Tuesday, February 27, 2018

चवीपुरते मीठ

tribal killed in kerala के लिए इमेज परिणाम

सगळा देश श्रीदेवीच्या आकस्मिक मृत्यूने व नीरव मोदीने घातलेल्या करोडो रुपयांच्या दरोड्याने चिंतीत असताना केरळात एका भुकेल्या आदिवासी व्यक्तीला तांदुळ चोरल्याबद्दल देहदंडाची शिक्षा जमावाने ठोठावली आहे. त्याचा गुन्हा तांदुळ चोरण्य़ाचा नव्हता, तर त्याच्यापाशी आपल्या चोरीला कायद्याच्या चौकटीत बसवण्याची सुसज्ज यंत्रणा नसणे, हा खरा गुन्हा होता. समाज कुठल्या पाशवी थराला जाऊन पोहोचला आहे, त्याचे हे विषण्ण करणारे उदाहरण आहे. त्यातल्या हिंसक पाशवी जमावाची कृती अंगावर शहारे आणणारी आहेच. पण तथाकथित सुबुद्ध समाजाची बधीरताही भयभीत करणारी आहे. तीन वर्षापुर्वी असाच जमावाकडून दिल्ली नजिकच्या गावातला अकलाख मारला गेला तर देशातले अकादमी पुरस्कार विजेते चवताळून उठले होते आणि कालपरवा बडोद्यात झालेल्या साहित्य संमेलनातही त्यापैकीच एक असलेल्या अध्यक्षांनी चिंता व्यक्त केली. पण कालपरवा केरळातील पलक्कडमध्ये एका गावात मधू नावाच्या आदिवासीची हत्या झाल्यावर सर्व सृजनशीलांच्या संवेदना बधीर होऊन गेल्या आहेत, त्यांच्या भावना विचार सर्वकाही सुप्तावस्थेत गेलेले आहेत. या संवेदना राजकीय व हितसंबंधिताशी जोडलेल्या असतात. त्यामुळे माणुस मारला जाण्याने त्यापैकी कोणाला कसलेही दु:ख होत नाही वा कर्तव्यही नसते. मारला कोण गेला, त्याचा धर्म काय होता? मारणार्‍यांचा धर्म जात काय असते? किंवा कुणाचे सरकार सत्तेमध्ये असताना हत्या झाली, अशा निकषावर संवेदना झोपी जाणे वा चवतळून उठणे शक्य असते, ही केरळातील पहिलीच घटना नसून मागल्या काही महिन्यात जमावाने कुणाला ठार मारण्याची तिसरी घटना आहे. त्याचे चित्रण करून ती सोशल मीडियातही टाकली गेली आहे. पण कुठल्याही सृजनशीलाचे हृदय द्रवलेले नाही. मारणारे भगव्या रंगातील असल्यास भावनांचा महापूर येत असतो. याचे हे उदाहरण आहे.

