
राहुल गांधी जेव्हा केव्हा वाहिन्यांच्या कॅमेरासमोर येतात, तेव्हा ते कुठल्याही पत्रकाराच्या प्रश्नाची उत्तरे देत नाहीत. उलट मोदी वा सरकारला तीन प्रश्न विचारत असतात. त्यांचे तीन प्रश्न कधीच कायम नसतात. रोजच्या तीन प्रश्नांमध्ये एकदोन प्रश्न बदलत असतात, किंवा आधीचेच प्रश्न नव्याने विचारत असतात. त्यांचा दावा असा आहे, की इतके प्रश्न विचारूनही प्रधानमंत्री कधीच त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत नाहीत. अर्थात मोदी कधी पत्रकार परिषद घेत नाहीत वा माध्यमांना सहसा मुलाखती देत नाहीत. त्यामुळे प्रश्नांची उत्तरे देणे ही मोदींची सवय नाही. किंवा कुवतही नसेल कदाचित. पण नित्यनेमाने इतरांना प्रश्न विचारणार्या राहुल गांधींमध्ये प्रश्नांची उत्तरे देण्याची हिंमत कितपत आहे? इतरांना प्रश्न विचारताना आपल्यालाही तितक्याच तत्परतेने इतरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता आली पाहिजेत ना? राहुल जे प्रश्न मोदींना विचारतात, त्याची माहिती सरकारच्या विविध खात्यातून गोळा करून द्यावी लागेल. ती सोपी नसून अतिशय गुंतागुंतीचे विषय आहेत. पण डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुलना मागली कित्येक वर्षे मोजकेच प्रश्न विचारलेले आहेत, त्यापैकी एकाचेही उत्तर देण्याची हिंमत राहुल वा त्यांच्या मातोश्रींनी दाखवलेली नाही. जेव्हा स्वामी कोर्टात पोहोचले आणि न्यायालयानेच या मायलेकरांना प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी फ़र्मावले, तेव्हा तर दोघे उत्तरे मागू नयेत म्हणून थेट हायकोर्ट सुप्रिम कोर्टापर्यंत धावले होते. फ़ार मोठा तमाशाही त्यांनी उभा केला होता आणि आपल्याला सूडबुद्धीने वा्गवले जात असल्याचा कांगावाही केलेला होता. मोदींना सवाल विचारणार्या राहुलना आपल्या व्यक्तीगत खर्चाविषयी उत्तर देण्याची इतकी भिती कशाला वाटत असते? सगळीकडे तीन सवालांची पोपटपंची करण्यापेक्षा आपल्याला शक्य असलेल्या साध्या प्रश्नांची उत्तरे देण्याची हिंमत आधी त्यांनी गोळा करायला नको काय?
अर्थात असे म्हटले, की राहुलभक्त वा मोदीत्रस्त म्हणतील, मोदींना राहुलनी जनतेच्या पैशासंबंधात प्रश्न विचारलेले आहेत. जो पैसा जनतेचा आहे त्याच्या विनिमयाचा हिशोब जनतेला मागायचा हक्क असतो आणि म्हणूनच मोदींनी उत्तरे दिली पाहिजेत. मग स्वामींनी राहुलना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तरी कुठे राहुलने घाम गाळून कमावलेल्या पैशाविषयीची आहेत? राहुल आज ज्या कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्याला जनतेने दिलेल्या देणगीच्या रकमेचा जमाखर्च ही खाजगी बाब नाही. तोही जनतेचाच पैसा असून तो गोळा करण्यासाठी करमुक्त म्हणून सवलत घेतलेली असते. करमुक्तीची सवलत घेतलेली रक्कम खाजगी कमाई नाही, की तिच्याबद्दल गोपनीयता बाळगण्याचे कारण नाही. राजकीय पक्षांना सार्वजनिक सेवेसाठी मिळणार्या देणगीविषयी गोपनीयता राखता येते. म्हणजे देणगीदार कोण त्याचे नाव घोषित करण्याची गरज नाही. पण जमलेला पैसा धंदेवाईक कारणासाठी गुंतवून कमाई करता येत नाही. स्वामींनी नेमक्या त्याच विषयातले प्रश्न मागल्या अनेक वर्षापासून उपस्थित केलेले आहेत. अशा पैशातून केलेली गुंतवणूक व्यक्तीगत मालकीच्या कंपनीकडे फ़िरवण्यात आल्याविषयीचे हे प्रश्न आहेत. जी रक्कम करमुक्तीची सवलत घेऊन उभारली, ती कुठल्या सर्वजनिक हितासाठी खर्च झाली, त्याविषयीचा प्रश्न आहे. राहुल कित्येक वर्षे उलटून गेल्यावरही उत्तर देऊ शकलेले नाहीत. आपल्याला घरातल्या व पक्षातल्या उलाढालीवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याची हिंमत नाही आणि इतरांना रोज उठून प्रश्न विचारत फ़िरायचे, ही उनाडकी झाली. मोदी सरकार संरक्षण खरेदी वा लढावू विमानाच्या व्यवहाराची माहिती देत नाही म्हणजे घोटाळा असेल, तर कोर्टाने विचारल्यावरही राहुल सोनिया कॉग्रेसच्या पैशाचा जमाखर्चावर लपवाछपवी करत असतील, तर तोही घोटाळाच असणार ना?
