Wednesday, April 18, 2018

पहिल्या चाचणीतच नापास

कर्नाटक विधानसभा निवडणूकीची प्रक्रीया सुरू झाली असून त्यापुर्वी़च एका वाहिनीने त्या राज्यातील जनमताचा कौल घेतला आहे. आजउद्या आणखी काही वाहिन्यांचे जनमत कौल येतील. पण या पहिल्या चाचणीतच कॉग्रेस नापास झालेली आहे. यापुर्वी महिनाभर आधीच आणखी एक चाचणी येउन गेली होती आणि त्यातही तिथल्या मतदानात कुणालाच स्पष्ट बहूमत मिळणार नसल्याचा निर्वाळा देण्यात आला होता. याही चाचणीत काहीशी तशीच स्थिती दिसते आहे. पण आधीच्या चाचणीत तीन प्रमुख पक्षात जवळपास समान जागांची विभागणी होताना दाखवलेले होते. यावेळी यात फ़रक पडला आहे. त्यात कॉग्रेस सर्वात मोठा पक्ष आणि भाजपाला त्याच्यापेक्षा काही जागा कमी मिळताना दिसते आहे. पण कॉग्रेस मोठा पक्ष होतानाही त्याला बहूमताचा पल्ला गाठणे अवघड असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे तिसर्‍या क्रमांकावरचा देवेगौडांचा पक्ष ज्या बाजूला झुकेल, त्याला सत्तेची पायरी चढणे शक्य असल्याचे ताजा कौल सांगतो. त्यातली गंमत अशी आहे, की खरोखरच असेच निकाल लागले तर मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना सत्ता गमवावी लागेल. कारण कॉग्रेसला सर्वात मोठा पक्ष होऊनही बहूमत हुकले, तर जनता दलाची मदत घ्यावी लागेल आणि ती मदत देण्यासाठी सर्वात मोठी किंमत असेल सिद्धरामय्यांचा बळी. मागल्या खेपेसही अशी स्थिती आली, तेव्हा कृष्णा या मुख्यमंत्र्याला बदलण्याच्या अटीवर देवेगौडांनी पाठींबा दिला होता आणि त्यात गौडांचे प्रतिनिधी म्हणून सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री झाले होते. पुढे तेच कॉग्रेसमध्ये गेले व मागल्या काही वर्षात त्यांनी देवेगौडांचा पक्ष निकालात काढण्याचे डावपेच खेळलेले आहेत. म्हणूनच त्यांना खड्यासारखे बाजूला करण्यावरच कॉग्रेसला पाठींबा मिळू शकेल. मुद्दा इतकाच, की सर्व मदार कॉग्रेसने ज्या नेत्यावर टाकलेली आहे, तो पहिल्याच चाचणीत नापास झाला आहे.

सर्वसाधारणपणे कुठल्याही राष्ट्रीय पक्षाच्या प्रचारात केंद्रातील नेता प्रचारसभेत सर्वात शेवटी बोलत असतो. कॉग्रेसच्या प्रचारात पक्षाध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांना तसा मान दिला जातो. पण सध्या कर्नाटकातील प्रचाराचे नेतॄत्व सिद्धरामैया करीत असून राहुलच्या नंतर ते धुवाधार भाषण करतात. उद्या त्यांनाच बाजूला करायची वेळ आली तर कॉग्रेसची स्थिती काय असेल? पण तो निकालानंतरचा विषय आहे. आज पहिल्या चाचणीतले आकडे महत्वाचे आहेत आणि त्यात भाजपा सहजासहजी बहूमतापर्यंत येताना दिसत नाही. एकूण मतांची टक्केवारी बघितली तर कॉग्रेसला ३७ टक्के व भाजपाला ३५ टक्के मतदारांनी पसंती दिलेली आहे. स्पर्धेतील तिसरा खेळाडू देवेगौडांचा सेक्युलर जनता दल खुप मागे म्हणजे १९ टक्क्यांवर आहे. मायावतींना सोबत घेऊनही त्या पक्षाला मोठी मजल मारता आलेली दिसत नाही. कॉग्रेस भाजपापेक्षा अवघ्या दोन टक्क्यांनी पुढे आहे. मात्र जागांचे अंदाज बघितले तर कॉग्रेस ९० ते १०१ आणि भाजपा ७८ ते ८६ जागा मिळवू शकतात. अवघ्या दोन टक्के मतांनी जागांमध्ये इतका फ़रक पडू शकतो. पण अशा जागा व टक्केवारी गफ़लत करणारी असते. मागल्या खेपेस भाजपाने बहूमत मिळवले, तेव्हा म्हणजे २००८ सालात कॉग्रेसला एक टक्का मते अधिक होती आणि तरीही भाजपाला जागा अधिक व बहूमतही मिळालेले होते. त्याचे कारण समजून घेतले पाहिजे. राज्याच्या उत्तरेकडे भाजपाचे वर्चस्व आहे आणि म्हणूनच त्याची गठ्ठा मते उत्तर कर्नाटकात आहेत. दक्षिण भागात ती घनता कमी होत जाते. उलट कॉग्रेसची मते राज्यामध्ये सर्वत्र सारखीच पसरलेली असल्याने पातळ होत जातात. सहाजिकच जिथे भाजपाची मते गठ्ठ्य़ाने आहेत, अशा जागी तो पक्ष बाजी मारून जातो आणि इतरत्र गौडांच्या पक्षाने विभागलेल्या मतांचा भाजपाला लाभ मिळून जातो. म्हणून हे दिसणारे दोन टक्के किरकोळ मानता येत नाहीत.

