Tuesday, May 14, 2019

२३ मे नंतरचा महाराष्ट्र

Related image

सतराव्या लोकसभेच्या पाचव्या मतदानाचा टप्पा उरकला आहे आणि ४२५ मतदारसंघांचे भवितव्य यंत्रात बंदिस्त झालेले आहे. त्यातच महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघ आहेत. या जागी मतदाराने कुठला कौल दिला आहे, त्यावर नुसते पंतप्रधान नरेंद्र मोदी वा भाजपाचेच भवितव्य अवलंबून नाही, तर महाराष्ट्रातील सर्व पाच प्रमुख पक्षांचे राजकीय भविष्यही अवलंबून आहे. तसे नसते तर शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी मुरब्बी नेत्याने अगोदरच मतदान यंत्रावर शंका घेण्याची वेळ आली नसती. ही निवडणूक देशातल्या बहुतांश पक्षांसाठी निर्णायक महत्वाची आहे. यात भाजपा आघाडीवर आहे, याविषयी कोणाच्याही मनात शंका नाही. कॉग्रेस राष्ट्रवादी याच्यासाठी ही निवडणूक सोपी नव्हती, हे त्यांच्या वागण्याबोलण्य़ातून स्पष्ट झालेले आहे. त्यांनी एकमेकांशी जुळवून घेत वेगाने हालचाली केल्या, तरी अनेक जागी त्यांना उमेदवार निश्चीत करतानाही तारांबळ झालेली होती. अखेरच्या क्षणी तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच कॉग्रेस आघाडी शरण गेली होती. जो पक्ष आघाडीत नको म्हणून आधी तावातावाने युक्तीवाद करण्यात आले, त्याच पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला स्टार प्रचारक म्हणून पुढे करण्याची वेळ येणे’; ही आघाडीसाठी नामुष्कीच होती. कारण या दोन्ही पक्षांनी आपल्यापाशी मराठी मतदाराला आकर्षित करू शकेल, असा कोणी वक्ता नेता उरला नसल्याची कबुली या मतदानात देऊन टाकलेली आहे. तर शिवसेनेने वेळीच भाजपाशी जुळते घेऊन तडजोड केली होती. कारण वेगवेगळे लढून भाजपाचे नुकसान शिवसेना करू शकली असती, यात शंका नाही. पण बदल्यात सेनेलाही लोकसभेत आपले अस्तित्व आखडते होण्याचे दुष्परिणाम भोगावे लागले असते. म्हणूनच भाजपा व शिवसेनेने जो समजूतदारपणा दाखवला; तितका कॉग्रेस व राष्ट्रवादीला दाखवता आला नाही. त्याची किंमत किती, ते २३ मे रोजी समजणार आहे.

