Thursday, February 22, 2018

राजा चुक-चुकला

baroda sammelan के लिए इमेज परिणाम

मागल्या पाव शतकात मराठी साहित्य संमेलनाच्या सोहळ्याने मायमराठीचे किती कोटकल्याण केले, हा संशोधनाचा विषय आहे. खरे तर जे बुद्धीमंत गणेशोत्सव वा तत्सम इतर सोहळ्यांविषयी प्रतिवर्षी अगत्याने नाके मुरडत असतात, त्यांनी तितक्याच उत्साहात साहित्य संमेलनाची कारणमिमांसा करणे अगत्याचे आहे. पण ती तसदी कोणी घेत नाही. कारण गुणात्मक पातळीवर गणेशोत्सवातला धिंगाणा आणि संमेलनातील भपका, यात कुठलाही फ़रक उरलेला नाही. तो एक सोपस्कार होऊन गेला असून हेतूशून्य उपचार इतकेच त्याला स्वरूप आलेले आहे. त्यात कुठल्या चर्चा झाल्या किंवा काय महत्वाचे विचारमंथन झाले, त्यातले काही कानावर येत नाही. पण नसते वाद किती झाले, त्याची गणती अगणित असते. आधी संमेलनाचा अध्यक्ष निवडण्यावरून रुसवेफ़ुगवे होतात आणि नंतर संमेलनाध्यक्ष काहीतरी बोलून आणखी धुरळा उडवतात. एकदा तो धुरळा खाली बसला, मग पुढल्या वर्षीपर्यंत कुणाला मराठी भाषा वा साहित्याची अजिबात फ़िकीर नसते. लाखोचे सरकारी अनुदान व यजमान संस्थांनी जमा केलेल्या पैशाची मेजवानी झोडताना, राजकारण्यांना चार शब्द खडेबोल म्हणून ऐकवले, की साहित्यिकांचे घोडे गंगेत न्हाले म्हणून समजायचे. हा आता खाक्या होऊन गेला आहे. गतवर्षी तेच झाले आणि याहीवर्षी अध्यक्षांनी ‘राजा तू चुकलास’ असे भाषणात सांगून परंपरा कायम राखली आहे. अर्थात याचा आरंभ पावशतकापुर्वी झाला. तोपर्यंत संमेलनाला तुटपुंजे सरकारी अनुदान मिळत असे. तेव्हा युतीचे शासन होते आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याने सेनापमुखांनी एकरकमी २५ लाख अनुदान देण्याचा पवित्रा घेतला. तर सर्वात आधी त्यांच्यावरच चिखलफ़ेक करण्यापासून धुमाकुळ सुरू झाला. तीच परंपरा आजतागायत साग्रसंगीत चालू आहे. तेव्हा सरकारी अनुदान नको म्हणून फ़ुशारक्या मारण्यात आल्या. पण पुढे शेपूट घातली गेली.

मुद्दा असा, की राज्यकर्ते आणि साहित्यिक यांच्यात वितुष्ट असलेच पाहिजे असे कोणी ठरवले आहे? कशासाठी कलाकार वा सृजनशील वर्गाने सत्तेचा शत्रू म्हणूनच काम केले पाहिजे? सत्तेच्या विरोधात दोनचार सणसणित शिव्या हासडल्या, मगच कुणाच्या सृजनाला नवी पालवी फ़ुटते, असा काही निसर्गनियम आहे काय? कला वा सृजनाला सत्तेने कधी व कोणती आडकाठी केली असेल, तर गोष्ट वेगळी. पण इथे एक चुकीचे गृहीत मांडले गेले आहे. राजा तू चुकलास असे म्हणता आले, तरच तुम्ही सृजनशील असता, असा नवा दंडक घालण्यात आला आहे. सत्ता वा राज्यकर्ता अन्यायी असतो वा सृजनाचा शत्रूच असतो, हे त्यामागचे गृहीत आहे. त्यामुळेच यात तथ्य असण्याची गरज राहिली नाही. मागल्या पानावरून पुढे चालू, या उक्तीनुसार प्रत्येक वर्षी अनुदान घेऊन राज्यकर्त्यांना शिव्याशाप देणे, हा एक परिपाठच होऊन गेला आहे. त्याला कुठलेही निमीत्त लागत नाही की कारण असावे लागत नाही. आताही यावर्षीच्या संमेलनात लक्ष्मीकांत देशमुख यांनी त्याची पुनरुक्ती केलेली आहे. राजा तू चुकतो आहेस आणि राजाने सुधारायला हवे, अशी शेलकी विधाने आपल्या भाषणात केली आणि तितकीच पकडून माध्यमात खळखळाट सुरू झाला. यात आता काही नवे राहिलेले नाही. मग त्यात दिल्लीजनिकच्या दादरी गावात जमावाकडून मारला गेलेला अखलाख वा तत्सम काही गोष्टींना नव्याने फ़ोडणी दिली जाते आणि बाकी शिळाच माल पुढे सरकवला जात असतो. आजचा जो कॊणी राजा वा राज्यकर्ता आहे, तो सत्तेत येण्यापुर्वीचा कोणी राजा चुकत नव्हता काय? चुकत असेल, तर त्याला खडेबोल ऐकवण्याची कोणाची हिंमत कशाला झालेली नव्हती? झालीच नसेल, तर त्यांना सृजनशील साहित्यिक म्हणून अपात्र ठरवायचे काय? इत्यादीचा उहापोह आजच्या अध्यक्षांना करता आला नसेल, तर त्यांची सर्व बाष्कळ बडबड म्हणावी लागेल.

