Wednesday, January 30, 2019

अपवादात्मक स्वयंभू नेता१९७२ सालच्या जुलै महिन्यातली गोष्ट आहे. अकरावी शालांत परिक्षेचे निकाल लागून नवी पिढी मुंबईच्या कॉलेजात दाखल होण्याचा काळ होता. त्याच्या आधी दादरच्या रुईया कॉलेजात असलेल्या प्रदीप दळवी नावाच्या विद्यार्थ्याने एका आंदोलनात पुढाकार घेतल्याने त्याला त्यावर्षॊ पुन्हा प्रवेश नाकारला गेला होता आणि त्याच्या प्रवेशासाठी आम्ही काही युवक संघटनांच्या वतीने आंदोलन छेडलेले होते. हा प्रदीप दळवी पुढे नाटककार झाला. त्या आंदोलनाला पाठी्बा देणार्‍या इतर दोन विद्यार्थ्याना कॉलेज व्यवस्थापनाने दमदाटी केली. म्हणून इतर संघटना त्यात उतरल्या होत्या. ते आंदोलन तीव्र करण्यासाठी मी कॉलेजच्या दारात उपोषणाला बसलो आणि तो नेमका नववर्षाचा पहिला दिवस होता. दोन दिवस माझे उपोषण झालेले होते आणि तेव्हा असल्या उपोषण वगैरेसाठी मंडप इत्यादी सोयी नसायच्या. एका रात्री मोठा पाऊस पडला आणि आम्हा उपोषणकर्त्यांची तारांबळ उडालेली होती. चौथ्या दिवशी वर्तमानपत्रात बातम्याही झळकल्या आणि नेमका तोच काळ महापालिका कर्मचार्‍यांचा संपही चालू होता. त्याचीच पालिका आयुक्तांशी बोलणी करण्यासाठी जॉर्ज फ़र्नांडीस मुंबईत आलेले होते. इतक्या रात्री त्यांच्यापर्यंत कमलाकर सुभेदार जगन्नाथ कोठेकर जाऊन पोहोचले आणि त्यांनी जॉर्जला रुईयाच्या उपोषणाला भेट देण्याचा आग्रह धरला. अपरात्री दोनच्या सुमारास जॉर्ज इतर सहकार्‍यांना घेऊन तिथे धडकला. एक साधी ताडपत्री डोक्यावर बांधून आम्हा पोरांचा कंपू तिथे झोपाळलेला होता आणि समोर एक पोलिस जिप पहार्‍यावर होती. त्यांचीही धावपळ झाली. कोठेकर सुभेदार जॉर्जला घेऊन माझ्याकडे आले. त्यांनी माझी ओळख करून दिली. तो खुप मोठा माणूस होता आणि आम्ही तुलनेने क्षुल्लक मुले होतो. पण अपरात्री जॉर्जला आलेला बघून पोलिसही गडबडून गेले होते. मला भेटताना सहानुभूतीपेक्षा जॉर्जच्या चेहर्‍यावर संताप होता. काय म्हणाला असेल हा माणूस माझ्याकडे बघून?

