Saturday, April 14, 2018

कौरव, पांडव आणि घटोत्कच

Image result for rahul cartoon kaurava pandawa

मध्यंतरी कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना अतिशय मोलाची विधाने केलेली आहेत. त्यापैकी एक म्हणजे आधुनिक महाभारताचे ‘दर्शन’ होय. आज जी राजकीय लढाई चालू आहे, त्यात आपण किरकोळ दिसत असलो तरी आपला सत्याचा पक्ष आहे. म्हणून आपण पांडव आहोत. तर भाजपा हा आजचा कौरवांचा पक्ष आहे. असा साक्षात्कार राहुलजींनी आपल्या अनुयायांना घडवला होता. त्याचे सार सांगताना ते म्हणाले, अखेरीस सत्याचा विजय होतो आणि आपण पांडव असल्याने आपलाच विजय होणार आहे. राहुल देशात वा परदेशात जे उच्चशिक्षण घेऊन आलेत, तिथे महाभारत किती शिकवले जात होते, ठाऊक नाही. त्यात कौरव किंवा पांडव म्हणून राहुल गांधी काय शिकले व त्यातून त्यांनी कितीसे समजून घेतले, तेही सांगता येणार नाही. पण जेव्हा आपण अनुयायांना साक्षात्कार घडवत असतो, तेव्हा त्यात बोधकथेतले सार व आशय आपल्याला नेमका ठाऊक असला पाहिजे. राहुलना महाभारताचा आशय किती समजला आहे आणि त्यांनी तो कितीसा समजून घेतला आहे, ते एक लाखमोलाचे कोडेच आहे. कारण जे कोणी महाभारताचा संग्राम ओळखतात, त्यांना पक्के ठाऊक आहे की पांडव असोत की कौरव म्हणून गणले गेलेले शंभर सख्खे भाऊ असोत, सगळे मिळून कौरवच होते. त्यांच्या आपसातील लढाईत जिंकले त्यांना पांडव म्हणून ओळखले जात असते. प्रत्यक्षात तेही कुरू वंशातले म्हणून कौरवच होते आणि असतात. त्यामुळे असल्या साक्षात्कारातून राहुल व्यवहारत: भाजपालाही आपल्याच वंशातले म्हणत आहेत, की कॉग्रेसला भाजपाच्या कुरू वंशातले ठरवित आहेत? त्याचा कुठलाही खुलासा होत नाही. कदाचित राहुलनाही त्याचे कुठले स्पष्टीकरण ठाऊक नसावे. कोणी काही लिहून द्यावे आणि आवेशात समोरच्या गर्दीला ऐकवण्याची जबाबदारी ते पार पाडत असतात ना?

महाभारतातला कुरूवंश दोन दुबळ्या भावांच्या वंशजांमध्ये विभागला गेलेला होता. त्यात धृतराष्ट्राची संतती होती, तिला कौरव म्हटलेले आहे. कारण तोच सिंहासनावर आरुढ झाला होता. त्याचा भाऊ पंडू हा अल्पवयात मरण पावला. त्याच्या मुलांना पित्यावरून नाव पडले. पंडूची मुले म्हणून पांडव. अन्यथा तेही कौरवच. त्यामुळे अशा लढाईचा सारांश इतकाच असतो, की भावांच्या लढाईत जिंकतो त्याला पांडव म्हणतात. लढताना सगळेच कौरव असतात आणि पांडव असल्याने कोणी जिंकत नाही. तर जिंकतात, ते पांडव असतात. ते सत्याच्या बाजूने होते असे मानायचे असते. कारण इतिहास नेहमी जेते म्हणजे विजेतेच लिहीत असतात. त्यात पराभूतांना कधी आपली बाजू मांडण्याची मुभा मिळत नसते. पण एकविसाव्या शतकातील महाभारताची गोष्ट वेगळी आहे. पराभूत नेहमी इतिहास लिहीण्याच्या व सांगण्याच्या आवेशात असतात आणि विजेत्याला कौरव ठरवण्याची स्पर्धा चालत असते. मग त्यात विजय दाखवता येत नसल्याने पराभवाला ‘नैतिक विजय’ असे नवे संबोधन तयार करण्यात आलेले आहे. सहाजिकच राहुल जी महाभारताची कथा सांगत आहेत, तिचा सांगाडा पुराणकालीन असला तरी त्याच्यावरचे आवरण आजच्या युगातले आहे. मग त्यात पांडव कसे जिंकणार? आजकाल विजेत्यांना पांडव मानले जात असते आणि त्यांचा विजय हा नैतिक विजय असतो. बाकी जिंकणारे राज्य करतात, सत्ता उपभोगतात आणि तरीही ते कौरव असतात. व्यवहारी जगात पांडव जिंकत नाहीत, इतकाच त्याचा अर्थ! राहुल गांधींच्या अशा महाभारतामध्ये त्यामुळे पांडवांचा कधी व्यवहारी विजय होण्याची शक्यता असेल काय? ज्यांनी ‘नैतिक’ विजयात समाधानी रहाण्याचा निर्धार केलेला आहे. त्यांना युद्ध जिंकण्याची फ़िकीर कशाला असेल? तर अशा राहुल गांधीचे महाभारत व कौरव-पांडव ऐकून मोठी गंमत वाटली आणि यातला घटोत्कच आठवला.

