Monday, January 14, 2019

सार्वजनिक बेशरमपणाचे नमूने

karnataka MLAs rebellion के लिए इमेज परिणाम

सध्या कॉग्रेसचे कर्नाटकातील दहाबारा आमदार बेपत्ता असल्याने भाजपा तिथले सरकार पाडण्याचा डाव खेळत असल्याचा आरोप चालू आहे. अशा पद्धतीने आमदार फ़ोडणे आणि सत्तापदासाठी सरकार पाडणे, हा उद्योग मुळात कोणी कर्नाटकात आणला होता? २००४ सालात झालेल्या निवडणूकीनंतर आजच्या सिद्धरामय्या यांच्याप्रमाणेच तेव्हा एम. एम. कृष्णा या मुख्यमंत्र्याने सत्ता गमावली होती. कारण भाजपा तिथे सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आलेला होता. मग भाजपाला सत्तेपासून दुर ठेवण्याचे पुरोगामी पुण्यकर्म कॉग्रेस आणि जनता दलाला हाती घ्यावे लागले. त्यातून धर्मसिंग नावाच्या कॉग्रेस नेत्याला मुख्यमंत्रीपदी बसवण्याची तडजोड झाली आणि जनता दल सेक्युलरचा उपमुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या मंत्रिमंडळात सहभागी झाले. त्यांना बिचार्‍यांना जनता दल म्हणजे कौटुंबिक राजकीय पक्ष असतो, हे ठाऊक नव्हते. म्हणून सिद्धरामय्या मुर्खांच्या नंदनवनात रममाण झालेले होते. वर्षभरातच त्यांना जमिनीवर आणायचे काम सुरू झाले. आज मुख्यमंत्री असलेले कुमारस्वामी यांनी आपल्या पित्याच्या वारश्यावर दावा करीत, सिद्धरामय्यांना त्यांची जागा दाखवून दिली. ती जागा कशी दाखवली, त्याचे कुणाला प्रात्यक्षिक हवे असेल, तर त्याने कर्नाटकाच्या सध्याच्या नाटकाकडे डोळसपणे बघितले पाहिजे. अगदी असाच खेळ चालला होता आणि कॉग्रेसच्या ऐवजी सेक्युलर जनता दलाचे आमदार सरकार सोडून बाजूला होत चालले होते. पक्षाध्यक्ष देवेगौडांचे सुपुत्र कुमारस्वामीच त्या आमदारांना सरकारच्या विरोधात गोळा करत होते आणि पिताजी मात्र मौनव्रत धारण करून अश्रू ढाळत बसलेले होते. अखेरीस धर्मसिंग सरकार अल्पमतात गेले आणि त्याच्या राजिनाम्यामुळे कुमारस्वामींचा मार्ग मोकळा झाला. भाजपाचा पाठींबा घेऊन चिरंजीव मुख्यमंत्री झाले होते. त्या आमदार पळवापळवीला पुण्यकर्म म्हणायचे, तर आज कुठले पापकर्म चालू आहे?

२००६ सालात कुमारस्वामी यांनी भाजपाशी सत्तेचा सौदा केला होता. विधानसभेची जी काही मुदत राहिलेली होती, त्यातला अर्धा काळ कुमारस्वामी आणि उरलेला अर्धा काळ येदीयुरप्पा मुख्यमंत्री; असा सौदा ठरला होता. त्यासाठीच धर्मसिंग यांच्या कॉग्रेस सरकारचा पाठींबा काढून घेत, जनता दलाचे एक एक आमदार बाजूला होत गेले. त्यांना तिथेच रोखण्याचे पाऊलही देवेगौडांनी उचलले नाही आणि मुलानेच विश्वासघात केल्याचे नक्राश्रू हा माजी पंतप्रधान ढाळत बसला. या पितापुत्राच्या नाटकाने मधल्यामधे सिद्धरामय्यांचा बळी गेला होता. त्याने त्याच रागात जनता दल सोडले आणि कॉग्रेसची कास धरली होती. ह्याला सभ्यपणा वा लोकशाही म्हणायचे असेल तर आमदार विकत घेणे वा सरकारे पाडणेही लोकशाहीच असते. त्यासाठी आज भाजपाला दोषी म्हणता येणार नाही. तेव्हा देवेगौडा व त्यांच्या सुपुत्राने असाच कॉग्रेसला दगा दिला होता आणि आज त्याला त्याचेच औषध सिद्धरामय्या पाजत आहेत. आपली पाच वर्षाची कारकिर्द संपवून त्यांनी कॉग्रेसला निदान ७७ आमदार मिळवून दिले होते. पण शपथविधीच्या दिवशी गौडांच्या घरची पोरेटोरेही मंचावर असताना सिद्धरामय्या समोरच्या गर्दीत बसलेले होते. त्यांना काहीच दुखलेले नसेल काय? दुखले असेल तर आपल्या ७७ आमदारांच्या बळावर आपलाच हाडवैरी कुमारस्वामी मुख्यमंत्री होताना बघणे, हेच मोठे दु:ख होते. त्याला डाळमळीत करणे, हेच मग सिद्धरामय्यांचे सुखद क्षण नसतात काय? आज कर्नाटकात मुख्यमंत्र्याला डळमळीत करणारे नाराज आमदार कॉग्रेसच्र असावेत आणि सिद्धरामय्या दोन पक्षांच्या सुसुत्रता समितीचे म्होरके असावेत, हा म्हणूनच योगायोग नाही. कुमारस्वामींनी तेरा वर्षापुर्वी जी भेटवस्तू दिलेली होती, ती आज सिद्धरामय्या जशीच्या तशी परतफ़ेड म्हणून माघारी देत आहेत. कारण त्यांच्याच इशार्‍यावर कॉग्रेसचे आमदार गायब व बेपत्ता झालेले आहेत.

