Wednesday, April 4, 2018

अण्णा आणि मोदी

संबंधित इमेज

अण्णांचे फ़सलेले उपोषण चालू असताना आणि संपल्यावर अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व सत्ताधारी भाजपाला शिव्याशाप देताना अण्णांच्या मागल्या उपोषणामुळे मोदी सत्तेत आल्याचा आवर्जून उल्लेख वा आरोप केलेला आहे. कुठल्याही यश वा विजयाची हीच तर गंमत असते. त्या विजयाला अनेक बाप असतात. पण अपयश नेहमी अनौरस असते. बिहार वा दिल्ली विधानसभात मोदी व भाजपाचा पराभव झाला, तेव्हा त्याला एकटे मोदी जबाबदार होते. तेव्हा अण्णा वा अन्य कोणाला ती जबाबदारी नको होती. पण २०१४ लोकसभा वा अन्य कुठल्या निवडणूकीत मोदी जिंकले, तर मात्र अण्णांसहीत अनेकजणांना त्याचे श्रेय असते. खरेच अण्णा वा अन्य कोणाला मोदींच्या पंतप्रधान होण्याचे इतके श्रेय घ्यायचे वा द्यायचे असेल, तर नोटाबंदी वा जीएसटीसह विविध बाबतीतले खापर एकट्या मोदींच्या माथी कशाला फ़ोडायचे? जे कोणी २०१४ च्या विजयाचे शिल्पकार आहेत, त्यांनीही तितक्याच उत्साहात पुढे येऊन आमच्याच पापामुळे असा त्रास झाला, म्हणून जगाची माफ़ीही मागण्याचे औदार्य दाखवायला हवे होते. पण तसे सहसा घडत नाही. कारण श्रेयाचे सगळे मानकरी असतात आणि जबाबदारीची वेळ आल्यावर प्रत्येकजण पाय काढता घेत असतो. उलट अशी जबाबदारी आपल्या शिरावर घ्यायला तयार असतो, त्याच्याकडे सामान्य माणूस म्हणूनच नेता म्हणून बघत असतो. पण सध्या अण्णांच्या उपोषणाच्या निमीत्ताने काही गोष्टी स्पष्ट करणे अगत्याचे ठरेल. लोकपाल आंदोलन चालू होते, तेव्हा मोदींनी त्याला पाठींबा तरी दिला होता काय? पुढे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मोदी उतरले, तेव्हा अण्णांनी तरी त्यांचे समर्थन केले होते काय? नसेल तर अण्णाच्या उपोषणामुळे मोदी पंतप्रधान पदावर आरुढ झाल्याच्या वल्गना निव्वळ धुळफ़ेक आहे. दिशाभूल आहे. वास्तविक तेव्हा अण्णाही मोदी विरोधातच होते.

पहिल्या म्हणजे जंतरमंतर येथील प्रासंगिक उपोषणाने त्या आंदोलनाचा आरंभ झाला होता आणि त्यात अनेक स्वयंसेवी संस्था सहभागी झालेल्या होत्या. त्याची सांगता झाल्यावर अण्णा एका जागी म्हणाले होते, विकास कसा असतो, ते गुजरातला जाऊन बघा. ह्या विधानावरून त्यांच्या स्वयंसेवी पाठीराख्यांची तारांबळ उडालेली होती. अण्णा राजकीय प्रचार करतात, असा गदारोळ करीत मेधा पाटकर यांच्यासह अनेकांनी लोकपाल आंदोलनातून बाजुला होण्याचा निर्णय घेतला होता. मग अण्णाही आपले शब्द सावरत मोदी विरोधाची भाषा बोलू लागले होते. त्यामुळे २०१४ च्या शर्यतीमध्ये अण्णांचा आशीर्वाद घेऊन मोदी सत्तेपर्यंत पोहोचल्याचा दावा फ़क्त दिशाभूल करणारा आहे. अण्णांचे तात्कालीन आंदोलन ज्या कारणाने यशस्वी झाले होते, त्याचे खरे श्रेय मनमोहन सिंग व सोनिया गांधींना होते. तितकेच मोदींच्या विजयाचे श्रेयही त्याच दोन महानुभावांचे होते. या दोघांनी व त्यांच्याभोवती जमा झालेल्या टोळक्याने देशात जे अराजक माजवलेले होते, त्यामुळे लोकमत कमालीचे युपीए व कॉग्रेस विरोधात झालेले होते. ते समजून घेऊन त्यावर फ़ुंकर घालण्यापेक्षा त्यांनी दडपशाहीचा मार्ग अवलंबिला. त्याची जी तीव्र प्रतिक्रीया तात्काळ उमटली, त्याने अण्णांना महात्मा करून टाकलेले होते. तरीही त्या नाराजीला ओळखून वागण्याचे वा सुधारण्याचे कुठलेही प्रयत्न कॉग्रेस नेत्यांनी अजिबात केले नाहीत आणि पर्यायाने सत्ताबदलाचे वारे वाहू लागले. त्याचे वादळ व चक्रीवादळ करण्याची किमया मोदींनी आपल्या प्रचारातून केली. त्यात अच्छे दिन वा इतर आश्वासनांमुळे सत्तापरिवर्तन झाले. थोडक्यात मोदी पंतप्रधानपदी पोहोचण्यासाठी शेकडो कारणे व निमीत्ते झालेली आहेत. त्यापैकी कोणा एकाने श्रेय घेण्याचे अजिबात कारण नाही, की आपला महिमाही सांगण्याची गरज नाही. ज्या अण्णा समर्थकांना असे वाटते, ते मुर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत.