अर्थात राहुल गांधीना आजच्या युगातील एनसीसी म्हणजे काय ते ठाऊक नसेल, तर त्यांना महाभारताच्या पुराणातील घटोत्कच माहिती असण्याचे काही कारणही नाही. पण तुमचीआमची गोष्ट वेगळी आहे. आपण उच्चशिक्षित नसतो आणि आपली आजी इटालीत बसून गोष्टी सांगणारीही नसते. त्यामुळे किती टाळले तरी आपल्याला घटोत्कच ठाऊक असावाच लागतो. महाभारतातल्या पांडवांशी राहुल गांधींनी स्वत:ची तुलना केली असली, तरी त्यातला घटोत्कच कोण ते त्यांना सांगता येणार नाही आणि त्यालाच खुप महत्व आहे. कारण त्या घनघोर युद्धात त्याच घटोत्कचाने फ़ार मोठी व महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे. तो घटोत्कच पांडवच होता. पाचपैकी एक असलेल्या भीम या पांडवाचा घटोत्कच हा पुत्र. पांडवांना वनवासात जावे लागले, तेव्हा तिथल्या एका राक्षसीचे मन भीमावर जडले आणि तिने भीमाशी विवाहित होण्याचा हट्ट केला. कुंतीने त्याला मान्यता दिल्यावर भीमाने हिडींबेशी लग्न केले आणि त्यातून ज्याचा जन्म झाला, तोच हा घटोत्कच होय. अशा घटोत्कचाने पुढल्या काळात युद्धजन्य स्थिती आली, तेव्हा पांडवांच्या वतीने त्यात भाग घेतला होता. त्यात तो प्राणघातक रितीने जखमी झाला आणि त्याचा मृत्यू समीप आला होता. तर त्याला युद्धभूमीवर श्रीकृष्णाने दिलेला सल्ला प्रसिद्ध आहे. घटोत्कचाला एक वरदान मिळालेले होते. तो राक्षस होता आणि त्यामुळे आधीच धिप्पाड असलेली देहयष्टी मनाला वाटेल तितकी विशाल व अक्राळविक्राळ करण्याची अमोघ शक्ती त्याला मिळालेली होती. तर त्या क्षणी म्हणजे मरण्यापुर्वी जितके क्षण शिल्लक आहेत, तेवढ्यात घटोत्कचाने आपला अवतार महाकाय करून पलिकडे कौरवांच्या सैन्यावर कोसळावे, असा तो श्रीकृष्णाचा सल्ला होता. त्याच्या त्या अगडबंब मृतदेहाखाली चिरडून गाडले जाऊन कौरवांचे हजारो सैनिक परस्पर मारले जातील, असा त्यामागचा डाव होता.

