Sunday, February 11, 2018

आता युती हवीच कशाला?

uddhav amit shah के लिए इमेज परिणाम

जसजशा लोकसभा निवडणूका जवळ येत चालल्या आहेत, तसतशी भाजपाला महाराष्ट्रात निवडणूकपूर्व युती आवश्यक वाटू लागली आहे. त्या पक्षाच्या हितासाठी तसा विचार त्यांनी केलाच पाहिजे. कुठल्याही पक्षाला आपले अस्तित्व टिकवणे व स्वार्थाचा विचार करून धोरणे आखणे अगत्याचेच असते. पण म्हणूनच अशा पक्षांबरोबर युती आघाडी करणार्‍या पक्षांनी आपल्या मतलबावर किंवा हितावर निखारे ठेवण्याचे कुठलेही कारण नसते. जर दोन्ही पक्ष विचारांच्या आधारे एकमेकांच्या जवळ आलेले असतील, तर काही प्रसंगी हितसंबंध गुंडाळून स्वार्थाला बगल देणेही भाग असते. पण आपल्या सोयीनुसार विचार व आपल्या मतलबानुसार विचारांना बगल देऊन युती वा आघाडी होऊ शकत नसते. करूही नये. म्हणूनच १९८८ सालात शिवसेना भाजपा यांच्यात युती झाली, तेव्हा त्यांना जोडणारा हिंदूत्व हा विचार वा भूमिका होती. तसे होते म्हणूनच बाळासाहेबांनी लोकसभेच्या अधिक जागा भाजपाला देत विधानसभेच्या अधिक जागा सेनेला मिळाव्यात, अशी युती केली होती. पण २०१४ च्या लोकसभा निकालानंतर भाजपाने ती भूमिका सोडून दिली होती आणि बदलत्या परिस्थितीत विधानसभेतही आपल्यालाच अधिक जागांचा दावा करीत युती मोडून टाकली होती. तेव्हा विचारांपेक्षा मतलबाला प्राधान्य दिलेले असेल, तर आता लोकसभेलाही विचारांचा मुद्दा पुढे करून सेनेशी युतीची अपेक्षा बाळगण्यात अर्थ नाही. किंबहूना  निवडणूका दूर असताना शिवसेना पक्षप्रमुखांनी स्वबळावर सर्व निवडणूका लढायची भूमिका जाहिर केल्यानंतरही भाजपाला त्याची चिंता वाटलेली नव्हती. पण गुजरात विधानसभा व राजस्थानच्या पोटनिवडणुकांचे निकाल समोर आल्यावर चित्र बदलले आहे. त्याचा परिणाम म्हणून असेल, इथे महाराष्ट्रात पुन्हा युती टिकवण्याचे वेध भाजपाला लागलेले आहेत. त्यात शिवसेनेने किती फ़सावे, ही बाब तिच्या नेतृत्वाला गंभीरपणे ठरवावी लागणार आहे.

प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी एका ज्येष्ठ सेना खासदाराची चर्चा करून युतीला पुन्हा उजाळा देण्याचा प्रस्ताव पुढे केला आहे. त्यात विधानसभेच्या १४० जागा सेनेला सोडण्याची ऑफ़र असल्याचे कळते. २८८ पैकी १४० जागा यात मोठे काय आहे? २०१४ च्या उत्तरार्धात युती मोडली, तेव्हाही त्यापेक्षा अधिक जागा सोडायची भाषा भाजपा बोलतच होता. १४५ वर सेनेने समाधान मानावे, अशी तेव्हाची ऑफ़र होती. मग आज भाजपाने अधिक काय देऊ केलेले आहे? नसेल तर त्यात सेनेने रस तरी कशाला घ्यावा? सेनेला अखेरच्या क्षणी भाजपाच्या अट्टाहासामुळे स्वबळावर लढावे लागलेले होते आणि त्यातही शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या होत्या. तितकेच नाही, तर ३६ जागी पाच हजाराहून कमी मतांनी पराभव पत्करलेला होता. म्हणजेच ९९ जागी शिवसेना लढत देऊ शकली होती आणि तेही अखेऱच्या क्षणी स्वबळावर लढताना. मग तेव्हा १५० जागांचा हट्ट तुटण्यापर्यंत धरून बसलेल्या सेनेला मोहात पाडण्यासारखे शहांच्या ऑफ़रमध्ये काय आहे? कदाचित मुठभर मंत्रीपदे जपण्याचा मोह असू शकेल. पण आता चार वर्षे उलटून गेल्यावर त्या पदांपेक्षा पक्षाचे भवितव्य अगत्याचे असते आणि म्हणूनच कुठल्याही कारणास्तव युतीचा प्रस्ताव शिवसेनेने स्विकारणे आत्मघातकी असेल. उलट हीच भाजपाशी मतलबाचा सौदा करण्याची वेळ आहे. कारण भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाला महाराष्ट्रातील जागांपेक्षा लोकसभेतील जागांची गरज आहे. गेल्या खेपेस देशभरात जिंकलेल्या लोकसभेच्या ४०-५० जागा आपण गमावणार याची चिंता, महाराष्ट्रातील अधिक जागा टिकावण्याची सक्ती करत आहेत. त्यासाठी युतीला महत्व आलेले आहे. त्यात युती म्हणून जिंकलेल्या जागा सेनेच्या की भाजपाच्या, याला महत्व उरत नाही. मग त्यात सेनेच्या जागा वाढल्या तरी भाजपाने आनंद मानायला काय हरकत आहे?