राज ठाकरे यांचा पाठीराखा मतदार पाच वर्षापुर्वीच हळुहळू त्यांच्यापासून दुरावत गेला आणि शिवसेना भाजपाकडे वळलेला आहे. त्यांना नव्याने पक्षाची संघटनात्मक बांधणी करायची होती आणि ती भाजप सेनेकडे जाऊन शक्य नव्हती. म्हणूनच त्यांनी मोदी-शहा यांना लक्ष्य करून आपला वेगळा ठसा या निवडणूकीवर उमटवला आहे. त्याचे परिणाम आज दिसणारे नसले, तरी पुढल्या काळात दिसतील. इथे दोघा ठाकरे बंधूंच्या राजकीय समजुतीचे कौतुक करावे लागेल. नवखे असूनही त्यांनी परिस्थितीशी जुळवून घेण्याचे कौशल्य दाखवले. मोदी विरोधात खंबीरपणे उभे राहून राज यांनी तमाम विरोधी पक्षाचे कार्यकर्ते व पाठीराख्यांची मने जिंकलेली आहेत. उलट्या बाजूला मोदी विरोध गुंडाळून अखेरच्या टप्प्यात उद्धव यांनी जागांचा समझोता केला. युतीच्या जुन्या व आजच्या समर्थकांना दिलासा देण्याचा शहाणपणा त्यांनी दाखवला. खरे तर पडत्या काळात अशा खेळी करण्यासाठी शरद पवार यांची ओळख आहे. पण त्यांनी स्वपक्षातील उमेदवार आणि मित्रपक्षाशी जुळते घेण्यापेक्षा त्यातच अडथळे उभे करून आपण वर्तमानापासून तुटल्याची साक्ष दिली. आधी त्यांनाच माढ्यातून माघार घेण्याची नामुष्की आली आणि नंतर नगरच्या जागेवरून कॉग्रेसचा एक मोठा बुरूज ढासळून टाकण्याचे काम पवारांनी छानपैकी पार पाडले. राज ठाकरे यांना चुचकारून त्यांनी एक फ़ुकटचा प्रचारक नक्की मिळवला. पण उद्या त्याच राजना पुन्हा कॉग्रेसने सोबत घेण्यास नकार दिला; तर पवार काय खेळी करणार? राज यांच्याशी आघाडी करण्यासाठी पवार कॉग्रेसचा ‘हात’ सोडणार काय? की कॉग्रेसला राज ठाकरे नको असतील तर राजना एकटे लढायची वेळ पवारच आणणार? तसे झाल्यास लोकसभेत त्यांनीच उभा केलेला अक्राळविक्राळ प्रचारक त्यांच्याच आघाडीवर तुटून पडेल आणि त्याची मोठी किंमत दोन्ही पक्षांना मोजावी लागेल.

आजची परिस्थिती बघितली तर कुठल्याही परिस्थितीत युतीचे दोन पक्ष ३०-३५ जागांच्या खाली येण्याची अजिबात शक्यता नाही. त्या यशावर स्वार होऊन विधानसभा लढायला सेना भाजपा सज्ज होतील. त्याची तडजोड त्यांनी आधीच करून ठेवलेली आहे. पण कॉग्रेस आणि राष्ट्रवादीची स्थिती काय असेल? त्यांचे विधानसभेसाठीचे भवितव्य काय असेल? आजच त्यांच्यासाठी प्रचाराची रणधुमाळी उडवून देणारा कोणी नेता नसल्याचे त्यांनीच लोकसभा प्रचारात सिद्ध करून टाकलेले आहे. पण त्याच वेळी राज ठाकरेंना पुढे करून युती विरोधकांसाठी राज ठाकरे हाच प्रभावी आक्रमक नेता असल्याचेही प्रदर्शन मांडलेले आहे. त्यामुळे निकालानंतर पुन्हा कॉग्रेस राष्ट्रवादी मोठ्या अपयशाने घेरले गेल्यास, त्यांच्या नेते कार्यकर्त्यांना पर्याय शोधावा लागेल. तो भाजपा वा शिवसेनाच असेल असे नाही. त्यापेक्षा आपल्या वि़चार आणि भावनांना उच्चार देणारा म्हणून बहुतांश दुय्यम कार्यकर्ता राज ठाकरे यांच्याकडे झुकणार आहे. एकूण लोकसभा प्रचार व राजकारण बघितले, तर २३ मेच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची आजवरची मांडणी पुरती विस्कटून जाण्याची शक्यता अधिक आहे. पाच वर्षापुर्वीचे पारंपारिक विरोधी पक्ष व आजचे सत्ताधारी, सेना व भाजपा आपले स्थान कायम राखतील. मात्र गेल्या पा़च वर्षातले व्यवहारी विरोधी पक्ष असूनही नाकर्ते राहिलेल्या कॉग्रेस राष्ट्रवादी पक्षांना आपली चमक निकालात दाखवता आली नाही, तर त्यांचे अनेक कार्यकर्ते व दुय्यम नेते पर्याय शोधू लागणार आहेत. त्यातून विरोधी जागेमध्ये प्रचंड पोकळी निर्माण होऊ शकते. राज ठाकरे त्याकडेच डोळे लावून बसलेले आहेत, किंवा त्यांनी त्यासाठीच लोकसभेत मेहनत घेतलेली आहे. मग २३ नंतर कॉग्रेस व राष्ट्रवादी यांचे भवितव्य काय असेल? एक एक करून मागल्या दोन दशकात जनता दल, शेकाप, कम्युनिस्ट वा रिपब्लिकन पक्ष जसे नामशेष होत गेले, त्याच वाटेने कॉग्रेसचे दोन्ही गट जाणार आहेत काय? त्यांना व पक्षनेत्यांना त्याचे उत्तर शोधायची पाळी लोकसभा निकालानंतर येणार आहे.