हा इतकाच प्रश्न नाही. असे शेकडो प्रश्न आहेत. गांधी घराणे व त्यांचे आप्तस्वकीय यांनी आजवर सरकारी वा पक्षीय व खाजगी केलेल्या व्यवहाराचे अनेक हिशोब दिलेले नाहीत. त्यविषयी शेकड्यांनी प्रश्न विचारले गेले आहेत. पण त्यापैकी एकाचेही उत्तर देण्याचे उसने अवसानही त्यांना दाखवता आलेले नाही. पण रोजच्या रोज
‘हमारे तीन सवाल है’ असली पोपाटपंची नित्यनेमाने चालू असते. राहुल सोनिया हे कॉग्रेसचे अध्यक्ष व उपाध्यक्ष असताना पक्षाच्या खात्यातून नॅशनल हेराल्ड नामक वर्तमानपत्राच्या पुनरुत्थानासाठी ९० कोटी रुपये कर्ज देण्यात आले. त्या कंपनीचे भागिदार हेच मायलेक असतात. मग त्यांच्या कंपनीला वर्तमानपत्र चालविता आले नाही आणि पैसे बुडीत गेले, म्हणून ती कंपनी एका नव्या कंपनीचा विकली गेली. योगायोगाने ही नवी कंपनीही त्याच मायलेकरांच्या मालकीची असते. म्हणजे राहुल सोनिया मिळून कॉग्रेस पक्षाचे पैसे आपल्याच एका बंद पडलेल्या कंपनीत गुंतवतात आणि ते बुडाले म्हणून नवी कंपनी स्थापन करून जुनी कंपनी विकत घेतात. थोडक्यात पक्षासाठी जमा केलेले पैसे मायलेकरांनी आपल्या खाजगी कंपनीत आणून बुडीत दाखवले आहेत आणि अफ़रातफ़र केलेली आहे. कारण नॅशनल हेराल्डला बुडीत जाण्याचे काही कारण नाही, की कर्जाचीही गरज नव्हती. देशाच्या वेगवेगळ्या महानगरात या वर्तमानपत्राच्या मालकीच्या डझनावारी मालमत्ता असून त्यांची आज बाजारी किंमत दिडदोन हजार कोटी इतकी आहे. पण अशा प्रकारे कागदोपत्री हेराफ़ेरी करून मायलेकरांनी ती हजारो कोटींची मालमत्ता पक्षाच्या पैशातून आपल्या खाजगी मालकीची करून घेतली आहे. ह्या सर्व हेराफ़ेरीविषयीच स्वामी यांनी मागल्या दहाबारा वर्षापासून प्रश्न विचारले होते. पण त्याचे उत्तर राहुल सोनियांनी दिले नाही की सरकारी दफ़्तरातून कायदेशीर मार्गाने मिळू शकणार्या उत्तरांनाही मज्जाव केलेला होता.
अमित शहांच्या जय नावाच्या सुपुत्राने कुठले व्यवहार व्यापार केले आणि त्यात कितीची उलाढाल झाली? त्यात अल्पावधीत किती लाभ झाला व त्याची संपत्ती किती महिन्यात वर्षात कितीपटीने वाढली,? असली माहिती शोधून प्रसिद्ध करणार्या कुणाही परखड सडेतोड व नि:पक्षपाती स्वतंत्र बाण्याच्या संपादक पत्रकारांना स्वामींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल घ्यावीशी वाटत नाही. त्यांना लोया वा इशरत जहानच्या मृत्यूने झोप लागत नाही. जय शहाच्या व्यापाराने निद्रानाशाचा विकार जडतो. पण सोनिया राहुल यांना नॅशनल हेराल्डच्या हेराफ़ेरीबद्दल कधीच चिकित्सा करायची इच्छा होत नाही. म्हणजेच राहुल गांधी फ़क्त कॉग्रेस पक्षाचेच अध्यक्ष नसतात. अनेक माध्यमात, वाहिन्यात, वर्तमानपत्रात, नियतकालिकात पप्पू बसलेले आहेत, रुळलेले आहेत. त्यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी प्रश्नांचे भंडार सज्ज असते. रोज तीन सवाल करण्यापर्यंत चिकित्सक प्रवृत्तीही असते. पण राहुल सोनियांचा विषय आला की त्यांची मती मंद होऊन जाते. जय शहाच्या व्यवहाराचे हिशोब जाहिरपणे तपासणार्या द वायर नावाच्या संकेतस्थळाचे संपादक जेव्हा द हिंदूचे संपादक होते, तेव्हा त्यांनी अशाच रॉबर्ट वाड्राच्या हरयाणातील जमिन खरेदीचा आलेला शोधनिबंध दडपून ठेवला होता. पुढे त्या रिपोर्टर महिलेने तो केजरीवालना पाठवला आणि त्यांनी पत्रकार परिषद घेऊन बोभाटा केल्यावर ‘हिंदू’तून दडपलेल्या भानगडीला प्रसिद्धी देण्यात आली. आधी आठ महिने सवाल विचारणारी बातमी दडपली गेली. मग त्या पप्पू संपादक सिद्धार्थ वरदराजनला राहुल गांधी नाहीतर दुसर्या कुठल्या उपाधीने ओळखायचे? कारण त्यांची भाषाही राहुलसारखीच असते. मोदींसाठी त्यांचे तीन सवाल कायम सज्ज असतात. पण सोनिया राहुल असा विषय आला, मग त्यांची बोबडी वळते आणि त्यांची शंकेखोरवृत्ती जागच्याजागी मरून पडते.
right and correct
ReplyDeleteबरोबरच आहे भाऊ,आपला तो बंडू दुसऱ्या च कार्ट आपली आई देवता दुसर्याची ती .....
ReplyDeletegf
Deleteबरोबर आहे भाऊ राहुल गांधी मोदींना हवे तेवढे प्रश्न विचारू शकतात कारण मोदी जनसेवक आहेत.
ReplyDeleteपरंतु ही मंडळी सोयीस्कर पणे हे विसरतात हे देखील जनसेवक आहेत. याना कोणी काही विचारायचे नाही. निर्लज्ज लोक आहेत.