Thursday, January 17, 2019

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

mamta maya rahul के लिए इमेज परिणाम

निवडणूक लढताना जिंकण्यासाठी मैदानात उतरावे लागते. नुसते उमेदवार तर कोणीही उभे करू शकतो. मागल्या पाचसहा लोकसभा निवडणूकांचे निकाल तपासले, तर कुठल्याही राष्ट्रीय म्हणून ओळखल्या जाणार्‍या पक्षापेक्षा मायावतींच्या बहूजन समाज पक्षाने देशात सर्वाधिक उमेदवार लोकसभेसाठी उभे केले आहेत. २०१४ सालात त्यांच्या तुलनेत केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने तसाच विक्रम केला. पण असे पक्ष फ़क्त सर्वाधिक पराभूत उमेदवारांचेच नाहीत, तर सर्वाधिक अनामत रकमा गमावणारे पक्षही झाले आहेत. कारण नुसती अनामत रक्कम व अर्ज भरला, म्हणून कोणीही निवडणूकीच्या आखाड्यात उतरला, असे मानले जात असते. आजकाल रिऍलिटी शो नावाचा खेळ वाहिन्यांवर चालतो, तेव्हा त्याची जी प्राथमिक फ़ेरी कुठल्याही मो्ठ्या शहरात योजली जाते. त्यात हजारोच्या संख्येने उत्साही लोक सहभागी होत असतात. आपण उत्तम गायक वा कलाकार असल्याची धारणा त्यामागे असते. त्याचाही पोरखेळ काही प्रमाणात प्रक्षेपित केला जातो. समोर बसलेले परिक्षक अशा स्पर्धकाची यथेच्छ टवाळीही करताना आपण बघू शकतो. या प्रत्येकाला स्पर्धक मानले जात असते आणि अशा गर्दीला चाळणी लावून खर्‍याखुर्‍या स्पर्धेतल्या स्पर्धकांची निवड केली जात असते. ती निवड होईपर्यंत प्रत्येकजण आपणच देशका कलाकार वा इंडीयन आयडोल होणार असल्याचे दावे प्रतिदावे करायला मोकळा असतो. परंतु वस्तुस्थिती अशी असते, की त्यातले बहुतांश पहिल्या चाचणी फ़ेरीतच बाद होऊन जातात. विधानसभा लोकसभेच्या लढतीमध्येही असे हजारो उमेदवार असतात आणि प्रथम त्यांचा प्रयास कुठल्यातरी पक्षाकडून उमेदवारी मिळवण्याचा असतो. त्यात संधी मिळाली नाही तर ते दुसर्‍या पक्षातही गळ टाकून बसलेले असतात. पण कुठेच संधी मिळाली नाही, तर असे लोक अपक्ष वा बंडखोर म्हणूनही मैदानात उतरतात. यातून अनेक पक्ष आपले उमेदावार ठरवित असतात किंवा अनेकांना नाऊमेद करीत असतात. म्हणूनच यापैकी प्रत्येकाला विधानसभा लोकसभेचा उमेदवार म्हणता येत नाही.

राजकीय पक्षही काही निकष लावून यातल्या अनेकांना उमेदवारी देतात किंवा नाकारतात. ज्या पक्षाचा वारा असतो, त्याकडे अशा उमेदवारांचा प्रामुख्याने ओढा असतो. राजकीय पक्षही आपल्याला जागा जिंकून देऊ शकणार्‍या उमेदवाराच्या शोधात असतात. म्हणून तर अनेकदा पक्षात खुप राबलेल्या कार्यकर्त्याला डावलून नवख्या किंवा नवागताला पक्षाची उमेदवारी मिळत असते. पण हा झाला प्रत्येक पक्ष वा संघटनेने उमेदवारी देण्याचा प्रश्न. पक्षाला आपले उमेदवार नक्कीच जिंकतील याची खात्री नसते. म्हणूनच जिंकायच्या जागा ठरवून बाकी नुसत्या लढवायच्या जागा होत असतात. यात मायावती वा आम आदमी पक्षाने भरताड उमेदवार उभे केले तरी त्यांना जागा जिंकण्याशी कर्तव्य नसते. आपल्या लोकप्रियतेचा अंदाज घेण्यासाठी असे घाऊक उमेद्वार उम्भे केले जात असतात. त्यामागे वेगळेच गणित असते. आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी व जनतेला आपल्या पक्षाची ओळख करून देण्याचाही हेतू त्यामागे असतो. म्हणूनच कुठला पक्ष किती जागा गंभीरपणे लढवतो, वा लढऊ शकतो, यावर त्याला मिळणार्‍या यशाचे समिकरण मांडावे लागत असते. मग तो पक्ष असो वा आघाडी-युती केलेले मित्रपक्ष असोत. आज भाजपा सर्वात बलशाली पक्ष दिसत असेल. तीन दशकापुर्वी कॉग्रेसही तितकाच बलशाली पक्ष होता. बलशाली पक्षाला मित्रांची गरज कमी असते आणि दुबळ्या पक्षांना अधिक जागा जिंकण्यासाठी मित्रपक्ष आघाडीच्या कुबड्यांशिवाय चालताही येत नसते. म्हणूनच कोण जिंकणार या प्रश्नाचे उतर शोधताना बलाशाली पक्ष वा त्याच्या विरोधातल्या आघाडीतले पक्ष, यांचे राज्यनिहाय बळ किती, याचे गणित नेमके मांडावे लागते. तरच अंदाज बांधणे शक्य होत असते. त्यासाठी केंद्रीय बलशाली पक्ष आणि त्याच्या विरोधात उभ्या राहू शकणार्‍या मित्र-शत्रू पक्षांच्या आघाड्या यांची वर्गवारी आधी करावी लागत असते. महागठबंधन ही भाषा बोलायला छान आहे, पण ते जुळवून आणणे खुप अशक्य कोटीतले काम आहे. म्हणून मग एक नसतील तर किती आघाड्या उभ्या राहू शकतील, त्याचीही वर्गवारी अगत्याची बनुन जाते.   