केरळात भगव्याचे राज्य नाही तर तांबड्याची सत्ता आहे. तिथे मारली जाणारी माणसे किडामुंगी असतात आणि मारली जाण्यासाठीच जन्माला आलेली असतात. त्यांचा मृत्यू वा हत्येची दखल घेणे पुरोगामी शिष्टाचारात बसणारे नसते. त्याकडे काणाडोळा करून हत्याकांडाला मुक्त रान देणार्‍यांना भेटायला अगत्याने दिल्लीहून केजरीवाल येतात वा चेन्नईहून तांबडा शर्ट परिधान करून सृजनशील कलावंत कमल हासन तिरुअनंतपुरमला पोहोचतात. दरम्यान तिथे डझनावारी राजकीय हत्या झाल्या किंवा कुठल्या प्राध्यापकाच हातपाय तोडलेले असले, तरी त्याचा मागमूस अशा सृजनशील मनाला लागलेला नसतो. ही आजकाल सृजनशीलतेची व्याख्या व व्याप्ती झालेली आहे. जिथे खापर भाजपा वा मोदींच्या माथी फ़ोडण्याची सोय नसते, तिथे सर्वकाही बधीर होऊन जाते. गौरी लंकेशसाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना जाब विचारण्यापेक्षा त्याच्याच खर्चाने योजलेल्या सोहळ्यात हजेरी लावण्यात सृजनशीलता शोधणार्‍यांकडून मधु नावाच्या तांदुळचोर भुकेल्या मधूने कसली अपेक्षा बाळगावी? त्याच्या जगण्यापेक्षा अशा सृजनांच्या भाषणे व लिखाणाचे जगणे अगत्या़चे असते. त्यासाठी बळी जायलाच मधूसारखे लोक जन्माला आलेले असतात. तेच त्यांचे अवतारकार्य असते. आणि असे फ़क्त केरळात घडते असेही नाही. डाव्या पुरोगामी पक्षांची सत्ता असलेल्या त्रिपुरातही होऊ शकते. आजकाल पुकारलेल्या नव्या एलगारच्या मोहिमेतील असे पहिले शहीद असतात. त्यांच्यासाठी नाही दिवा नाही मेणबत्ती, अशी स्थिती असते. त्यांच्यासाठी परत करायला कोणाकडे पुरस्कार नसतो की तिकडे फ़िरकायला जिग्नेश मेवाणी वगैरेंना वेळही नसतो. कारण असे जमावाकडून चेचून मारले जातात, त्यांच्याच चितेवर आपल्या राजकीय पोळ्या भाजून मेवाणी आमदार होत असतात ना? मग अशा मधूला वाचवून आपल्या राजकीय पायावर धोंडा कोणी पाडून घ्यायचा?

अकलाखलाची हत्या उत्तरप्रदेशचे पोलिस रोखू शकले नाही, तेव्हा तिथे समाजवादी पक्षाचे राज्य होते आणि तरीही खापर केंद्रातल्या मोदी सरकारच्या माथी आले. नंतर हैद्राबादेत विद्यापीठात रोहित वेमुलाने आत्महत्या केली. तिथे केंद्राचे पोलिस नाहीत, तरी आरोपी मोदीच असतात. पण केरळात मार्क्सवादी मुख्यमंत्री असूनही कोणीही अजून त्याचे खापर पिनयारी विजयन यांच्या माथी मारलेले नाही. कोणी त्याचा जाब त्यांना विचारायला पुढे सरसावलेला नाही. कारण हकनाक मरणारा कोणीही असला व मारणारा कोणीही असला, तरी सत्ता कोणाची यानुसारच दु:खामध्ये व समस्येमध्ये कमीअधिक होत असते. डाव्यांच्या वा पुरोगामी सरकारच्या अखत्यारीत हत्याकांड झाले, तरी ते सौम्य असते आणि त्यात जातीय व भयंकर असे काहीच नसते. तो निव्वळ कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असतो. देश व लोकशाही धोक्यात येत नसते आणि मधूला वाचवण्यापेक्षाही आधी देशाचे संविधान वाचवणे अगत्याने असते. मधु मेल्याने बिघडत नसते. अर्थात मधू तरी तांदुळ चोरताना मुद्देमालासह पकडला गेला होता. त्या त्रिपुरातील एका आदिवासी महिलेचा गुन्हा त्यापेक्षा भयंकर होता. तिने आजवर निमूट मार्क्सवादी पक्षाला मत दिलेले होते. घरच्यांनी फ़र्मावले आणि तिने निमूट विळा हातोड्याला मत दिले होते. यावेळी तिला कुठली दुर्बुद्धी झाली आणि तिने कमळाला मत देण्याचा अक्षम्य गुन्हा केला आणि तिला प्राणाचे मोल मोजावे लागले. उत्तर त्रिपुरातील तिच्या हत्याकांडाची कुणा साहित्यिक सृजनशील बुद्धीमंतांना दखल घ्यायची गरज वाटलेली नाही. कारण त्यांच्यापर्यंत तशी बातमीही आलेली नाही. कुठल्या तरी कोपर्‍यात कुणा वर्तमानपत्राने तिची खबर दिली आणि त्यात तिच्या नावाचही उल्लेख आलेला नाही. कशाला येईल? माणिक सरकार हे डाव्या आघाडीचे मुख्यमंत्री. त्यांच्या सत्ताकाळात कोणीही मारला गेला, तरी त्याला थेट मोक्षच मिळतो ना?

