Friday, January 11, 2019

पुरोगामी जादुटोणा

cbi vs cbi के लिए इमेज परिणाम

राहुल गांधी यांना बोफ़ोर्सच्या भुताने इतके छळलेले आहे, की त्यावर रामनाम जपावे तसा त्यांनी राफ़ायलचा जप चालविलेला आहे. त्यात हळुहळू त्यांनी बहुतेक विरोधी पक्षांनाही ओढून घेतलेले आहे. तेही स्वाभाविक आहे. कारण नरेंद्र मोदी यांच्यावर अन्य काही आरोप करता येत नसतील, तर चिखलफ़ेक करण्यालाही पर्याय नसतो ना? पण ज्या पद्धतीने हा पोरखेळ रंगत चालला आहे, त्याकडे बघता पुराणकथा किती सत्यकथा आहेत, त्याचीच प्रचिती येऊ लागली आहे. रामायणातली एक अशीच कथा आहे, ती अहिल्येच्या उद्धाराची. कुठल्या देव किंवा देवीच्या शापाने अहिल्या शीळा होऊन पडलेली असते. आपल्याला शापातून मुक्ती मिळावी म्हणून अहिल्येने म्हणे उ:शाप मागितला होता. शाप देणार्‍या देवाने तिच्या दगड होऊन पडलेल्या शिळेला अवतार पुरूष श्रीरामाचा पदस्पर्श झाला तरच पुन्हा अहिल्या मानवीरूप धारण करू शकते अशी ती कथा आहे. आजच्या विज्ञानयुगात तिला कोणीही भाकडकथाच म्हणणार. कारण त्याचा कोणी वैज्ञानिक पुरावा देऊ शकत नाही. पण डोळसपणे बघितले तर त्याचे पुरावे उपलब्ध असल्याचे दिसून येते. सध्या गाजत असलेल्या राहुलकृत राफ़ायल कथापुराणात वर्मा नावाच्या शीळेचा असाच उद्धार झालेला आहे. पुरोगामी दैवतांनी शापवाणी उच्चारल्याने शीळा होऊन पडलेल्या सीबीआय संचालक आलोककुमार वर्मा यांचा कालपरवा नरेंद्र मोदींच्या पदस्पर्श होताच उद्धार होऊन गेला आहे. पण सगळी माध्यमे व विश्लेषक हे विज्ञानवादी पुरोगामी असल्याने वर्मा हे शीळा होऊन पडलेले होते, ही पार्श्वभूमी कथन करीत नाहीत. म्हणून मग या नवोदित अहिल्येचा उद्धार कसा झाला, त्याची चमत्कारीक पुराणकथा आपल्याला ऐकायला मिळत नाही. ती सविस्तर सांगणे भाग आहे. त्यांना शाप कोणी दिला व त्यांची शीळा कशाला होऊन पडली होती. मोदींचा पदस्पर्श त्यांना कसा झाला?

२०१७ सालातही या देशात भाजपाचेच सरकार होते आणि त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच होते. अशा पंतप्रधानाला सरन्यायाधीश व विरोधी नेत्यांशी सल्लामसलत करून सीबीआयचा प्रमुख संचालक नेमता येत असतो. नरेंद्र मोदी यांनी विरोधी नेते कॉग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे आणि सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याशी सल्लामसलत करून आलोक वर्मा यांना त्या पदावर नेमले. थोडक्यात मोदींनी वर्मांच्या गळ्यात अधिकारपदाची माळ घातली. तर त्याला जोरदार आक्षेप घेत खरगे यांनी कडाडून विरोध केला होता. पण पंतप्रधान व सरन्यायाधीश यांच्या बहूमताने वर्मा यांची नेमणूक झाली आणि पुढले काम सुरू झाले. खरगे हे अर्थातच कॉग्रेसचे नेते, पुरोगामी आणि राहुल-सोनियांचे आश्रित असल्याने त्यांना देवाचा दर्जा आपोआपच प्राप्त होत असतो. त्यांनी तात्काळ आलोक वर्मांना शीळा होण्याचा शाप देऊन टाकला आणि त्या शापवाणीची अंमलबजावणी करण्यासाठी देवदुतासारखे नामांकित वकील प्रशांत भूषण धावून आले. त्यांनी त्या नेमणूकीला आव्हान देणारी याचिका सुप्रिम कोर्टात दाखल केली आणि वर्मांना हाकलून देण्यासाठी जणू नवसच केला. ही जानेवारी २०१७ मधली गोष्ट आहे. पण पुरोगामी देवांची शापवाणी इतकी प्रखर असते, की ज्या देवाने शाप दिलाय त्याच्याच उ:शापाने मुक्ती मिळू शकत असते. बहुधा वर्मा यांनी नेमणूकीच्या वेळीच खरगे यांच्याकडे विनवण्या केलेल्या व उ:शाप मागितलेला असावा. खरगेंनी दिलेल्या उ:शापामध्ये कुठे प्रशांत भूषण यांचे नामोनिशाण नसेल तर वर्मांचा पुरोगामी उद्धार कसा व्हावा? म्हणूनच भूषण यांची याचिका काही करू शकली नाही आणि वर्मा सीबीआयचे संचालक म्हणून रुजू झाले. त्यांना मोदींनी निवडले, हाच त्यांचा गुन्हा होता आणि मोदींनी लाथ मारून बाहेर काढल्याशिवाय त्यांना पुरोगामी मुक्ती मिळण्याची अजिबात शक्यता नव्हती. अखेर तेच झाले आणि खरगे यांची शापवाणी खरी ठरली.

