Tuesday, February 13, 2018

कॉग्रेसला काय धाड भरलीय?

 shekhar gupta with sonia के लिए इमेज परिणाम

इंग्रजी पत्रकारिता आणि दिल्लीतल्या खास वर्तुळातले संपादक म्हणून ओळखले जाणारे शेखर गुप्ता यांनी एक विस्तृत लेख लिहून कॉग्रेसच्या आजच्या दुर्दशेची थोडी मिमांसा केलेली आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस सुप्रिम कोर्टाच्या चार न्यायाधीशांनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेऊन पत्रकार परिषद घेतली, तेव्हा त्यांच्या पाठीशी उभे असलेले शेखर गुप्ता आपण विविध वाहिन्यांवर बघितलेले आहेत. एनडीटीव्ही वाहिनीवर ते दिर्घकाळ विविध चर्चांमध्ये सहभागी होत असतात. यातूनच त्यांचे दिल्लीतील वजन लक्षात यावे. अशा माणसाने आज कॉग्रेसविषयी इतके निराश कशाला व्हावे? अर्थात ज्यांचे पोटपाणी व चैन ऐषारामाची सोय कॉग्रेसने दिर्घकाळ केली, त्यांना त्या पक्षाची सत्ता गेल्यावर वैफ़ल्य आल्यास नवल नाही. पण गुप्ता कमालीचे निराश वाटतात. पुन्हा कॉग्रेस सत्तेच्या जवळही पोहोचण्याची आशा त्यांनी सोडलेली दिसते. म्हणून तर आपल्या लाडक्या पक्षाला धीर व प्रोत्साहन देण्यापेक्षा त्यांनी कॉग्रेस कशी व कुठे आजारी पडलेली आहे, त्याची मिमांसा करण्याचे धाडस केलेले आहे. देशाच्या सत्तेचे केंद्र मानल्या जाणार्‍या ल्युटीयन्स दिल्लीतील कोणी पत्रकार तितके धाडस अजून करू शकलेला नाही. कदाचित त्यांना अजूनही कॉग्रेस सत्तेपर्यंत येण्याची आशा असावी. म्हणूनच तिचे आजार लपवून तिला प्रोत्साहन देण्याचा खेळ इतरांनी चालू ठेवलेला असावा. शेखर गुप्तांची गोष्ट थोडी वेगळी आहे. ते नुसते सत्तेचे निकटवर्ति नाहीत, तर सत्तेच्या व्यवहारात लुडबुडणारे आहेत आणि त्यांची आज सगळीकडून कोंडी झालेली आहे. अन्यथा त्यांनी मिमांसा करण्यापर्यंत मजल मारली नसती. तेही मोदी निंदेला जोडून राहुल गुणगानात रममाण होऊन गेले असते. कॉग्रेस पुन्हा राजकीय यश मिळवून सत्तेपर्यंत मुसंडी मारेल अशी आशा शेखर गुप्तांनी का सोडलेली आहे? त्यांनी केलेले कॉग्रेसी आजाराचे निदान काय आहे?


