Tuesday, November 20, 2018

केजरीवाल का तिखा लाल

Image result for kejriwal at rajghat

काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्या कार्यालयातून बाहेर पडत असताना कोणीतरी त्यांच्यावर मिरची पुड फ़ेकल्याची बातमी आली आणि पाच वर्षापुर्वी ज्या घटना घडत होत्या, त्याचे स्मरण झाले. तेव्हा केजरीवाल किंवा त्यांचे निकटवर्तिय कोणी आप नेते कुठे जातील, तिथे त्यांच्यावर शाई फ़ेकण्याचा सपाटा लागलेला होता. दिल्ली असो किंवा वारणाशी असो, तिथे कोणी तरी गर्दीतून अकस्मात पुढे घुसायचा आणि केजरीवाल यांच्या अंगावर शाई फ़ेकून अटक करून घ्यायचा. कधीतरी त्याला आपचे कार्यकर्ते यथेच्छ झोडपूनही काढायचे. मग विनाविलंब टिव्हीच्या विविध कॅमेरासमोर आपचे प्रवक्ते येऊन भाजपावाल्यांनीच तो हल्ला केल्याचे तावातावाने कथन करू लागायचे. केजरीवाल व शिसोदिया वगैरे मंडळी तशा माखल्या तोंडाने व रंगलेल्या कपड्यानिशी आपल्या व्यासपीठावर जाऊन भाषणे देत भाजपाच्या नावाने शिव्याशाप देण्याचा उद्योग सुरू करायचे. हळुहळू वाहिन्यांनाही त्याचा कंटाळा आल्यामुळे लोकसभेच्या निकालानंतर शाई फ़ेकण्याचे प्रकार थंडावलेले होते. मजेची गोष्ट म्हणजे त्या निकालानंतर केजरीवाल कुठेही कसेही फ़िरत होते आणि लोकांमध्ये मिसळत होते. पण विधानसभेच्या निवडणुका लागण्यापर्यंत पुन्हा कोणी त्यांच्या वाटेला शाई घेऊन गेला नव्हता, की कुणावर आरोप करायची सवड आपनेत्यांना मिळालेली नव्हती. आता त्यात प्रगती झालेली दिसते, शाईच्या बाजी कोणाला नवा काही पदार्थ वापरण्य़ाची बुद्धी झालेली आहे. येत्या काही दिवसात किंवा लोकसभेच्या निवडणूका होईपर्यंत अनेकदा केजरीवाल किंवा अन्य आप नेत्यांवर आता मिरची पुड वा अन्य काही मसाल्याचे पदार्थ फ़ेकण्याचे प्रकार वाढत जातील. कारण अशा बातम्यांना वाहिन्यांच्या बाजारात खुप मागणी असते. सहाजिकच त्याचा पुरवठा करण्याचे कंत्राट आम आदमी पक्षाने घेतलेले असेल तर असे प्रकार वाढण्याला पर्याय नाही.

तेव्हा म्हणजे मागल्या लोकसभेपुर्वी केजरीवाल यांनी अशी अनेक नाटके रंगवली होती. त्यांना त्यातून वारेमाप प्रसिद्धीही मिळालेली होती. शाईतून एक नवखा पुढारी थेट देशाचा पंतप्रधान व्हायला निघाला होता आणि वाहिन्यांच्या पत्रकारांनी आम आदमी पक्षाला भाजपाचा मुख्य प्रतिस्पर्धी बनवून कॉग्रेसला परस्पर निकालात काढले होते. पण सुदैवाने आपल्या देशात वाहिन्यांच्या वा पत्रकारांच्या मतांवर निकाल लागत नसल्याने कॉग्रेसचा जबरदस्त पराभव झाला, तरी देशातला तोच दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष म्हणून लोकसभेत निवडून आला. केजरीवाल यांच्या दिल्लीतल्या सर्व उमेदवारांना पराभवाची चव चाखावी लागली होती. देशात तर केजरीवाल यांच्या पक्षाने इतिहासात सर्वाधिक अनामत रकमा जप्त होणारा पक्ष म्हणून विक्रम साजरा केला होता. खुद्द केजरीवालही वाराणशीमध्ये मोदींच्या विरोधात पराभूत झाले होते. काही बाटल्या शाई आणि वारेमाप प्रसिद्धी त्यांना निवडणूकीत यश मिळवून देऊ शकली नाही. त्यामुळे पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा गुंडाळून ठेवत केजरीवाल पुन्हा दिल्लीची जमिन शोधत फ़िरू लागले होते. लौट के बुद्दू घरको आये, या उक्तीप्रमाणे त्यांनी आपले कार्यक्षेत्र दिल्लीपुरते मर्यादित करून विधानसभेची तयारी सुरू केली आणि चांगले यश मिळवले. मजेची गोष्ट म्हणजे त्या मध्यावधी विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात मोकाट फ़िरणार्‍या केजरीवाल यांच्यावर कोणीही पुन्हा शाई फ़ेकली नाही, की कुठली उचापत केली नाही. त्यानंतर थेट आता हा मिरची पुड फ़ेकण्याचा उद्योग झालेला आहे. याचा अर्थच आम आदमी पक्ष जुन्याच मार्गाने लोकसभेच्या तयारीला लागला असे म्हणावे लागेल. कारण असली काही नाटके तमाशे केल्याशिवाय केजरीवाल यांना प्रसिद्धी मिळत नाही आणि प्रसिद्धीच्या झोताबाहेर गेल्यावर त्यांना चैन पडेनाशी होते ना?