खरे तर अण्णांच्या यशाचे वा महात्म्याचे मोठे श्रेय सोनिया व मनमोहन सिंग यांना आहे. अण्णांनी कधी ते श्रेय त्या दोघांना दिले आहे काय? देशात इतके मोठे अराजक माजवायचे आणि जनतेला सैरभैर करून टाकायचे. पुढे त्यावर अण्णा उपोषणाला बसले असताना जनतेच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे अण्णांवर पोलिसही घालायचे. याचे श्रेय अण्णांचे नक्कीच नाही. सभोवार वातावरण चिघळलेले असताना ते शांत करण्याचे प्रयास युपीएने केले असते, तर अण्णांच्या आंदोलनाला इतकी प्रसिद्धी वा प्रतिसाद मिळाला असता काय? पण अण्णांनी एकदाही त्या दोघांचे वा कॉग्रेसचे आभार मानलेले नाहीत. उलट मोदींकडे बघता येईल. त्यांनी अनेकदा आपल्या यशाचे श्रेय राहुल-सोनिया व मनमोहन सिंग यांना दिलेले आहे. ते वास्तव आहे. युपीएने इतका वाईट कारभार केला नसता वा अराजक माजवलेच नसते, तर देशभरात मोदींना इतका जबरदस्त प्रतिसाद कशाला मिळाला असता? गुजरातमधे मोदींनी कितीही विकास केलेला असला, म्हणून त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला देशाच्या कानाकोपर्‍यातून इतका प्रतिसाद मिळणे निव्वळ अशक्य होते. पण मोदींना पंतप्रधान करूनच थांबायचे, असा चंग बांधलेल्या कॉग्रेस शासनाने त्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण केली. त्याचा लाभ केजरीवाल यांनी जितका उठवला, त्याच्या अनेकपटींनी मोठी संघटना हाताशी असलेल्या मोदींनी देशव्यापी राजकीय लाभ घेतला. म्हणूनच अण्णांमुळे मोदी सत्ता मिळवू शकले, ही निव्वळ धुळफ़ेक आहे. म्हणूनच यावेळी सरकारने अण्णांची दखल घेतली नाही, तर शिव्याशाप देण्यात काही अर्थ नाही. अण्णांची इतकीच राजकीय महत्ता असती, तर मोदीच कशाला, त्यापुर्वीच्या युपीए सरकारनेही त्यांच्यासमोर तेव्हाच लोटांगण घालले असते. अरेरावी करून आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला नसता. सोनियांची मदार मग कोणावर होती?