१९९६ पासून केंद्रामध्ये आघाडीचे राजकारण खुप झाले आहे. त्यात निवडणूकपुर्व युत्या व आघाड्याही झालेल्या आहेत. पण नुसत्या आघाडीच्या बळावर सत्ता संपादन करण्यापर्यंत सहसा मजल मारली गेलेली नाही. २००४ सालात सोनियांनी युपीए बनवून सत्ता बळकावली असली, तरी त्यांनी केलेल्या निवडणूकपुर्व आघाडीला बहूमताचा पल्ला गाठता आलेला नव्हता. त्याच्याही आधी १९९८ सालात वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या एनडीए आघाडीला सर्वात मोठा गट लोकसभेत बनता आले. तरीही बहूमताचा पल्ला ओलांडता आला नाही. सत्ता संपादनासाठी त्यांना तेलगू देसमची मदत घ्यावी लागलेली होती. ती आघाडी १९९९ सालात मात्र बहूमतापर्यंत जाऊ शकली होती. तशीच २००९ सालात युपीए आघाडीतील पक्षांना बहूमताचा पल्ला ओलांडणे शक्य झालेले आहे. पण अशा कुठल्याही आघाडीला निर्विवाद बहूमत संपादन करण्याचे यश कधीच मिळाले नाही. त्यांची सरकारने आली व चालली, तरी धुसफ़ुस होत राहिली. आताही एनडीएमध्ये आलेले तेलगू देसमचे भाजपाशी बिनसले आणि त्या साडेचार वर्षापुर्वॊच्या आघाडीतले दोन पक्ष बाजूला झालेले आहेत. मात्र २०१४ मध्ये एक फ़रक पडला होता, तो एकाच पक्षाला बहूमत मिळण्याचा. तीन दशकानंतर प्रथमच मोदींनी भाजपाला सर्वाधिक जागा नव्हेतर स्पष्ट बहूमतापर्यंत पोहोचवले. परिणामी १९८० पर्यंत कॉग्रेस जसा एकहाती बलशाली पक्ष होता व त्याला कुठल्या मित्रपक्षाची गरज नव्हती; तशा स्थितीत भाजपा पोहोचला आहे. किंबहूना त्या काळात कॉग्रेस विरुद्ध उरलेले सगळे पक्ष, अशीच स्थिती आता आलेली आहे. पण आजही भाजपाला लोकसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढवण्याचा आत्मविश्वास मिळवता आलेला नाही आणि कॉग्रेस तर दोन दशकापुर्वीच तो आत्मविश्वास गमावून बसलेली आहे.