अकला्खची अगत्याने आठवण करणार्‍या आपल्या संमेलजाध्यक्षांना त्यानंतर केरळात पडलेले डझनावारी राजकीय मुडदे ऐकायला मिळालेले नाहीत की ठाऊकही नाहीत. मग संमेलनात त्यांचे स्मरण करणे वा त्यावरून विजयन राजाला चुकत असल्याचे सांगणे, कसे शक्य व्हावे? त्रिपुरातील त्या आदिवासी निनावी महिलेने आपला मताचा हक्क गाजवण्याचा वेगळा विचार केला, म्हणजे अविष्कार स्वातंत्र्याची किती मोठी पायमल्लीच ना? मग तिची दखल कोणी कशाला घ्यावी? संविधान असो, लोकशाही असो वा अन्य कुठलेही स्वातंत्र्य असो, त्याला जोवर पुरोगामी प्रतिगामी असा निकष लागत नाही, तोपर्यंत त्या कृती वा घटनेला पाप किंवा पुण्य़ ठरवता येणार नसते. एकदा ते निकष लागले, मग राजा चुकला की त्याची रयतच चुकली, हे ठरत असते. केरळात वा त्रिपुरात अर्थातच रयत चुकलेली असते आणि अन्यत्र भाजपाचे सरकार असले, मग आपोआपच राजा चुकत असतो. कारण त्याने निवडून येणे हाच गुन्हा असतो. त्याने सत्तेची अभिलाषा बाळगणे, पुरोगामी उच्चवर्णाच्या विरोधात शुद्रवर्णी हिंदू पक्षाने लढायचा विचार करणेच, केवढे मोठे पाप असते. त्यात पुन्हा पुरोगाम्यांचा पराभव करणे म्हणजे तर घोर पाप! मग असा राजा सत्ता हाताळतो म्हणजेच मोठी चुक असते आणि त्याला ठणकावून चुक दाखवणे आवश्यक असते. तो सत्तेत आला तरी चुक असतो आणि सत्तेत नसला तरी चुकच असतो. कारण तो प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देण्याचा मनसुबा बाळगून असतो. बाकी मधूला जमावाने मारणे वा अकलाखला ठार करणे, ह्या नित्याच्या गोष्टी असतात. त्या चवीपुरते मीठ किंवा फ़ोडणीपुरता कडीपत्ता म्हणतात, तशा वापरायच्या असतात. वर्णाश्रम चालू़च असतो. उच्चनीच भेदभाव कायम असतात. त्याच्या व्याख्या बदलून टाकल्या म्हणजे झाले. नीरव मोदीने खोटे हमीपत्र वापरून करोडो रुपये सहज उचलले, तर पुरोगामी वस्त्रे परिधान करून संविधान बचावाची भामटेगिरी काय मोठी अवघड असते?

7 comments:

  1. Not our media or social media we are totaly responsible, shame on us.

    ReplyDelete
  2. सृजनशीलता जेव्हां अर्थार्जनाशी जोडली जाते तेव्हां तिच्या डोळ्यांवर धन आणि मान सन्मान ह्यांची झापडे बांधली जातात.