आंध्र वा तामिळनाडूत भाजपाने स्थानिक पक्षांना अधिक जागा देऊन मोजक्या लोकसभा जागा स्विकारल्या होत्याच ना? मग महाराष्ट्रातला मित्रपक्ष मोठा झाल्याने चिंतेचे काय करण असू शकते? नसेल तर त्या मित्रपक्षाने तरी कशाला युतीचा प्रस्ताव स्विकारावा? सेनेचे १८ खासदार आहेत, त्याचे २८ झाले तरी भाजपाशीच सत्तेत भागिदारी करणार ना? ते कधी सेक्युलर पक्षांच्या सोबत जाण्याची शक्यता नाही. आमदार अधिक असोत की खासदार अधिक असोत, शिवसेना हिंदूत्वाच्या गटामध्ये राहिलेली असेल, तर तिच्या विस्ताराला भाजपाने आडकाठी करण्यातच मुळात चुक झालेली आहे. जेव्हा चुक झाली, तेव्हा त्याचे मोल चार वर्षांनी मोजावे लागेल, याचे भान राखले गेले असते, तर आज ही गयावया करण्याची वेळ आली नसती. पण मध्यंतरीच्या चार वर्षात मैत्री कशी विस्कटून जाईल, त्याची काळजी भाजपाच्या उथळ नेत्यांनी घेतली आणि आता गरज वाटू लागल्यावर अमित शहांना पुढाकार घ्यावा लागतो आहे. यात अनेकजण शिवसेनेच्याही तोंडाळ नेत्यांना दोष देतील. पण सेना हा प्रादेशिक व स्थानिक पक्ष असून राष्ट्रीय राजकारणात मोठा भाऊ असलेल्या भाजपाने समजूतदारपणा दाखवणे भाग होते. त्यात चुक झाली व सेनेला दुखावण्यात चतुराई शोधली गेली. आता त्याची किंमत मोजायचीही तयारी असायला हवी आहे. नाहीतरी सेनेला गमावण्यासारखे फ़ारसे काही नाही. लोकसभेत त्यांचे दोन खासदार नसले तरी त्या पक्षाला फ़ारसा फ़रक पडणार नाही. पण भाजपाला ती चैन परवडणारी नाही. उलट विधानसभेत भाजपाचे मुठभर आमदार कमी व मंत्रीही कमी झाले असते, म्हणून त्यांच्या राष्ट्रीय राजकारणाचे गणित विस्कटणार नव्हते. पण त्याचे चार वर्षापुर्वी भान नव्हते, तर आता चुचकारण्याची गरज काय? आपला स्वार्थ नसेल तर असलेली सत्ता बुडाली तरी सेनेला काय फ़रक पडणार आहे? त्याविषयी बेफ़िकीर होण्याची वेळ सेनेवर कोणी आणली?

बिहारच्या महाआघाडीचा विचका कशामुळे झाला? नितीशची कोंडी लालू करत होते आणि त्यात राहुल व सोनियांनी वेळीच हस्तक्षेप करायची गरज होती. पण राहुलना तितकी जाण नाही आणि महाआघाडी मोडण्याने आपले काही कमी होत नसल्याचे ओळखून नितीशनी एनडीएचा रस्ता धरला. बुडाले कोण? कित्येक दशकांनंतर कॉग्रेस २४ आमदार व काही मंत्रीपदे बिहारमध्ये मिळवू शकली होती. लालुंनाही दहा वर्षांनी सत्तेत हिस्सा मिळाला होता. पण दुबळा आहे म्हणून नितीशला लाचार करण्याच्या आगावूपणाने सर्व राजकारण विस्कटले. तशीच काहीशी वेळ महाराष्ट्रात भाजपावर आलेली आहे. त्यांनी एकाच वेळी शिवसेनेला दुखावले आणि इतर जे छोटे गट सोबत आलेले होते, त्यांनाही विश्वासात घेतलेले नाही. राजकीय संघटना व प्रभाव बघितला तर आजही भाजपापेक्षा शिवसेना दुबळी आहे. पण दोन्ही कॉग्रेसच्या एकजुटीला स्वबळावर सामोरे जाण्याइतका भाजपा बलवान नाही. अशा भाजपासोबत राहुन सेनेला अपेक्षित लाभ मिळत नसेल, तर असलेली सत्ता बुडण्याचे किती दु:ख असेल? मागल्या चार वर्षातल्या घडामोडी बघितल्या, तर आपल्या स्वार्थापेक्षा सेनेला भाजपाच्या नुकसानात अधिक मतलब वाटण्याचीच वागणूक आहे. तशी वेळ त्या पक्षावर कोणी आणली? तेच भाजपाचे खरे शत्रू आहेत. पण तेच भाजपाचे राज्यातील महत्वाचे पदाधिकारीही आहेत. चारपाच वर्षांनी उदभवणार्‍या परिस्थितीचा विचार नेत्यांना सुचणार नसेल, तर त्यांना नेतृत्व म्हणजे काही कळत नसते. युती मोडण्याची कोणाची हिंमत नव्हती, अशी दर्पोक्ती करणार्‍या नाथाभाऊ खडसेंची आज काय स्थिती आहे? अमित शहा सेनेशी बोलायला राजी नव्हते, त्यांना आज काय झाले आहे? मुद्दा इतकाच, की सेनेने अशा मोहात किती फ़सावे? विधानसभेच्या नव्हेतर लोकसभा जागांमध्येही हिस्सा वाढवून घेण्याची हिच वेळ आहे. होणार नसेल तर स्वबळाची भूमिका आहे़च की.

