Thursday, January 31, 2019

बुडत्याला इव्हीएमचा आधार

shuja hussain EVM के लिए इमेज परिणाम

ज्याचा स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास नसतो, त्याला नेहमी बाकीच्या प्रत्येक गोष्टीतली त्रुटी दिसत असते. आपल्यातली त्रुटी मान्य करण्याचा प्रामाणिकपणा नसलेले लोक अशा मानसिकतेचे रुग्ण असतात. त्यामुळेच त्यांना कोणीही कुठल्याही बाबतीत समजावू शकत नसतो. प्रश्नाला उत्तर असते आणि शंकेचे समाधान असते. पण संशयाला समाधान वा उत्तर कधीच असू शकत नाही. तो आपल्या मेंदूत शिरलेला भ्रम असतो. एकदा त्या भ्रमाच्या आहारी माणूस गेला, मग त्याची बुद्धी काम करीत नाही आणि सत्य बघण्यापेक्षा त्याच्या भ्रमाला पुरक असलेल्या गोष्टी दाखवून तो आपला भ्रम अधिक आवेशात मांडू लागतो. उत्तरप्रदेश विधानसभेचे निकाल लागले आणि अशाच एक भुताने राजकीय पक्षांना पछाडले आहे. त्या भूताचे नाव इव्हीएम असे आहे. निवडणूकीत मतनोंदणीसाठी जे यंत्र वापरले जाते, त्याचेच नाव इव्हीएम असे आहे. त्यात संगणकीय पद्धतीने नागरिकाचे मत नोंदले जाते आणि मोजणीच्या वेळी कालापव्यय होत नाही. काम कमी होते आणि हाताळणीलाही हे यंत्र सोयीचे आहे. मागल्या अनेक निवडणूका त्याच यंत्राच्या मदतीने पार पडलेल्या आहेत. पण साडेचार वर्षापुर्वी लोकसभा निवडणूक झाली आणि त्यात भाजपाने मोदींच्या नेतृताखाली बहूमत संपादन केले. त्यात ज्या पक्षांची धुळधाण उडाली, त्यांना अजून आपल्या नाकर्तेपणाची साक्ष पटलेली नाही. त्यानंतरही अनेक राज्यात अशा पक्षांची सतत पिछेहाट होत गेली आणि त्यातले सत्य बघायची हिंमत नसलेल्यांना कुठलेतरी कारण हवे होते. ते विधानसभेत पराभूत झाल्यावर मायावतींनी दिले आणि इव्हीएम नावाचे भूत बटलीतून बाहेर आले. ते अनेक पक्षांच्या मानगुटीवर असे पक्के बसलेले आहे, की अधूनमधून ते अक्राळविक्राळ रुप धारण करते आणि फ़क्त सनसनाटी माजवण्यासाठीच उतावळी असलेल्या माध्यमांना ऊत येत असतो. बुडत्या पराभूताना तो काडीचा आधार झाला आहे.