‘द प्रिन्ट’ नावाच्या एका संकेतस्थळावर गुप्ता यांनी लिहीलेल्या लेखाचे शीर्षकच बोलके आहे. ‘विरोधातील भाजपा टोकदार आणि नेमका होता, तर कॉग्रेस आळशी व आशाळभूत आहे’ असा त्यांच्या लेखाच्या शीर्षकाचा आशय आहे. तशा निष्कर्षापर्यंत वेगवेगळ्या कारणांनी गुप्ता आलेले आहेत. त्यापैकी एक मुद्दा अतिशय नेमका व दुखण्यावर बोट ठेवणारा आहे. गमावलेली सत्ता व वैभव पुन्हा मिळवण्यासाठी कॉग्रेस लढायलाही राजी नाही. उलट आयते कोणी आपल्यासमोर सत्तेचे वाढलेले ताट घेऊन यावे, अशा प्रतिक्षेत आहे, असा गुप्ता यांच्या एकूण मिमांसेचा आशय आहे. मग सध्या कॉग्रेस विरोधातले राजकारण म्हणजे काय करते आहे? तर आपल्या विरोधी राजकारणाचा ठेका त्या पक्षाने इतरांकडे सोपवला आहे, असे गुप्ता यांना वाटते. माध्यमे, पत्रकार, वाहिन्या व विविध क्षेत्रातले चळवळ्ये व संघटना यांच्याकडे विरोधी राजकारणाची सुत्रे कॉग्रेसने सोपवली आहेत. स्वत: कॉग्रेस व तिचे नेते कुठलेही आक्रमक विरोधी राजकारण करीत नाहीत, हा गुप्ता यांचा निष्कर्ष आहे. त्यात चुक काही़च नाही. गुप्ता एकाच गोष्टीची गफ़लत आपल्या मिमांसेत करीत आहेत, ती म्हणजे असे आजच सुरू झालेले नाही. सोनिया गांधी यांच्या हाती कॉग्रेसची सुत्रे आल्यापासूनच त्यांनी पक्षाच्या राजकारणाची सुत्रे टेंडरे काढल्यासारखी पक्षबाह्य घटकांकडे सोपवलेली आहेत. तीस्ता सेटलवाड, गौप्यस्फ़ोट करणारे काही भुरटे पत्रकार, मुख्य प्रवाहातील काही लफ़ंगे मतलबी संपादक आणि विविध क्षेत्रात मान्यवर समजले जाणारे दलाल, अशा लोकांना सोनियांनी गोळा केले. मग त्यांच्यावर पक्षाच्या विविध लढाया लढण्याची कामगिरी सोपवलेली. त्यात कुठेही पक्षाचे नेते वा कार्यकर्त्यांना स्थान नव्हते. २०१४ मध्ये मोदीलाटेमुळे कॉग्रेसचा पराभव झाल्यानंतर ही स्थिती आलेली नाही, खुप आधीच त्याची सुरूवात झाली होती.

गुजरातची दंगल असो वा वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतरचा काळ असो, भाजपा आपले हातपाय पसरू लागल्यापासून त्याला रोखण्याची कामगिरी अशा राजकारणबाह्य काही लोकांनी आपणहून स्वत:कडे घेतली. मोदी विरुद्ध माध्यमे हा संघर्ष आजचा नाही, तो २००२ पासूनचा आहे. तेच मोदी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आल्यानंतर तो संघर्ष अधिक टोकदार होत गेला. भाजपाचा वाढता प्रभाव किंवा कॉग्रेससह डाव्यांच्या नामोहरम होण्याने, त्या त्या पक्षांना जितक्या वेदना झाल्या नसतील, तितका आक्रोश अशा चळवळ्ये व संपादकांकडून होत राहिला. त्यातूनच सोनिया गांधींना पक्षकार्य कंत्राटाने हाती घेणारे ठेकेदार मिळत गेले. राजदीप सरदेसाई, बरखा दत्त किंवा खुद्द शेखर गुप्ता यांना २०१४ नंतर आपापल्या माध्यमे वा अन्य क्षेत्रातील बालेकिल्ल्यातून कशाला पळ काढावा लागला? त्यांनीच माध्यमे व सामाजिक क्षेत्रातून राजकीय लढाई छेडून कॉग्रेसला आळशी बनवण्याची प्रक्रीया सुरू केली. या सर्व काळात भाजपा जिंकत वा हरत होता, तरी त्याची लढाई कॉग्रेसशी कधीच झाली नाही. निवडणूकीच्या आखाड्यात भले कॉग्रेस वा सेक्युलर पक्षाचे उमेदवार असायचे. पण त्यातले भाजपाविरोधी रणनितीकार व पडद्यामागचे सेनापती शेखर गुप्ता, बरखा दत्त असेच लोक होते ना? तीस्ता सेटलवाड गुजरातमध्ये लढत होती आणि कॉग्रेसचा त्या संघर्षात कुठे मागमूस नव्हता. अरुंधती रॉय, रामचंद्र गुहा, अमर्त्य सेन, शबाना वा जावेद अख्तर, अनंतमुर्ति, टहलका वा छुपे कॅमेरे ही फ़ौज; पत्रकारिता, चळवळी वा समाजकार्य करीत नव्हती, तर भाजपाला राजकारणात नेस्तनाबुत करण्यातच रमलेली होती. हे काम असे लोक करत असतील व त्यांना लागणारी रसद पुरवण्याचे काम कॉग्रेसने केले. म्हणून तर ठेकेदारी आजची नाही, हे लक्षात येऊ शकेल. अशा ठेकेदारीतून त्यांनीच कॉग्रेसला राजकीय संघटना म्हणून जमिनदोस्त करून टाकली.

