Friday, February 16, 2018

गोष्ट तशी जुनीच आहे

kureel bank fraud के लिए इमेज परिणाम

कालपरवा पंजाब नॅशनल बॅन्केतून नीरव मोदी या इसमाने ११ हजार कोटी रुपयांची अफ़रातफ़र केल्याची बातमी आली आणि कल्लोळ सुरू झाला. वास्तविक त्याच बॅन्केने तशी रितसर तक्रार केली आहे आणि काही कर्मचारी व अधिकार्‍यांना निलंबित केले आहे. त्यांच्याच संगनमताने हा घोटाळा होऊ शकला असाही दावा आहे. या निमीत्ताने तीन दशकापुर्वी गाजलेला किरीट आचार्य नामक भामट्याचा पांढरपेशा दरोडा आठवला. अनेक वर्षे हा इसम बॅन्क ऑफ़ इंडियाच्या अहमदाबाद शाखेत साधा कारकुन होता. पण त्याने नोकरी संभाळून अनेक उद्योग उभे केलेले होते. त्याने सिनेमागृहे बांधली, अमिताभला घेऊन चित्रपटाची निर्मिती केली. त्यासाठी त्याने पंचतारांकित हॉटेलात आलिशान पार्ट्या दिल्या. त्यात त्याच्या बॅन्केचे बडे बडे अधिकारी व्यवस्थापकही हजर असायचे. मजा मारायचे. पण त्यापैकी कोणालाही किरीट आचार्य इतका पैसेवाला असून बॅन्केत साधी कारकुनाची नोकरी कशाला करतो, अशी शंका आली नाही. तो राजरोसपणे आपल्या बॅन्केतून खोट्या चेकद्वारे पैसे अन्यत्र फ़िरवित होता आणि त्यातून मस्तपैकी चंगळ करीत होता. बॅन्केच्या व्यवहाराचा व नियमांचा त्याने आपल्या भामटेगिरीसाठी सुनियोजित वापर करून घेतला होता. म्हणून वर्षानुवर्षे त्याची दरोडेखोरी चालू राहिली. कामाच्या जागी सर्व सहकारी कर्मचारी त्याच्यावर भलतेच खुश होते. कारण तो त्यांच्या कामातही मदत कराय़चा आणि वेळप्रसंगी त्यांच्या अडचणीला पैशाचीही सढळहस्ते द्यायचा. आपल्या चोरीत त्याने कुठली चुक केली नाही. पण भलत्याच कुणाच्या मुर्ख हव्यासापायी आचार्य पकडला गेला आणि तो घोटाळा उघडकीस आला. तेव्हा सीबीआयलाही ते मोठे कारस्थान वाटलेले होते. पण कुठलेही कारस्थान नव्हते. व्यवहारातील हलगर्जीपणाचा लाभ उठवून आचार्यने त्या काळात कोट्यवधी रुपये पळवले होते. कसे?