आपण राजकारणात वा कामात कुठे कमी पडलो, ते तपासणे हे राजकीय पक्षांचे काम असते. पराभव त्यातून होत असतो. कधी संघटना कमी पडते तर कधी राजकारण फ़सते आणि लोकशाहीत पराभव पचवावा लागत असतो. कारण कुठलाही मतदार कोणा पक्षाचा बांधील गुलाम वा वेठबिगार नसतो. प्रत्येक निवडणूकीत तो वेगळा विचार करून वेगळ्या पक्षाला मतदान करू शकत असतो. पक्षांच्या वा नेत्यांच्या इच्छेनुसार लोक मतदान करत नसतात. म्हणूनच तुमचा पराभव झाला, तर त्यामागे तुमचा नाकर्तेपणा असतो. तुमचा मतदार घटला वा इतरत्र वळला; तर त्याला तुम्ही जबाबदार असता. आताही तीन राज्यातली सत्ता भाजपाने गमावली, तर त्यांनाही दोष मतदार वा इव्हीएमच्या माथी मारता आला असता. पण त्यांनी तसे काही म्हटलेले नाही. पण गेल्या दोन वर्षात सतत यंत्राच्या नावाने शिमगा करणार्‍या कॉग्रेसला सत्ता मिळाल्यावर त्यांनी यंत्रावरील आरोप मागे घेण्याचे सौजन्य दाखवलेले नाही. अगदी मतदान संपले, तेव्हाही राहुल गांधींनी यंतरत गडबड होण्याची भिती व्यक्त केली होती. पण त्यांच्याच पक्षाला यश मिळाल्यावर मात्र आपली शंका चुकीची असल्याचे अजिबात मान्य केले नाही. तेच केजरीवाल यांच्याही बाबतीत सांगता येईल. २०१५ सालात त्यांनी दिल्ली विधानसभा मतदानाच्या दरम्यान यंत्रात गडबड होणार असल्याची आवई ठोकलेली होती. पण प्रत्यक्षात निकाल लागले, तेव्हा अशी गडबड असेल तर केजरीवाल वा त्यांच्याच पक्षाने केली म्हणावे असे निकाल लागलेले होते. ७० पैकी ६७ जागा एका पक्षाला मिळण्याचा विक्रम यापुर्वी कधी झालेला नव्हता. पण तो केजरीवाल यांच्या बाबतीत झाला. तेव्हा लोकशाहीचा विजय म्हणून त्यांनी टेंभा मिरवला. कारण त्यांच्याच पक्षाला प्रचंड यश मिळाले होते. मात्र भाजपाला यश मिळाले, मग यंत्रात गडबड असते. तेच मायावतींचे झाले आणि नंतर प्रत्येक पराभूत पक्ष त्याचाच आधार घेऊन बोलू लागला.

तुलनाच करायची तर तेलंगणाचे चंद्रशेखर राव यांचे कौतुक करावे लागेल. कारण त्यांनी नुकत्याच निवडणूकीत मोठा विजय मिळवला आणि कालपरवा मतदान यंत्रावर आरोप झाले, तेव्हा राव यांच्याच पक्षाने त्याचे जोरदार खंडन केलेले आहे. यंत्रावर आरोप ही पराभूत मानसिकता असल्याचा दावा त्यांनी केला आहे. किंबहुना राव यांच्या पक्षाने ताज्या वादाला नेमके उत्तर दिले आहे. जे पराभूत आहेत, त्यांना आपले अपयश लपवण्यासाठी असे आरोप करावे लागत आहेत, असे तेलंगणा समितीच्या नेत्याने साफ़ सांगून टाकलेले आहे. तेच सत्य केजरीवालही बोलू शकले असते. पण सवयीच्या थापाड्याला स्वप्नातही खरे बोलणे वर्ज्य असते ना? अन्यथा हा वाद उफ़ाळला तेव्हा दोन वर्षापुर्वी त्यांनीच आधी मतदान यंत्राच्या बचावाला सामोरे यायला हवे होते. कारण २०१५ मध्ये त्यांनीच या यंत्रांच्या मदतीने झालेल्या मतदानात अभूतपुर्व यश संपादन केले होते. पण त्या जनमताची धुळधाण केल्याने केजरीवाल यांना एका पोटनिवडणूकीत जबरदस्त फ़टका बसला आणि नंतरच्या महापालिका मतदानात त्यांच्या पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या दिल्लीतच धुळधाण उडाली. म्हणून मग आपले अपयश लपवण्यासाठी त्यांनाही मायावतींच्या मायाजालात तोंड लपवणे भाग झाले. मायावतींनी आपला उत्तरप्रदेशातील दारूण पराभव झाकण्यासाठी सर्वप्रथम ही आवई उठवली आणि मग एका एका पक्षाने भाजपाचे उत्तरप्रदेशातील यश यंत्रामुळेच वा त्यातल्या गडबडीने झाल्याचा आक्रोश सुरू केला होता. पण तसे असते, तर त्याच दरम्यान झालेल्या पंजाब वा गोव्यातील मतदानात हेराफ़ेरी करून भाजपाला जिंकणे शक्य होते. पण तसे झाले नाही. म्हणजेच यंत्रातली गडबड अशक्य आहे. पण बुडत्याला काडीचा आधार तसे अनेकजण आपापले अपयश लपवायला मायाजालात अडकत गेले आणि सनसनाटी माजवणार्‍या माध्यमांनी आगीत तेल ओतले.