असली भाषा व शब्द वापरणार्‍यांची कींव करावी असे वाटते. कारण अविष्कार स्वातंत्र्य कायद्याने वा राज्यघटनेने दिले म्हणून हे लोक इतक्या फ़ुशारक्या मारतात. पण ते नसते तर यापैकी किती लोकांची असली मुक्ताफ़ळे उधळण्याची हिंमत झाली असती? यापैकी कितीजण सत्ताकृपेसाठी लाचार व आशाळभूत असतात, ते जनता नित्यनेमाने अनुभवत असते. विविध पदव्या, सन्मान वा पुरस्कार मिळण्यासाठी आपणच धावपळ करणारे जेव्हा अशी भाषा बोलतात, तेव्हा सामान्य माणसांना त्यांची कींव येणे स्वाभाविक आहे. स्वातंत्र्याची भूक असलेले कोणी उद्धारकर्त्याच्या प्रतिक्षेत नसतात. कुणाच्या वळचणीला बसत नाहीत. आणिबाणीच्या काळात कराड संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून बोलताना, दुर्गाबाई भागवत यांनी परिणामांची पर्वा केल्याशिवाय राजा शेजारी मंचावर बसला असतानाही, तो चुकत असल्याचे ठणकावुन सांगण्याचे धाडस केले होते. संमेलन संपताच त्याची किंमतही मोजली होती. बहुधा संमेलनाच्या अध्यक्षाला अटक होण्याची ती इतिहासातील पहिलीच घटना होती.  लिहीलेल्या व उच्चारलेल्या शब्दावर ज्यांचा विश्वास असतो, ते राजा चुकत असल्यास केव्हाही सांगायला बिचकत नाहीत. त्यांना कोणी त्यासाठी आग्रह धरण्याची गरज नसते. आताचे अध्यक्ष तितके शब्दाला बांधील नसतात. म्हणून ते केविलवाणे वाटतात. दुसरी गोष्ट दुर्गाबाई जेव्हा असे बोलल्या, तेव्हा खरोखरच स्वातंत्र्याची गळचेपी झालेली होती. जितक्या सहजपणे देशमुख व्यासपीठावरून हे वाक्य बोलले, तितक्या सहजपणे तेव्हा असे काही खाजगीत बोलण्याची कुणा संपादकाची हिंमत नव्हती, किंवा तथाकथित स्वातंत्र्यवीराची बिशाद नव्हती. आज राजा आपल्याला हात लावू शकत नसल्याची हमी असल्यावर दमदाटीचा आव आणण्यात कसला पुरूषार्थ आहे? खरेच असे बोलायचे असेल, तर फ़ार काही लागत नाही. प्रामाणिकपणाची शेंडी हवी आणि तिची गाठ सोडण्याचे धारिष्ट्य हवे.

धनानंद नावाचा राजा मगधाचे राज्य चालवित होता, तेव्हा त्याच्या मस्तवालपणाला नजरेस आणून देण्याची कुणा शहाण्याची बिशाद नव्हती,. अशावेळी चाणक्य नावाचा कोणी त्याच्या दरबारात गेला आणि त्याची अनाचारी सत्ता उलथून पाडण्याचा निर्धार करून बाहेर पडल्याची कहाणी भारताने अनेक पिढ्या ऐकलेली आहे. तो नुसताच शिव्याशाप देऊन थांबला नाही. धनानंदाला सत्ताभ्रष्ट करून पुन्हा न्यायाचे व सौहार्दाचे राज्य उभे करण्याचा संकल्प त्याने सोडला होता. जोवर ते इप्सित साध्य होणार नाही, तोपर्यंत शेंडीला गाठ मारणार नाही, असा निर्धार त्याने व्यक्त केला व तो पुर्णत्वास नेला. तेव्हा राजा चुकला बोलण्यासाठी किती धाडस हवे आणि किती निर्धार आवश्यक आहे, त्याचे माप कळू शकते. चाणक्याच्या काळापेक्षा आज तुम्ही खुप सुस्थितीत आहात. त्याला कुठल्या राज्यघटनेने स्वातंत्र्य दिलेले नव्हते, की अधिकार दिलेले नव्हते. आपल्या बुद्धी व विद्वत्तेचे अधिकार त्याला पुरेसे वाटले होते आणि खरोखरच तितके बळ पुरेसे असते. त्याला केवळ प्रामाणिकपणाची जोड असावी लागते. आजच्या काळातल्या बुद्धीमंतांसाठी तितक्याच वस्तुचा दुष्काळ आहे. सवलतीच्या बळावर सामाजिक व राजकीय उलथापालथ घडवण्याचे उत्तुंग मनसुबे म्हणूनच फ़ुसके ठरतात. आज राजा आहे, त्याला सत्तेच्या खुर्चीवर बसण्याच्या आधीपासूनच तो चुकीचा असल्याचे सांगितले जात होते आणि मागल्या पावणेचार वर्षात दुसरे काहीही सांगितले गेलेले नाही. पण ते सांगताना कुणाला प्रामाणिकपणाच्या शेंडीला गाठ मारण्याची हिंमत झालेली नाही. कोणी चंद्रगुप्त शोधता वा उभा करता आलेला नाही. त्याच राजाला वेसण घालणार्‍या राज्यघटना व कायद्याचे दोर पकडून इशारे देण्यापलिकडे कोणाची झेप जाऊ शकलेली नाही. राजा चुकत असेलही. पण त्यासाठी राजा काहीतरी करतोय. तुम्ही काहीच करत नसाल तर चुकणार तरी कसे राव? म्हणून नुसते चुक-चुकणे चाललेले आहे.