6 comments:

  1. भाऊराव,

    या लेखाच्या निमित्ताने श्री. उद्धव यांना एक सांगावंसं वाटतं. ते म्हणजे भाजपबिजपशी युतीचं जाऊद्या. फक्त राज ठाकऱ्यांचं बघा. ही घरचीच जोडी जर जमली तर बरीच मोठी मजल मारता येईल. पण त्यासाठी उद्धव यांच्या अंगात दम असणं आवश्यक आहे. केवळ सामोपचाराच्या भूमिकेने राजोद्धव एकत्र येणं मुश्कील आहे. उद्धव यांना जबरदस्त हिंमत दाखवावी लागेल. प्रश्न धैर्याचा आहे.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  2. आणि पुन्हा एकदा भाऊंचे सेनाप्रेमाचे दर्शन झाले।

    ReplyDelete
  3. भाऊ 1996 मधे सेनेने भाजपची ठाण्याची राम कापसे यांची जागा हिसकावून घेतली तेव्हाच ही युती कार्यकर्त्यांच्या मनातून तुटली कारण त्यानंतर राज्यात कोणत्याच निवडणुकीत भाजप सेना युतीचे एकत्रित सरकार आले नाही कारण सेनेला जरी केंद्रात रस नव्हता तरी ही जागा काढून घेतली गेली
    सध्याच्या परिस्थितीत युतीचे जागा वाटप अशक्य वाटते कारण उदाहरणार्थ पुण्यासारख्या शहरात भाजपच्या सगळया जागा लागल्या आहेत तर मुंबईत दोघांच्याही निम्म्या निम्म्या जागा लागल्या आहेत अशा स्थितीत कोण कोणाला कुठल्या जागा सोडणार हा प्रश्नच आहे
    राहता राहिला प्रश्न लोकसभेचा त्या निवडणुकीत मोदींना आणि संघाला अर्वाच्च शिवीगाळ होणार आहे म्हणजेच एका बाजूला मोदी आणि त्यांच्या मागे संघाची सगळी यंत्रणा आणि दुसऱ्या बाजूला सगळे असे हे युद्ध होणार आहे
    त्याचा फायदा मोदींना आतापर्यंत भाजप जिथे नाही अशा पूर्व आणि दक्षिणेकडच्या राज्यात होऊ शकतो
    जिथे आत्ता भाजप आहे म्हणजेच उत्तर भारत पश्चिम भारत आणि मध्य भारत तिथे मोदी प्रचार करतील तर दक्षिण आणि पूर्व भारतात योगी आदित्यनाथ प्रचार करतील
    आत्ता कर्नाटकात योगी हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत
    त्यामुळे ही लढाई फारच रंगतदार होणार आहे 2019 ची लढाई मोदी आणि राहुल यांच्यात अध्यक्षीय पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीसारखी होईल आणि त्यात मोदी बाजी मारण्याची शक्यता जास्त वाटते

    ReplyDelete
  4. अतिशय उत्तम भाऊ . पण ही युती घडायची असेल तर मोदीशहांना आपला नेहमीचा ताठा सोडून मवाळपणे वागणे भाग आहे . आणि तसं झालंच तर राज ठाकरे या माणसाला लांब ठेवण्यातच हीत आहे .

    ReplyDelete
  5. भाऊ आजुन 1 वर्ष आहे तोपर्यंत विरोधक मोदीजिना पूर्ण संपवतील अथवा मोदीजी संपवतील काहीतरी एक होईल

    ReplyDelete