आयुष्यात इतका मोठा माणूस मला पहिल्यांदाच भेटत होता आणि उपोषणाला सहानुभूती व पाठींबा व्यक्त करायला आलेल्या जॉर्जने ऐकवलेले पहिले शब्द चकीत करून जाणारे होते. ‘शरम नही आती? अनशनपर बैठे हो और सिगरेट पी रहे हो?’ माझ्यासहीत ताडपत्रीच्या निवार्‍यात बसलेले सगळेच हैराण होऊन गेले. ताबडतोब सगळ्यांनी आपापली सिगरेट फ़ेकली आणि मग सोबत्यांशी जॉर्जचा संवाद सुरू झाला, कोठेकर सुभेदारला त्याने सुचना दिल्या. पोरांचे आंदोलन प्रभावी आणि यशस्वी होण्यासाठी कोण कोण कसली मदत करू शकेल, त्याची जंत्री त्यानेच दिली. डॉक्टरपासून वकीलापर्यंत कोणाकोणाला सज्ज ठेवायचे त्याची सुचना देऊन संवाद पंधरा मिनीटात आवरला. घोंगावत आलेले वादळ तसेच उठून निघून गेले. पण त्या अपरात्री जॉर्ज तिथे येऊन गेल्याची बातमी सकाळी कॉलेज व्यवस्थापनाला मिळाली आणि पोलिस ठाण्यातही पोहोचलेली होती. दुसरा दिवस उजाडला तोच मुळात आमच्या उपोषणाला व्यापक स्वरूप देऊन. इतर अनेक युवक विद्यार्थी संघटना दुसर्‍या दिवशी संध्याकाळ होईपर्यंत कामाला लागल्या होत्या. व्यवस्थापनानेही विषय चिघळू नये म्हणून प्रदीपला बोलावून घेतले आणि दोन दिवसात विषय निकाली निघाला. जॉर्जचा प्रतिनिधी म्हणून त्या दिवशी कोठेकर व्यवस्थापनाशी बोलणी करायला गेला होता. म्हणजे आम्ही चार दिवस खराखुरा उपास केला त्याला काहीच अर्थ नव्हता. या वादळाची अपरात्रीची पंधरा मिनीटे चमत्कार घडवून गेलेली होती. ही आयुष्यात पहिली जॉर्जशी झालेली भेट. थेट दमदाटी देणारी. पण त्त्यातली आस्था व वडीलकी त्याला लपवता आली नाही, की आम्हाला कोणी समजावण्याची गरज भासली नाही. आंदोलन पेटवणे, जनतेचा संघर्ष उभा करणे किंवा अन्य कुणाच्या संघर्षात सहभागी होताना जॉर्जपाशी समस्येची उत्तरेही सज्ज असायची, याचा तो पहिला अनुभव.

पुढे आणिबाणी लागली. जॉर्जच्या भूमिगत होऊन चालविलेल्या विरोधाच्या कहाण्याही ऐकायला मिळत होत्या. पुढे जॉर्ज पकडला गेला आणि त्याला दरोडेखोरप्रमाणे कसे वाईट वागवले जात होते, त्याच्याही कथा वाचल्या ऐकल्या होत्या. आणिबाणी उठली आणि निवडणूका लागल्यावर इतर नेत्यांची सुटका झाली तरी जॉर्ज तुरूंगात पडला होता आणि तिथूनच त्याने १९७७ ची निवडणूक बिहारमधून लढवली. तीन लाखाहून अधिक मोठा फ़रकाने निवडून आला. जनता सरकारने त्याच्यावरचे आरोप मागे घेतले आणि जॉर्ज देशाचा उद्योगमंत्री म्हणून मोरारजी सरकारमध्ये सामील झाला. त्यानंतर प्रथमच मुंबईला आलेल्या जॉर्जचे अनेक किस्से आहेत. पण त्यातला एक मोठा किस्सा त्याच्या व्यक्तीमत्वाची साक्ष देणारा म्हटले पाहिजे. जनता विजयानंतर शिवाजीपार्कला मोठी सभा झाली आणि तिथे जॉर्जचे भाषण त्याच्यातला खरा नेताच दाखवणारे होते. सगळे आयुष्य संघर्ष, आंदोलन, प्रतिक्रीया वा जनसंघटनेत व्यतित केलेला जॉर्ज मंत्री म्हणून जनतेला सामोरा आला होता. कामगार नेता म्हणून सरकारवर टिका करण्यात वा सरकारकडून काहीतरी मागण्यात हयात गेलेला जॉर्ज; त्यावेळी खुप वेगळा बोलत होता. आंदोलन व संघर्षाच्या राजकारणाने परिवर्तन घडवून आणले की नेत्याने कसे वागावे आणि जनतेला कसे परिवर्तनात सहभागी करून घ्यावे; त्याचा जीताजागता नमूना म्हणजे ते जॉर्जचे भाषण म्हणायला हवे. आजवर आपण सरकारकडे काही मागितले नाहीतर सरकार बदलण्याच्या भाषा केल्या. आता आपणच सरकार आहोत आणि सरकार आपलेच आहे. आपल्यासाठी सरकारने काय करावे ते सांगत आलो, आता सरकारसाठी वा देशासाठी आपण कामगार काय करणार, ते सांगायची व करायची वेळ आहे, असे त्याने शिवाजीपार्कला लोटलेल्या त्या जनसागराला ठामपणे सांगितले होते. हा जॉर्जचा पैलू कोणी किती समजून घेतला?

