Thursday, February 8, 2018

कोण गुलाम, कोण आझाद?

ghulam nabi azad cartoon के लिए इमेज परिणाम

अर्थसंकल्प आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना राज्यसभेतील विरोधी नेते आणि कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी एक गंभीर आरोप मोदी सरकारवर केला. मोदी सरकारच्या सर्व योजना जुन्याच आहेत. त्यात गेमचेंजर असे काहीच नसून केवळ नेमचेंजर म्हणजे नाव बदलून जुन्याच योजना लोकांसमोर आणल्या आहेत, असा आझाद यांचा दावा आहे. तो खरा मानायचा, तर मग राहुल गांधी यांच्या विद्वत्तेचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण होतो. कारण आझाद ज्या योजना आपल्या म्हणजे युपीए कॉग्रेस सरकारच्या आहेत असे छाती पिटून सांगत आहेत, त्याच नाव बदललेल्या जनताविरोधी असल्याचा दावा राहुलनी केलेला आहे. याच अर्थसंकल्पावर भाष्य करताना राहुलनी मोदींच्या योजना जनताविरोधी म्हटलेले आहे. त्याच्याशी आझाद यांचा दावा जोडला, तर मोदींनी काहीही जनताविरोधी केलेले नसून, मुळातच कॉग्रेसने जनताविरोधी योजना आखल्या असा अर्थ निघतो. मग योजनेसाठी मोदींना गुन्हेगार मानता येत नाही. त्यांनी फ़क्त नाव बदलले आहे. बाकीची जनताविरोधी पापे कॉग्रेसचीच ठरतात ना? आझाद किंवा राहुलसह अन्य कॉग्रेस नेत्यांनी निदान एकत्र बसून निर्णय घ्यावा, की आपण जनताविरोधी योजना कशाला आखल्या? कारण मोदींवर नाव बदलल्याचा आरोप लागू होत असेल, तर त्या योजनेमुळे जनतेचे जे नुकसान झाले आहे, त्याचे श्रेय तर कॉग्रेसकडेच जाते ना? मग मोदींच्या नावाने शंख करताना पापाचे धनी कॉग्रेसने व्हायचे काय? नसेल तर निदान नव्या घातक योजना मोदींच्याच अ़सल्याचा दावा आझाद यांना करावा लागेल. किंवा योजना जनकल्याणाच्या असतील तर त्या योजना मोदींनी नाव बदलले असले तरी जनहिताच्या असल्याचे राहुलना कबुल करावे लागेल. यातला कोण खोटा बोलतोय आणि कोण खरे सांगतोय, ते सामान्य मतदारानेच ठरवावे.

सत्ता गमावून चार वर्षे होत आली, तरी कॉग्रेसचे नेते अजून आपली अशी स्थिती कशामुळे झाली, त्याचा अंदाजही बांधू शकलेले नाहीत. याचा यापेक्षा मोठा कोणता पुरावा देण्याची गरज आहे काय? राज्यसभेतील नेता आझाद आणि पक्षाध्यक्ष राहुल गांधी सतत एकमेकांना भेटत असतील व बैठका घेतात तेव्हा काहीतरी भूमिका ठरवून घेत असतील, असे गृहीत धरावे लागते. तसे असते तर संसदेत अर्थसंकल्पावर कोणी काय बोलावे आणि त्यात परस्परविरोधी मतप्रदर्शन होऊ नये, याची काळजी नक्की घेतली गेली असती. पण तसे घडताना एकदाही दिसलेले नाही. सत्ता गमावल्याच्या दु:खातून कॉग्रेस अध्यक्षांसह तमाम नेते अजून बाहेर पडलेले नाहीत. त्याचीच प्रचिती सातत्याने येत असते. हा इतर कुणा विरोधकाचा दावा नाही, ते एका ज्येष्ठ अनुभवी कॉग्रेस नेत्याचेच निरिक्षण आहे. युपीएचे राज्यमंत्री म्हणून काम केलेले व कधीकाळी राहुलना भाषणे लिहून देणारे जयराम रमेश, यांनी काही महिन्यांपुर्वीच ते निरिक्षण जाहिरपणे सांगितले होते. साम्राज्य गमावलेले सम्राट, अशा शब्दात रमेश यांनी कॉग्रेस नेत्यांची संभावना केलेली होती आणि त्या अवस्थेतून कोणी कॉग्रेस नेता बाहेर पडू धजलेला नाही. मोदी म्हणाले त्याप्रमाणे भाजपा वा मोदी सत्तेत येऊन बसलेत, हे वास्तव मान्य करायलाच कॉग्रेसी बुद्धी अजून राजी झालेली नाही. हीच त्या पक्षाची खरी समस्या आहे आणि ती सोडवायची हिंमत त्यापैकी कोणापाशी उरलेली नाही. त्यातून अशा गफ़लती होत असतात. त्याचाच फ़ायदा उठवून धुर्त मोदी इथपर्यंत मजल मारून आलेले आहेत. आपल्याभोवती भाट व भुंकणार्‍या कुत्र्यांचा मेळावा भरवला, म्हणून कोणी पराक्रमी पुरूष होत नसतो. याचा दाखला राहुल सातत्याने देत असतात आणि राज्यसभेत त्याचाच अनुभव सदस्यांना आला. कॉग्रेसने राज्यसभेत किती हास्यास्पद लोक भरती केलेत, त्याचा हा पुरावा आहे.

