची तयारी असायला हवी. तुम्ही युद्धखोर नसाल, म्हणून युद्ध टाळता येत नाही. युद्ध तुम्हाला शोधत तुमच्यापर्यंत येऊन धडकते आणि ते टाळता येत नाही. मुंबईच्या लक्षावधी नागरिकांना युद्ध नकोच होते. पण पाकिस्तानातून आलेल्या कसाब टोळीने युद्ध मुंबईवर लादलेच ना? रोहिंग्यांची कहाणी वेगळी नाही. त्यांच्यात लपलेले अनेक जिहादी आज नामोहरम झालेले आहेत आणि त्यांना पुन्हा सावरून सज्ज होण्यासाठी उसंत म्हणून आश्रय हवा आहे.

पण जगभरच्या मुस्लिम समाजात जिहादी युद्धाची खुमखुमी असल्याची चर्चा करण्याचेही आता काहीही कारण उरलेले नाही. मूठभर मुस्लिम दहशतवादी असले म्हणून सगळेच मुस्लीम जिहादी नाहीत, ह्या युक्तीवादाला अर्थ नाही. कारण जिहादी किती आहेत, याला महत्व नसून; ते कुठे दडी मारून बसतात, त्याला प्राधान्य आहे. याच वृत्तीने जगभरच्या शांततावादी राष्ट्रांना व समाजाला युद्धाच्या व हिंसेच्या खाईत लोटलेले आहे. सहाजिकच अशा जिहादी मानसिकतेचा बंदोबस्त करायचा, तर त्यात इतर कोणी नव्हेतर मुस्लिम धर्मियांनीच पुढाकार घेणे अगत्याचे आहे. नसेल तर जगभरच्या मुस्लिमांनाच दहशतवादी ठरावे लागणार आहे. त्याचा आरंभ भारतानजिक म्यानमार या देशात झालेला आहे. इतके समजून घेतले, तर रोहिंग्या मुस्लिमांची समस्या काय आहे, त्याचा सहज उलगडा होऊ शकतो. म्यानमार ह्या देशाच्या पश्चिमेला राखाईन किंवा अकरान नावाचा प्रांत आहे. तिथे प्रामुख्याने रोहिंग्या नावाच्या वंशाचे लोक वसलेले आहेत. त्यातली बहुसंख्या मुस्लिम असून काही किरकोळ लोक बौद्ध वा हिंदू समाजाचेही आहेत. पण खुप पुर्वीपासून या रोहिंग्या मुस्लिमांनी आपला वेगळा मुस्लिम देश असावा, म्हणून उचापती केलेल्या आहेत. अगदी भारत स्वतंत्र होत असताना किंवा हिंदूस्तानची फ़ाळणी होत असताना, आपल्याला पुर्व पाकिस्तानचा घटक म्हणून सामावून घेण्यासाठी या भागातले काही मुस्लिम नेते जिना यांनाही भेटले होते. पण त्याचा उपयोग झाला नाही, तर त्यांनी शस्त्र हाती घेऊन जिहादही पुकारला होता. तेव्हापासून हा संघर्ष सुरू झालेला आहे. बाकीचा म्यानमार देश प्रामुख्याने बौद्ध धर्मीय लोकसंख्येचा असून, त्यात किरकोळ ख्रिश्चन व हिंदूंचा समावेश आहे. पण या घटकांनी कधी वेगळेपणा दाखवला नसल्याने त्यांना कुठला त्रास झाला नाही. मात्र रोहिंग्यांना शेवटी मातृभूमी सोडून पळण्याची वेळ आलेली आहे.