युपीएच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत देशातल्या अनेक राज्यात पोलिस चकमकी झडत होत्या आणि त्यातल्या सर्वात कमी चकमकी गुजरातमध्ये झाल्या. पण खोट्या चकमकीचा बोभाटा व गदारोळ गुजरातसाठी होत राहिला. मुलायमची सत्ता असलेल्या उत्तरप्रदेशात वा युपीएचीच सत्ता असलेल्या महाराष्ट्रातील चकमकींच्या बातम्या सुद्धा कुठे फ़ारशा झळकल्या नाहीत. हा फ़रक गुप्तांच्या लक्षात कसा येत नाही? येदीयुरप्पांच्या जमिन घोटाळ्याचा कंठाशोष करणार्‍या संपादक पत्रकारांना, चळवळ्या समाजसेवकांना हरयाणा राजस्थानात त्याच्या अनेकपट घोटाळे केलेल्या रॉबर्ट वाड्रांची भानगड समोर आणायची हिंमत झाली नाही, की गरज वाटली नाही. यातला फ़रक गुप्तांना का समजत नाही? कारण तेही त्या ठेकेदारीचा एक हिस्सा होते. त्यांच्यासारख्यांनीच कॉग्रेसला आळशी बनवत त्याच्या राजकारणाचे एक एक क्षेत्र आपल्याकडे वर्ग करून घेतले. त्यातून आपापल्या तुंबड्या भरलेल्या आहेत. कोळसाखाण घोटाळा वा राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा कुठल्या पत्रकार माध्यमाने शोधून काढला नाही किंवा त्याला वाचा फ़ोडली नाही. जेव्हा त्याचा अन्य मार्गांनी गवगवा झाला, तेव्हा लाजेकाजेस्तव माध्यमांना तेही विषय घ्यावे लागले होते. युपीएला दुसरी कारकिर्द मिळाली, तेव्हा त्यातली मंत्रीपदे कोणाला व कुठल्या पक्षाला कशी वाटावी, यातले सौदे करण्यात एकाहून एक नामचिन पत्रकार पुढे होते. नीरा राडीयाच्या टेप्स उघड झाल्यावर त्यांची नावे बाहेर आली. ती पत्रकारिता होती की कॉग्रेसी राज्यकारभाराचे ठेके उचलण्याचे काम चालू होते? ही सगळी पक्षाची कामे व राजकारण पत्रकार व चळवळ्येच संभाळत असल्याने सोनियांना पक्ष व संघटनेची गरज वाटेनाशी झाली. मग संघटनात्मक पातळीवर कॉग्रेस नामशेष होत गेली. नुसती माध्यमे व त्यातील बातम्याचा गदारोळ करून निवडणूका जिंकता येतील, हा भ्रम सोनियांसह राहुलच्या मनात कोणी रुजवला?