विद्यमान लोकसभा निवडणूक जितकी मोदी वा केंद्रातील भाजपा किंवा कॉग्रेससाठी निर्णायक नाही; त्यापेक्षा अधिक राज्यात सात दशके राजकीय प्रभाव पाडणार्‍या कॉग्रेसी विचारधारेच्या भवितव्याशी हा निकाल निगडित आहे. ज्या सांगलीतून महाराष्ट्राची तिकीटे वाटली जायची, तिथेच यावेळी वसंतदादांचा नातू शेतकरी संघटनेच्या चिन्हावर लढतो आहे. पवारांना बारामती धोक्यात वाटते आहे. मोहिते विखे भाजपात दाखल झाले आहेत. राज्यात वा मुंबईत पक्षाचे नेतृत्व करू शकणारा कोणी नेता कॉग्रेसपाशी उरलेला नाही आणि राष्ट्रवादीला आजही पवारांवरच विसंबून रहावे लागते आहे. अशाच स्थितीतून पारंपारिक विरोधी पक्ष नामशेष झाले. नव्या नेतृत्वाचा अभाव त्याचे मुख्य कारण होते आणि दोन्ही कॉग्रेस गट त्याच आजाराने बाधीत झालेले आहेत. १९९० दरम्यान अशी स्थिती विरोधकांची झाली, तेव्हा नेतृत्वाची पोकळी बाळासाहेब ठाकरे यांनी पुढे येऊन भरून काढली होती. आज राज ठाकरे यांनी तेच जाळे फ़ेकलेले आहे. सहसा अशा निवडंणुकीत सत्ताधारी पक्षाची जागा व्यापण्याचा विरोधातले पक्ष प्रयत्न करतात. पण इथे मात्र उलटी स्थिती आहे. विरोधी पक्षांनी आपली जागा व बुरूज भक्कम करण्याचा पाच वर्षात अजिबात प्रयत्न केला नाही. उलट सत्तेत बसूनही शिवसेनेने विरोधकांची भूमिका पार पाडलेली होती. १९८६ सालात पुलोद मोडून पवार कॉग्रेसमध्ये पुन्हा गेले आणि पुलोदमधले पक्ष अनाथ झाले. तशीच काहीशी स्थिती शिवसेना पुन्हा मोदींच्या बाजूला गेल्याने आज झालेली आहे, भाजपाच्या विरोधातल्या मतदाराला हवा तसा प्रतिसाद किंवा नेतृत्व पवार वा कॉग्रेस देऊ शकली नाही. त्यातून ही पोकळी निर्माण होऊन गेली. त्यामुळे ही निवडणूक राज्यातील सत्ताधारी पक्षांचे भवितव्य ठरवणारी नसून, विरोधी पक्षांचे भवितव्य ठरवणारी होऊ घातली आहे. त्याला चालना किंवा लगाम मतदार देत असतो. त्याचे उत्तर २३ रोजी मिळेल.