आक्टोबर २०१८ मध्ये आलोक वर्मा आणि त्यांचे सहाय्यक राकेश अस्थाना यांच्यात सीबीआयमध्ये तुंबळ युद्ध सुरू झाले. त्यांनी एकमेकांच्या विरोधात आरोप केले व गुन्हेही दाखल करण्यापर्यंत मजल गेली. देशातल्या या प्रमुख तपासयंत्रणेची लक्तरेच चव्हाट्यावर आली. त्यामुळे सरकारला त्यात हस्तक्षेप करण्याची वेळ आली. दक्षता आयोगाच्या माध्यमातून सरकारने त्या दोन्ही अधिकार्‍यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. त्यावर वर्मा यांनी सुप्रिम कोर्टात दाद मागितली आणि जानेवारीत त्यांना न्याय मिळाला. नेमणूकीचा अधिकार ज्या समितीला आहे, तिलाच वर्मांना बाजूला करता येईल, असा तो निर्णय होता. सहाजिकच २०१७ जानेवारीत जी समिती वर्मांना नेमायला बसलेली होती, त्यात फ़क्त एक बदल झाला. सरन्यायाधीश बदलले होते. बाकी मोदी व खरगे तसेच्या तसे होते. आता गंमत अशी झाली, की वर्मा यांना हटवण्यात मोदींचा पुढाकार होता. सामान्य भाषेत मोदींनी वर्मांना जणू लाथ मारून बाहेर काढण्याचा पवित्रा घेतला होता आणि खरगे कमालीचे सुखावलेच, कारण त्यातून त्यांनी वर्मांना दिलेला उ:शाप खरा ठरणार होता. ज्या वर्मांच्या नेमणूकीला याच खरगेंनी जानेवारी २०१७ मध्ये कडाडून विरोध केला होता, तेच खरगे आता वर्मांच्या समर्थनाला पुढे सरसावले. न्या. सिक्री व पंतप्रधान मोदी या दोघांनी वर्मांना हटवण्याच्या बाजूने कौल देताच खरगे विरोधाला उभे ठाकले. आपणच दीड वर्षापुर्वी वर्मांच्या पात्रता व कुवतीवर शंका घेऊन त्यांच्या नेमणूकीला विरोध केल्याचेही स्मरण खरगेंना राहिले नाही. ती नेमणूक रद्द करण्यासाठी कोर्टात धावलेले प्रशांत भूषण यांना आपली याचिका लक्षात राहिली नाही. हे दोघे दिग्गज एका सेकंदात वर्मांच्या समर्थनाला व वकिलीसाठी धावत येऊन उभे राहिले. याला म्हणतात पौराणिक चमत्कार. कारण वर्मांचा चेहरा बदललेला नाही की अठरा महिन्यात त्यांची कुवत बदललेली नाही. मग खरगे भुषणांना झाले काय? दैवी चमत्कार! नरेंद्र मोदींचा पदस्पर्श आणखी काय?