इटालीतल्या आजीकडून अशी सुरस कथा राहुलना कशी ऐकायला मिळेल? त्यासाठी अस्सल भारतीय देशी आजी असावी लागते. किंवा प्रवचन वा किर्तनातून असल्या गोष्टी कानी पडत असतात. बिचार्‍या राहुलना त्यापासून कायम वंचित रहावे लागलेले असेल, तर त्यांना कौरव पांडव कुठून कळायचे आणि घटोत्कच कसा माहिती असेल? पण आजच्या युगात वा एकविसाव्या शतकातील महाभारतामध्ये ह्या घटोत्कचाला फ़ारच महत्व आलेले आहे. मजेची गोष्ट म्हणजे तो पांडवातच वावरतो आहे आणि त्याला आपण कुठल्या बाजूला कोसळतोय व कुणाचा चुराडा करतोय, त्याचाही थांगपत्ता लागलेला नाही. किंबहूना या घटोत्कचाला आपण घटोत्कच आहोत त्याचेही भान राहिलेले नाही. म्हणून जखमी अवस्थेत असताना तो अक्राळविक्राळ रूप धारण करून अखेरीची लढाई लढतो आहे. त्यात त्याला कौरव आठवत आहेत. पांडवही आठवत आहेत. पण त्यांच्या लढाईची कारणे वा त्यामागची मिमांसा मात्र अजिबात समजून घेता आलेली नाही. त्याच्या बाजूचा कोणी श्रीकृष्ण असलाच तर त्यालाही बोलायची वा सल्ला देण्याची हिंमत उरलेली नाही. बघता बघता हा आधुनिक घटोत्कच इतका अवाढव्य होत गेला आहे, की तथाकथित पांडव सेनेतील अनेकांना जीव मुठीत धरून पळ काढायची वेळ आलेली आहे. पण त्याची घटोत्कचाला कुठे फ़िकीर आहे? तो मस्त गडगडा हसतच मोठा होत चालला आहे व जमिनीवरच्या पांडवांना पळता भूई थोडी झालेली आहे. कारण अक्राळविक्राळ होऊन पलिकडे शत्रू सैन्याचा अंगावर पडावे, हे त्याला सांगायलाही कोणी धजावलेला नाही. राहुल गांधींनी गेल्या चार वर्षात त्यांच्या नेतृत्वाखाली झालेली कॉग्रेसची अवस्था बघावी. नंतर आपला चेहरा आरशात बघावा. मग ते पांडव आहेत, म्हणजे कोण आहेत, त्याची थोडी जाणिव होईल. गेल्या चार वर्षात त्यांच्याच पायदळी तुडवली गेल्याने अनेक राज्यातील कॉग्रेस जमिनदोस्त होऊन गेली आहे.

गांधी नेहरू खानदानात जन्मल्यामुळे राहुल गांधींना शून्यातून थेट कॉग्रेस अध्यक्ष होण्याचे वरदान आपोआप मिळालेले होते. कधीकाळी देशात अथक सत्ता राबवणार्‍या या देशव्यापी पक्षाचे अध्यक्षपद म्हणजे अक्राळविक्राळ राजकीय पक्ष होय. लाखो कार्यकर्त्यांचे बळ व संघटन पाठीशी असलेला अध्यक्ष म्हणजे घटोत्कचाचेच आधुनिक रूप होय. पण त्याचे राहुलना थोडेतरी भान आहे काय? आपल्या एक एक पावलाखाली त्यांनी एकेका राज्यातली कॉग्रेस संघटना पायदळी तुडवून टाकलेली आहे. आंध्रप्रदेश हे राज्य २००४ सालात कॉग्रेसला सत्तेवर आणण्यासाठी सर्वाधिक खासदार निवडून देणारे होते. आज तिथे एकही कॉग्रेस खासदार शिल्लक राहिलेला नाही. देशाला कॉग्रेसला चार चार पंतप्रधान व बहूमताची सत्ता देणार्‍या उत्तरप्रदेशात आज त्या पक्षाचे नामोनिशाण उरलेले नाही. तिथल्या संघटनेची धुळधाण कोणी केली? ती नरेंद्र मोदी वा अमित शहांनी केलेली नाही. १९९६ सालात तिथून एकही कॉग्रेस उमेदवार लोकसभेत निवडून आला नव्हता, तिथून २००९ सालात २१ खासदार विजयी करण्यापर्यंत सोनियांनी काम केले होते. राहुलनी पक्षाची सुत्रे हाती घेतली आणि आता मायलेकराखेरीज अन्य कोणी कॉग्रेसवाला तिथून निवडून येऊ शकलेला नाही. बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश, हरयाणा, गुजरात अशा राज्यातून कॉग्रेस दिल्ली काबीज करत होती. आज तिथे कॉग्रेसची दुर्दशा होऊन गेली आहे. मागल्या चार वर्षात एकामागून एक अनेक राज्ये कॉग्रेसच्या हातून निसटली, तेव्हा त्या पक्षाचा नेता कोण होता? सोनियाजी नामधारी व राहुलच कर्ताकरविता होता ना? त्याच्या कर्तृत्वाने कॉग्रेस नामशेष होतानाचा राजकीय लाभ मोदी शहा उचलत गेले. त्यांना कॉग्रेसच्या विरोधात फ़ार मोठी लढाई करावीच लागलेली नाही. राहुलच्या पायदळी तुडवल्या गेलेल्या कॉग्रेसजनांना सामावून घेणे, किंवा जायबंदी झालेल्यांच्या जागी आपला तगडा सैनिक उभा करण्यावर त्या जोडगोळीने विजय प्राप्त केला आहे.