भाजपाला व पर्यायाने त्याच्या हिंदूत्वाला बदनाम करून राजकीय लढाई जिंकण्याचे मनसुबे रचले गेले, त्याला असे पत्रकारच जबाबदार आहेत आणि त्यातून कॉग्रेस पक्ष रुग्णशय्येवर येऊन पडला आहे. इशरत जहानची चकमक असो किंवा मालेगावच्या स्फ़ोटाच्या निमीत्ताने रंगवलेला तमाशा असो, त्यात कुठले राजकारण होते? भाजपाला संघटनात्मक शक्तीवर रोखणे वा पराभूत करण्याची कल्पनाच युपीएच्या दहा वर्षात मारली गेली होती. तीस्ता वा तत्सम चळवळ्यांनी न्यायालयात जाऊन भाजपाला बेजार करायचे आणि त्याच्याच बातम्या तिखटमीठ लावून छापण्याने भाजपाला बदनाम करून संपवायची योजना कॉग्रेस कार्यकारिणीने प्रस्ताव संमत करून आखलेली नव्हती. गुप्ता वा त्यांच्यासारख्या काही पत्रकार व माध्यमांनी त्याला सुरूवात केली आणि त्यातले राजकीय लाभ बघून सोनिया व कॉग्रेस त्यातला बळी झालेली आहे. मग त्याची पुढली पायरी म्हणून मार्क्सवादी, डावे, समाजवादी, पुरोगामी अशा विविध राजकीय गटांना हाताशी धरून भाजपा विरोधातील लढाईची कामे त्यांना सोपवली गेली. लालू, नितीश, ममता, मुलायम वा मायावती अशांचा लबाडीने उपयोग करून घेण्यात आला. पण मरगळलेली दुबळी कॉग्रेस संघटनात्मक पातळीवर सुदृढ करणे कोणाला सुचले नाही. की ठेकेदारांनी सुचू दिले नाही? मागल्या दहापंधरा वर्षात खुद्द शेखर गुप्ता किंवा तत्सम कॉग्रेसप्रेमी पत्रकार, संपादक, विचारवंत गोतावळ्याने भाजपाला नामोहरम करण्यापेक्षा सत्तेतल्या कॉग्रेसचे दोष व त्रुटी कटाक्षाने दाखवून सुधारण्यासाठी कानपिचक्या दिल्या असत्या, तर कॉग्रेस आळसावत गेली नसती. परावलंबी भूमिकेतून बाहेर पडण्याची गरज कॉग्रेस नेतृत्वालाही वाटली असती. जावयाला घबाड देण्यापेक्षा आणि लाडक्या पोराचे कोडकौतुक करत बसण्यापेक्षा, सोनियांनी पक्षाचा संघटनात्मक पाया मजबूत करण्यासाठी नक्कीच हालचाली केल्या असत्या.

