Sunday, April 22, 2018

पराभूत ‘यशवंत’

Yashwant Sinha के लिए इमेज परिणाम

वाजपेयी यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री व संरक्षणमंत्री म्हणून महत्वाच्या जबाबदार्‍या पार पाडलेले भाजपा नेते यशवंत सिन्हा, यांनी अखेरीस पक्षाचा राजिनामा देऊन राजकारणाचा संन्यास घेतला आहे. खरे तर आधी संन्यास घेऊन व पक्षाचा त्याग करून त्यांनी आपल्या अगाध ज्ञानाचा प्रकाश टाकला असता, तर देशातील लोकांनी त्यांच्याकडे विजयवीर म्हणून बघितले असते. पण त्यांनी मागली दोन वर्षे आपल्याच पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला गोत्यात आणण्यासाठी शक्य तितके सगळे प्रयोग केले आणि त्याचे कुठलेही लाभ मिळत नसल्याचे अनुभवास आल्यानंतर संन्यासाचा व त्यागाचा आव आणला आहे. त्यांच्यावर ही पाळी अन्य कोणी आणलेली नसून खुद्द यशवंत सिन्हा यांनीच स्वत:ला हास्यास्पद करून घेतले आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या पक्षात वा संघटनेत सहभागी होता, तेव्हा व्यक्तीगत अहंकार प्रतिष्ठा बाजूला ठेवून संघटनात्मक शिस्तीला प्राधान्य असते. त्याचे कुठलेही पालन करायचे तुम्ही नाकारता, तेव्हा तुम्ही संघटनेचे सदस्य राहिलेले नसता. कारण कोणी तुम्हाला सक्तीने आपल्या संघटनेत राखू शकत नसतो. तसे करण्याचा त्या संघटनेला उपयोग नसतो की त्या व्यक्तीलाही काही लाभ नसतो. हे बंधन तुम्हीच स्वत:वर घालून घेतलेले असते. ज्याक्षणी ते बंधन झुगारून सिन्हा नेत्याला व पक्षाच्या जाहिर भूमिकांनाच आव्हान देऊ लागले, तिथून ते भाजपात नसल्यासारखेच झाले होते. म्हणून त्यांनी आता पक्षाचा राजिनामा वगैरे देण्याच्या औपचारितकेला अर्थ नाही. केंद्रात पुन्हा भाजपाची सत्ता आल्यावर आपली वर्णी महत्वाच्या सत्तापदावर लागली नसल्याने ते विचलीत झालेले होते. हे सत्य त्यांना एकदाही लपवता आलेले नसेल, तर अशा कृतीने हास्यास्पद होण्याखेरीज पदरात दुसरे काय पडू शकते? लोकशाही, अर्थकारण फ़क्त आपल्यालाच कळते, अशा भ्रमाने त्यांना पछाडल्याचा तो परिणाम आहे.

एका घरात कुटुंबातही अनेक मतभेद असतात आणि तेवढ्यासाठी कोणी बाहेरच्याला हाताशी धरून आपल्या कुटुंबप्रमुखाच्या विरोधात कारवाया करीत नाही. केल्यास तो त्या कुटुंबातला उरत नसतो. त्या कारवाया अपेशी ठरल्या, मग त्याची कुटुंबातून हाकालपट्टी होत असते. जे निकष कुटुंब घराण्याला लागतात, तेच विशिष्ठ विचारांनी एकत्र आलेल्या पक्ष व संघटनांनाही लागू होत असतात. यशवंत सिन्हा मागल्या दोनतीन वर्षापासून ज्या कारवाया करीत होते, त्याला पक्षशिस्तीचा भंग असे म्हणतात. म्हणूनच त्यांची कधीच पक्षातून हाकालपट्टी व्हायला हवी होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहांनी यशवंत मोहिमेकडे साफ़ दुर्लक्ष केले होते. सिन्हा यांना थांबवले नाही की हाकलून लावले नाही. अर्थात त्यातही काही नवे नाही. घरात कुटुंबात काही लहान मुले बालिश हरकती करतात, त्यांना कोणी घराबाहेर हाकलून लावत नाही. त्यांच्याकडून वडीलधार्‍यांची अवज्ञा झाली तरी काणाडोळा केला जातो. इथे काहीही वेगळे झालेले नाही. वयामुळे चळ लागला असे मानून मोदी शहांनी अशा पोरकटपणाकडे काणाडोळा केलेला होता. कारण सिन्हा यांनी कितीही उचापती केल्या, तरी त्याचा भाजपाला कुठलाही धोका नव्हता. खरेतर त्यातून सिन्हा यांना आपली औकात कळायला हवी होती. त्यांनी आपल्या उचापती आवरत्या घ्यायला हव्या होत्या. पण आपण सिकंदर वा योद्धा असल्याच्या थाटात मोहिमेवर निघालेल्या सिन्हांना त्याचे भान राहिले नाही. बाकी मोदी विरोधक त्यांना हरभर्‍याच्या झाडावर चढवत राहिले. सहाजिकच आपल्या युद्धसज्जतेची साक्ष देण्याची जबाबदारी सिन्हा यांच्यावर येऊन पडली आणि पक्ष हाकलत नसेल तर आपणच बाहेर पडण्याची नामुष्की त्यांच्यावर आली. पण त्यांना इतकीही किंमत वा मोल नाही, की अन्य कुठल्या पक्षाने पायघड्या घालून स्वागत करावे. तिथून मग संन्यासाचा पवित्रा पुढे आला.