तब्बल तीस वर्षांनी महाराष्ट्र पुन्हा एका राजकीय आवर्तामध्ये सापडलेला आहे. तेव्हा केंद्रात बोफ़ोर्स तोफ़ा खरेदीच्या घोटाळ्याने लोकसभा निवडणूका गाजवल्या होत्या. याहीवेळी केंद्रात राफ़ायल लढावू विमानांच्या खरेदीवरून हलकल्लोळ माजवण्यात आलेला आहे. तेव्हा त्या लोकसभा मतदानाने महाराष्ट्रातील राजकारणाचा चेहरामोहरा बदलून टाकला होता. तोपर्यंत जे प्रस्थापित विरोधी पक्ष राज्यात होते, त्यांची दुर्दशा आजच्या विरोधकांसारखीच झालेली होती. त्यामुळे मोठा फ़टका सत्ताधारी पक्षाला बसला नव्हता, तर लोकांनी आपली विरोधी पक्षाची निवड बदलत असल्याचे संकेत दिलेले होते. त्याला आता तीस वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे आणि महाराष्ट्र पुन्हा एका नव्या बदलाला सज्ज झालेला दिसतो आहे. त्यात नुसते कॉग्रेस राष्ट्रवादी पक्षच गोधळलेले नाहीत. तर तेव्हाप्रमाणेच दलितांचे नेतृत्व करणार्‍या रिपब्लिकन पक्ष व नेत्यांमध्येही गोंधळ आहे. तेव्हाही शेतकरी नेता म्हणून लोकप्रियता संपादन केलेले शरद जोशी गोंधळलेले होते आणि प्रकाश आंबेडकर नव्याने राजकारणात आले असूनही गोंधळलेले होते. कुणालाही आपल्या भूमिकाच निश्चीत करता आल्या नव्हत्या आणि त्यातून राजकीय अस्थिरता वा पोकळी निर्माण झाली होती. आजची स्थिती त्यापेक्षा किंचीतही वेगळी नाही. म्हणूनच २३ मे रोजी लोकसभा निवडणूकीचे निकाल असले, तरी परिणाम महाराष्ट्रावर दिर्घकालीन होणार आहेत. गेल्या दोनतीन दशकात राज्याचे दिग्गज नेते म्हणून नावारूपाला आलेले अनेक चेहरे इतिहासजमा होण्याचीही शक्यता आहे. तसे झाल्यास महाराष्ट्र हा ढासळलेला कॉग्रेसचा देशातील अखेरचा बुरूज असेल. राज्याच्या राजकारणातला मध्यवर्ति स्तंभ अशी स्वातंत्र्योत्तर कालखंडातील कॉग्रेसची जागा संपुष्टात येऊ शकेल. कारण नुसत्या जागा कमीअधिक होऊन काही होत नाही. कॉग्रेस व राष्ट्रवादी यांच्या मतांच्या प्रमाणात सातत्याने झालेली घट, भवितव्याची चाहूल आहे. बघू २३ मे काय घेऊन उजाडतो.

10 comments:

  1. काॅंग्रेस व राष्ट्रवादीने आपल्या तोफा " मनसे "च्या मुखातून डागल्या. त्या मुळे मनसे विधानसभेत विरोधीपक्ष म्हणून बसण्याची शक्यता मला तरी वाटत नाही. कारण मनसे कडे संघटनाच नाही. जी आहे ती अत्यंत दुबळी आहे. काॅंग्रेस व राष्ट्रवादीतून फुटून उमेदवार मनसेत जाण्याची शक्यता मला तरी दिसत नाही. मनसे म्हणजे " बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात " असल्याने त्यांचा फुगा फुटायला वेळ लागणार नाही.
    मनसे कडे एके काळी नाशिकची मनपा होती. ती व्यवस्थित चालवून आपला पाया बळकट करण्याची संधी जनतेने दिली होती. ती राज ठाकरेंनी अक्षरशः वाया घालवली. तोंडच्या पोकळ वाफा दवडून आपल्याला सत्ता मिळेल अशी मनसेची इच्छा असल्यास ती संपूर्ण फोल ठरेल.सत्ता मिळविण्यासाठी संघटना लागते. संघटना बांधायची तर विश्वासू सहकारी लागतात. घरच्या कुत्र्यांचे कौतूक करून संघटना उभारता येत नाही.