कॉग्रेसची अवस्था आज पाकिस्तानी सेना व राज्यकर्त्यांसारखी झालेली आहे. पाक सेना मागल्या अनेक वर्षात लढाई विसरून गेलेली आहे. भारताला आपण हरवू शकत नाही, अशा न्युनगंडाने पछाडलेल्या पाक सेनेने व राज्यकर्त्यांनी दोन दशकात जिहादी संघटनांना हाताशी धरून भारताला डिवचण्याचा अखंड खेळ केला आहे. त्यामुळे भारताला त्रास झाला हे कोणी नाकारू शकत नाही. पण यातच भारताचे नाक दाबले जाते, अशा भ्रमात पाकसेना निष्क्रीय होत गेली आणि जिहादी प्रशिक्षण देण्याच्या पलिकडे कुठलेही पराक्रमाचे काम त्या सेनेला आता आवाक्यात राहिलेले नाही. म्हणून सर्जिकल स्ट्राईक झाल्यावर त्याला चोख उत्तर देण्य़ाची हिंमत पाकिस्तानला झाली नाही. कारण भारताशी आपण दोन हात करू शकत नाही असा पाकला आता आत्मविश्वास प्राप्त झाला आहे. त्यापेक्षा जिहादी गटांना रसद पुरवून त्यांचे लाड करून भारताला सतावण्याची एक रणनिती बनुन गेली आहे. पण याच कालावधीत जिहादी खरे लढवय्ये म्हणून अधिक आक्रमक झाले असून, त्यांनी पाक राज्यकर्ते व सेनेला आपल्या तालावर नाचवायला आरंभ केला आहे. नवाज शरीफ़ त्याचेच बळी आहेत आणि सईद हाफ़ीज त्यामुळेच शेफ़ारला आहे. कॉग्रेसची अवस्था कितीशी वेगळी आहे? त्यांनाही जिग्नेश मेवानी, हार्दिक पटेल वा कर्नाटकात मुस्लिम पक्ष पीडीएफ़ची मदत घेण्यापर्यंत लाचार व्हावे लागलेले आहे. आपला पक्ष वाढवणे, त्याची संघटना उभारणे हा विषयच राहुल सोनियांच्या मनाला शिवलेला नाही. त्यापेक्षा अन्य कुणाकुणाला पक्षाचे काम कंत्राटाने सोपवता येईल, त्याचा शोध कायम चालू असतो. त्यात यशवंत सिन्हा आलेले चालतात आणि नक्षलवादीही घ्यायची तयारी झालेली आहे. कारण कॉग्रेसला आता आपल्या बळावर काही संपादन करण्याची वा पुरूषार्थ गाजवण्याची इच्छाच राहिलेली नाही. हरलेल्या जुगार्‍यासारखी कॉग्रेसची फ़रफ़ट चालली आहे.

सोनिया गांधींनी १९९९ सालात कॉग्रेसची सुत्रे हाती घेतल्यावर पंचमढी येथे पक्षाचे अधिवेशन योजलेले होते. पुन्हा नव्याने कॉग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधण्याचा निर्णय तिथे झालेला होता. त्यासाठी काय चुका नडल्या व काय उपाय योजायचे, त्याचा आढावा घेण्यासाठी अंथोनी समिती नेमलेली होती. पण तिचा अहवाल कधी वाचला गेला नाही, की त्यानुसार काही केले गेले नाही. तो आजही धुळ खात पडून राहिला आहे. पुढे पाच वर्षांनी सत्तेसाठी तडजोडी केल्या आणि मध्यंतरी माध्यमे पत्रकारांनी वाजपेयी सरकारला बेजार केल्याने सत्तासुत्रे सोनियांच्या हाती आली. त्यानंतर तडजोडी आघाड्या व अधिकाधिक काम पक्षबाह्य लोकांवर सोपवण्याची सवयच लागून गेली. त्याचा हा परिणाम आहे. आता तर पक्षाला नव्याने उभारी देण्याची कल्पनाही कॉग्रेसला नकोशी झालेली आहे. मोदीविरोधात वापरलेली जुनी शस्त्रेही बोथट होऊन गेलेली आहेत. जुने ठेकेदार उपयोगाचे राहिलेले नाहीत. म्हणून जिग्नेश वा गौरी लंकेश यांच्याकडे आशाळभूतपणे बघायची वेळ आलेली आहे. कॉग्रेसची मिमांसा शेखर गुप्तांनी योग्य केलेली असली, तरी त्यांनी व त्यांच्यासारख्यांनी थोडे आत्मपरिक्षणही करायला हवे. कारण ज्या रोगाचे निदान असे लोक करतात, त्याची बाधा त्यांच्यापासूनच सुरू होत असते. त्यांच्याच आहारी गेल्याने २००४ नंतर लालकृष्ण अडवाणींच्या राजकीय महत्वाकांक्षेला सुरूंग लागला होता आणि दुबळी कॉग्रेस व मनमोहन सिंगही यशस्वी होऊ शकले होते. मोदींची कहाणी भिन्न आहे. ते प्रत्येक बाबतीत स्वावलंबनाला प्राधान्य देतात. संघटना विस्तारण्याच्या बरोबरच आधुनिक तंत्राचा व कल्पनांचाही लौकर स्विकार करतात. पण या सर्वांपेक्षा कष्टाला वा मेहनतीला मोदी पर्याय शोधत नाहीत. ज्या दिवशी राहुल व कॉग्रेसला मेहनतीची महत्ता समजेल, तिथून कॉग्रेसच्या यशाचा मार्ग पुन्हा एकदा खुला होऊ शकेल.