मागल्या दोन वर्षात जितक्या आवेशात मोदी सरकारवर सिन्हा तुटून पडलेले आहेत, ते बघता त्यांची वेदना लपून राहिलेली नव्हती. पण देशाचे अर्थमंत्री म्हणून अनेक वर्षे काम केलेल्या सिन्हांनी ताळतंत्र सोडलेले होते. एका बाजूला ते भाजपा खासदारांना पत्र लिहून आपण युपीए सरकार संपवण्यासाठी कसे कष्ट घेतले, त्याविषयीच्या आठवणी सांगतात. त्यामुळे देशात सत्तांतर झाले वा मोदी सत्तेत आल्याचीही ग्वाही देतात. त्यात तथ्य असेल, तर युपीएचा कारभार देशाचे दिवाळे वाजवणाराच होता याची साक्ष सिन्हाच देत असतात. तसे असेल तर जी घसरण युपीए काळात चालू होती, तितकी दिवाळखोर स्थिती आज नाही, हे कोणालाही मान्य करावे लागेल. पण तेव्हा विरोधात असताना यशवंत सिन्हा यांनी कधी युपीए सरकारच्या विरोधात आंदोलने, मेळावे भरवल्याचे कोणाच्या ऐकीवात आहे काय? आज सिन्हांच्या सोबतीने मोदी सरकारवर तोफ़ा डागणारे बहुतेक लोक त्याच युपीएतले सरदार आहेत. सिन्हांसोबत त्यापैकी किती युपीए सरदार त्यांच्या काळात देशाचे दिवाळे वाजले, हे मान्य करतील? भाजपा खासदारांना सिन्हांनी लिहीलेल्या पत्रातील युपीए विषयक मुद्दे, हे नवे सिन्हासोबती किती मान्य करतील? सिन्हा यांनी पत्रातून युपीएवर झाडलेले ताशेरे व केलेल्या तक्रारी निरर्थक ठरतात. कारण त्याच लोकांच्या गळ्यात गळे घालून सिन्हा नाटके करीत आहेत. शिवाय जे सरकार पाडायचे होते म्हणून आपण झटलो अशी ग्वाही सिन्हा देतात, ते झटताना त्यांनी अशा मेळावे, परिसंवादाचे किती आयोजन केलेले होते? नसेल, तर युपीए हटावसाठी झटलो म्हणजे काय? एकूणच हा माणूस सत्तेतला हिस्सा मिळालेला नाही म्हणून कमालीचा भरकटला आहे. पक्षासाठी आपण आजवर कुठे योगदान दिले व कधी पक्षात आलो, तेही त्यांना सांगता येणार नाही. व्यक्तीगत स्वार्थ साधला जात नसल्याची ही निव्वळ पोटदुखी आहे.