राष्ट्रपती अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर बोलायला पंतप्रधान एकाच दिवशी लोकसभा व राज्यसभेत उभे राहिले आणि त्यांनी एक तासाहून अधिक काळ दोन्हीकडे भाषणे देत कॉग्रेस सत्तेचे व पक्षाचे वाभाडे काढले. त्यापैकी लोकसभेत अखंड त्यांच्या भाषणात व्यत्यय आणला जात होता आणि अशा दंगेखोरंना रोखण्याचा सभापती सुमित्रा महाजन यांनी नादच सोडून दिला. पण राज्यसभेत गोष्ट वेगळी होती. आपल्या अधिकाराचा पुरेपुर उपयोग करणार्‍या सभाध्यक्ष व्यंकय्या नायडू काटेकोर राहिले आणि सभागृहात शांतता नांदण्याची काळजी घेतली. काही सदस्यांना त्यांनी शिस्त तोडल्यास कारवाईचा इशाराही दिला होता. तरीही एका प्रसंगी रेणुका चौधरी नावाच्या कॉग्रेस महिला सदस्या पंतप्रधानांच्या भाषणा दरम्यान खिदळल्यासारख्या गडगडा हसू लागल्या. त्यांच्या त्या ‘विकट हास्याने’ मोदी अजिबात विचलीत झाले नाहीत. कारण त्यांना लोकसभेपेक्षा राज्यसभेत शांततापुर्ण वातावरण मिळाले होते. म्हणूनच रेणुकांच्या बालीश हास्याला व्यंकय्याजी रोखू बघत असताना, मोदींनी असा जबर शालजोडीतला टोमणा मारला की या महिलेची दातखिळी बसली. मोदी सभाध्यक्षांना म्हणाले, असू दे अध्यक्ष महोदय. त्यांना हसू देत. रामायण मालिका संपुष्टात आल्यापासून असे हास्य कधी कानी पडलेले नव्हते. मोदींचा रोख सरळसरळ रेणुका चौधरींकडे होता आणि त्यांचे विकट हास्य म्हणजे रामायणातील राक्षसी शुर्पणखाचे हास्य असल्याचा अर्थ त्यातून निघत होता. म्हणजेच थप्पड मारूनही मोदी शब्दात अडकले नव्हते. पुढल्या भाषणा दरम्यान रेणुका चौधरी यांची बोलती बंद होऊन गेली होती. उनाड प्रतिक्रीया देऊन राहुल सोनियांना खुश करण्यापलिकडे यांचे कर्तृत्व काय? त्यांना राज्यसभेत कुठल्या गुणवत्तेसाठी आणून बसवण्यात आलेले आहे? पक्षासाठी त्यांचे योगदान किती? खुशमस्करेगिरी ही पक्षात गुणवत्ता ठरवली गेल्याचे दुष्परिणाम कॉग्रेस आज भोगते आहे.

तेच एक सत्य आहे. कॉग्रेसला मोदींनी पराभूत केले वा मोदींनी निवडणूका जिंकल्या, हे अर्धसत्य आहे. वास्तवात कॉग्रेस आपल्या अशा कर्माने पराभूत झालेली आहे. असल्या पोरकटपणाला लोकांनी सत्ताभ्रष्ट केलेले आहे. आपण काय बोलत आहोत आणि काय दिवे लावत आहोत, याचे किंचीतही भान नसलेले नेते, हा कॉग्रेससाठी असाध्य आजार झालेला आहे. नेत्यांची फ़ळी दुबळी आहेच. पण ज्यांना आवर घालता येत नाही असा तोंडाळ बेताल कळपच राहुलनी आपल्या भोवताली गोळा करून ठेवलेला आहे. रेणुका चौधरी हे त्याचे जळजळीत उदाहरण आहे. जयराम रमेश यांच्यासारखा कुशल व बुद्धीमान नेता समोर बसलेला होता आणि मोदींनी अगत्याने त्यांचा उल्लेखही आपल्या भाषणात केला. त्यांच्यासारखा माणूस मोजूनमापून बोलतो. चौधरी यांच्यासारखे नुसतेच अक्कल पाजळणारे कॉग्रेसचे प्रवक्ते म्हणून पुढे आणल्यावर आपलेच दात पाडून घेतले गेल्यास नवल कुठले? तुमच्या असल्या बालीश व बेतालपणाचाच लाभ उठावित मोदी इथपर्यंत पोहोचलेत. तुमचा मुर्खपणा हेच मोदींचे बलस्थान झालेले असेल, तर बदल तुमच्यात होण्याची गरज आहे. त्या दिशेने वाटचाल होण्यापेक्षा रेणुकाबाई आपलेच ‘नाक कापून’ घ्यायला आगावूपणा करीत असतील, तर त्यांच्या पक्षाचे काय भवितव्य असेल? मग गुलाम कोण आणि आझाद कोण, अशी तारांबळ उडण्याला पर्याय उरत नाही. कोण खरा आणि कोण खोटा असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात निर्माण होणारच. त्याची किंमत मतातून मोजावी लागत असते. अर्थात राहुलना हे समजणे अशक्य आहे आणि त्यांच्याच हाती कॉग्रेसची सुत्रे गेलेली असल्याने, त्यातला गुलाम कोण आणि आझाद कोण त्याचाच शोध घेण्यासाठी कित्येक वर्षे जाणार आहेत. त्यातून पक्ष म्हणून कॉग्रेस किती शिल्लक राहिल या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे. ज्याचे त्याने शोधावे.

6 comments:

  1. rahulch mukhya dosh jababdari na ghene ha ahe,sarw kahi alagad wa aayate milawe watte, congress madhye te jamate pan deshala asa gulacha ganapati nakoy

    ReplyDelete
  2. कोण गुलाम, कोण आझाद?

    शिर्शक छान अाहे.

    ReplyDelete
  3. राहुल गांधी हिच काँग्रेसची समस्या आहे.

    ReplyDelete
  4. सर, जबरदस्त विश्लेषण. हारजित चालू असते. पण टोकाचा विरोध नसावा. कोण बोलत आहे, काय बोलत आहे आणि आपण वर्गातील उनाडा प्रमाणे वर्तन करणे चुक आहे. पण जो अध्यक्ष आपल्या पंतप्रधानाची ठेवत नाही. त्याचे लोक दुसरयाची काय राखणार. पण मतदार राजा पहात असतो तो बोलत नाही करून दाखवतो.

    ReplyDelete
  5. राहुल गांधी यांच्या विद्वत्तेचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण होतो.
    Rahul Gandhi have very low IQ

    ReplyDelete
  6. सर्व नेते कांग्रेस चमको गिरी अनि चमचे गिरी करत आहेत

    ReplyDelete