तेव्हा आजच्यासारखी आधुनिक बॅन्क व्यवस्था आलेली नव्हती, की फ़ोन वा इंटरनेट सुविधा सुरू झालेली नव्हती. बॅन्केत तुम्ही आपल्या खात्यात चेक जमा केल्यावर तो ज्याने दिला, त्याच्या बॅन्केत पाठवला जायचा आणि तिथून दुजोरा मिळाला, मगच तुमच्या खात्यात तितके पैसे जमा व्हायचे. पण यात एक अशी प्रथा होती, की चेक पाठवून चार दिवस उलट्यानंतरही पलिकडल्या बॅन्केने चेकविषयी शंका घेतली नाही वा प्रश्न विचारले नाहीत, तर दुजोरा असल्याचे गृहीत धरून पैसे तुमच्या खात्यात जमा व्हायचे. अशा दोन वेगळ्या बॅन्कांच्या शाखांमधून इकडेतिकडे गेलेल्या पैशाचा ताळेबंद कित्येक महिने वर्षे तपासून बघितला जात नसतो. आचार्यने त्याच प्रथेचा लाभ उठवला होता. जिथे तो काम करायचा तिथल्याच त्याच्या खात्याचा चेक तो अन्यत्र एका बॅन्केत जमा करायचा आणि तो याच्या शाखेत दुजोरा मिळण्यासाठी आला, मग गायब करून टाकायचा. त्यासाठी चेकची नेआण करणार्‍या शिपायाला त्याने विश्वासात घेतलेले होते आणि ते काम त्याच्या शाखेत करणार्‍याचे काम अंगावर घेऊन मदत करण्याच्या वेळी नेमका आचार्य हजर असायचा. क्लिअरन्ससाठी आलेला चेक तो परस्पर नष्ट करून टाकायचा आणि चार दिवस उलटले, मग त्या दुसर्‍या बॅन्केत त्याच्या खात्यातले पैसे जमा झाल्याचे गृहीत धरून जमा दाखवली जायची. तिथून ती रक्कम आचार्य काढून घ्यायचा. अशा बाबतीत दक्षता अधिकारी शंका काढण्याची शक्यता असल्याने त्यालाही आचार्यने विश्वासात घेऊन टक्केवारी दिलेली होती. हे कित्येक वर्षे बिनबोभाट चाललेले होते आणि कोणाला त्याचा थांग लागलेला नव्हता. या सेवेसाठी त्याने चेकची नेआण करणार्‍या शिपायालाही नवीकोरी मारुती कार भेट दिलेली होती. गडबड तेव्हा झाली जेव्हा दक्षता अधिकार्‍याला हाव सुटली आणि त्याने तोच प्रयोग अन्य एका बॅन्क कारकुनाला करायला भाग पाडले.

हा नवा भामटा बनेल नव्हता आणि त्याला ते काम जमले नाही. त्याने केलेला घोटाळा उघड झाल्यावर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आणि एकामागून एक स्फ़ोट सुरू झाले. त्या नवख्याने दोन थपडा बसताच दक्षता अधिकार्‍याचे नाव सांगितले आणि त्याला पोलिसांनी इंगा दाखवला, तेव्हा त्यानेही किरीट आचार्यचे व्यवहार सांगून टाकले. त्याचा शोध घेतला असता, त्या काळात तीनचार कोटी रुपयांची अफ़रातफ़र झाल्याचे लक्षात आले. प्रत्यक्ष किरीटला सीबीआयने ताब्यात घेतले, तेव्हा त्याला थप्पड मारायलाही त्यांना भिती वाटत होती. कारण तितकाच दुवा त्यांच्या हाती होता आणि मारहाणीत त्याला मोठी इजा झाल्यास, अन्य साथीदारांची माहिती हुकण्याची चिंता त्यांना होती. सहाजिकच किरीटच्या कलाने त्याच्याकडून माहिती मिळवण्याचे काम सुरू झाले. हे कारस्थान कोणाचे? त्यातले भागिदार कोण आहेत? कोण कोण बडे लोक त्यात किरीटच्या पाठीशी उभे आहेत, अशी प्रश्नांची सरबत्ती झाली. त्यावर किरीटने दिलेले उत्तर मोठे मजेशीर होते. आपल्या पाठीशी सगळी बॅन्कच उभी असून समोर बॉलीवुड असल्याचे त्याने सांगितले. तोवर त्याने उचललेल्या पैशातून उद्योग उभे केले होते आणि त्याची उलाढाल बारातेरा कोटीपर्यंत गेली होती. त्याचा बचाव साधासरळ होता. आपण अनधिकृत कर्ज घेतले आहे आणि सर्व रक्कम व्याजासकट परत करायला तयार आहोत. तितक्या पैशातून तीनचार कोटी व्याजासह परत करणे त्याला अवघडही नव्हते. पण त्यात त्याच्या बॅन्केचे बडे अनेक अधिकारी भरडले गेले. कारण शाखेतला एक साधा कारकुन अशी पंचतारांकित चैन मौज करत असतानाही त्याच्या आर्थिक व्यवहाराविषयी त्यांना शंका आली नाही, हाच दोष मानला गेला होता. आज नीरव मोदी वा विजय मल्ल्याच्या भानगडी ऐकल्या व बघितल्या, मग किरीटने पेरलेल्या बीजातून किती मोठे वृक्ष वाढले त्याचा अंदाज येतो.