त्यापुर्वीच्या या विरोधी पक्षाच्या नेत्याची भाषाच बदललेली नव्हती, तर कृती व दिशाही बदलून गेलेली होती. आंदोलनाचा नेता आणि राजकीय नेता यातला हा महत्वाचा फ़रक होता. संघर्षात व्यवस्था बदलण्याची मागणी असते किंवा तेच तर सुत्र असते. पण तो बदल झाल्यावर कालचा आंदोलक आज नेता झालेला असतो व त्याला कारभार हाकता आला पाहिजे. काय नको ते सांगणे खुप सोपे असते. कारण त्यात आपल्याला काही करायचे नसते. पण जे नको ते बदलण्याचा अधिकारच जनता तुमच्या हाती सोपवते; तेव्हा राजकीय नेत्याची खरी कसोटी लागते. बहुतांश आंदोलक नेत्यांना त्याचा गंधही नसतो. म्हणून विरोधी राजकारणाने सत्तेत आलेले बहुतांश नेते वा राजकीय संघटना, सत्ता राबवताना अपेशी ठरतात. त्यांची आपणच बोललेले शब्द वा केलेल्या मागण्या पुर्ण करताना तारांबळ उडून जात असते. जॉर्ज याला अपवाद होता. तो जितका आक्रमक कामगार नेता किंवा आंदोलनकर्ता होता, तितकाच उत्तम प्रशासकही होता. कालपर्यंत आपण केलेल्या मागण्या पुर्ण करायची वेळ आली, तेव्हा तो गडबडला नाही. तर पर्याय शोधून त्याने अनेक प्रश्न व समस्या मार्गी लावल्या. मधू दंडवते आयुष्यभर कोकण रेल्वेसाठी संघर्ष करत राहिले. पण १९७७ साली खुद्द तेच रेल्वेमंत्री झाल्यावरही कोकण रेल्वेचा विषय मार्गी लावू शकलेले नव्हते. पुढे १९८९ सालात पुन्हा देशात सत्तांतर होऊन व्हीपी सिंग सरकार आले, तेव्हा अल्पकाळ म्हणजे वर्षभर रेल्वे खाते संभाळणार्‍या जॉर्जनी कोकण रेल्वेसाठी असा पर्याय शोधला, की त्याचे मंत्रीपद गेले तरी कोकणरेल्वे रुळावर आलेली होती. खाजगी बॉन्डमधून भांडवल उभे करून रेल्वेचा नवा मार्ग बांधण्याची कल्पना घेणार्‍या जॉर्जने कोकणाची कोकण रेल्वे हाही विषय पुसून टाकला. ही पश्चीम किनार्‍याची रेल्वे आहे आणि कर्नाटक केरळपर्यंतच्या जनतेला उपयुक्त असल्याने देशाचीच सुविधा असल्याचा युक्तीवाद करीत जॉर्जने हा पर्याय काढला होता.