राहुल गांधी त्या अर्थाने खरोखरच पांडव आहेत. पण ते पाच पांडवापैकी एक नसून घटोत्कच ह्या पांडव वंशजासारखे आहेत. त्यांच्या हाती नेतृत्व आल्यापासून कॉग्रेस पक्ष दिवसेदिवस अधिक खच्ची झाला आहे, तुडवला गेला आहे. जे काम घटोत्कचाने शत्रूला चिरडण्यासाठी करायचे होते, तेच हा आधुनिक घटोत्कच आपल्याच सेनेला तुडवण्याने शत्रूचे काम सोपे करून टाकत चालला आहे. पण तथाकथित पांडवांपैकी कोणाला वा त्यांच्या कुणा श्रीकृष्णाला या आधुनिक घटोत्कचाला दिशा दाखवण्याची हिंमत गोळा करता आलेली नाही. कर्नाटक हे त्यातील शेवटाहून आधीचे पाऊल आहे. त्यानंतर मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगडची लढाई व्हायची आहे. मग वर्षभराने लोकसभेची निर्णायक लढाई व्हायची आहे. त्यात लढण्याइतपत तरी राहुल गांधी कॉग्रेस शिल्लक ठेवतील किंवा नाही, याचीच शंका येते. कारण त्यांना असे अर्धवट महाभारत वा कौरव पांडवांच्या गोष्टी सांगणार्‍यांनी, त्यातला आशय वा सार समजावलेले नाही. त्यामुळे हा घटोत्कच भस्मासूरासारखा बेताल झालेला आहे आणि बेधडक आपल्याच सेनेला तुडवित मोकाट सुटलेला आहे. म्हणून तर विविध लहानमोठे पक्ष वा प्रादेशिक पक्ष कॉग्रेस सोबत मोदीविरोधी आघाडीत सहभागी व्हायलाही बिचकत आहेत. कारण अशीच वाटचाल सुरू राहिली, तर पुढल्या वर्षी तो घटोत्कच अंतिम निर्णायक लढाईत शत्रूच्या अंगावर कोसळण्यापेक्षा अक्राळविक्राळ होऊन आपल्याच बाजूच्या सेनेवर कोसळण्याची भिती इतरेजनांना भेडसावू लागली आहे. तसे झाल्यास विरोधकांसाठी तो अपुर्व कपाळमोक्ष असेल. म्हणून तर ममता चार दिवस दिल्लीत होत्या. पण त्या राहुलच्या जवळपास फ़िरकल्या नाहीत. सोनियांना भेटल्या तरी राहुलशी बोलल्या नाहीत. इतरही विरोधी नेत्यांनी राहुलपासून चार हात दूर रहाण्यातच धन्यता मानलेली आहे. कारण त्यांना पांडवांच्या विजयापेक्षाही आपल्याच अस्तित्वाच्या सुरक्षेची अधिक चिंता आहे.