गेल्या पाचसहा वर्षात आपला देश पुराणकाळात जाऊन बसला आहे. इथे दैवी चमत्कार घडतात, कुठलीही कसलीही तात्विक उलथापालथ घडते. ज्याला कुठे वैज्ञानिक कारण वा तर्क देता येत नाही. निकष एकच असतो. मोदींचा हात ज्याला लागेल त्याची शीळा होऊन पडत असते आणि मोदींचा पाय लागला किंवा त्यांनी लाथ मारली, मग त्याचा उद्धार होत असतो. मोदींच्या सोबत होते म्हणून आंध्राचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडी पक्के प्रतिगामी होते आणि त्यांनी मोदींची साथ सोडली तर तात्काळ ते पुरोगामी आघाडीचे अध्वर्यु होऊन गेले. शत्रुघ्न सिन्हा, यशवंत सिन्हा वा अरुण शौरी हे मोदींच्या विरोधात बोलू लागले आणि उद्धार होऊन गेला. कुशवाहा बिहारमध्ये तात्काळ पुरोगामी होऊन गेले. ही एकविसाव्या शतकातील पुराणकथा आहे की विज्ञानकथा आहे? जगातली प्रत्येक घटना राफ़ायल विमान खरेदीशी जोडलेली आहे. जर सुप्रिम कोर्टाने मोदी सरकाला विरोधी ठरणारा निकाल दिला, तर तो न्यायाचा विजय असतो. नसेल तर न्यायालाही मोदींची दहशत असल्याची साक्ष मिळत असते. मोदींना रोजच्या रोज शिव्याशाप देण्याइतकी मोकळीक म्हणजे विचारस्वातंत्र्याची गळचेपी असते. कोर्टाच्या आदेशान्वये कोणाला अटक झाली तर सुडबुद्धीचे राजकारण असते. बाकी संघ भाजपा वा मोदींच्यावर कसल्याही कारणाशिवाय खटले भरणे वा आरोप करणे हा न्याय असतो. थोडक्यात आजकाल पुरोगामी मोक्ष सोपा झालेला आहे. मोदींना शिव्या घाला किंवा मोदींचा पदस्पर्श होईल इतके काही करून घ्या. तुम्ही जगातले सर्वात पवित्र पुरोगामी होऊन जाता. खरगे वा भूषण यांच्यासारखे महात्मे इतके सोपे चमत्कार घडवून दाखवित असतील, तर आपण रामायण काळातून बाहेर कुठे पडलेले असतो? त्या दोघांनी वर्मांच्या नेमणूकीला विरोध करणे आणि त्याच वर्मांच्या हाकालपट्टीला तितक्याच आवेशात विरोध करणे, चमत्कारापेक्षा कमी आहे काय? यालाच म्हणतात पुरोगामी जादुटोणा

11 comments:

 1. भाऊ, आपले विश्लेषण एकदम बरोबर आहे. देशातील कोणतीही वाईट घटना, मोदी आणि भाजपा पर्यंत भिडवणे हेच विरोधी पक्ष फुरोगामी आणि मिडिया यांचे सध्याचे काम आहे पण लोकसुद्धा मुळाशी जात नसल्याने त्याला बळी पडत आहेत.

  ReplyDelete
 2. व्वा... पर्दाफाश.

  ReplyDelete
 3. लोकांना यातलं काहीही ठाऊक नाही.वर्मा कोण? विरोध व समर्थन कुणी दिलं? खटला कसला? लोक बिचारे डेली सोप,बॉलिवूड,पेट्रोल चे रेट,7 वा वेतन आयोग,कर्ज माफी,सबसिडी बस इथं पर्यंतच.आणि हे काँग्रेस ला पक्कं ठाऊक आहे.

  ReplyDelete
 4. बिनपाण्याने म्हणतात ती हीच का हो भाऊ

  ReplyDelete
 5. ह्या मीडिययाला काउंटर मीडिया उभा करणे हाच उपाय

  ReplyDelete
  Replies
  1. जे काम,जाणीव असूनही प्रमोद महाजनांना असूनही जमले नाही ते थोडेफार मोदीनी केले आहे.

   Delete
 6. बहुतेक सर्व पत्रकार, संपादक, हे कॉंग्रेसच्या राजवटीत निर्मिली गेले आहेत. साहजिकच, ही मंडळी खाल्ल्या मिठाला जागत आहेत. परदेशी पत्रकार, भारतीय पत्रकारांच्या एककल्ली विचारसरणी पाहून स्तिमित झाले आहेत. इतका पराकोटीचा विरोध, केवळ निष्ठावंतांकडूनच केला जाईल, याची खात्री कॉंग्रेस हायकमांडला असणारच. म्हणून सर्व पत्रकार मोदींवर विखारी टिका करतात

  ReplyDelete
 7. पण ह्या पुरोगाम्याना तरी कुठे लाज आहे. लाज कोळून पिवून निर्ल्लज्जपणे बौद्धिक बकबक करीत स्वतःचीच तारीफ करत दिवस काढणे. समाजात मानभावीपणे वावरत,जास्तीत जास्त तेढ निर्माण करणे हे एकच काम राहीले आहेे. त्यात, समाजाचाही बेशरमपणा आणि आत्ममग्नपणा ही इतका वाढला आहे की जोपर्यंत स्वतःला काही त्रास होत नाही तोपर्यंत अशा पुरोगाम्यांंच्या वळचणीला लागून आपले महत्त्व वाढवून घेण्याचा ओंगळवाणा प्रयत्न करत राहायचे. यादेशात राष्ट्राला महत्त्व देणारे समाजमन इंदीरा-सोनिया कॉंग्रेसने जाणीवपूर्वक तयार केले नाही आणि रास्वसंघाने जेवढे केले त्यातच आत्मसंतुष्ट आहे

  ReplyDelete