कुमारस्वामी व देवेगौडा ही कानडी राजकारणात ओवाळून टाकलेली मंडळी आहेत. दांभिकतेचे मुर्तिमंत रुप म्हणून माजी पंतप्रधान देवेगौडांकडे बघता येईल. १९९६ सालात लोकसभेचे निकाल लागत असताना दुरदर्शनच्या कार्यक्रमात कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून प्रणय रॉयने त्यांची मुलाखत घेतलेली होती. आता देवेगौडा राष्ट्रीय राजकारणात येणार काय, असा सवाल प्रणयने त्यांना विचारला होता. तर हे गृहस्थ उदगारले होते, कर्नाटकातला जो मोठा नेता केंद्रीय राजकारणात गेला त्याचे आणि त्याच्या पक्षाचे भवितव्य रसातळाला गेलेले आहे. म्हणूनच मला राष्ट्रीय राजकारणात येण्याची अजिबात हौस नाही. त्याचे कारण स्पष्ट होते. निजलिंगप्पा मुख्यमंत्री असतानाच कॉग्रेस अध्यक्ष झाले आणि त्यांच्यासह कॉग्रेस पक्ष रसातळाला गेला. विरेंद्र पाटिल तसेच नामोहरम होऊन संपले आणि गौडांचे गुरू रामकृष्ण हेगडे केंद्रात मंत्री झाले आणि पुढल्या काळात नामशेष होऊन गेले. गौडांनीच त्यांना पक्षातून हाकलून लावण्यापर्यंत नामुष्की हेगडेंवर आलेली होती. असे देवेगौडा तीन महिन्यातच आपल्याच शब्दांना हरताळ फ़ासून भाजपाला सत्तेपासून दुर ठेवण्याच्या डावपेचात, कॉग्रेसच्या पाठींब्यावर पंतप्रधान झाले. थोडक्यात केंद्रीय राजकारणात जाऊन त्यांनीच आपला शेवट ओढवून घेतला. कारण अकरा महिन्यात त्यांना कॉग्रेसने पायदळी तुडवले आणि नंतर कर्नाटकातही तिसर्‍या क्रमांकाचा प्रादेशिक पक्ष चालवण्यापेक्षा  देवेगौडांना जास्त प्रतिष्ठा राहिली नाही. पण ढोंगीपणा त्यांच्या हाडीमाशी खिळलेला आहे. म्हणूनच दिल्लीत भाजपाला सत्तेपासून दुर ठेवायला पंतप्रधान झालेल्या देवेगौडांच्या सुपुत्राने, दक्षिणेतील कर्नाटक या पहिल्या राज्यात भाजपाला सत्तेत आणून बसवण्याचा पराक्रम केला. तेव्हा हे बुवा अश्रू ढाळत बसले आणि मुलाचे पुन्हा तोंड बघणार नाही असल्या वल्गना करीत होते. पण बेशरमपणा तिथेच संपत नाही.