जनता सरकारमध्ये उद्योगमंत्री असताना जॉर्जनी भारतीय कायद्यांना धाब्या्वर बसवणार्‍या बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणून इथल्या कायदा व्यवस्थेच्या आधारे कोकाकोला आणि आयबीएम यांना कारभार गुंडाळणे भाग पाडले होते. हा त्याच्यातल्या संघर्षमय नेत्याचा अविष्कार होता. पण दुसरीकडे तो जमाना सिमेन्ट टंचाई व पुरवठ्यात भष्टाचाराचा होता. सिमेन्ट कोटा प्रकरणाने अंतुले यांना मुख्यमंत्रीपद गमवावे लागले, हा संदर्भ लक्षात घेतला तर सिमेन्ट ही किती वादाची बाब त्या काळात असावी, याचा अंदाज येऊ शकेल. विविध संस्था व कंपन्यांना सिमेन्ट कोटा सरकारी मर्जीने मिळत असे आणि स्वातंत्र्योत्तर तीन दशकात या उपयुक्त वस्तुच्या उत्पादनात वाढ करण्याचे प्रयासही झालेले नव्हते. उद्योग खाते हाती आल्यावर जॉर्जनी तोही विषय असाच तडकाफ़डकी निकालात काढलेला होता. सिमेन्ट उत्पादनातलॊ काही कंपन्यांची मक्तेदारी मोडीत काढून फ़र्नांडीस यांनी इतर बड्या भारतीय कंपन्यांना सक्तीने सिमेन्ट उत्पादनात आणले. आज ज्या विविध विकास कामाना गती आली आहे, त्यातला मोठा घटक विपुल सिमेन्ट पुरवठा हेच आहे. पण त्यासाठीचा खरा पाया १९७७ नंतरच्या जॉर्जच्या त्या निर्णयाने घातला गेला. त्याची आठवणही कोणाला राहिलेली नाही. जितका काळ सत्ता संभाळली, ती उपभोगली नाही, तर त्या सत्ताधिकाराने जनहितासाठी अतिशय विचारपुर्वक दुरगामी परिणाम घडवणारा एक मंत्री म्हणून जॉर्जचे कधी मूल्यमापन झाले आहे काय? त्याच्या राजकीय कारवाया वा भूमिकांचा उहापोह नेहमी होत राहिला. पण देशाच्या भवितव्याचा विचार करून आपल्या सत्ताकाळात निर्णय घेणारा व कटाक्षाने ते राबवणारा अन्य कोणी मंत्री आढळणार नाही. काही शेकडा मैल अंतर कमी करणारी कोकण रेल्वे आणि सिमेन्टच्या उत्पादनातल्या वाढीने देशाच्या विकासाला महत्वाचे साहित्य विपुल प्रमाणात पुरवणारा हा देवदूत जॉर्ज होता आणि आहे.

कालपर्यंत भ्रष्टाचाराच्या नावाने शंख करून राजकारणात आल्यावर मनसोक्त लूटमार व भ्रष्टाचार करणार्‍या केजरीवालांच्या जमान्यात आपण आहोत. अशा काळात केजरीवालनी चाराघोटाळ्यातील लालूंना मिठी मारणे आपल्याला चकीत करीत नाही. त्या काळातल्या लोकांना बिहारचा नेता असलेल्या जॉर्जची महत्ता कशी कळावी ना?
१९९५ च्या सुमारास लालूंचा चारा घोटाळा उघडकीस आल्यावर त्यांना बाजूला करताना स्वपक्षाचाही कान पकडणारा पहिला नेता जॉर्ज होता. त्यासाठी त्याला लालुंशी वैर पत्करावे लागले आणि बिहारमध्ये वेगळी राजकीय चुल मांडावी लागली होती. इतरांवर बेछूट आरोप करताना आपल्याच पक्षातल्या पाप्याच्या पितरांना पाठीशी घालणे आजकाल युक्तीवाद मानले जाते. त्या काळात जॉर्जच्या स्वपक्षातील संघर्षाची महत्ता कशी कळावी? बिहारमधून जॉर्जला निवडून येऊ देणार नाही, अशा धमक्या लालूंनी दिल्या, तेव्हा समता पक्ष नावाची वेगळी चुल मांडून ह्या हिंमतबाजाने लालूंच्या नाकावर टिच्चून लोकसभेत विजय मिळवला होता. तशी वेळ त्याच्यावर आणली गेली नसती, तर जॉर्जला भाजपाच्या संगतीला जावे लागले नसते. लालूंची पापे पाठीशी घालणारे मात्र आजही जॉर्जवर भाजपा सोबत गेला म्हणून दोषारोप करतातच. पण आयुष्यभर कॉग्रेसशी उभा दावा मांडलेली समाजवादी चळवळ लालूंनी बिहारची सत्ता टिकवण्यासाठी कॉग्रेसच्या दावणीला बांधली, त्याचे वैषम्य अशा दिवाळखोरांना कधी वाटले नाही. ज्या कॉग्रेसी भ्रष्टाचाराच्या विरोधात समाजवादी चळवळ उभी राहिली, तीच लालूंचा भ्रष्टाचार पाठीशी घालत कॉग्रेसच्या वळचणीला गेली. त्यापासून जॉर्ज अलिप्त राहिले, ही वस्तुस्थिती सांगण्याची कोणाची हिंमत झाली काय? तिथेच समाजवादी चळवळीचा र्‍हास होत गेला. चांगल्याचा स्विकार व त्याच्याशी सहकार्य करताना जॉर्जनी कधी आढेवेढे घेतले नाहीत. म्हणूनच त्यांनी वाजपेयी व भाजपा यांच्याशी जुळवून घेणे योग्य मानले.