परंपरेने भाजपाचा वरचष्मा लिंगायत समाजात असून त्याचा प्रभाव असलेल्या उत्तर महाराष्ट्रात मागल्या खेपेस भाजपाची मते विभागली गेलेली होती. येदीयुरप्पा नाराज होऊन वेगळा पक्ष काढून लढलेले होते. त्याचा मोठा फ़टका भाजपाला आपल्या प्रभावक्षेत्रात बसलेला होता. त्याचा कॉग्रेसला निर्णायक बहूमत मिळण्यात फ़ायदा झालेला होता. आज ती स्थिती नसली तरी लिंगायत आरक्षणाच्या विषयाने भाजपाचा हा मतदार विचलीत झालेला आहे. सिद्धरामय्यांनी त्यासाठीच लिंगायत समाजाला वेगळा धर्म म्हणून मान्यता देण्याचा डाव खेळलेला आहे. पण त्याचे प्रतिबिंब चाचणीत पडलेले दिसत नाही. त्याचा उपयोग झाला असता, तर कॉग्रेस व भाजपा यांची मतांची टक्केवारी तुल्यबळ दिसली नसती. अजून उमेदवारांचे अर्ज भरून झालेले नाहीत आणि प्रचाराची रणधुमाळी उडालेली नाही. पण राहुल व सिद्धरामय्यांनी प्रचाराचा जोर लावलेला आहे आणि भाजपाचा हुकमाचा पत्ता मैदानात आलेला नाही. तरीही कॉग्रेसला भाजपाला खुप मागे टाकता आलेले नसेल तर परिस्थिती गंभीर मानायला हवी. कारण मोदी मैदानात आले मग प्रचाराचा रोख एकतर्फ़ होऊन जात असतो. कर्नाटकात मोदींची लोकप्रियताही या चाचणीत तपासली गेली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदींच्या कामावर ५१ टक्के लोक खुश आहेत आणि ३१ टक्के लोकांनी त्यांचे काम वाईट नसल्याचे सांगितले आहे. याचा अर्थ मोदी हा प्रचारात हुकमाचा पत्ता होऊन जातो. पुढे राज्यातील नेत्यांच्या स्पर्धेत सिद्धरामय्या यांना ३३ टक्के तर येदीयुरप्पांना २६ टक्के पसंती आहे. इथे मुख्यमंत्री पुढे असले तरी त्यांच्या मदतीला राहुलचा प्रभाव येत नाही. पण येदीयुरप्पांना मोदींचे यश उपयुक्त ठरू शकते. परिणामी दोन्ही मोठे पक्ष आज तरी कर्नाटकात एकमेकांना तुल्यबळ मानावे लागतील. यांच्या स्पर्धेत जनता दल कुठेच नसले तरी ते कोणाची मते किती खातात, त्यावर कॉग्रेस भाजपाचे भवितव्य अवलंबून आहे.

तिहेरी लढतीमध्ये कोणत्या पक्षाची काय अवस्था होते, ते लोकसभा मतदानातून लक्षात येऊ शकते. मागल्या लोकसभेत भाजपाने मोठी झेप घेताना मोठ्या प्रमाणात जनता दलाचा सफ़ाया केला होता. २० टक्के मतांवरून त्या पक्षाची अवस्था १० टक्के इतकी खाली आली. आताही देवेगौडांना १९ टक्के पसंती दिसत असली तरी जेव्हा मतदान होईल तेव्हा जिंकण्याची शक्यता असलेल्या पक्षांकडे वळण्याचा अनेक मतदारांचा कल असतो. असे मतदार गौडांना सोडून कॉग्रेस वा भाजपाकडे झुकू शकतात. त्यामुळे निकालावर मोठा परिणाम होऊ शकतो. चाचणीचे विश्लेषण करणारे वाहिनीवरचे जाणकार ४० च्या आसपास जागा घेऊन देवेगौडा किंगमेकर होतील, असेच काही सांगत होते. पण प्रत्यक्षात त्यांचा तरंगता अस्थिर मतदार खरा किंगमेकर ठरू शकतो. गेल्या चारपाच वर्षात प्रत्येक निवडणूकीत मतदाराने कुठल्या तरी एका पक्षाला स्पष्ट कौल दिलेला आहे. कर्नाटक त्याला अपवाद नाही. त्यामुळेच अटीतटीची लढाई होत असताना देवेगौडांच्या पक्षाला बहूमत गाठणे शक्य नसले, तर त्यांचा मोठा मतदारवर्ग भाजपा कॉग्रेसमध्ये विभागला जाऊ शकतो. त्यातून कॉग्रेसला ३७ वरून ४० टक्के गाठणे वा भाजपाला ३५ वरून ३८-३९ टक्के गाठणे अशक्य नाही. तसे झाल्यास मधल्यामध्ये गौडांच्या पक्षाचे मरण होईल आणि भाजपा वा कॉग्रेस बहूमतापर्यंत जाऊन पोहोचेल. चाचणीने काहीही दाखवले तरी विधानसभा त्रिशंकू होण्याची बिलकुल शक्यता नाही. त्यामुळे भाजपा कर्नाटकला कॉग्रेसमुक्त करणार की सिद्धरामय्या मोदीलाट थोपवून दाखवणार, इतकाच मुद्दा आहे. देवेगौडांचा त्यामध्ये किती खुर्दा होतो, ते निकालाच्या दिवशी बघावे लागेल. मोदींनी गुजरातप्रमाणे कर्नाटकात प्रचाराची मेराथॉन शर्यत सुरू केली, तर मात्र कॉग्रेसला दक्षिणेत शिल्लक राहिलेला हा बालेकिल्ला वाचवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावावी लागेल. ती राहुल गांधींसाठी म्हणूनच सत्वपरिक्षा आहे.

5 comments:

  1. भाऊ, मला वाटते की केम्ब्रिज अनलेटिकाचे डावपेच अजून दिसत नाहीत. एक एक गोष्ट मंचावर येऊ लागली आहे. ATM मधील पैसे संपणे हा त्यातलाच प्रकार आहे असे समजते. जनता यातील काय विचारात घेईल याच्यावर निकाल असेल. अजून बरेच दिवस आहेत, बघूया !

    ReplyDelete
    Replies
    1. अहो वाळवेकर साहेब मान्य आहे भाजपा समर्थक आहेत पण म्हणून इतकं?
      अहो एवढ्या सगळ्या ATM मधून पैसे टाकल्या टाकल्या कसं काय काँग्रेस चे लोक सगळे पैसे काढून घेतील?!
      भक्ती मध्ये इतके वाहून नका जाऊ.. सत्य आणि अफवा यात फरक काय ते जरा समजून घ्या

      Delete
    2. जसे सगळी व्यवस्था चार वर्षात भाजप कडे वळते अगदी दहा वर्षे आणि त्या आधीही काँग्रेस सत्तेत असूनही

      Delete
  2. परंपरेने भाजपाचा वरचष्मा लिंगायत समाजात असून त्याचा प्रभाव असलेल्या *उत्तर महाराष्ट्रात* मागल्या खेपेस भाजपाची मते विभागली गेलेली होती. - "उत्तर कर्नाटकात" हवंय ना ?

    ReplyDelete
  3. भाऊ,
    जिथे जिथे प्रादेशिक पक्ष प्रबळ आहेत आणि काँग्रेस दुसर्या स्थानावर आहे, तेथे तेथे काँग्रेसचा पूर्णपणे धुव्वा उडालेला दिसतो ऊदा. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, झारखंड

    परंतू समान परिस्थिती भध्ये भाजपला मात्र अप्रत्यक्ष लाभ झालेला दिसतो.

    असे नेमके काय आहे की प्रादेशिक पक्षांना पसंती न देणारे मतदार काँग्रेसला डावलतात पण भाजपाला मात्र पसंत करतात?

    ReplyDelete