15 comments:

  1. भाऊ सुंदर विश्लेषण केलतं...त्या मुर्ख कॉंग्रेस नेतृत्वाने अपघातानेच तुमचा लेख वाचावा आणि त्यावर जमल्यास काहीतरी विचार करावा अशी आशा करतो....

    ReplyDelete
    Replies
    1. भाऊंचे हे तिखट विश्लेषण त्यांच्या किती गळी उतरेल. अन उतरेलका हेही महत्वाचे...

      Delete
  2. विचार करायला लावणारा लेख...धन्यवाद भाऊ

    ReplyDelete
  3. Bhau Karachi lihilay tumhi,aaj sudha bjp cha raag Congress peksha Gupta,rajdeep, wagale jast kartat,tyawarun kiti kholwar Congress ne tyana posley lakshat yete.pan he lok mate milvun det nahit

    ReplyDelete
  4. भाऊ, हा लेख झणझणीत अंजन आहे त्यामुळे हा लेख काँग्रेसला कळावा ही प्रामाणिक इच्छा आहे. सुधारणा झालीतर चांगलेच आहे, अन्यथा महात्मानी सांगितल्याप्रमाणे विसर्जित होईल.
    भाऊ, तुम्ही खूप छान विश्लेषण केले आहे व त्यामुळे माझ्यासारख्या अडाणी माणसाला समजले आहे. धन्यवाद.

    ReplyDelete
  5. वा!!जबरदस्त .

    ReplyDelete
  6. काॅङग्रेस कधीही त्यांच्या पक्षात कर्तृत्ववान लोकाना स्थान देत नाही. कारण असे लोक गांधी घराण्यापेक्षा वरचढ ठरतील अशी भीती आहे.

    ReplyDelete
  7. काय जबरदस्त लिहिता हो भाऊ तुम्ही.
    तुम्ही अगदी मर्मावर बोट ठेवले खांग्रेसच्या.

    ReplyDelete
  8. अप्रतिम विश्लेशण. कंत्राटी फौजेने वाजपेयींची सत्ता घालवली तसेच गडकरींना पण दिल्ली काही काळासाठी सोडावी लागली. जर मोदींना पूर्ण बहुमत मिळाले नसते तर त्यांनापण इतके खंबीर राहता आले नसते.

    ReplyDelete
  9. shekharji v tya pravrutichya lókanchi tymhi ghetalleli haajari sadetodch aahe.

    ReplyDelete
  10. भाऊ नेहमीप्रमाणेच छान विश्लेषण. जोपर्यंत गांधी परिवाराची हकालपट्टी होत नाही आणि चांगले नेतृत्व पुढे येत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष उभारी घेऊ शकत नाही. भारताला दोन मजबूत राष्ट्रीय राजकीय पक्षांची नितांत गरज आहे. विरोधी पक्ष मजबूत असणे तेवढाच आवश्यक आहे जेवढा सत्ताधारी पक्ष मजबूत असेल.

    ReplyDelete
  11. भाऊ खूप जबरदस्त लेख आहे...!
    काँग्रेस २०१४ नंतर त्यांच्या स्वतःच्या तंगड्यात तंगडी अडकून पडत आली आहे.... काँग्रेस चे जेष्ठ लोकच राहुल च्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस ला विनाशाकडे घेऊन जायला समर्थ आहे...

    ReplyDelete
  12. सखोल विवेचन आहे हे. मस्त!!

    ReplyDelete