Tuesday, November 13, 2018

त्यांना सत्य गवसले आहे



हेनरीख हायने नावाचा जर्मन कवी विचारवंत आहे. त्याचे एक वचन प्रसिद्ध आहे. तो म्हणतो, ‘आपल्याला अंतिम सत्य गवसले आहे असा ज्यांना भ्रम झालेला असतो, ते लोक आपले सत्य सिद्ध करण्यासाठी बेधाडक धडधडीत असत्य बोलू लागतात.’ कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांची मागल्या तीनचार महिन्यातली विविध वक्तव्ये बघितली, ऐकली व गंभीरपणे समजून घेण्याचा प्रयत्न केला; की हायनेचे शब्द पटतात. राहुल गांधींना अंतिम सत्य गवसले असल्याचे सहज लक्षात येऊ शकते. राफ़ायलपासून जगातल्या कुठल्याही बाबतीत राहुल गांधींचे ज्ञान अपुर्व आणि संपुर्ण स्वरूपाचे आहे. अन्यथा त्यांना इतक्या ठामपणे बोलता आलेच नसते. मध्यंतरी राहुल गांधी मध्यप्रदेश विधानसभेच्या निवडणूकांसाठी कॉग्रेस उमेदवारांचा प्रचार करायला गेलेले होते. त्यांनी ठामपणे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या भावाचे नाव व्यापम घोटाळा व पनामा पेपर्समध्ये आल्याचे छातीठोकपणे सांगून टाकले. त्याच्याही पुढे जाऊन पाकिस्तानचे माजी पंतप्रधान पनामा पेपर्समध्येच नाव झळकल्याने तुरूंगात जाऊन पडल्याचाही संदर्भ राहुलनी नेमका दिला. मग त्यांचे अगाध ज्ञान चुकीचे कसे मानता येईल? सहाजिकच राहुलभक्तांनी विनाविलंब गदारोळ सुरू केला आणि चौहान यांचे पित्त खवळले. ताबडतोब शब्द मागे घेतले नाहीत, तर राहुल यांच्यावर बदनामीचा खटला भरण्याचा इशारा त्यांनी देऊन टाकला. सत्य बोललेले सख्ख्या आईला आवडत नसेल, तर राहुलचे ‘सत्य’ चौहानांना कसे आवडावे? पण राहुलनीच माघार घेतली आणि एका महान सत्याची भृणहत्या होऊन गेली. कारण राहुलनी चौहान यांच्या इशार्‍यासमोर सपशेल नांगी टाकली आणि आपल्याला त्या संदर्भातले काहीच ठाऊक नसल्याचेही कबुल करून टाकले. पण मग कशातले नेमके काय राहुल गांधींना ठाऊक आहे? ते सामान्य लोकांना कसे उमजावे? की त्यांना हायनेच्या उक्तीतले अंतिम सत्य गवसले असे मानावे?

मध्यप्रदेशात भाजपाच्या विरोधातला प्रचार करताना आरोप करणे स्वाभाविक आहे. पण चौहान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात जमिन अस्मानाचा फ़रक आहे. मागल्या सोळा वर्षात सोनियांनी आपल्या सुपुत्रासाठी घरचा अभ्यास जितका घेतलेला नसेल, तितकी मेहनत गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या मोदींसाठी घेतलेली होती. त्यामुळे अशा अंतिम सत्य गवसलेल्या आरोपांना उत्तरे देण्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष करावे, हा धडा मोदींनी नेमका शिकून घेतलेला आहे. सहाजिकच त्यामुळे त्यांना थेट पंतप्रधान पदापर्यंत मजल मारता आली. सोनियांनी आपलेच सुपुत्र राहुल यांच्यावर तितकी मेहनत घेतली असती, तर त्यांना चौहान यांच्या धमकीला घाबतण्याचे काही कारण उरले नसते. त्यांनी अंतिम सत्य बोलण्याचा उद्योग केला नसता. पण तो केला व नंतर आपल्याला कशातलेच काही कळत नाही आणि भाषणात अनेक संदर्भ इकडचे तिकडे होऊन जातात, अशी कबुली राहुलना द्यावी लागली. अर्थात जी गोष्ट व्यापम वा चौहान यांच्यावरील आरोपांची आहे, तीच तशीच राहुलनी आपल्या भाषणात वेळोवेळी सांगितलेल्या अंतिम सत्याची आहे. कोणीही येऊन मोदी विरोधात काहीही खुळ्यासारखे सांगितले, तरी राहुलना तेच अंतिम सत्य असल्याचा साक्षात्कार होतो आणि ते जगाला ज्ञानाचे डोस तात्काळ पाजू लागतात. आता त्यासाठी राहुल यांना जागतिक किर्ती प्राप्त झाली असून, फ़्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांपासून भारताला राफ़ायल विमाने पुरवणार्‍या कंपनीच्या प्रमुखापर्यंत; सगळेच राहुलना खोटे पाडू लागले आहेत. पण त्याची पर्वा करण्याचे काहीही कारण नाही. राहुलना अंतिम सत्य गवसले आहे आणि ते सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांनी शतायुषी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून आपल्या शिरावर घेतलेली आहे. परिणामी त्यांना रोजच्या रोज सभांमध्ये वा पत्रकारांना ज्ञानदान करताना अंतिम सत्य बोलणे भाग नाही का? ते सिद्ध होण्यासाठी राहुल खोटे बोलते तर नवल काय?