भले आपल्या विरोधात कितीही लोकमत गेलेले असले आणि आपला कारभार उत्तम नसला, तरी आपल्याला मतदार झिडकारू शकत नाहीत, अशी मस्ती कॉग्रेस पक्षाला इतक्या टोकाला घेऊन गेलेली होती. निवडणूक चाचणी शास्त्रामध्ये त्याला ‘टिना’ घटक म्हणतात. त्याचा अर्थ अन्य कोणी पर्याय नाही, म्हणून होणारी निवड. २००९ साली त्याच कारणास्तव युपीएला दुसर्‍यांदा लोकांचा कौल मिळाला होता. तो उत्तम कारभारासाठी नव्हता. सोनिया मनमोहन यांचा कारभार उत्तम नसला तरीही त्यांना हटवल्यास पुढे काय? या प्रश्नाचे उत्तर जनतेपाशी नव्हते. कोणी अन्य विरोधी पक्ष त्याचे उत्तर देण्यास पुढे सरसावलेला नव्हता. तसे बाकीचे विरोधी पक्ष सरकारला शिव्याशाप देत असले तरी पुन्हा पुरोगामी म्हणून त्यांच्याच पाठीशी उभे रहात होते आणि एकमेव खरा पर्याय असलेल्या भाजपाकडे अडवाणी यांचे दुबळे नेतृत्व होते. त्यापेक्षा असलेले मनमोहन सोनिया लोकांनी चालवून घेतलेले होते. २०१३ नंतर तसा पर्याय देण्याची हिंमत करीत मोदी पुढे सरसावले आणि लोकांनी त्यांना पर्याय म्हणूनच स्विकारले. अण्णांचे आशीर्वाद घेऊन मोदी पुढे आले नव्हते. युपीएविरोधी लाटेवर स्वार होऊन त्यांनी आपली प्रचार मोहिम हाती घेतलेली होती. म्हणूनच आता पुढल्या वर्षी काय होईल याचे उत्तर २००९ सालात शोधणे भाग आहे. मोदींनी लोकाच्या अपेक्षा पुर्ण केल्या नाहीत, असे विश्लेषणातून सांगितले जात असले, तरी मोदींना पर्याय म्हणून काही समोर आणलेला नाही. त्यामुळे मोदी सरकारविषयी भासवले जात तितकी नाराजी जनमानसात नाही. २०११ च्या तुलनेत निम्मे नाराजी असती, तरी रामलिला मैदानातल्या उपोषणाने मोदींचे धाबे दणाणले असते. बाकीच्यांची गोष्ट सोडून द्या, मोदीच धावत तिथपर्यंत आले असते आणि हातापाया पडून त्यांनी अण्णांसमोर शरणागती पत्करली असती. त्याची कारणे अण्णा समर्थकांनी शोधली तरी त्यांना सत्याचा साक्षात्कार होऊ शकेल.

6 comments:

  1. अण्णा हे दिल्ली करांच्या द्रुष्टीने बाहेरचे , जोपर्यंत तिथल्या कोणाचा पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत उपोषण successfull होण्याचे प्रमाण फार कमी होते .
    त्याचप्रमाणे नरेंद्र मोदींनी घेतलेले निर्णय लोकांनी 100%स्वीकारले असल्यामुळे अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा मिळू शकला नाहि .

    त्याचप्रमाणे आत्ता विरोधक फक्त विरोध करत आहेत .त्यांच्याकडे कोणताही कार्यक्रम नाही .
    मोदी पंतप्रधान झाले हे कॉंग्रेसचा बेमूवर्तपणा , स्वतःचा कार्यक्रम व करून दाखवीलेला विकास यामुळे .

    ReplyDelete
  2. मुद्देसूद मांडणी आणि सत्य परिस्थिती वरील विश्लेषण

    ReplyDelete
  3. Bhau kiti Modi chi prashansha karnar?. Anna ni vatavaran nirmiti keli tyacha labh Kejriwal ani Modi yanhi vathavala ani hi vatavaran nirmiti pramukhyane uttar bhartat ch nirman zhali. Baki desha chya kana koparyatun modi vijaya sathi kontahi labh milala nhavta.

    ReplyDelete
    Replies
    1. पहिल्या वाक्यात तुम्ही म्हणताय मोदींची किती प्रशंसा करताय आणि शेवटच्या वाक्यात म्हणताय उत्तर भारत सोडून कुठेच मोदी विजयासाठी लाभ मिळाला नव्हता..याचा अर्थ उरलेल्या प्रदेशात मोदींनी विजयासाठी परिश्रम केले असाच होतोय.

      Delete
    2. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक उत्तर भारतात येतात काय

      Delete
  4. Bhau sadhyachi deshatil patristhiti kay ahe he karnatak nivadnuk zalyavar samjel ase vatte. Karan donhi paksh ata samn reshevar ahet. Baghuya kon jinkatay

    ReplyDelete