तेव्हा किरीट आचार्य याच्या भानगडीत वा अफ़रतफ़रीमध्ये कोणी बडे अधिकारी सहभागी नव्हते. पण नंतरच्या काळात अशा गोष्टी वाचून राजकारणी व अधिकार्‍यांनाही सरकारी बॅन्का ही अलिबाबाची गुहा असल्याचा साक्षात्कार झालेला असू शकतो. त्या गुहेचे दार उघडण्याचा मंत्र, नियम व कायद्याचा घोटाळा करून मिळवता येतो, असा तो साक्षात्कार असावा. अन्यथा मल्ल्या, नीरव मोदी असे लोक या अलिबाबाच्या गुहेतून इतकी संपत्ती अशा सहजपणे कशाला लुटू शकले असते? आधी राजकीय आशीर्वादाने वा भागिदारीने काही कोटींचे कर्ज मिळवायचे. त्यात त्यांना हिस्सा द्यायचा आणि मग तेच कर्ज फ़ेडता येत नाही म्हणून त्याची फ़ेरमांडणी मागायची. ती फ़ेरमांडणी म्हणजे बुडीत कर्ज वाचवण्यासाठी बॅन्केने आणखी मोठी रक्कम कर्ज दिले, असे दाखवून जुने वसुल झाल्याचा देखावा उभा करायचा. हेच वर्षानुवषे चालत राहिले आहे. किरीट आचार्यने आपल्या कौशल्याने व लबाडीने बॅन्केला गंडा घातला होता. शिपाई व सामान्य अधिकार्‍यांना हाताशी धरून चोरी केलेली होती. मल्ल्या व नीरव यांनी मंत्र्यांना व राजकारण्यांसह बॅन्केलाच विश्वासात घेऊन बुडवेगिरी केली आहे. यात मनमोहन सिंग यांना मल्ल्याने पाठवलेले फ़ेरमांडणीच्या आभाराचे पत्रही समोर आलेले आहे आणि नीरव प्रकरणी प्रश्न विचारताच चिदंबरम कॅमेरा समोरून पळ काढताना दिसत आहेत. किरीट आचार्यला असे गॉडफ़ादर तेव्हा मिळाले असते, तर त्याने मल्ल्या वा नीरव यांनी लुटण्यासाठी बॅन्का शिल्लकही ठेवल्या नसत्या. या विषयात मोदी सरकारने सर्व बॅन्कांना हिशोब देण्याचा व बुडीत कर्जची खाती जाहिर करण्याचा झक्कू लावला नसता, तर नीरव प्रकरण कशाला चव्हाट्यावर आले असते? पण कॉग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला मात्र मोदी सरकारला जाब विचारत आहेत. त्यांचे शब्द ऐकले, मग एका हिंदी उक्तीचा अर्थ प्रथमच लक्षात येतो, उलटा चोर कोतवाल को डाटे!

2 comments:

  1. यानिमित्ताने भाऊ सामाजिक नीतिमत्ता याविषयी चर्चा होणे गरजेचे आहे.घसरलेल्या नीतिमत्तेला, ज्या पद्धतीची लोकशाही आपण अंगिकारलेली आहे,ती कितपत जबाबदार आहे याचा विचार व्हायला हवा.हा विषय सर्वांनीच गांभीर्याने घ्यायला हवा.

    ReplyDelete