आता त्याच शिळ्या कढीला ऊत आणण्यासाठी लंडन येथील एका पत्रकार संस्थेने गौप्यस्फ़ोट करणारी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात आपला चेहरा झाकलेल्या कुणा शुजा हुसेन नावाच्या भुरट्याने २०१४ पासून भारतातल्या सर्व निवडणुकांमध्ये यंत्रात गडबडी झाल्याचा दावा केलेला आहे. त्याने केलेल्या दाव्यात इतक्या त्रुटी व थापा आहेत, की आयोजक पत्रकार संस्थेने दुसर्‍याच दिवशी आपले हात झटकले आणि त्याच्या दाव्याशी आपल्याला कर्तव्य नसल्याचे सांगून टाकले. हा इसम कोण आणि अशा विषयातील त्याचे ज्ञान काय, याचा खुलासा कुठेही झालेला नाही. मजेची गोष्ट म्हणजे त्याने केलेला एक दावा इतका बिनबुडाचा आहे, की त्याला तोड नाही. ज्या साधनांच्या हस्ते अशा गडबडी करण्यात आल्या, त्याला फ़्रिक्वेन्सी म्हणतात. भारतातल्या सर्वात मोठ्या डीजिटल सेवा कंपनीने अशी फ़्रिक्वेन्सी भाजपाला पुरवली म्हणून २०१४ नंतर गडबडी करणे शक्य झाले, असा शुजाचा दावा आहे. पण ज्या कंपनीचा तो संदर्भ देतो आहे, त्या जिओ म्हणजे मुकेश अंबानींच्या कंपनीचा डिजिटल सेवा कारभारच २०१६ मध्ये सुरू झाला. मग दोन वर्षे आधी ती कंपनी फ़्रिक्वेन्सी कशी पुरवू शकते? पण असले प्रश्न भ्रमिष्टांना पडत नसतात. त्यांना आपल्याला सोयीचे पुरावे व संदर्भ हवे असतात आणि ते खरे असण्याचीही गरज नसते. म्हणून कोणा भुरट्याने असला खेळ केल्यावर तिथे कॉग्रेसचे बोलघेवडे नेते कपील सिब्बल अगत्याने हजर राहिले आणि त्यांनी पक्षालाही तोंडघशी पाडून दिले. वास्तविक अशा बदनामी व खोट्या आरोपांनी मोदींना पराभूत करणे शक्य असते तर बघायला नको. कारण शुजाचा दावा मान्य करायचा तर त्यातला अतिरेक आपल्याकडे आणूनही मोदींना पराभूत करणे शक्य आहे. राफ़ायलचे आरोप वा प्रियंका गांधीना पक्षात आणायचेही कारण नाही. शुजाला हाताशी धरून कुठलाही फ़डतूस पक्ष लोकसभा जिंकू शकेल ना?

हा शुजा स्वत:ला हॅकर म्हणवून घेतो, हॅकर म्हणजे दुसर्‍याच्या संगणकात अन्य मार्गाने गडबड करून आपल्याला हवे ते उद्योग करायचे. भाजपा सोडून अन्य पक्ष जिंकले, तेव्हा आपणच भाजपाला शह देणारे हॅकिंग मतदान यंत्रात केले असल्याचा शुजाचा दावा आहे. म्हणजे आजही तो अशा पद्धतीने गडबड करून लोकसभेच्या वा अन्य निवडणूकात कॉग्रेस किंवा अन्य कुठल्याही पक्षाला विजयी करून देऊ शकतो. कारण तीन विधानसभांमध्ये भाजपा नुकताच हरला, तेही शुजाचेच कर्तृत्व होते ना? मग त्याचा असा गाजावाजा करण्यापेक्षा कॉग्रेसने त्यालाच आर्थिक व अन्य लागेल ती मदत देऊन लोकसभेत बहूमत मिळवणे शक्य आहे. तो सोपा मार्ग मोदींना सत्ताभ्रष्ट करण्यासाठी उपलब्ध असताना कॉग्रेस किंवा कपील सिब्बल यांनी असले गौप्यस्फ़ोट करण्यात आपली शक्ती वाया कशाला घालवावी? कॉग्रेस वा अन्य पक्षांचा शुजाच्या शब्दावर विश्वास असेल, तर त्यांनीही पक्षाची संघटना व काम बंद करून अशाच हॅकरना हाताशी धरावे आणि निवडणूका घरबसल्या जिंकाव्यात. मतदानयंत्र नको किंवा कागदी मतपत्रिका पुन्हा आणा, असले आग्रह धरण्याची तरी काय गरज आहे? चारसहा हॅकर्स कामाला जुंपायचे की निवडणूक संपली. कोट्यवधी रुपये नको की विविध नेत्यांची मनधरणी गठबंधने नकोत. लहानसहान पक्षांची मस्ती नको. पण ते शक्य नाही, हे कॉग्रेससहीत सर्व पक्षांना ठाऊक आहे आणि म्हणूनच असल्या आवया उठवून नुसता गहजब केला जातो. त्यातून मोदी वा भाजपाच्या यशाविषयी शंका संशय निर्माण करण्यापेक्षा अन्य कुठलाही हेतू नाही. हे सर्व अतिशहाणे एकच गोष्ट विसरतात. २००२ पासून अशाच खोट्या आरोपाशी सामना संघर्ष करत नरेंद्र मोदी नावाचा माणूस पंतप्रधान पदापर्यंत पोहोचला आहे आणि त्याच्या प्रत्येक यशात अशा दिवाळखोर आरोप व बदनामीचे मोठे योगदान आहे. बुडत्याला काडी आशा दाखवते, पण बुडण्यापासून वाचवू शकत नाही, हे असे नेते व राजकारण्यांना कळणार कधी हा अनुत्तरीत प्रश्न आहे.