तेव्हा लोकसभेचे वेध लागलेले असताना एका धरण्याचा कार्यक्रम योजलेला होता. तिथे केजरीवाल नव्हते आणि त्यांचे अन्य सहकारी तिथे बसलेले होते. योगेंद्र यादव यांच्यावर असाच हल्ला झालेला होता. कोणीतरी थेट मंचावर अकस्मात आला आणि त्याने यादवांच्या तोंडाला काळे फ़ासले होते. मग तशाच रंगलेल्या तोंडाने यादवांनी वाहिन्यांना मुलाखती दिल्या होत्या, तर प्रवक्त्यांनी भाजपावर झोड उठवली होती. पुढे अधिक चौकशी झाली आणि कार्यकर्त्यांनी ज्याला झोडपून पोलिसांच्या ताब्यात दिलेले होते, तो त्यांच्याच पक्षाचा कोणी कार्यकर्ता असल्याचे निदर्शनाला आलेले होते. मग कशाच्या आधारावर आप प्रवक्त्यांनी भाजपा किंवा कॉग्रेसवर हल्ल्याचे आरोप केलेले होते? हेच कशाला अशाच एका निवडणूक प्रचार फ़ेरीत कोणीतरी एक उत्साही कार्यकर्ता केजरीवाल यांच्या उघड्या जिपच्या समोर आला आणि हार घालण्याच्या निमीत्ताने अगदी जवळ पोहोचला. हार घालून होताच त्याने केजरीवाल यांच्या कानशिलात सणसणित वाजवली होती. ती इतकी जबरदस्त होती, की केजरीवाल यांचा चेहरा सुजलेला होता. मग तसाच चेहरा घेऊन त्यांनी एक्दोन तास गांधी समाधी राजघाट येथे धरणे धरलेले होते. तपासाअंती तोही त्यांच्याच पक्षाचा कोणी कार्यकर्ता असल्याचे निष्पन्न झालेले होते. वारंवार असे प्रकार एकाच पक्ष वा नेत्याच्या बाबतीत घडू लागले आणि त्यात त्याचाच कोणी कार्यकर्ता असल्याचे उघड होऊ लागल्यावर अधिक काळ ते नाटक चालू शकले नाही. त्या नाटकाचे प्रयोग प्रेक्षकाअभावी वाहिन्यांनाही थांबवावे लागलेले होते. बहुधा म्हणूनच आता नव्या कलाकारांच्या संचात आणि नवी नेपथ्य रचना करून मिरची पुड हा खेळ सुरू झालेला असू शकतो. कारण असे हल्ले आम आदमी पक्ष व केजरीवाल सोडून अन्य पक्षांच्या वाट्याला फ़ारसे आलेले नाहीत. नाट्यमयता हा या नव्या पक्षाचा आत्मा राहिला आहे.