हे सर्व बोलायला ठिक आहे. त्यात नवे काही नाही. मुद्दा आहे तो बौद्धधर्मीय आक्रमकांचा. जगात बौद्ध धर्माची ओळख शांतताप्रिय व अहिंसक अशी आहे. म्हणूनच मग म्यानमारमध्ये बुद्ध अनुयायी असे हिंसेला का प्रवृत्त झाले, त्याचे जगाला नवल वाटणे स्वाभाविक आहे. तिथल्या बुद्धधर्मिय लोकांचे नेतृत्व करणार्‍या धर्मगुरूंनीच ह्या हिंसेचे नेतृत्व केलेले आहे. ही बाब अधिक थक्क करून सोडणारी आहे. पण तशी वेळ त्यांच्यावर आणली गेली असेल, तर त्यांनी काय करावे? जगाला शांतीचा संदेश देणार्‍या बुद्ध धर्मालाच धोका निर्माण झाला तर काय? हिंसा करू नका वा अहिंसक बना; असे शब्दांचे बुडबुडे उडवणे सोपे आहे. पण जेव्हा कोणी हिंसा करायला अंगावर चाल करून येतो, तेव्हा त्याच्या दाढीला हात लावून समजूत घालता येत नाही. त्याची समजूत घालणे वा मतपरिवर्तन करणे; यासाठी तुम्ही आधी आपला जीव वाचवणे किंवा जीवंत रहाणे अगत्याचे असते. पण अशा हल्लेखोराने तुम्हाला मरणाखेरीज कुठलाच पर्याय शिल्लक ठेवला नाही, तर काय करायचे? आपण मरायचे आणि जगाला शांतीचा संदेश देणारा आवाजही मरून जाऊ द्यायचा काय? असा प्रश्न जेव्हा उभा रहातो, तेव्हा तुम्हाला आपला जीव वाचवण्यापेक्षा शांती व अहिंसेचा आवाज शिल्लक राखण्यासाठी हत्यार हाती घ्यावे लागते. हिंसेला हिंसेनेच उत्तर देऊन अहिंसेचे संरक्षण करणे भाग असते. ती तुमच्या मनातली हिंसा नसते, किंवा तुमच्यातून ती हिंसा उदभवलेली नसते. ती कुणाच्या तरी हिंसेतून अहिंसेची जपणूक करण्यासाठी उपजलेली हिंसा असते. थोडक्यात अशी हिंसा ही प्रतिक्रीया असते. मुंबईतल्या जिहादी हिंसेला रोखण्यासाठी जी लष्करी पोलिसी कारवाई झाली, ती हिंसा नव्हती. तर अहिंसेला वाचवण्यासाठी दिलेली प्रतिक्रिया होती. नेमके तेच आज म्यानमारमध्ये चालू आहे. तिथे रोहिंग्यांच्या निर्मूलनाची हिंसा चालू नसून, अहिंसेला जगवण्यासाठी चाललेली कारवाई आहे.

जगाच्या पाठीवर आजपर्यंतच्या इतिहासात अशी कारवाई अनेक देशात झालेली आहे. पण म्यानमार हा बौद्ध देश असून तिथे बुद्ध धर्मगुरूंनी त्यात पुढाकार घेतल्याने अनेकांना नवल वाटलेले आहे. त्यात कुठलेही नवल नाही. ती साधी मानवी प्रतिक्रीया आहे आणि त्याची नेमकी व्याख्याच हवी असेल तर आपण दलाई लामा यांचेही शब्द तपासून बघू शकतो. न्युयॉर्क शहरावर जिहादींनी घातपाती हल्ला केल्यावर अमेरिकेचे अध्यक्ष ज्या आक्रमकपणे इस्लामी अतिरेकाच्या विरोधात बोलू लागले होते, त्यात धर्मद्वेष सामावलेला होता. आज जे कोणी मुस्लिम अतिरेकाच्या विरोधात आमच्या बाजूने उभे नसतील ते आमचेही शत्रूच आहेत, अशी विभागणी बुश यांनी केली होती. त्यावर दलाई लामा म्हणाले होते, ‘बुश यांचे हे शब्द माझ्यातला मुस्लिम जागवतात.’ दलाई लामा तर बुद्ध धर्माचे गुरूवर्य आहेत. त्यांच्यातला मुस्लिम म्हणजे कोण? मुस्लिम जागतो म्हणजे काय? बुश जगभरच्या मुस्लिमांना केवळ मुस्लिम असल्याने दोषी ठरवून ठार मारायला निघाले असतील, तर त्याला प्रतिकार करण्याची हिंसक प्रतिक्रीया प्रत्येक मनात उमटेल, असेच दलाई लामांना म्हणायचे होते. तुम्ही जेव्हा द्वेषाने प्रवृत्त होता आणि अकारण द्वेषाने कृती करू लागता; तेव्हा समोरच्या निरागस मनातही तुम्ही तितकाच द्वेष जन्माला घालत असता. रोहिंग्या असोत किंवा अन्य कुठल्याही भागातले मुस्लिम अतिरेकी असोत, त्यांनी धर्माच्या नावाने हत्यार उपसल्याने, सध्या ही चमत्कारीक स्थिती जगभर निर्माण झालेली आहे. जगातल्या प्रत्येक धर्मीयांशी स्थानिक मुस्लिमांचे वैर जुंपलेले आहे. भारतात हिंदू, तर दक्षिण आशियात बुद्धधर्मीय वा युरोपात ख्रिश्चन धर्मियांशी मुस्लिमांचे हिंसक संघर्ष पेटलेले आहेत. जिथे तशी शक्यता नाही, तिथल्या अन्यधर्मियांनी पलायन केले आहे. मात्र संघटितरित्या मुस्लिम आक्रमणाला उत्तर द्यायला एक बुद्ध धर्मगुरू उभे राहिले, ही गोष्ट अनेकांना थक्क करून सोडत आहे.