10 comments:

 1. EVM जर अशी मदत करत असेल तर महागठबंधनाची गरज काय ? तसेच महागठबंधनाला यश या मुळे मिळणार नसेल तर त्याचा उपयोग नसतांना ते का करावे ? एक बरे झाले कि EVM कॉंग्रेस सरकारनेच आणलेले आहे नाहीतर या बदमाशांनी भारतात कहर केला असता.

  ReplyDelete
 2. Honourable Bhau your all artical are very nice and very rational. A good batsman speaks with his.bat like that you speak with your pen. All politikal parties are hundred percent corrupted so they are unable to stand before BJP and honourable Modi so they played these foolish tacties . Please Bhau .go on writing. It is your the best service of our great Bharat Matrimony.My pranam to your writing.Apparao Kulkarni, Latur

  ReplyDelete
 3. Bhau plz dont waste your valuable time on evm topic

  ReplyDelete
 4. काहींच्या मते ATM हॅक करता येते तर मग EVM का नाही? EVM नेट ला जोडलेले नसते. त्यात अँटेना कुठाय की जो frequency पकडले? तसेच मतदानाच्या आधी सर्व पक्षीय उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्या समोर मशीन चेक होते. हे लोकांना माहीत नसते किंवा लोक मुद्दाम ऐकू घेत नाहीत. तसेच अनेक तांत्रिक बाबी आहेत उदा. EVM ची चिप एकदाच प्रोग्रॅम करता येते.
  नुसतीच राळ उडवून देणे हाच उद्देश दिसतो. EVM हॅक होणे खूपच अवघड आहे. कृपया तांत्रिक बाजू समजावून सांगणारा लेख लिहावा ही विनंती.

  ReplyDelete
 5. शहाण्याला शब्दाचा मार पण ह्या नीच माणसांचं काय करायच? आपले आक्रमक पत्रकार आणि जबरदस्त व्यंगचित्रकारपण त्यातलेच.

  ReplyDelete
 6. भाऊ आपण म्हणता ते एकदम सत्य आहे की मोदींच्या विजयात या बदनामीचा मोठा वाटा आहे कारण आज हरियाणाच्या एका पोटनिवडणुकीत राहुल गांधीचा प्रवक्ता रणदीप सुरजेवालाचा अतिशय दारुण पराभव झाला आहे तिथे भाजपचा विजय होताना हा सुरजेवाला थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे

  ReplyDelete
 7. पुन्हा 2019.ईव्हीएम की जय असे म्हणणार झाडुन सारे विरोधक

  ReplyDelete
 8. भाऊ ह्या लोकांचा राफेल बाबतीत भारताच्या PM, Defence minister, French president, dassault ह्या सर्वांवर विश्वास नाही. आणि कोण कुठला तो शुजा (ज्याने तोंड पण दाखवले नाही) त्याच्यावर ह्या विरोधकांचा विश्वास.
  गजबच

  ReplyDelete