हळुहळू लोक झालेली पडझड विसरून गेले आणि कुमारस्वामी या सुपुत्राने आपल्याशी दगाफ़टका केल्याचे देवेगौडांचे नाटकही कानडी जनता विसरून गेली, असे पित्याला वाटले. त्यामुळे कुमारस्वामींचे भाजपाच्या मदतीने मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न साकार झाल्यावर, हा पिता विचारसरणी वगैरे गुंडाळून ते मुख्यमंत्रीपद टिकवायला दिल्लीत भाजपाच्या पक्षश्रेष्ठींचे उंबरठे झिजवायला दारोदार फ़िरत होता. मुळ करारानुसार कुमारस्वामी अर्धा काळा व येदीयुरप्पा उर्वरीत काळ मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यातला आपला काळ कुमारस्वामींनी उपभोगला आणि पद सोडायची वेळ आली तेव्हा मुलालाच सत्तेत कायम राहू द्यावे, म्हणून देवेगौडा वाजपेयी व अडवाणींची मनधरणी करत दिल्लीत मुक्काम ठोकून होते. पण त्यात त्यांना यश आले नाही आणि पुत्राला पद सोडावे लागले. येदीयुरप्पा यांचा शपथविधीही झाला. मात्र त्यांना सरकार चालवायला देवेगौडा वा त्यांच्या पुत्राने सहकार्य केले नाही. शपथ झाली तेव्हा पुढली दोन वर्षे येदीयुरप्पा मुख्यमंत्री रहाणार होते. मग अकस्मात या पितापुत्रांना पुरोगामीत्वाच्या वांत्या सुरू झाल्या आणि जातीयवादी पक्षाशी सहकार्य नको असल्याचे सेक्युलर साक्षात्कार होऊ लागले. परिणामी येदीयुरप्पा सरकार काही महिन्यातच कोसळले आणि कर्नाटकात मध्यावधि विधानसभा निवडणूका घेण्याची पाळी आली. तेव्हा काय झाले? देवेगौडा वा अन्य पुरोगामी शहाणे समजतात तितकी सामान्य जनता पुरोगामी वा मुर्ख नसते. म्हणूनच त्या मतदाराने मध्यावधी निवडणूकीत भाजपाला सत्तेच्या इतके नजिक आणून ठेवले, की कुठल्याही जुळवाजुळवीने भाजपाला सरकार बनवण्यात अडचण येऊ नये. पण मुद्दा भाजपाच्या सत्तेचा नसून गौडा वा एकूणच पुरोगामी बेशरमपणाचा आहे. कारण सत्ता मिळणार असेल तर त्यांच्यासाठी भाजपा अस्पृष्य नसते आणि सत्ता मिळणार नसेल, तेव्हा भाजपा अस्पर्श असतो. ह्याला शुद्ध ढोंगीपणा नाही तर काय म्हणायचे?

ज्यांनी २००६ मध्ये भाजपाला हाताशी धरून कॉग्रेसचा मुख्यमंत्री जमिनदोस्त केला; तेच आता भाजपाला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी कॉग्रेसशी हातमिळवणी करतात. त्यातही मजेची गोष्ट म्हणजे निवडणूक प्रचारात राहुल गांधी कायम गौडांच्या पक्षाची भाजपाची बी टीम म्हणून अवहेलना करीत होते. मात्र निकालांना २४ तास उलटले नाहीत, इतक्याच राहुलनीच त्या भाजपाच्या बी टीमला मुख्यमंत्रीपद देऊन टाकले. मुद्दा जुनाच. भाजपाला सत्तेपासून दुर ठेवणे. थोडक्यात पुरोगामीतत्व म्हणजे आता विचार राहिलेला नाही. भाजपाला सत्तेपासून दुर ठेवणे वा शिव्याशाप देणे; म्हणजे पुरोगामीत्व होऊन बसलेले आहे. मग भाजपा मोदींना शिव्याशाप देणारा कोणी पाकिस्तानी का असेना, त्यालाही मिठ्या मारणे पवित्र झालेले आहे. सगळा भंपकपणा आहे. सत्तेची पदे पुरेशी नाहीत आणि दोन्ही पक्षातल्या इच्छुकांना पदे पुरत नाहीत, म्हणून त्यांच्यात नाराजी आहे. विरोधातला पक्ष तुमच्यातली नाराजी आपल्या डावपेचात वापरणारच. गुजरातमध्ये शंकरसिंग वाघेला यांच्यापासून विविध राज्यात कॉग्रेसने आजवर अशा अन्य पक्षातल्यांना फ़ोडून आपला पक्ष सत्तेत राखला वा वाढवला ना? आजही कर्नाटकातले प्रमुख कॉग्रेसनेता हे पळवलेले पोरच आहे ना? सिद्धरामय्या गौडांच्या पुत्रप्रेमाने नाराज होऊन २००६ मध्ये कॉग्रेस पक्षात गेले, तेव्हा पळवापळवीचा आरोप कोणी केला नव्हता तो? उत्तरप्रदेशचे कॉग्रेसनेते राज बब्बर समाजवादी नेते होते ना पुर्वी? मग उगाच तत्वज्ञान वा विचारसवणीच्या गमजा कशाला? सगळी सत्तेची साठमारी आहे आणि भाजपाही तितकाच तरबेज झालाय. बेशरमपणाला तितक्याच निर्लज्जपणे उत्तर मिळू लागले, म्हणून शिव्याशाप चालले आहेत. कॉग्रेसने बदमाशी केली, मग धुर्तपणा असतो आणि भाजपाने तसेच काही केले मग लोकशाहीच्या नरडीला नख लागते; असे वाटायला भारतातील सामान्य मतदार नेहरू विद्यापीठातून राज्यशास्त्र शिकलेला नसतो.

