Tuesday, January 1, 2019

मायावतींच्या हाथीचे दात

mayawati cartoon के लिए इमेज परिणाम

नववर्षाच्या पहिल्या दिवशीच मायावतींनी मध्यप्रदेश व राजस्थानच्या कॉग्रेस सरकारांचा पाठींबा काढून घेण्याचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे त्या दोन राज्यातील सरकारांचे भवितव्य काय, असली चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे खरे तर सर्वच राजकीय पक्षांचे मनोरंजन झालेले असेल. कारण अशा धमक्या कृतीसाठी नसतात, तर जनतेसमोर उभा केलेला तो निव्वळ देखावा असतो. हे मायावती जाणतात इतकेच कॉग्रेसवालेही जाणून आहेत. त्याच्याही पलिकडे अशा इशार्‍यांनी सरकारे पडत नाहीत, हे भाजपावाल्यांनाही पक्के ठाऊक आहे. पण त्यावरून कथक वा भरतनाट्यम सुरू करणार्‍या माध्यमांची विश्वासार्हता संपलेली आहे. असे इशारे दोन राज्यांसाठी देताना मायावती खरेच गंभीर असतील, तर त्यांनी जे निमीत्त पुढे केले आहे, ते दोन राज्यांपुरते मर्यादित असायचे काही कारण नव्हते. राजस्थान मध्यप्रदेशात भारत बंदच्या आंदोलनात दाखल झालेले खटले मागे घेण्याची अट त्यांनी घातली आहे. तीच अट त्यांनी छत्तीसगडच्या कॉग्रेस सरकारला का घातलेली नाही? तर दोन राज्यात आपल्या पाठीब्यामुळे कॉग्रेस सत्तेत असल्याचा आभास त्यांना उभा करायचा आहे. पण व्यवहारात ती वस्तुस्थिती नाही. कारण मायावतींच्या पाठींब्यामुळे त्या दोन राज्यात कॉग्रेस सरकार बनवू शकलेली नाही, की कॉग्रेसने बसपाचा पाठींबाही कधी मागितला नव्हता. मग जो पाठींबा मागितला व दिलेला नव्हता, तो मागे घेण्याच्या धमकीत कितीसा दम असेल? नसेल तर त्या धमकावण्यातून मायावतींना काय सिद्ध करायचे आहे? पण असल्या तपशीलात जाण्याची आजच्या बुद्धीमान पत्रकार माध्यमांना गरज वाटत नाही. त्यांनी तात्काळ मायावतींचा डंका वाजवून कॉग्रेस भयभीत झाल्याचे काहूर माजवले आहे. वास्तवात कॉग्रेस बसपाच्या धमकीला भिक घालणार नाही, की भाजपावाले उतावळे होऊन सरकारे पडण्याच्या कामाला हातभार लावायला पुढे येणार नाहीत. मग मायावतींना त्यातून काय साधायचे आहे?

राजस्थानात कॉग्रेसचे बहूमत एका जागेने हुकलेले आहे आणि मायावतींना सहा आमदार निवडून आणणे शक्य झालेले आहे. म्हणूनच मायावती सोबत येऊनही बहूमताची जुळणी करणे तिथे भाजपाला बिलकुल शक्य नाही. मायावतींनी पाठींबा काढून घेतल्याने कॉग्रेसचे गेहलोट सरकार पडण्याची बिलकुल शक्यता नाही. तीच कथा मध्यप्रदेशची आहे. कॉग्रेसला बहूमतासाठी किरकोळ दोनतीन जागा कमी आहेत आणि मायावती समाजवादी अवघे तीन आमदार निवडून आणू शकले. त्याखेरीज बरेच अपक्ष आमदार दोन्ही राज्यात असून त्यांना सोबत घेऊन कॉग्रेसने दोन्ही राज्यात सत्ता संपादन केलेली आहे. मायावतींकडे कॉग्रेसने सरकार बनवताना वा बनवण्यासाठी कधीच वाडगा धरलेला नव्हता. त्यामुळे पाठींबा काढून घेण्याने काहीही होणार नाही, हे मायावतींना कळत नसेल काय? नेमके कळते. पण असले इशारे देऊन महागठबंधन वा मित्र पक्षांची कुठलीच कदर कॉग्रेस करत नाही, हा संदेश त्यांना अन्य पक्षांना द्यायचा आहे. लोकसभेपुर्वी महागठबंधनात कॉग्रेसला शिरजोर करू नका, असा संकेत मतदार व अन्य पक्षांना द्यायचा आहे. खरेच मायावतींना भाजपाला पराभूत करायचे असते, तर त्यांनी कर्नाटक व छत्तीसगडमध्ये कॉग्रेसशी निवडणुकपुर्व हातमिळवणी केली असती. तेच नाही तर राजस्थान मध्यप्रदेशातही जागावाटप केले असते. पण दोन्ही जागी त्यांनी निकाल आल्यावर कॉग्रेसला परस्पर पाठींबा दिला. आपला भाजपाविरोध दाखवायला तसा देखावा निर्माण केला. पण निवडणूकीपुर्वी मायावतींची रणनिती तिन्ही राज्यात कॉग्रेसला बहूमतापासून वंचित ठेवण्याची होती आणि लोकसभेतही कॉग्रेसला अधिक शिरजोर होऊ द्यायचे नाही, हा़च त्यांचा डाव आहे. त्यांना केंद्रात वा कुठेही अन्य पक्षाचे बिगरभाजपा मजबूत सरकार नको आहे, तर मजबूर सरकार आहे. हे मजबूर सरकार कसे असते, त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी ही धमकी दिलेली आहे. सरकार खरोखर पाडण्याचा तिच्याशी काडीमात्र संबंध नाही.