    ReplyDelete
  3. भाऊ, मधूच्याबाबतीत जे काही झाले तू क्रूरच आहे व त्याबद्दल जबाबदार असणार्या सर्वाना शिक्षा झालीच पाहिजे. आता गोष्ट संमेलन अध्यक्षांची, त्यांच्या विशिष्ट संवेदना, सोयीप्रमाणे उघडे असणारे डोळे सर्वच काही अचाट आहे. त्यांना हव्या तेव्हढ्याच गोष्टी दिसतात. लगेच निकाल पण देतात राजा तू चुकला आहेस. जो पापी नाही त्यानेच दगड मारावा ह्या गोष्टीप्रमाणे गेल्यास, ही सर्व मंडळी पळून जातील. मधूच्या राजाला जाऊन सांग की राजा तू चुकला आहेस मग बघू.

    ReplyDelete
  4. टिनपाट बोरू बहाद्दर जे अकला्खसाठी लेखण्या झिजवत होते, त्यांचा बोरूतली शाई आता संपलेली दिसते.
    अकला्खची हत्या होण्यासाठी मोदीच जबाबदार आहेत असे म्हणणारा राजदीप, डॉ. नारंग यांची हत्या झाल्यावर , त्याला roadrage अस म्हणतो.

    शेखर गुप्ता यांनी मधूच्या हत्येला जातीय रंग देऊ नका असे म्हणले, आणि दोनच दिवसात कुठल्याशा एका प्रकरणात हिंदुमुलाने अत्याचार केल्याचे दाखले दिले.

    नाममात्र अपवाद वगळता काँग्रेसचेच राज्य असल्याने, पत्रकार,साहित्यिक, प्रशासन, राजकारणी यांचं चांगलच सख्य आहे.
    त्यामुळे पत्रकार, साहित्यिक स्वतःहुन काँग्रेसच्या बचावाला उतरतात.
    इंटरनेट या माध्यमावर मात्र या घटकाच नियंत्रण नाही. त्यामुळे यांचे काळे धंदे आता लोकांना कळू लागले आहेत.

    छत्तीसगड मधील मुलीने भात भात म्हणत प्राण सोडले , अशी हेडलाईन देणारी वृत्तपत्रे मात्र मधुच्या बाबतीत मात्र मूग गिळून गप्प आहेत.

    काही बेरक्या पत्रकारांना सरकारने पेन्शन द्यावी अस वाटत आहे.काय म्हणाव या लोकांना??

    ReplyDelete
  5. लेख अप्रतिम... भाऊ सध्या सोशल मीडिया वर सिरीया मधील अत्याचारांचा महापुर आलाय. जो तो शेयर करतोय, इतकी तत्परता काश्मीरी पंडीतां विषई कधी दिसली नव्हती. हकनाक कोणी मरत असेल तर ते गैरच, पण सिरीया ला वेगळा न्याय का? आपला एखादा या विषयावर लेख आल्यास खुलासा होईल. धन्यवाद..

    ReplyDelete
  6. इंग्रजी भाषेत लिहिल्याबद्दल माफ करा.
    Sorry to say, One more UPA and India is gone.

    Chrislamist will take over with help of Naxalite , urban Naxalite if Congress comes back.

    Indian needs to understand the clash of civilizations is going on . India is battle ground for world's two dominant religions.
    At one side evangelist are here , with all arsenal, other side is supported by petro dollars.
    And third one is China, who has its own interest.

    Hope that Indians will wake atleast after more than one thousand years of foreign rule.
    But chances are very slim.

    Providing some links to understand the narrative.
    It's Conversation between Rajiv Malhotra and TV Mohandas Pai.

    https://youtu.be/LAZPY_rTJLU

    Interested readers can read book by Rajiv Malhotra , titled 'Breaking India'

    (This is not an advertisement or promotion.)

    जास्तीत जास्त लोकांना माहीत व्हावं म्हणून लिंक्स दिल्या आहेत.

    कम्युनिस्ट राजवटीचा खरा चेहरा दाखवणारा माणूस
    http://www.anatolekonstantin.com

    धन्यवाद


    ReplyDelete
  7. खूप मस्त लिहिता तुम्ही

    ReplyDelete