जगाला शांततेचा संदेश देणार्‍या बुद्ध धर्माची शिकवण देणारा धर्मगुरू वा उपदेशक, म्हणजे कुठल्याही स्थितीत अहिंसेचेच धडे देणार हे त्यामागचे गृहीत आहे. त्यामुळेच म्यानमारचा एक बुद्ध धर्मोपदेशकच मुस्लिम रोहिंग्यांच्या विरोधातल्या हत्याकांडाचे नेतृत्व करतो, ही चमत्कारीक गोष्ट वाटते आहे. पण तसे केवळ म्यानमार याच एका देशात घडलेले नाही. मागल्या दशकाच्या दक्षिण आशियातील घडामोडी बरकाईने बघितल्या तर हे धुमसत पेटत राहिलेले प्रकरण आहे. ते म्यानमारपुरते मर्यादित राहिलेले नाही. शेजारी थायलंड, श्रीलंका अशा देशातही त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे. राखाईन नजिक असलेल्या बंगलादेश या मुस्लिम देशामधील पाकिस्तानशी संबंधित जिहादी संघटनांनी रोहिंग्यामधील काही गटांना चिथावण्या देऊन म्यानमारमध्ये धार्मिक युद्ध पुकारले. हळुहळू बुद्धधर्मियांचा संयम संपत गेला आहे. अगोदर राखाईन प्रांतातील हिंदूंच्या विरोधात ही मोहिम चालली आणि तिचा प्रतिकार झाला नाही. तेव्हा त्याचा विस्तार बौद्ध धर्मियांच्या बाबतीतही होऊ लागला. त्यातून ही तीव्र प्रतिक्रीया उमटलेली आहे. जबरदस्तीने व हिंसेच्या मार्गाने धर्मांतर व धर्मप्रसार हे त्यामागचे खरे कारण आहे. सहाजिकच अन्य बुद्ध धर्मिय राष्ट्रातही त्यावरची प्रतिक्रीया उमटत गेलेली आहे. श्रीलंका, थायलंड, कंबोडिया अशा देशातही अल्पसंख्य असलेल्या मुस्लिमांच्या विरोधात हिंसक मोहिमा बुद्धधर्मिय भिक्षूंनी उघडलेल्या होत्या. हळुहळू संपुर्ण दक्षिण आशियातील बुद्धधर्मिय देशात व लोकसंख्येत त्याचा प्रभाव वाढताना दिसतो आहे. ही लोकसंख्या थोडीथोडकी नाही. काही वर्षापुर्वी याच बुद्ध धर्मनेत्यांनी व त्यांच्या विविध संघटनांनी जिहाद विरोधासाठी भारतातील हिंदू संघटनांनाही समविचारी सहकारी म्हणून सोबत घेण्यासाठी प्रयत्न केलेले होते. ह्या तुकड्यात पसरलेल्या बातम्या एकत्र केल्यास, आशियामध्ये मुस्लिम विरोधी बुद्धधर्मीय युद्धाची शक्यता वाढत चाललेली नाकारता येत नाही.