१९७९ सालात जनता सरकार वादाच्या भोवर्‍यात सापडले, तेव्हा अविश्वास प्रस्तावाला ठोस उत्तर देण्याची कामगिरी जॉर्जनीच पार पाडलेली होती. चरणसिंग गट फ़ुटलेला होता आणि विरोधी नेता यशवंतराव चव्हाणाच्या अविश्वास प्रस्तावाने भलतेच वळण घेतलेले होते. अशा वेळी जॉर्जनी प्रदिर्घ भाषण करून सरकारची बाजू समर्थपणे मांडलेली होती. पण त्याच्या दुसर्‍याच दिवशी खुद्द जॉर्ज फ़र्नांडीस यांनीच जनता पक्ष सोडला. त्यामुळे त्यांच्यावर कोलांट्य़ा उड्या मारणारा नेता म्हणून खुपच टिका झाली. पण त्यांच्या त्या निर्णयामागे ज्येष्ठ समाजवादी मधू लिमये असल्याची कुजबुज होती. मात्र कितीही शिव्याशाप खाल्ले तरी जॉर्जनी कधीही आपल्या निर्णयाचे रहस्य उलगडून सांगितले नाही. आयुष्यभर टक्केटोणपे खात एका विचार व ध्येयवादाला चिकटून जगलेला हा समाजवादी नेता, कधीही पुस्तकी नव्हता की शब्दातच अडकून पडलेला नव्हता. तो कायम कृतीशील व प्रसंगावधानी होता. आपला कॉग्रेसविरोध त्याने कधी सोडला नाही, की तत्वांचे अवडंबर माजवून जनतेची प्रतारणा केली नाही. लाठ्या खात, अटका सोसून खटले अंगावर झेलत, त्याने आपल्या राजकीय भूमिका पार पाडल्या. नुसते शब्दाचे बुडबुडे उडवित बसलेल्या समाजवाद्यांचे शिव्याशापही खुप सहन केले. त्याच्यावर खोटेपणाचा आरोप कोणी करू शकत नाही. साधेपणाने आयुष्य जगताना त्याच्या वाट्याला अवहेलना खुप आली, पण त्यातही तो कधी निरुत्साही झाला नाही. लोकांचा सहभाग असलेल्या कुठल्याही कृती, कार्यक्रम वा आंदोलनाकडे त्याने कधी पाठ फ़िरवली नाही. सामान्य माणूस म्हणून जगताना सामान्य माणसाचाच विचार करणारा नेता आणि देशहितासाठी सगळे पुर्वग्रह सोडण्याची हिंमत असलेला नेता; हेच त्याचे खरे वर्णन असू शकते. पुस्तके, शब्दातले तत्व यापेक्षा जगण्यातल्या वस्तुस्थितीला भिडणारा हा अजोड नेता, भारतीय सार्वजनिक जीवनातली त्सुनामी होता. स्वतंत्र  भारताचा एक स्वयंभू नेता होता जॉर्ज फ़र्नांडीस!