    ReplyDelete
  2. भाऊ, पहाटेच्या दाट धुक्यामधूनसुध्दा क्षितिजाच्या पलिकडील अचूक पहाण्याची तूमची क्षमता विलक्षण आहे..
    आम्ही नशीबवान आहोत..

    ReplyDelete
  3. फारच छान...! खर म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यावरील (लंबी रेस का घोडा .. ) ह्या नंतर मला आवडलेला लेख .. वैयक्तिक मला मात्र उत्सुकता मोदी बहुमताने (भाजपा, NDA नाही ) ह्या विषयीची च जास्त आहे... फार गरज आहे त्याची

    ReplyDelete
  4. भाऊ,23 मे चा तुमचा अंदाज अजून आला नाही.

    ReplyDelete
  5. Bhau khara game tar congress ncp cha honar ahe. Ata raj thackray khup changlya sabha ghetayt. Pan yaat maja ashi ahe ki jo bjp shivsena yancha paramparik maradar ahe to tyanchyakade akarshit honar nahi. Pan jo congress ncp cha matadar ahe jyanna bjp shivsena nakoy tyanna mns ha navin option milel (tyancha vichar asa asel ki tasehi congress ncp virodhak mhanun lajivane ahet tar yaveli mns la sandhi deu). Tyamyle raj thackray yancha losabhe madhye upayog tyanna vidhansabhe madhye tras denar ahe

    ReplyDelete
  6. मी मागेच तुमच्या एका लेखावर म्हटले होते की राज मोदींच्या विरुद्ध बोलतायत, पण त्यांचा निशाणा फडणवीस आहेत. सहा महिन्यातच निवडणुका आहेत. भाजप सेनेचे सरकार आणि मनसे प्रमुख विरोधी पक्ष.

    ReplyDelete
  7. 30 वर्षांपूर्वी बाळासाहेबांनी जो करिष्मा केला तसाच आता राज साहेब करणार

    ReplyDelete
  8. आदरणीय भाऊ सर आपण म्हणता त्या प्रमाणे राज ठाकरे हे पुढील विरोधी राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी आजपासुन मेहनत करत आहेत पण प्रश्न असा आहे की तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांची आणि संघटनेची बांधणी करणे जमेल का? सभा घेऊन मतदारांना आकर्षित करता येऊ शकते पण कार्यकर्त्यांना दिशा देऊन वाटचाल करता येईल का? पत्रकार परिषद घेऊन जनतेचे प्रश्न मांडणे आणि जनतेतून निवडणूक जिंकून जनतेचे प्रश्न मांडणे ह्यात मोठा फरक आहे. २००९ मध्ये १३ आमदार असताना त्यांची पाटी कोरीच राहिली. आताही अभ्यासपूर्ण विचार करून लढणार्या नेत्यांची पक्षात वानवा आहे, कुशल संघटक तयार करून मतदान करणारया मतदार वाढवणे आणि नकारात्मक राजकारण न करता सक्षम पर्याय म्हणून स्वतःला जनतेसमोर सादर करावे लागेल. तसेही केवळ मराठीचा मुद्दा न घेता सर्व समावेशक मुद्दे घेऊन सातत्याने राजकारण चालू ठेवावे लागेल पण जर का केवळ पार्ट टाईम राजकारणात त्यांना पडून राहायचे असेल तर त्यांचे राजकीय अस्तित्व संपायला वेळ लागणार नाही.
    ����

    ReplyDelete
  9. I think Ajit Pawar will separate from Pawar Saheb. He may join Raj. Congress will be finished soon and eventually NCP as well.

    ReplyDelete