मोदी-शहा यांच्यापेक्षा या विरोधकांना राहुल व त्यांच्या अशा घटोत्कची महाभारताने भयभीत केले आहे. अर्थात राहुलना त्याची अजिबात फ़िकीर नाही. महाभारतातल्या त्या घटोत्कचाला तरी आपल्या भवितव्याची कुठे फ़िकीर होती. राहुल यांच्या नेतृत्वाखालची कॉग्रेस म्हणूनच महाभारतातल्या घटोत्कचासारखी झालेली आहे. अखेरच्या क्षणात तिचा अक्राळविक्राळा आकार दिसेलही. पण तो कुठल्या बाजूला कोसळून पडणार याला महत्व आहे. तो भाजपाच्या अंगावर कोसळला तर गोष्ट वेगळी. मगच त्याची महाभारताशी तुलना होऊ शकेल. पण मागल्या चार वर्षातल्या आधुनिक महाभारताकडे बघितल्यास राहुल त्या घटोत्कचाला आपल्याच बाजूला पाडण्यासाठी खुप उतावळे झालेले वारंवार अनुभवास येत असते. शतायुषी वा देशव्यापी कॉग्रेस म्हणजे काय, तेच राहुलना अजून समजलेले नाही, की ती कॉग्रेस कोसळून पडल्यास काय होईल, त्याचा अंदाज नाही. म्हणून ही बेफ़िकीरी चालू आहे. खरे सांगायचे तर मोदी-शहा नावाची जोडगोळी मोठ्या खुबीने या घटोत्कचाला विरोधी पक्षाच्या सैन्यात मोक्याच्या जागी आणून उभे करण्याचे डाव खेळत आहेत. त्यात या विरोधकांनी राहुलला आपला सेनानी म्हणून स्विकारावे, हीच भाजपाची खेळी आहे. याच्या परिणामी घटोत्कच अक्राळविक्राळ होऊन कोसळेल, तेव्हा हानी विरोधकांची व्हावी, ही त्यातली भाजपाची अपेक्षा आहे. आठवते? बंगालच्या विधानसभा निवडणूकीत मार्क्सवाद्यांनी याच घटोत्कचाला सोबत घेतले आणि तेच आपल्या बालेकिल्ल्यात नामशेष होऊन गेले. अखिलेशने वर्षभरापुर्वी उत्तरप्रदेशात सोबत घेतले आणि त्याच्या पक्षाची केवढी धुळधाण उडाली? हे आहे आजचे एकविसाव्या शतकातील महाभारत. हे आहेत त्यातले पांडव आणि कौरव! त्यातला घटोत्कच ज्याला ओळखता येईल व त्याला खेळवू शकेल, त्यालाच ते महाभारत जिंकता येणार आहे. मग तोच पांडव म्हणून घोषित होईल.

12 comments:

  1. पौराणिक आणि आधुनिक(बावळट व्हाया ईटली) घटोत्कच....तुलना..छान जमलयं भाऊ.
    कुठे घेऊन चाललाय पक्ष माझा...म्हणायची वेळ आली आहे.

    ReplyDelete
  2. घटोत्कच हा गडगडाटी हास्य करायचा तर आत्ताचा घटोत्कच ईकडे बटाटे तिकडे सोने येईल असे सांगून हसवीतो त्यामुळे विरोधी सैन्य घाबरण्याचे ऐवजी त्याचेच सैन्य घाबरते .

    ReplyDelete
  3. कर्नाटक मध्ये मोदी शाह वेगळी चाल करतायत ,त्यांना पूर्ण कर्नाटक जिंकता येत नाहीये तशी तयारी पण नाहीये,येदिरुप्पाना मुख्यमंत्री करण्यापेक्षा लिंगायत मते मिळवणे हाच उद्देश दिसतोय. स्वतःच्या जागा वाढविणे ,टक्केवारी वाढविणे ,एवढाच उद्देश दिसतोय ते काम अमित शाह चोख करतीलच . उद्या जरी काँग्रेस ची सत्ता तिथे अली वा मोठा पक्ष झाला तर त्याचे श्रेय सिद्धरामय्या ना मिळणार राहुलला नाही . त्यामुळे ती चिंता नाहीये .पण त्यामुळे काँग्रेस इतर विरोधी पार्टीना राहुलच्या नेतृत्वाखाली निवडणूक करायला दबाव आणेल आणि त्यांचे मीडियातले लोक पण ,आणि तिथेच मोदींचा विजय झालेला असेल,

    ReplyDelete
    Replies
    1. भाऊ आज खुप हसलो हा लेख वाचताना ऐतिहासिक शब्द रचना तुम्हाला वंदना

      Delete
  4. प्रसाद कणेकरApril 16, 2018 at 9:28 AM

    भाऊ अप्रतिम लेख.

    ReplyDelete
  5. भाऊ अप्रतिम

    ReplyDelete
  6. आज खरंच आनंद झालाय भाऊ,आमचं युवापिढी चे कोणीतरी ऐकून घेणारे आणि परिवर्तन घडवणारे नेतृत्व परत सत्तेत येतंय त्यामुळे अत्याधिक आनंद.

    ReplyDelete