21 comments:

  1. नेहरू विद्यापीठातून राज्यशास्त्र…
    भाऊ, पुरोगाम्यांना डायरेक वहाण खाणं ही आवडेल यापेक्षा! 😂😂

    ReplyDelete
    Replies
    1. हाहाहा । सुंदर प्रतिक्रिया

      Delete
  2. स्वातंत्र्यानंतर ते 2014 पर्यंत किती राज्यांच्या विधानसभा बरखास्त केल्या आणि किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू केली याचाही इतिहास मजेशीर आहे. फरक इतकाच की लोकशाहीची हत्या केली असं म्हणायला तेव्हा सोशल मीडिया नव्हता .

    ReplyDelete
  3. भाऊ बोलायला शब्दच नाहीत इतक अप्रतिम


    ReplyDelete
  4. कर्नाटक निवडणूका संपल्यावर सिद्धरामय्या हेच आमदार मिळवून देतील असे आपण एका लेखात म्हटले होते आज खरे होतांना दिसते आहे.

    ReplyDelete
  5. आपल्या लेख मुळे जुन्या स्मृति जागृत झाल्या खुपच छान माहिती पुर्ण

    ReplyDelete
  6. Voters must vote carefully in a high turnout in next election and keep in mind the issues raised by Bhau in this blog.

    ReplyDelete
  7. apratim..lokanchya manatil bolalat

    ReplyDelete
  8. राजकारण म्हणजे सत्ता प्राप्ती करणे एव्हढेच ह्याला महत्व राहीले आहे.हा सगळा प्रकार लोकशाहीच्या नावाखाली सुरु असलेला विधीनिषेधशुन्य प्रकार आहे.व त्याला कोणताही पक्ष अपवाद नाही.

    ReplyDelete
  9. त्या नरडीला नख . भ्रूणहत्या वगैरे चर्चेच्या दिवशीच कळून चुकले होते की पुरोगामी माध्यम ही चर्चा कोणत्या दिशेने घेऊन जात आहे . तेव्हा पासून आपण चर्चा ... नाही ... कानाला खडा एकदम... न्यूज पेपर चॅनेल बंद ... यांनी बोलावलेल्या पुरोगामी तज्ञापेक्षा रोजची सिरीयल परवडली 😂😂😂

    ReplyDelete
  10. Bhau Superb , u are simply grate - Prasanna

    ReplyDelete
  11. अगदी योग्य आणि मार्मिक विस्लेषण केलेले आहे ,देवेगौडा स्वतःच्या सोईनुसार जेडीएस चा वापर करतात, सत्ता उपभोगण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची ह्याची तयारी असते.

    ReplyDelete
  12. अहो भाऊ त्या मुर्खांना फक्त खुर्ची हवी आहे. लाज कोळून प्यालेले हे सत्ताधुंद पिपासू आहेत. निर्लज्जपणा ही त्यांची खासीयत आहे. यांना खेटरानेच पुजणे योग्य आहे. शब्दांचा मार फक्त शहाण्यांसाठी असतो. हे बडवलेले बैल आहेत.

    ReplyDelete
  13. श्री भाऊ शेवटचे वाक्य सगळं बोलून गेलं लय भारी

    ReplyDelete
  14. एकच बरे आहे, निकडणुकीमध्ये कर्नाटक मध्ये ज्यांचे सरकार येते त्यांच्या विरुध्द सरकार दिल्लीत येते हा इतिहास आहे, त्या दृष्टीने बघता मोदीच परत निवडून येण्याची शक्यता जास्ती

    ReplyDelete