नोव्हेंबर महिन्याच्या आरंभी राहुलनी पुन्हा एकदा राफ़ायलच्या बाबतीत अंतिम सत्य पत्रकार परिषदेत सांगितले आणि मग हेनरीक हायनेच्या जर्मन देशाच्या शेजारी असलेल्या फ़्रान्सच्या एका मोठ्या कंपनीच्या प्रमुखाने राहुल गांधी यांच्याप्रमाणे आपल्याला खोटे बोलण्याची सवय नसल्याचे पत्रकारांना सांगून टाकले. राहुल खोटे उगाच बोलत नाहीत. त्यांना राफ़ायलचे अंतिम सत्य गवसलेले आहे. ते त्यांना खरे वाटलेले असेल तर खरे ठरवण्य़ासाठी धडधडीत खोटे बोलत रहावे लागले, तर चुक कसे म्हणता येईल? राफ़ायलमध्ये कुठलातरी भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यात पंतप्रधान मोदींनी सरकारी तिजोरीतले ३० हजार कोटी रुपये उचलून अनिल अंबानींच्या खिशात टाकलेले आहेत. हे राहुल गांधींना सापडलेले अंतिम सत्य आहे. एकदा हे अंतिम सत्य मानले, मग त्यासाठी कुठली कागदपत्रे वा पुराव्याची गरज नसते किंवा साक्षीदाराचीही गरज उरत नसते. रस्त्यावरचा कोणीही काहीही निराधार बोलला तरी, तो भक्कम सज्जड पुरावा होत असतो. कारण सत्य सिद्ध होण्याशी सर्व मतलब असतो. सत्य काय आहे त्याच्याशी कोणाला कर्तव्य असते? हायने जसा जर्मन विचारवंत होता तसाच एक जर्मन राजकारणी होता. त्याचे नाव गोबेल्स होते. त्याचेही एक विधान खुप प्रसिद्ध आहे. एखादे असत्य शंभर वेळा बिनदिक्कतपणे सांगत राहिले; मग लोकांना तेच सत्य वाटू लागते. बहुधा राहुलना मातोश्रींनी त्याच गोबेल्सची शिकवणी लावलेली असावी. अन्यथा त्यांनी इतका ‘सत्याचा आग्रह’ धरून आपण गांधीच असल्याचे सिद्ध करण्याची काहीही गरज नव्हती. मागल्या साडेचार वर्षामध्ये त्यांना पक्षाची संघटना उभारून भाजपाला २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत मोठे आव्हान उभे करता आले असते. पण गांधीवादी परंपरेच्या आहारी जाऊन राहुलनी अंतिम सत्याचा ध्यास घेतलेला आहे. हायने व गोबेल्स यांच्या शिकवण्या त्यांना कुठे घेऊन जातात, ते आणखी आठ महिन्यात समोर आलेले असेल.