6 comments:

  1. भाऊ नेहमी प्रमाणे सणसणीत लेख. महामुलाखतीबद्दल वाचण्यास उत्सुक आहोत. तेव्हढा दोन तास वेळ काढच अशी नम्र विंनती. खणत्या राजांच्या सम्पूर्ण कारकिर्दीचे तुम्ही अवलोकन केले आहेच. त्यामुळे तुमचा त्यावर लेख हा हवाच.

    ReplyDelete
  2. राजापाशी अनुदानासासाठी कटोरा घेऊन जावा आणि अनुदान मिळाल्यावर त्या राजावरच ' दुगाण्या ' झाडा...........!! हा तर निव्वळ ' कृतगन्हपणाच ' ...............बाळासाहेबांनी याचे समर्पक वर्णन केले होते. साहित्य संमेलन म्हणजे निव्वळ बैलांचा बाजारच असतो आणि बैलांनी त्यांची किंमत स्वतः ठरवायची नसते तर ' बैल ' विकणाऱ्या आणि विकत घेणार्यांनी ठरवायची असते. हे असे ' पैशाला पासरी ' साहित्यिक पोत्याने उपलब्ध आहेत. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवडणूक आणि या निवडणुकीतील मतदार हे एक मोठे ' गूढ ' प्रकरणच आहे. यावर संशोधन व्हावयास हवे. प्रस्तुत मतदार यादीतील अनेक मतदार साहित्यिक यापूर्वीच निवर्तले असून मतदार याद्या ' अद्ययावत 'च झालेल्या नाहीत.वेगवेगळ्या राज्यात पसरलेले हे मतदार आणि त्यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्षांकडून मिळणारी मदत याबद्दल कोणी बोलतच नाही. ...........वर निवडून आल्यावर छाती पुढे काढून काय तर ' राजा ..........तू चुकलास '.........वा रे व्वा..........!! गड्या तूच फकस्त एकदम ' बरोबर '.....!!

    ReplyDelete
  3. फक्त राजाने चुकायच नाय ...बाकि साहित्यिक ..कलाकार ..बुध्दीजीवीनी देश बुडविला तरी चालेल ...

    ReplyDelete
  4. याच अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा वापर करून चार वर्षापूर्वीच्या सरकारांवर दुगाण्या झाडल्याचं स्मरत नाही.. का तेव्हाचा राजा 'जाणता' म्हणून मूग गिळणं पसंत केलं गेलं? 'श्री' (पाल) आणि 'लक्ष्मी'(कांत)चा परिणाम, सरस्वतीला सत्तेच्या दावणीला उभं केलं जातंय याहून मोठं दुर्दैव काय असावं?

    ReplyDelete
  5. पूर्वीच्या सरकारच्या काळात साहित्यिकांसाठी ' रमणा ' भरविला जात असे. ' रमणा ' हा पेशवाईतील एक खास समारंभ होता. राजे खुश झाले कि एखाद्याला गळ्यातली मोत्याचीच माळ दे , कोणाला अंगठी दे वगैरे वगैरे करत असत. आताचे जाणते राजे असेच लाचार साहित्यिकांना शोधून मग ' उपकृत ' करत असत.एकदा उपकृत झाला कि मग काय तो उर्वरित आयुष्यभर राजाच्या फक्त ' आरत्याच ' ओवाळायचा. अशा वर्गवारीसाठी निगरगट्ट आणि बेतास बात साहित्यिक शोधले जातात. मग काय एक वर्षभर ' मज्जाच मज्जा '

    ReplyDelete