गेल्या वर्षाच्या आरंभी भीमा कोरेगावचा हिंसाचार घडल्यानंतर जो देशव्यापी बंदचा इशारा देण्यात आला होता. त्यात उपरोक्त राज्यात जे हिंसक प्रकार घडले त्यावर दाखल झालेले हे खटले आहेत. तेव्हा तिथे भाजपाची सत्ता होती आणि आता ती सत्ता बदलल्यानंतरही कॉग्रेस ते खटले कायम ठेवते आहे. म्हणजेच कॉग्रेस व भाजपा यांच्यात दलित नितीविषयी काडीमात्र फ़रक नाही, असा एक संदेश मायावतींना मतदाराला द्यायचा आहे. ज्या कोणी भाजपाविरोधात कॉग्रेसला मते दिली, त्यांच्या मनात किल्मिष घालण्याचा तो डाव आहे. इतके असूनही भाजपा विरोधात बहूमत हुकलेल्या कॉग्रेसला आपण उदार अंतकरणाने पाठींबा दिला होता. पण दलितांच्या न्यायासाठी आपण पाठींबा काढून घेतो, असा देखावाही त्यातून उभा करायचा आहे. मुळात तो पाठींबा जाहिर करतानाच मायावतींनी ती अट कशाला घातलेली नव्हती? तर त्यांच्या पाठींब्यासाठी कॉग्रेसची सत्ता अडलेलीही नव्हती. तो पाठींबाही एक देखावा होता आणि आताचा इशाराही निव्वळ देखावा आहे. पण मतदारासाठी तो इशारा असला तरी अन्य पुरोगामी पक्षांसाठी व महागठबंधनात जायला उत्सुक असलेल्या पक्षांसाठीही त्यात इशारा आहेच. सत्ता मिळाली मग कॉग्रेसला मित्र पक्षांची कुठलीही पर्वा नसते, असा त्यातला छुपा इशारा आहे. त्यात तथ्य नक्कीच आहे. २००९ नंतर डावी आघाडी, लालूंचा राजद किंवा राष्ट्रवादी इत्यादी पक्षांनी तो अनुभव घेतलेलाच आहे. पण आज मोदीविरोधात तेच अधिक उतावळेपणाने कॉग्रेसच्या समर्थनाला धावलेले आहेत. त्यांना जागवण्यासाठी मायावतींनी अशी भूमिका घेतलेली आहे. त्यातून सरकार पडण्याची म्हणूनच मायावतींना अपेक्षा नाही की कॉग्रेसला त्याची भितीही नाही. पण लोकसभेपुर्वी कॉग्रेस एकाकी पडावी आणि त्यांचे तथाकथित महागठबंधन आकाराला येऊ नये; ही मायावतींची खरी आकांक्षा आहे. त्यातून ही धमकी आकाराला आलेली आहे.

तीन आठवड्यापुर्वी लागलेले निकाल बघितले, तरी मायावतींची धमकी किती पोकळ आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो. खरेतर मायावतींनी आजवर अशा अनेक धमक्या दिल्या, पण त्याचा कधी उपयोग केलेला नाही. व्यक्तीगत कारणासाठी कॉग्रेसने मायावतींना विधानसभा वा संसदेत यथेच्छ वापर करून घेतला आहे. त्यात मायावतींना त्यांची योग्य जागा कॉग्रेसने वारंवार दाखवलेली आहे. उत्तराखंड वा हिमाचल प्रदेश विधानसभेत कॉग्रेसचे बहूमत हुकलेले असताना मायावतींनीच कॉग्रेसला वाचवलेले होते आणि एफ़डीआय विषयात मायावतींनी विरोधात भाषणे करून प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी कॉग्रेसचे समर्थन केलेले होते. ही त्यांची अगतिकता जाहिर आहे. म्हणूनच अशा धमक्या दिल्यानंतर मायावतींना कुठे कसे वाकवायचे, हे कॉग्रेस पुर्णपणे जाणून आहे. नसती तर त्यांच्यासमोर निवडणूकीपुर्वीच कॉग्रेसने लोटांगण घातले असते. मायावतींच कशाला सगळ्या पुरोगामी म्हणून मिरवणार्‍या लहानसहान पक्षांची अगतिकता व औकात कॉग्रेस पुर्णपणे जाणून आहे. हे लोक कितीही कॉग्रेसविरोधी बोलले तरी भाजपा वा संघाची बी टीम म्हटल्यावर शेपूट हलवित आपल्यामागे येऊन निमूट उभे रहाणार; याची सोनिया राहुलना खात्री आहे. मग त्यांनी मायावतींकडे पाठींबा मागितलाही नव्हता, तर तोच पाठींबा काढून घेण्याच्या धमकीला घाबरून जाण्याचे काय कारण आहे? अर्थात अशा धमक्यांना आपण घाबरत असल्याचे नाटक कॉग्रेसही रंगवणारच. कारण तितकीच मायावतींची किंमत कॉग्रेसला मोजावी लागते. मग स्वस्तातला सौदा कॉग्रेसने सोडावा कशाला? उत्तरप्रदेशात मायावती आपल्याला जवळ घेणार नाहीत आणि उर्वरीत राज्यात त्या भाजपासोबत जाऊ शकत नाहीत, याविषयी कॉग्रेस निश्चींत असल्यावर धमक्यांचा पाऊस पडला म्हणून कशाला चिंता करायची? म्हणतात ना? हाथीके दात दिखानेके अलग और खानेके कुछ और!

1 comment: