Saturday, January 26, 2019

दोन प्रियंकांचे कथापुराण

priyanka gandhi के लिए इमेज परिणाम

आता पुढले दोनतीन महिने प्रियंका कथापुराण ऐकावे लागणार आहे. त्यात प्रियंका कुठले कपडे घालणार? तिचे कपडे कोण शिवणार? ते कुठून आणले जाणार, किंवा कुठल्या समारंभासाठी ती कुठले कपडे परिधान करणार? अशा सर्व कथा आपल्यापर्यंत येऊन पोहोचणार आहेत. त्यात नवे असे काहीच नाही. आपल्याला त्याची सवय झालेली आहे. दोनतीन महिन्यापुर्वी आपण चोपडांच्या प्रियंकाच्या विवाहाचे अप्रुप वाहिन्या व माध्यमातून ऐकत होतो आणि आता गांधींच्या प्रियंकाचे कोडकौतुक सुरू झाले आहे. लोकसभेचे निकाल लागण्यापर्यत आपल्याला बारीकसारीक सगळे तपशील घरपोच आणून दिले जाणार आहेत. आपण फ़क्त वर्तमानपत्र उघडले पाहिजे वा टिव्ही चालू करून त्यात कुठली तरी वृत्तवाहिनी सुरू केली पाहिजे. हे नुसते नावातले साम्य नाही, तर माध्यमांच्या बातम्यातले साम्य आहे. प्रियंका चोपडाने अमेरिकन पती निवडला आणि कथापुराण सुरू झालेले होते. आता प्रियंका गांधींनी बुडत्या कॉग्रेसला वाचवण्याचा विडा उचलला आहे. त्यातून नवे कथापुराण सुरू झालेले आहे. ते ऐकण्याला पर्याय नाही. मात्र त्यात तथ्य वा सत्य किती असेल, ते शोधण्यासाठी मे महिन्याचा उत्तरार्ध उजाडावा लागेल. कारण करिष्मा असलेल्या प्रियंका गांधी यांचा पुर्वकरिष्मा यापैकी कुठले माध्यम आता सांगायला राजी नाही. आजवर प्रियंका गांधींनी किती निवडणूका कॉग्रेसला जिंकून दिल्या, किंवा राजकारणापासून अलिप्त राहुन त्यांनी आई व भावासाठी संभाळलेल्या अमेठी रायबरेली मतदारसंघात त्यांचे योगदान किती? त्याविषयी पुर्ण आळीमिळी गुपचिळी आहे. माध्यमातील ही स्वयंघोषित आणिबाणी लक्षणीय आहे. सरकारने त्यांच्या तोंडात बोळा कोंबलेला नाही. पण ठराविक माहिती काही माध्यमे व पत्रकार स्वत:च सांगत नाहीत वा सांगायला घाबरत असतात. त्याला स्वयंघोषित आणिबाणी म्हणतात, प्रियंका गांधींचा करिष्मा ही त्यापैकीच एक बाब आहे.

बुधवारी अकस्मात प्रियंका गांधींनी कॉग्रेस वा राजकारणात प्रवेश केल्याची बातमी आली आणि हलकल्लोळ माजला आहे. जणू आता भारतीय राजकारणात नवे युग अवतरले असल्याचा साक्षात्कार तमाम संपादक पत्रकारांना झालेला आहे. मतदान व्हायचे नसते तर एव्हाना नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदावरून पायउतारच व्हाचे लागले असते. पण सुदैवाने माध्यमांच्या इशार्‍यावर राष्ट्रपती वा अन्य शासकीय यंत्रणा चालत नसल्याने, तसे काही होऊ शकलेले नाही. पण माध्यमांचा सुर लक्षात घेतला तर आगामी लोकसभेत मोदींचा दारूण पराभव गेल्या बुधवारीच होऊन गेलेला आहे. भले लोकसभेच्या मतदानाचे वेळापत्रक जाहिर झालेले नसो. मोदी व भाजपाचे निर्दालन करायला प्रियंका गांधींनी अवतार घेतलेला असून, पुर्व उत्तारप्रदेशात बसून त्या संपुर्ण देशात मोदींना पळती भूई थोडी करणार, हा अनेकांचा निष्कर्ष आहे. त्यामुळे मोदींना आता दिल्लीत लपायलाही जागा शिल्लक उरणार नाही, याची अनेक संपादकांना खात्रीच पटलेली आहे. हे सर्व प्रियंका कसे करणार? आजवर त्यांनी राजकारणात काय केले? निवडणूकांमध्ये प्रियंका गांधींचे योगदान कुठले? त्यांनी प्रयत्न केला व कॉग्रेसला जिंकून देण्याचा प्रयास केला; अशा जागी पुर्वी कसे निकाल लागलेले होते? असल्या गोष्टी विचारायच्या नसतात. कोणाच्या मनात तशा शंका प्रश्न आलेच, तरी त्याचा उल्लेखही कुठे करायचा नसतो. त्याही पलिकडे जाऊन कोणी मोठ्याने असा प्रश्न विचारलाच, तर त्याला असंस्कृत ठरवून किंवा पोरकट ठरवून खिल्ली उडवायची असते. मग पुरोगामीत्व जिंकते आणि प्रियंका गांधींचा विजय निश्चीत होत असतो. चर्चा करायची नाही तर कौतुक करायचे. मग विजयाविषयीच्या शंका आपोआप निकालात निघतात. मग भले प्रत्यक्ष निवडणूकीत बोर्‍या वाजला तरी कुठे बिघडले ना? त्यापेक्षा बुधवारपासून सुरू झालेला हलकल्लोळ किंचीतही वेगळा नाही.   

पहिली गोष्ट म्हणजे प्रियंका गांधी राजकारणात नव्या नाहीत. त्यांनी मागल्या अनेक वर्षात आपल्या भाऊ व आईसाठी अमेठी व रायबरेली हे मतदारसंघ संभाळलेले आहेत. तिथले राजकारणही खेळलेले आहे. त्यासाठी भाषणे केलेली आहेत आणि वेळोवेळी पक्षाच्या कामातही हस्तक्षेप केलेला आहे. पक्षात कुठले अधिकार पद नसताना त्यांनी अनेक निर्णय परस्पर केलेले आहेत. त्यामुळे सरचिटणिसपद प्रियंकाने स्विकारले म्हणजे त्यांचा नवा अवतार झाला, हा गाजावाजाच मुळात बोगस आहे. कुठली जबाबदारी न घेता आजवर त्यांनी पक्षात चालवलेली लुडबुड, म्हणजेच राजकारण होते आणि आता त्यांनी पद स्विकारले म्हणजे काही कृती वा हस्तक्षेप केल्यास त्याची जबाबदारी आपली असण्याला दिलेली मान्यता आहे. मागल्या विधानसभा निवडणूकीत काय झाले होते? दिल्लीची सत्ता उत्तरप्रदेशातून मिळते, म्हणून २०१२ पासून राहुल गांधी अनेक प्रयोग करत राहिलेले आहेत आणि प्रियंकाने त्यांना साथ दिलेली आहे. २०१२ मध्ये पक्षाची धुळधाण उडालेली होती आणि २०१७ ची सुरूवात सहा महिने आधीच झालेली होती. त्यासाठी प्रशांत किशोर नावाचा चाणक्यही सोबत घेतलेला होता. आपल्यासोबत त्यालाही मातिमोल करून टाकण्याचे कर्तृत्व राहुलनी गाजवलेले आहे. तेव्हाही त्यांच्यासोबत प्रियंका होत्याच की. मग करिष्मा तेव्हा कुठे दडी मारून बसलेला होता? आधी प्रशांत किशोरने एक हाती उत्तरप्रदेश जिंकण्यासाठी राहुल वा प्रियंकाला मुख्यमंत्री पदाची उमेदवार बनवण्याचा प्रस्ताव दिलेला होता. पण ज्या घराण्यात फ़क्त पंतप्रधानच जन्माला येतात, त्यापैकी एकाला मुख्यमंत्री बनवण्याचा घाट म्हणजे अवमूल्यन होते. तो प्रस्ताव फ़ेटाळला गेला आणि प्रियंकाचा करिष्मा बहुधा लोकसभेसाठी राखून ठेवलेला असावा. त्यांच्या जागी आधी शीला दिक्षितांना पुढे करण्यात आले आणि अखेरीस प्रियंकांनी महत्वाचा निर्णय घेऊन समाजवादी पक्षाशी आघाडी केलेली होती. हे विसरले सगळे संपादक विश्लेषक?

एकहाती उत्तरप्रदेश जिंकण्याच्या योजनेचा बोजवारा उडाल्यावर आधी प्रशांत किशोरनेच समाजवादी पक्षाशी आघाडी करण्याचा प्रस्ताव दिला. तर त्याला गप्प करण्य़ात आले आणि नंतर तोच प्रस्ताव प्रियंकाने आणल्यावर धावपळ करून ती आघाडी जुंपली गेलेली होती. निकाल काय लागले? त्यात प्रियंका नव्हत्या, की करिष्मा घरात कपाटबंद करून उत्तरप्रदेशात आलेल्या होत्या? तेव्हा उत्तरप्रदेशात पक्षाचा धुव्वा उडालेला आधीच दिसू लागला होता. म्हणून उमेदवारी अर्ज भरायला आरंभ झाला, तेव्हा प्रशांत किशोरने सुचवलेला दुसरा पर्याय म्हणून समाजवादी पक्षाशी आघाडी जुळवण्याचा अखेरचा प्रयास प्रियंकांनीच केला होता. त्याप्रमाणे अखिलेश सोबत राहुल यांनी एकत्र पत्रकार परिषद घ्यायचे ठरले होते. पण राहुलना कसलीच भागिदारी नको असल्याने तिकडे फ़िरकले नाहीत आणि अखिलेशने परस्पर आपले उमेदवार जाहिर करून टाकले. तेव्हा प्रियंका रात्रभर जाग्या होत्या आणि त्यांनी डझनभर मेसेज अखिलेशला पाठवले होते. त्याला उत्तर मिळाले नाही म्हणून अखेरीस मातोश्रींनी दिल्लीचे मनसबदार अहमद पटेल यांना लखनौला पाठवले आणि कशीबशी आघाडी घडवून आणलेली होती. तेव्हा करिष्माटिक प्रियंकांनी कोणता संदेश जनतेला दिला होता? काही आठवते का? युपीके लडके बहूत हुशार है. हमे बाहरके किसीकी क्या जरूरत? मग त्या निवडणुकीत ‘युपीके लडके’ ही घोषणा खुप गाजली होती. त्यातून कोणते निकाल लागले होते? लडके निकले कडके आणि २८ आमदारांवरून कॉग्रेस ४ आमदारांपर्यंत घसरली. अर्थात प्रियंकांनी आपला करिष्मा संपुर्ण उत्तरप्रदेशात दाखवला नव्हता. तेव्हाही त्या अमेठी रायबरेलीत मर्यादित राहिल्या आणि तिथल्या १० उमेदावारांना निवडून आणायची जबाबदारी त्यांनी घेतलेली होती. त्यांच्या करिष्म्याने शून्य गेले आणि एक आमदार निवडून येऊ शकला. त्याला करिष्मा म्हणतात राव.

प्रियंका आजीसारख्या दिसतात आणि त्यांची बोलण्याची लकब व हालचाली इंदिराजींसारख्या आहेत, यात शंका नाही. पण तशा लकबी व हालचाली असलेल्या किमान शंभर महिला आजही देशाच्या कानाकोपर्‍यात हुडकून मिळू शकतील. तेवढ्याने त्यांना कोणी इंदिराजी मानत नाही, की करिष्मा म्हणून मतदार पागल होत नाही. तसेच काहीसे इथे महाराष्ट्रातही घडलेले आहे. शिवसेनेतून बाजूला झालेले बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे यांच्या हालचाली लकबी व भाषणाची शैली डिट्टो शिवसेनाप्रमुखांची आहे. त्याची अनेकदा चर्चाही झालेली आहे. आरंभी त्यांना मिळालेले यशही त्याच खात्यात जमा करण्यात आले. अगदी बाळासाहेबांच्या हयातीत राजनी ते मिळवलेले होते. पण तो करिष्मा होता काय? असेल तर आज काय शिल्लक आहे? त्याचा गाजावाजा जरूर होतो. पण फ़लित मात्र बिलकुल वेगळे असते. प्रियंकांच्या कथानकात इंदिराजी घुसवून डंका पिटणार्‍यांना एक लक्षात येत नाही, की इंदिराजींपाशी स्वत:ची प्रतिभा होती आणि कर्तृत्व होते. राजकीय जुगार खेळण्याची प्रचंड क्षमता त्यांना प्रतिकुल परिस्थितीवर मात करून जायला मदतनीस ठरत होती? अन्य कोणाच्या छत्रछायेत इंदिराजी हे व्यक्तीमत्व विकसित झाले नाही की नेहरूंची कन्या म्हणून त्यांना आयते म्होरकेपद मिळालेले नव्हते. पक्षांतर्गत प्रतिकार व विरोधाला सामोरे जातानाच प्रतिपक्षातील विरोधकांचा वापर करून घेण्याची जबरदस्त कुशलता त्यांना अवगत होती. गुंगी गुडिया अशी त्यांची संभावना झालेली होती आणि कोणीही तेव्हा आजीचा करिष्मा ढोल बडवून सांगितलेला नव्हता. त्या शून्यातून इंदिराजींनी आपले स्थान व व्यक्तीमत्व निर्माण केले. त्याची तुलना गालाला खळी पडली वा तसेच हसता आले, म्हणून प्रियंकांशी होऊ शकत नाही. त्याने प्रियंकाची थोरवी नक्की वाढवता येते. पणा इंदिराजींच्या व्यक्तीमत्वाची ती विटंबना असते. मग प्रियंकाचे राजकीय आगमन काय सांगते?

प्रियंका चोपडाच्या आधी कोणा अभिनेत्रीने परदेशी नागरिकाशी विवाह केला नव्हता असे अजिबात नाही. इतरही अभिनेत्री विवाहबद्ध झाल्या. पण चोपडांच्या प्रियंकाचा विवाहसोहळा वाहिन्या व माध्यमांनी महिना दिड महिना चालविला होता. त्यापेक्षा प्रियंका गांधींचे कौतुक थोडे होण्याची बिलकुल शक्यता नाही. याचा इतका गाजावाजा करायचा, की त्यात सगळी लोकसभा निवडणूक झाकोळली गेली पाहिजे. हेही नवे नाही. २०१२ मध्ये असाच राहुल एकहाती उत्तरप्रदेश जिंकायला निघाल्याच्या मोहिमेचा गाजावाजा होत राहिला. त्यातले भट्टा परसोल प्रकरण कोणाला आज आठवत नाही. मायावती सरकारने जमिन अधिग्रहण आदेश लावल्याने त्या गावात हिंसा उफ़ाळली होती आणि सुरक्षा बाजूला ठेवून राहुल गांधी मोटरबाईकने तिथे गावकर्‍यांना भेटायला गेल्याचा हलकल्लोळ माजलेला होता. त्या गडबडीत मुलायमपुत्र अखिलेश संपुर्ण उत्तरप्रदेशची यात्रा करीत फ़िरल्याचे लोकांना सांगण्याची माध्यमांना अजिबात गरज भासलेली नव्हती. अर्थात त्यामुळे अखिलेशचे नुकसान झाले नाही. त्यालाच बहूमत व मुख्यमंत्रीपद मिळाले आणि आज तो आपल्या पायावर पक्ष चालवितो आहे. उलट राहुलना मातोश्री कमी पडल्या म्हणून भगिनीला मैदानात आणावे लागलेले आहे. तर त्या भगिनीचे अफ़ाट कौतुक चाललेले आहे. तितक्यानेच आगामी लोकसभा कॉग्रेसने जिंकलेली असेल तर आणखी काय हवे ना? मागल्या लोकसभेत ऐनवेळी भाजपाने अमेठीत स्मृती इराणी यांना उमेदवारी दिली, तेव्हा याच प्रियंका काय म्हणाल्या तेही आता कोणाला आठवणार नाही. कुणा पत्रकाराने स्मृतीच्या उमेदवारीची बातमी देऊन प्रियंकांकडे प्रतिक्रीया मागितली होती. तेव्हा तुच्छपणे प्रियंका उदगारल्या, ‘स्मृती हु?’ तिटकार्‍याने उच्चारलेले ते शब्द स्मृती इराणीविषयी होते, जिला अवघे भारतीय गाजलेल्या मालिकेतील भाभी म्हणून ओळखतात. ही प्रियंकाची भारतीय मनाविषयीची जाण आहे, असो.

अखेर त्याच स्मृतीने अमेठीत राहुलना प्रथमच जिंकण्यासाठी लढण्याइतका घाम फ़ोडलेला होता. कुठल्या मुलाखतीत प्रियंकांना मोदी बेटी म्हणाले, तर फ़णकार्‍याने मी फ़क्त राजीव गांधींची बेटी असल्याचा संताप प्रियंकाने व्यक्त केला होता. यापेक्षा सुसंस्कृतपणा कोणता असू शकतो? सामान्य भारतीय व त्यांच्या नेत्यांविषयी इतकी तुच्छता म्हणजे करिष्मा असेल, तर नक्कीच प्रियंकांच्या राजकारण प्रवेशाला भाजपा व सर्वांनीच घाबरून राहिले पाहिजे. त्यांच्यासमोर संघर्षाला उभे रहाणे वा लढायची भाषा बोलणेही मोठी अवज्ञाच ना? असो, आता प्रियंका मैदानात आलेल्या आहेत आणि त्यातून पुर्व उत्तरप्रदेश कॉग्रेसने आधीच पादाक्रांत करून झाला आहे. त्यामुळे योगींचे मुख्यमंत्रीपद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाराणशीची जागाही गडबडली आहे. उर्वरीत उत्तरप्रदेश तरी ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे सोपवण्याची काय गरज असावी? त्याचाही भार प्रियंकांकडेच सोपवला असता, तर काम सोपे झाले नसते का? अर्थात राहुल गांधी मारतात तो प्रत्येक मास्टरस्ट्रोक असतो. त्यामुळे अमूक का केले किंवा तमूक का केले नाही, या प्रश्नांना काहीही अर्थ नाही. आता प्रियंकाच्या या मुसंडीने मोदी आधीच नेस्तनाबुत झाल्याने मायावती व अखिलेश यांनी वेळीच सावध झालेले बरे. कारण उत्तरप्रदेशच्या सर्व ८० जागा कॉग्रेस लढवणार असल्याने मोदी नंतर ते आव्हान सपा बसपा यांनाच पेलावे लागणार आहे. मतदान होऊन निकाल लागण्यापर्यंत प्रत्येकजण विजेताच असतो. त्यात कोणी करिष्माधारी चमत्कारी माताभगिनी असली, तर कोणी हरकत घेण्याचे कारण नाही. मुद्दा अशा बाबा मातांच्या पुर्वीच्या चमत्काराची खातरजमा करून घेण्याचा असतो. पण भक्तभाटांनी तशी मोकळीक ठेवली तर ना? एक गोष्ट नक्की, आपल्यापाशी काही करिष्मा नसल्याने मोदी अधिक मेहनत व कष्ट घेतील. कारण हा माणूस कायम कष्टानेचे पुढे आला आहे. त्याला करिष्मा उपयोगी पडलेला नाही. बाकी निकाल लागण्यापर्यंत आपण प्रियंका कथापुराणाचा आनंद घ्यायला मोकळे ना?

19 comments:

 1. भाऊ! प्रियंका गांधी नाही प्रियंका वाडरा म्हणा.

  ReplyDelete
 2. भाऊ प्रियंका वाड्रा म्हणा

  ReplyDelete
 3. So much hype is given to the idea that Priyanka Vadra looks like Indira Gandhi. But more than 70% of India's electorate was not there during the Indira Gandhi regime. They don't know her at all. How does she matter to them? Only some old fogeys are romanticising memories of Indira. 😀
  This line of approach is itself so foolish. Someone needs to tell these Congressies that Indira is an unknown to most contemporary voters.

  ReplyDelete
  Replies
  1. and who are here from Indira's regime, 50% out of those hate her for Emergency.

   Delete
 4. श्री भाऊ तुमच्या सर्व लेखांवर एका वाक्यात "reading bet the lines" हीच समर्पक उपमा असू शकते

  ReplyDelete
 5. भाऊ मस्त

  प्रियंका म्हणजे गारुड्याची पुंगी आहे ...

  ReplyDelete
  Replies
  1. गाजराची म्हणायचंय का?

   Delete
 6. Why you give important to Priyanka?

  ReplyDelete
 7. सडेतोड भाउ खास करुन राज ठाकरेंच उदा एकदम चपखल आहे,आणि सुब्रमन्यम स्वामी म्हणतात तसे तिला bipolar disorder आहे म्हनतात तसे असले तर काही खर नाही.

  ReplyDelete
 8. भाऊ मिडियाचे खोटेपण मोदी सत्तेवर आल्यापासून उघडे पडु लागलेले आहे.प्रीयंकावर लिहिलेला लोकसत्ता चा अग्रलेख याचा खास नमुना आहे. तिचे सगळे prons मांडले cons ची चर्चाच नाही. घराणेशाहिच्या मुद्द्यावर लोकसत्ता म्हणते यावरून चर्चा करण्यात काही अर्थ नाही....काय हा खोटारडेपणा.मांजरीला आपण डोळे झाकले जगाला आपण दुध पिलेले दिसणार नाही. सध्या मिडीया पुरोगाम्याच्या ताटाखालचे मांजर झालेला आहे.प्या कितीही दुध जनता पाहतेच आहे..!

  ReplyDelete
 9. bhau, prasanna joshi was about to jump from his seat at the debate on prinkaya's new role as active politician. so what you written is true, media is just wish modi to lose the election. and shivsena was also happy.

  ReplyDelete
 10. भाऊ लोकसत्ताच्या कुबेरांना मध्यप्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड येथील नेत्रदीपक विजयाचे शिल्पकार राहूल गांधी असल्याचा भास झालाय त्यामुळे पूर्व उत्तर प्रदेशात प्रियांका तर उर्वरित ठिकाणी राहूल मोदी आणि शहा यांची सुट्टी करणार आहेत,उद्याच्या महाराष्ट्र टाईम्स मधले सुनील चावके यांचे दिल्ली वार्तापत्र वाचले म्हणजे याची खात्री पटेल, मोदी आणि शहा यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे.

  ReplyDelete
 11. काल सोसायटी मधल्या काकू भेटल्या. बोलता बोलता म्हणाल्या की मी आता दुसऱ्या डोळ्याचे पण ऑपरेशन करणार आहे.

  मी त्यांना म्हटले तुम्ही त्या आधीच्या डॉक्टर गांधी मॅडम कडेच करणार असाल ऑपरेशन.. चांगल्या अनुभवी डॉक्टर आहेत त्या....

  त्यावर काकू म्हणाल्या, नाही, त्या डॉक्टरीण बाई वारल्या. आता त्यांच्या नातीकडून ऑपरेशन करून घेणार आहे.

  मी आश्चर्य चकित होऊन म्हणालो, अहो काकू, मी त्यांच्या नातीला ओळखतो. ती तर प्राथमिक शाळेत शिक्षिका आहे, ती कशी करू शकेल तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन ?

  त्यावर काकू म्हणाल्या, का नाही करू शकणार ती ऑपरेशन ? ती मुलगी लहानपणापासून तिच्या आजीला इंजेक्शन देतांना, औषधे देतांना पाहत आली आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती अगदी आपल्या आजी सारखीच दिसते !

  या स्टोरीचा सध्या चर्चेत असलेल्या राजकीय मास्टर स्ट्रोक शी संबंध नाही. जस्ट आठवलं म्हणून पाठवलं.

  ReplyDelete
 12. आजच एक बातमी वाचली त्यात प्रियांका गांधीनी आपला आणि नवर्याच्या बिझिनेसचा काही संबंध नाही असे म्हणून आपण स्वच्छच आहोत असे सांगितले आहे. भाऊनी लिहिल्याप्रमाणे एकाही पत्रकाराला त्यांना तुम्ही एकत्रच राहताना मग असे कसे म्हणू शकता असे विचारले नाही. यावरून हे पत्रकार किती मिंधे आहेत हे कळते.

  ReplyDelete
 13. आपल्या भावाप्रमाणे ही पण वर्षानुवर्षे Coming of age याच स्थितीत राहू दे ही सदिच्छा :)

  ReplyDelete
 14. नेहमीप्रमाणेच भाऊंचा सडेतोड परखड लेख

  ReplyDelete
 15. Baki sagale mediawale jaudet, ha saamnacha editorial wacha, shivsena kuth chalali ahe tech samjat nahi.

  Link: http://www.saamana.com/saamana-editorial-on-priyanka-gandhi-join-politics/

  ReplyDelete