म्हणून तर कुठल्याही मित्रपक्षांचा अजून थांगपत्ता नसताना सगळे मिळू्न भाजपाला पराभूत करू अशी भाषा कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बोलत असतात, पण स्वबळावर लढू असे अजिबात बोलत नाहीत. भाजपाही तशी भाषा अजून बोलू शकलेला नाही. परिणामी येत्या लोकसभा निवडणूका कुठलाही एक पक्ष विरुद्ध उरलेले सगळे पक्ष, अशी होण्याची बिलकुल शक्यता नाही. भाजपा मोठा पक्ष असेल, पण तोही आघाडी असल्यासारख्या लोकसभेच्या आखाड्यात उतरणार आहे. त्यामुळेच लोकसभेच्या आखाड्यातली पहिली आघाडी म्हणून भाजपाकडे बघावे लागते. एनडीए म्हणजे सर्वात मोठा पक्ष भाजपा अधिक त्याचे जे उरलेसुरले मित्रपक्ष आहेत. त्यांच्या एकजुटीतून तयार होणारी ती राजकीय आघाडी होय. त्यात शिवसेना असेल किंवा नाही, याविषयी आजतरी शंका आहे. पण बाकी अनेक लहानपक्ष जरूर असतील. तेव्हा भाजपालाच पहिली आघाडी संबोधणे भाग आहे. तो पक्ष व त्याचे मित्रपक्ष सोडून मग उरलेल्या तमाम राजकीय वा प्रादेशिक पक्षांची राहुल म्हणतात, तशी महागठबंधन ही आघाडी होईल काय? तसे झाले तर एकास एक उमेदवार अशी थेट लढत होऊ शकते. पण तशी शक्यता निदान २०१९ चा वर्षारंभ होण्यापुर्वी तरी दिसलेली नाही. कारण भाजपा वा मोदींचे विरोधक मानल्या जाणार्‍या अनेक पक्ष व नेत्यांना केवळ मोदी विरोधासाठी कॉग्रेस वा राहुलच्या गोटात जायची इच्छा दिसत नाही. किंबहूना त्यापैकी काहीजण तितक्याच तीव्रतेने कॉग्रेस व राहुल विरोधातही बोलताना ऐकायला मिळतात. मग दुसरी आघाडी वा महागठबंधन कसे असेल? की एकापेक्षा अधिक मोदी विरोधातल्या आघड्या आकाराला यायच्या आहेत? असतील तर त्या कशा असतील व त्यात कोण कोण पक्ष समाविष्ट असतील? त्यांचे नेतृत्व कोणाकडे असेल? त्यांच्यात कशा लढती होतील आणि त्या कोणाला लाभदायक वा तोट्याच्या ठरू शकतील? ह्याचा उहापोह केल्याशिवाय लोकसभेची भाकिते करणे निव्वळ मुर्खपणा ठरू शकतो. विरोधी एकजुटीचा विषय म्हणूनच हास्यास्पद व पोरखेळ असतो. 

9 comments:

  1. नुसत्या युपी मध्येच तीन आघाड्या होतायत.

    ReplyDelete
  2. भाऊ अखिलेश आणि मायावती यांच्या नंतर चंद्राबाबू नायडू यांनी देखील काँग्रेस सोबत येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती करायला नकार दिला आहे अशा बातम्या आज चॅनेल्सनी दिल्या आहेत

    ReplyDelete
  3. पूर्वी मतदाराला पक्ष निवडायच्या बाबतीत अनेक पर्याय असत. आता त्याला महागठबंधन/आघाडी/युती इ. निवडायला अनेक पर्याय आहेत. ते असे
    १) राष्ट्रीय लोकशाही आघाडी: भाजप+अकाली दल+जनता दल(U); लोकजनशक्ती पार्टी+अण्णा द्रमुक(कदाचित) इ.
    २) महागठबंधन : काँग्रेस+तेलुगू देशम+द्रमुक+राष्ट्रवादी+राष्ट्रीय लोकदल इ.
    ३) समाजवादी+बसप
    ४) तेलंगाणा राष्ट्रीय समिती+तृणुमुल+बिजू जनता दल(कदाचित)
    ५) CPIM+CPI आणि इतर यांची डावी आघाडी
    ६) भारिप महासंघ+ओवायसी यांचा AIMIM
    ७) कोणत्याही आघाडीत प्रवेश न मिळालेले अथवा सगळ्यांशी जुळवून न घेणारे पक्ष: चौटालांचा INLD, शिवसेना, Y S Congress Party, PDP इ.

    ReplyDelete
  4. As you have expressed Mr. Modi stands a higher chance to be getting one more term. Mayawati wants to be the leader of the main opposition group. She is expecting that mother and son may be behind bars or Rahul is likely to loose Amethi. He may decide to contest from two places but definitely he will loose from Amethi.

    ReplyDelete
  5. You should take some monthly subscription. The value of your work and insights deserve it. 🙏

    ReplyDelete
    Replies
    1. Yes you are true.the content is so valuable and mind opener

      Delete
  6. भाऊ
    सध्या तरी समजदार लोकांना मोदी पाहीजे.

    ReplyDelete
  7. भाऊ, शिवसेना नक्की काय करेल असे वाटते ?
    सध्या तरी भाजप ला शिव्या व काँग्रेस ची स्तुती सुरु आहे. काँग्रेस त्यांना जवळ नक्कीच करणार नाही, मग शिवसेना अशा परिस्थितीत एकटीच लढणार ?

    ReplyDelete
  8. शिवसेना will definitely join NDA
    that's what BJP top leader ship confident about


    If required by reducing count of BJP seats

    ReplyDelete