बारकाईने आशियाचा वा प्रामुख्याने दक्षिण आशियाचा नकाशा बघितला, तर भारताच्या सभोवताली पश्चीमेला मुस्लिम राष्ट्रे व पूर्वेला बौद्ध राष्ट्रे पसरलेली दिसतात. त्यात भारतानजिक असलेली राष्ट्रे बौद्ध आहेत तर त्याच्याही पलिकडे इंडोनेशिया व मलेशिया ही मुस्लिम राष्ट्रे आहेत. पण या दोन्ही मुस्लिम राष्ट्रांनी आपल्याकडे जिहाद शिरजोर होऊ दिलेला नाही, की धर्माच्या नावाने हिंसेला मोकाट रान दिलेले नाही. पण त्यांनाही बाजूला ठेवले तर भारताभोवती असलेल्या बौद्ध राष्ट्रांमध्ये असलेली बौद्ध लोकसंख्या नगण्य नक्कीच नाही. आजही चीनसारख्या देशात २५ कोटी लोक बौद्ध आहेत आणि त्यांचेही पश्चीमेकडील उग्येर वंशीय मुस्लिमांशी खडे वैर आहे. चीनमध्ये कम्युनिस्ट सत्ता असली तरी प्रामुख्याने मोठी लोकसंख्या बौद्ध असल्याने त्यांनाच झुकते माप मिळते. त्यासाठी मुस्लिमांच्या आक्रमकतेला वेसण घालणारेही निर्णय होत असतात. हा सगळा नकाशा बारकाईने बघितला, तर इस्लामचे आव्हान पेलायची कुवत बौद्ध लोकंसंख्येत नक्कीच आहे. अवघ्या जगाला सध्या मुस्लिम जिहादने ग्रासलेले आहे. पण आपल्या उदारवादी राजकारणामुळे ख्रिश्चन देश महाशक्ती असूनही थेट धर्माच्या पातळीवर इस्लामचे आव्हान स्विकारायला राजी नाहीत. ती हिंमत एकप्रकारे म्यानमारने दाखवलेली आहे. तिथल्या लष्करी व नागरी सत्तेने ठामपणे धर्माचा बागुलबुवा बाजूला ठेवून, रोहिंग्यांना पळता भूई थोडी केली आहे आणि वेळ आलीच तर तितक्या टोकाला थायलंड, कंबोडिया व श्रीलंकाही जाऊ शकतील. ह्या शक्यता लक्षात घेतल्या, तर तिसरे महायुद्ध लांब नाही, असेच म्हणावे लागेल. उदारमतवादी राजकारणात फ़सलेल्या पाश्चात्य देशांकडे शक्ती असूनही शक्य नसलेले हे आव्हान, आता पुर्वेचे बुद्ध देश अंगावर घेऊ शकतील. किंबहूना त्याचीच चाहुल रोहिंग्यांच्या निमीत्ताने लागलेली आहे. हे का होऊ शकले?

भारताच्या पश्चीम सीमेवर वसलेल्या पाकिस्तानच्या पश्चीम सीमेलगत १९८० च्या दशकात अफ़गाणिस्तानमध्ये जिहाद सुरू झाला आणि हळुहळू अवघ्या जगाला त्याने आपल्या फ़ेर्‍यात ओढून घेतले. योगायोग असा, की भारताच्या पूर्व सीमेलगत दुसरा मुस्लिम देश आहे, त्याचे नाव बंगलादेश. त्याच्याही पुर्व सीमेलगत वसलेला देश आहे म्यानमार. त्याच दोन देशांच्या सीमेवर आज जिहाद विरोधातले वातावरण पेटलेले आहे. तिथल्या बौद्धधर्मिय भिक्षूंनी आपल्या अनुयायांना एकत्र करून हिंसक मार्गाने जिहादचा बंदोबस्त करण्याची पावले उचलली आहेत. त्याचा फ़ैलाव आसपासच्या बुद्ध देशांमध्येही पडू लागला आहे. या बुद्धधर्मियांतली अतिरेकी आक्रमकता कुठून निपजली आहे, त्याचे उत्तर दलाई लामा देतात. शेकडो वर्षे त्या देशात व भूमीत गुण्यागोविंदाने अनेक धर्म नांदले, तिथे अकस्मात आपल्याच धर्माचे वर्चस्व असावे अशा हिंसक आक्रमकतेने अन्य धर्मियांनाही हिंसक बनवण्याचे पाप केलेले आहे. रोहिंग्यांनी जिहादचा आश्रय घेऊन पुकारलेल्या हिंसेने शांतीप्रिय बुद्ध अनुयायी व त्यांचे धर्मोपदेशक यांना हिंसक बनवले आहे. त्यांच्या बुद्धामधला हिंसक मुस्लिम ज्यांनी जागवला, त्यांनाच आता तो बुद्ध अक्राळविक्राळ होऊन भयभीत करू लागला आहे. तो लवकर शांत झाला नाही, तर अवघ्या जगालाच धर्मयुद्धाच्या खाईत घेऊन जाणार आहे. रोहिंग्या प्रकरणी कालबाह्य उदारवादाचे नाटक रंगवून पडदा पाडता येणार नाही. मानवतावाद किंवा माणुसकीचे सैतानी रूप आता जगाने अनुभवले आहे आणि त्याला समर्थपणे सामोरे जाण्याची हिंमत बुद्ध राष्ट्रांनी केली, तर जगभरले जिहादत्रस्त समाज त्यांच्याच बाजूने उभे रहणार आहेत. त्यापासून भारताची सुटका नाही की पाश्चात्य राष्ट्रांनाही पळ काढता येणार नाही. कारण आता शांतीप्रिय बुद्धातला ‘मुस्लिम’ खडबडून जागा झालेला आहे. हे युद्ध हिंसक असले तरी ते अहिंसेला जगवण्यासाठी सुरू झाले आहे.


4 comments:

  1. उत्तम वस्तुस्थिती दर्शक लेख

    ReplyDelete
  2. अतिशय चिंतनशील लेख. सर्वच उदारमतवादी विचारांचा अतिरेक झाल्याने फावते ते फक्त कोत्या आणि विस्तारवादी धर्मांध लोकांचेच. कुठेही या उदारमतवादी लोकांचे ऐकून कुणी हिंसा सोडल्याचे ऐकवात नाही. उलट ज्या लेबनानमध्ये ६०% ख्रिस्ती होते त्यांचे शिरकाण झाले आणि लेबनान इस्लामिक देश झाला, तीच गोष्ट अफगानिस्तान या मुळच्या बौद्ध देशाची. तीच मलेशिया, बाली बेटांची. तीच काश्मीरची. तीच जिथे पोलीस चौकी दोन पोलिसांसकट जळून टाकली त्या भिवंडीची ! जगभर हा अत्यंत टोकाचा अतिरेकी विचार पोहोचला सगळे संपलेच आहेत. आता या सिरियातील अशाच लोकांना जर्मनीत सामावून घेणा-या मर्केलबाईना त्या देशाने पुन्हा डोक्यावर घेतले आहे. त्यामुळे जर्मनी नक्की मुस्लीम राष्ट्र होणार.असहाय्य ख्रिस्ती धर्मगुरुंचे मरण अटळ आहे. ते सगळे इथेही व्हावे अशीच सुप्त इच्छा आहे की काय इथल्या पुरोगाम्यांची? तसे दिसतेच आहे, मग बाकीच्या देशाने इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा अशीच भूमिका घ्यायला हवी.

    ReplyDelete
  3. u र ग्रेट भाऊ
    तबियत सांभाळा बाकी काही नाही

    ReplyDelete
  4. अहिंसा परमो धर्मः,धर्म हिंसा तथैव च:।

    स्वधर्म रक्षणाकरता केली जाणारी हिंसा, ही देखील श्रेष्ठ कर्तव्य समजावी, असाच हा स्पष्ट संदेश आहे.
    म्यानमारच्या बौद्ध धर्मीयांनी तो अर्थ नीट समजून घेतला आहे.
    चीननेही आपल्या भागातील मुसलमान समुदायावर निर्बंध घातले आहेत.



    ReplyDelete