मागल्या लोकसभा निवडणुका जाहिर होण्याच्या बेताला केजरीवाल पक्षाचा प्रचार करण्यासाठी गुजरातला पोहोचले होते आणि अचानक त्यांनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदींची भेट मागितली. ती नाकारली गेल्यावर त्यांनी तिथेच तमाशा सुरू केला होता. आपण दिल्लीचे माजी मुख्यमंत्री असतानाही आपल्याला गुजरातचा मुख्यमंत्री तात्काळ भेट देत नाही, ह्याला ‘आम आदमी’ पक्षाचा नेता लोकशाहीचा अपमान ठरवून नाटक रंगवत होता. मग त्याच दरम्यान निवडणूक आयोगाने लोकसभेच्या मतदानाचे वेळापत्रक जाहिर केले आणि आचारसंहिता लागू झाली. तर आचारसंहितेचे कारण देऊन केजरीवाल यांच्यासोबत चाललेल्या तीसचाळीस गाड्यांचा ताफ़ा पोलिसांनी रोखला. तर त्याला भाजपाची दादागिरी ठरवून केजरीवालनी मोठा तमाशा केला होता. त्यांचे दिल्लीतले दोनतीनशे समर्थक भाजपाच्या पक्ष कार्यालयाजवळ जमा झाले आणि तिथे त्यांनी दगडफ़ेक सुरू केली. अशाप्रकारे त्या पक्षाने आपण गांधीवादॊ व अहिंसक असल्याची साक्ष दिली होती. त्याची किंमत त्यांना लोकसभा मतदानातून मोजावी लागली होतीच. पण नाट्यमयता ही केजरीवालांच्या रक्तात आणि आम आदमी पक्षाच्या डीएनएमध्येच सामावलेली आहे. त्यामुळे आता निवडणूकांचे वेध लागले असतील तर अशा नाटकांचे नवनवे अविष्कार पुढल्या काळात दिसणार आहेत. वाहिन्यांना नाट्यमयता हवीच असल्याने त्याला वारेमाप प्रसिद्धी मिळणारच. तेव्हा वाहिन्यांच्या प्रेक्षकांनीही तशा नाटकाची सवय लावून घेतलेली बरी. आज मिरची पुड टाकलेली आहे. उद्या सुहाना वा एमडीएच वगैरे मसाला कंपन्यांची जाहिरात केजरीवाल यांनाच मॉडेल म्हणूनही वापरू लागण्याची शक्यता कोणी नाकारू शकणार नाही. आम आदमी पक्षाचे नेते वा केजरीवाल यांच्या अंगावर फ़ेकलेली मिरची पुड म्हणजे आमचाच ‘एव्हरेस्टचा तिखा लाल’ असल्याची जाहिरात झळकली तर मला आश्चर्य वाटणार नाही. कदाचित कंपनी आपली जाहिरात बदलून ‘केजरीवालका तिखा लाल’ अशीही जाहिरात करू लागण्याची शक्यता आहे

6 comments:

  1. अजुन पण बरेचसे मिडीया अॅंकर केजरीवालचे पाठीराखे आहेत.इतके दिवस नाइलाजाने गप्प हेोते,केजरीवालने काही अस केल की लगेच एका सुरात बोलायला लागतात.खास करुन आज तक.इथ महाराष्ट्रात तर AAP नाहीये तरी लालुनचांगण चालु असत.

    ReplyDelete
  2. श्री एकदम सही शाल जोडीतलं, मला वाटत तुमच्या वर आचार्य अत्रे यांचा effect असावा

    ReplyDelete
  3. मस्तं केजरीवाल आणि कंपनीला चांगलच उघडं केले आहे. यावेळी कांही त्यांची डाळ शिजणार नाही हे नक्की

    ReplyDelete
  4. "आता निवडणूकांचे वेध लागले असतील तर अशा नाटकांचे नवनवे अविष्कार पुढल्या काळात दिसणार आहेत. वाहिन्यांना नाट्यमयता हवीच असल्याने त्याला वारेमाप प्रसिद्धी मिळणारच. तेव्हा वाहिन्यांच्या प्रेक्षकांनीही तशा नाटकाची सवय लावून घेतलेली बरी."
    .
    .
    .
    .
    .
    .
    27 नोव्हेंबर - आजकी ताजा खबर 'केजरीवालांच्या घरी जिवंत काडतुसांसह एकाला अटक - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी त्यांना भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तीकडे .32mm ची जिवंत काडतुसं सापडली आहेत. मोहम्मद इम्रानकडे जिवंत काडतूस सापडल्याने अरविंद केजरीवाल यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांच्यावर एका व्यक्तीने मिरची पूड फेकल्याची घटना घडली होती. या दोन प्रकरणांमुळे केजरीवालांच्या सुरक्षेत वाढ करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.' स्रोत - ABP Majha

    ReplyDelete