खरे तर राहुल यांना कोणी गंभीरपणे घेत नाही. पण बिचार्‍या विरोधी पक्षांची भलतीच गोची होऊन गेलेली आहे. त्यांना राहुलखेरीज पर्याय राहिलेला नाही. मागल्या अनेक वर्षात आपली बिगर कॉग्रेसवादाची भूमिका सोडून त्यांनीच पायावर धोंडा पाडून घेतला आहे. आपली मूळ बिगरकॉग्रेसी राजकारणाची परंपरा चालवताना त्यांनीच पुरोगामीत्वाचे नाटक रंगवले नसते आणि भाजपाला वाळीत टाकण्य़ाचा खुळेपणा केला नसता, तर भाजपाला आपले हातपाय इतके सर्वदुर पसरण्यासाठी मोकळी जमिन मिळाली नसती/ कॉग्रेसला संजिवनी मिळताना पुरोगामीत्व मिरवणारे असे केविलवाणे होऊन गेले नसते. एका बाजूला कॉग्रेस नेस्तनाबुत झाली असती आणि दुसरीकडे भाजपाला देशव्यापी होण्याची संधीही मिळू शकली नसती. तसे झाल्यामुळे पुरोगामी म्हणवणार्‍या पक्षांना यापुर्वी सोनियांची सत्ता मानावी लागली नसती. आज राहुलच्या वेडसरपणाचे खुळे समर्थनही करावे लागले नसते. एखाद दुसर्‍या राज्यात ज्यांचे अस्तित्व किंवा प्रभाव आहे, त्यांना एकत्र येताना दुबळ्या कॉग्रेसला मोठा पक्ष म्हणून स्विकारावे लागते आहे आणि पर्यायाने राहुल गांधी यांचे नेतृत्व मान्य करण्यावर महागठबंधन उभे राहू शकणार आहे. तसेच करायचे असेल तर पुरोगामी पक्षांनाही राहुलचे अंतिम सत्य मान्य करावे लागणारच. मग राफ़ायलच्या सापळ्यात अडकण्याला पर्याय नाही. सहाजिकच इतके पाठबळ मागे असताना राहुल गांधींनी माघार घ्यायचे काही कारण नाही. त्यांनी राफ़ायलच्या विमानात बसूनच विरोधकांचे नेतृत्व खंबीरपणे चालविले आहे आणि त्याची किंमत अखेरीस या विरोधी पक्षांना मोजावी लागणार आहे. कारण आगामी लोकसभेत कॉग्रेसचे संख्याबळ आणखी घटू शकत नसल्याने वाढणार आहे आणि भाजपा घटण्याची शक्यता नसल्याने दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या वाढीव जागांसाठी पुरोगामी व अन्य पक्षांना आपापल्या जागा मोकळ्या करून देण्याखेरीज पर्याय नाही. कारण राहुल गांधींना गवसलेले अंतिम सत्य सतराव्या लोकसभेचे वास्तविक चित्र रंगवणार आहे.

9 comments:

  1. भाउ खरतर राहुलचा बेतालपणा किंवा काही म्हना आणि त्याचा पाठीराखा करनारे पुरेगामी लोकांची कसरत फार मजा आणते पुरोगामी म्हणे बु्द्धिवान असतात त्यांच्या बु्द्धिचा किस राहुल छान पाडतात

    ReplyDelete
  2. या पुरोगामी पक्षांची मजाच वाटते. स्वातंत्र्यानंतर पहिली अनेक वर्षे काँग्रेसविरोधी जवळपास सगळी जागा या पक्षांनी व्यापली होती. जनसंघ हा एक मार्जिनल पक्ष होता.पण काँग्रेसला विरोध करणे ही जबाबदारी भगवान श्रीकृष्णाने (त्याच्यावर कितीही विश्वास नसेल तरी) आपल्यावरच टाकली आहे असा स्वत:च गैरसमज करून घेतल्याने सुरवातीला काँग्रेसला रोखायला म्हणून जनसंघ आणि नंतर भाजपशी हातमिळवणी करण्यात यांना काही गैर वाटले नाही. यांच्यातील समाजवाद्यांचा जन्म गेला एकमेकांशी भांडण्यात. समाजवादी विचारांच्या पक्षांमध्ये आतापर्यंत किती वेळा फूट पडली असेल आणि ते किती वेळा एकत्र आले असतील याची मोजणी करणे कोणाही मर्त्य मानवाला शक्यच नाही. आणि काँग्रेसविरोधाच्या नावावर ज्या जनसंघ-भाजपशी हातमिळवणी केली तो पक्ष मात्र केडर बेस्ड आणि एकजिनसी. सतत भांडून भूस पाडणाऱ्या पुरोगाम्यांपेक्षा जनतेला जनसंघ-भाजप विरोधी पक्ष म्हणून अधिक विश्वासार्ह वाटले असतील तर त्यात काहीही आश्चर्य नाही. त्यातून झाले असे की या पुरोगाम्यांनी जनसंघ-भाजपचा उंट आपण होऊन आपल्या तंबूत घेतला आणि स्वत:लाच तंबूबाहेर पडायची वेळ त्यांच्यावर आली.

    नंतर भाजप मोठा झाल्यावर भाजपला रोखणे ही जबाबदारी भगवान श्रीकृष्णाने केवळ आपल्यावरच टाकली आहे असा गैरसमज परत एकदा पुरोगाम्यांनी करून घेतला आणि भाजपविरोधात काँग्रेसशी बिनदिक्कत हातमिळवणी केली.

    सुरवातीला काँग्रेसविरोधात जनसंघ-भाजपशी हातमिळवणी करून या पुरोगाम्यांनी आपले प्रमुख विरोधी पक्ष हे स्थान गमावले. आता भाजपविरोधात काँग्रेसशी हातमिळवणी करून हे पुरोगामी आपल्या राजकारणातील स्थानावरच घाला घालत आहेत.

    हा प्रकार नेत्यांपुरता मर्यादित नाही तर फेसबुक आणि इतर ठिकाणच्या स्वयंघोषित पुरोगामी असलेल्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला आहे. आजही राहुल गांधींनी मोदींविरोधात काहीतरी वेडगळ आरोप केले की मुळातल्या काँग्रेस समर्थकांना होत असेल त्याच्या चौपट आनंद या पुरोगाम्यांना होतो. इतकी वर्षे आणीबाणीला आमच्या पूर्वसुरींनी अगदी प्राणपणाने विरोध केला म्हणून अभिमानाने सांगणाऱ्या या लोकांना आणीबाणी हे अनुशासन पर्व होते हा दृष्टांत आता झाला आहे. याला काय म्हणावे? या सगळ्या प्रकारातून जर का कोणाचा फायदा झाला तर काँग्रेसचा होणार आहे आणि तो आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून होणार आहे हे यांना समजत नाही का?

    हे पुरोगामी म्हणजे स्वत:ला कितीही तत्वनिष्ठ समजत असतात, आपण कोणीतरी फार मोठे ग्रेट असेही त्यांना वाटत असते. तरी सत्य परिस्थिती ही आहे की ते देवळातील एखाद्या घंटेप्रमाणे असतात. कोणीही येऊन त्यांना वाजवून पुढे जातो आणि पुढे गेल्यावर ती घंटा तिथेच वर्षानुवर्षे लटकत आहे याची दखल घ्यायची तसदीही कोणी घेत नाही.

    ReplyDelete
  3. Shivraj Chauhan yanhya mulavar aarop kele hote, bhavavar nahi

    ReplyDelete
  4. Bhau
    yetya loksabhet cong Chya jaga kami honar nahit he kase?

    Mazya mate cong going to loose Amethi / Raybareli this time. Lets see.

    ReplyDelete
  5. भाऊ, करोडोंपेक्षा अधिक लोकांपर्यंत तुमचं लिखाण पोहोचलं आहे आता वेळ आली आहे ती युट्युब सारख्या प्रभावी माध्यमाचा वापर करून मराठी/हिंदीतून आपले विचार लोकांसमोर मांडण्याची म्हणजे कमी वेळेत अधिक प्रभावीपणे आपले विचार अधिक लोकांपर्यंत पोहोचवता येतील. साधा ट्रायपॉड आणि स्मार्टफोन वापरून ह्या नवीन माध्यमाचा वापर करता येतो आणि एका रिसर्च नुसार पुढच्या काही वर्षात वेब इंडस्ट्री टेलिव्हिजन इंडस्ट्रीला मागे टाकणार आहे तेव्हा लवकरात लवकर याचा श्रीगणेशा करावा. एखादा ब्लॉग पब्लिश करण्याइतपत सोपे आहे. वर्तमानपत्रातून ब्लॉगकडे वळलात आता युट्युबचा सुद्धा श्री गणेशा होऊन जाऊदे..

    ReplyDelete
    Replies
    1. आम्ही वाट पाहतोय भाऊ,लवकर घेऊन या

      Delete
  6. भाऊ
    राहूल गांधीने सावरकरा विषयी चुकीचे बोल ले. आपल्या लेखातून आपण आढावा घ्या वा .दुसरा कोणी हिंमत करू शकत नाही.

    ReplyDelete
  7. एखादे यू-ट्यूब चैनल सुरु केले पाहिजे भाऊ...

    ReplyDelete
  8. भाऊ खरंच तुमचे अभ्यासपूर्ण विश्लेषण यूट्यूबवर पहायला आवडेल...

    ReplyDelete