18 comments:

 1. एका चळवळ्या नेत्याचा विविधांगी परिचय.. 👏

  ReplyDelete
 2. मला आवडलेला जॉर्जचा सर्वात मोठा आणि मस्त निर्णय म्हणजे acclimatisation. सियाचीनवरच्या सैनिकांना snow scooters आवश्यक होत्या. आणि मंत्रालयातले बाबू त्या फाईल्स ●●खाली घालून बसले होते. त्या सगळ्यांना जॉर्जने acclimatisation साठी आठ आठ दिवस सियाचीनला पाठवून दिलं होतं.

  ReplyDelete
 3. लाख बोललात भाऊ,आजकाल शेतकरी आंदोलन,लोकपाल आंदोलन,आरक्षण/जातीच्या नावाखाली आपल्याच लोकांना आपल्याचं सरकारला वेठीस धरायचे खेळ चाललेत ते पाहुन आपण अजुनही पारतंत्र्यातचं आहोत असं वाटतं...ही बौध्दिक पोकळी‌ भरून काढायची कशी हा प्रश्र्न पडतो

  ReplyDelete
 4. खरं आहे भाऊ ....
  माझ्या लहान वयातच, मी जाॅर्ज यांना ऐकलंय. पेटवून टाकणारं व्यक्तिमत्व, प्रचंड उत्साह, सखोल ज्ञान.
  आजपर्यंत बाळासाहेब व जाॅर्ज हे दोनच नेते खऱ्या अर्थाने नेते वाटतात....

  ReplyDelete
 5. भाऊ, विजय मिळवल्यावर शांत पणे काम करणे हा हिटलर व जॉर्ज यांच्यातील साम्य आहे

  ReplyDelete
 6. कालच पुस्तक deliver झालं । 🙏.
  Now looking forward to read ...

  ReplyDelete
  Replies
  1. Which book sir...Is it on George.. Please named me

   Delete
 7. मध्यंतरी एका संरक्षणविषयक कार्यक्रमाला संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना आमंत्रित करण्यात आले होते आणि कार्यक्रम संपल्यावर एका शाळकरी मुलाने त्यांना प्रश्न विचारला की सर भारताचा खरा शत्रू कोण? त्यावर क्षणाचाही विलंब न लावता जॉर्ज फर्नांडीस म्हणाले होते की खरेतर संरक्षण विषयक माहिती हे गुप्त ठेवायची असते परंतु तुम्हाला एकाच शब्दात सांगायचे झाले तर चीन हा भारताचा सर्वात मोठा शत्रू आहे असे जॉर्ज फर्नांडिस मिळाल्या म्हणाल्या काश्मीर ते कन्याकुमारी सर्व माध्यमातील सर्व उतावळे पत्रकार खालच्या वरच्या तोंडाने बोम्बलू लागले की जॉर्जना नसती उठाठेव करण्याची काय गरज आहे खाजवून खरूज कशाला काढताय इत्यादी इत्यादी. परंतु जॉर्ज फर्नांडिस त्यावेळी त्यांच्या या सत्य विधानावर अत्यंत ठाम राहिले होते

  ReplyDelete
 8. 1977 साली जनता सरकारच्या सरकार असताना जॉर्ज फर्नांडिस केंद्रीय मंत्रिमंडळात होते त्यांनी त्या वेळेला अमेरिकन कोकाकोला कंपनी ला भारतातून हाकलून दिले याचा परिणाम कोकाकोला आणि अमेरिकन लोबी त्यांच्या विरोधात गेली . नंतर जेव्हा फर्नांडिस पुन्हा संरक्षण मंत्री झाले त्या वेळेला शवपेटी प्रकरणातना त्यांना सोनिया आणि मंडळी बदनाम करत होती त्यावेळी या लॉबीने त्या बदनाम करणार्‍या मंडळींना मदत केली असावी.

  ReplyDelete
 9. जॉर्ज फर्नांडिस यांच्या आयुष्याचा आलेखच तुम्ही समोर मांडलात भाऊ! जुन्या पिढीतल्या ह्या धुरंधर नेत्याची समर्पक ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!!

  ReplyDelete