जेव्हा सिन्हांनी पक्षाच्या राजिनाम्याची घोषणा केली, तेव्हा त्यांच्यासोब्त भाजपाचे दुसरे नाराज शत्रुघ्न सिन्हा व्यासपीठावर होते. त्यांच्याच कुठल्या तरी चित्रपटातील एक प्रसंग आठवतो. एका गुंडाच्या जुगारी अड्ड्यात जाऊन शत्रुघ्न डाव खेळत असतो आणि अखेरीस त्याच गुंडाशी खेळायची वेळ येते. एका डावात सर्व पैसे लावून झाल्यावर तो गुंड पत्ते दाखवायला सांगतो. त्याच्याकडे तीन राण्या असतात आणि शत्रुघ्न तीन बादशहा असल्याचा दावा करतो. पण दाखवतो दोनच बादशहा आणि पैसे उचलू लागतो. त्याला रोखून गुंड म्हणतो, अबे तिसरा बादशहा दिखाव. मग त्याच्या नाकावर ठोसा मारून शत्रुघ्न उत्तरतो, ‘अबे तिसरा बादशहा तो खुद हम है.’ असले चटकदार संवाद चित्रपटात मनोरंजनासाठी चालतात व छान वाटतात. पण प्रत्यक्ष व्यवहारी जगात ते कुचकामी असतात. हे चित्रपटाच्या पडद्यावरच कायम रमलेल्या शत्रुघ्न सिन्हाला उमजले नाही तर हरकत नाही. पण त्याच्याच नादाला लागलेल्या यशवंत सिन्हांचे काय? त्यांना हा साधा व्यवहार कळत नाही? पंतप्रधानाला ठोसा मारून मीच देशाचा अर्थमंत्री वा अर्थशास्त्री असल्याचे सांगता येत नसते. तो निव्वळ फ़िल्मी पोरकटपणा असतो आणि दोन वर्षानंतर यशवंत सिन्हांनी त्याचाच अभिनय रंगवला आहे. अशा वेळी शत्रुघ्न त्यांच्या बाजूला बसलेला असेल, तर कोणाची बाधा यशवंत सिन्हांना झालेली आहे, ते लक्षात येऊ शकते. मात्र अशा पोरकट राजकारणाला दबून जाणारा पंतप्रधान आज उपलब्ध नाही हे यशवंताचे दुर्दैव आहे. उलट त्या सर्वोच्च पदावर बसलेला पंतप्रधान शत्रुघ्न सिन्हाच्याच नेहमी गाजलेल्या एकशब्दी डायलॉगचा अनुच्चारी उच्चार करत असतो, ‘खामोश!’ मोदी खामोश राहून जे बोलतात, ती त्यांची मनकी बात असते, हे त्यांच्या अनेक विरोधकांना अजूनही उमजलेले नाही. म्हणून त्यांच्यासमोर अनेक यशवंत पराभूत होत असतात.

6 comments:

  1. भले यशवंत सिन्हा मंत्रीमंडळात नसतील पण त्यांचे पूत्र मंत्री आहेत ...त्यांनी थोडी समजदारी दाखवायला पाहीजे होती...

    ReplyDelete
  2. सुपर्ब अप्रतिम लेख

    ReplyDelete
  3. राजकीय मनोविश्लेषण एकच नंबर भाऊ,

    ReplyDelete
  4. HE THOUGHT HE WILL BE NOMINATED FOR PRESEDENTIALSHIP OF BRICS BANK

    ReplyDelete
  5. हेच यशवंत ............२०१३ मध्ये गोव्यात भाजपच्या अधिवेशनात राजनाथसिंहांनी ' मोदी ' यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली ........तेंव्हा ते मला ' नमोनिया ' झाला नाही म्हणून पत्रकारांना सांगत होते...... दुसरे वृद्ध भीष्माचार्य / ढुढाचार्य ...मोदी यांचे नाव घोषित होताच घुश्यातच दिल्लीला तडकफडकी निघून गेले होते. या यशवंताचा ' गैरसमज ' असा कि यांच्या शिवाय भाजपचे दिल्लीत पानंच हलणार नाही. हा माणूस तसा मूळ भाजपचा नाहीच. चंद्रशेखर सरकारमध्ये सरकारी नोकरी सोडून हा सरकारमध्ये मध्ये मंत्री म्हणून घुसला होता. पुढे वाजपेयींनी याला मंत्रिपद दिले होते. यशवंत सिन्हा , शत्रूघन सिन्हा , अरुण शौरी हे भाजपातील असंतुष्ट ' पावटे ' च होते. आता उरलेले दोघे कधी जातात याची वाट बघणे ........!!

    ReplyDelete