Sunday, May 5, 2019

अजितदादांचे ‘गुण-गान’

Image result for ajitdada salgar supriya

चौथ्या फ़ेरीबरोबर महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान संपून गेलेले आहे. पण मतमोजणीला अजून पंधरवडा बाकी असल्याने शिमग्याच्या सोंगांनी आपले मुखवटे उतरवलेले नाहीत, की तोंडाला लागलेला रंग पुसलेला नाही. सहाजिकच २३ मेपर्यंत आरोप प्रत्यारोपाची चिखपफ़ेक चालूच रहाणार आहे. यात सर्वात धक्कादायक झाली आहेत ती जाणता नेता शरद पवार यांची वक्तव्ये. त्यांचा आजवर इतका तोल सुटलेला नव्हता. इतक्या अनुभवी व मुरब्बी नेत्याची ताजी वक्तव्ये विधाने किंवा आरोप बघितले, तर हातातली अखेरची बारामतीही निसटल्याचा वेगळाच आत्मविश्वास त्यातून व्यक्त होतो. भाजपाने बारामती मतदारसंघ जिंकला, तर मतदान यंत्रामध्येच गडबड असल्याचे मानावे लागेल, हा पवारांचा दावा त्यांच्या आजवरल्या अर्धशतकी राजकीय कारकिर्दीवर बोळा फ़िरवणारा आहे. आयुष्यात चौदा निवडणूका लढलो आणि एकदाही हरलो नाही, असे म्हणत त्यांनी माढा मतदारसंघातून काढता पाय घेतला होता. तेव्हा असलेला आत्मविश्वास अशा रितीने समोर आलेला आहे. पवार पराभवाच्या भयानेच माढ्यातून बाजूला झाले, कारण त्यांना बारामतीचीच शाश्वती उरलेली नव्हती. अन्यथा त्यांनी सतत बारामतीत मुक्काम ठोकला नसता, की मतदान संपल्यावर यंत्राविषयी शंका काढल्या नसत्या. सहाजिकच पवारांच्या ताज्या विधानाला जोडून अजितदादांच्या बारामती सभेतील वक्तव्याची सांगड घालून बघणे भाग आहे. त्या सभेत कुणी सलगर नावाची मुलगी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांचा शेलक्या भाषेत उद्धार करीत होती. पण तिथे मंचावर हजर असूनही पवारांनीही तिला रोखले नव्हते. त्याकडे त्याच मंचावरून बोलताना अजितदादांनी लक्ष वेधलेले आहे. त्याची एक व्हिडीओ क्लिप खुप व्हायरल झाली आणि मीही ती सोशल मीडियामध्ये शेअर केली होती. त्यात अजितदादांना नेमके काय म्हणायचे होते?

सलगर नावाच्या मुलीच्या शेलक्या भाषेतील वक्तव्याचा समाचार अजितदादांनी तिथेच नंतर बोलताना घेतला आणि तिला झापले. असे क्लिप टाकणार्‍यांनी म्हटलेले होते. अजितदादांची ख्याती टग्या म्हणून आहे आणि त्यांनीच स्वत:साठी तो शब्द अनेकदा वापरलेला आहे. पण या दिवशी त्यांनी ज्या कारणास्तव त्या मुलीला झापले, ते कौतुकास्पद होते आणि म्हणूनच मी तात्काळ त्यांचे कौतुक केले होते. पण नंतर एकदोनदा तीच क्लिप काळजीपुर्वक ऐकल्यावर त्यात सामावलेला मतितार्थ उशिरा लक्षात आला. त्यात दादा म्हणतात, मुख्यमंत्री पंतप्रधान यांच्याविषयी असे शब्द किंवा उद्गार, कितीसे योग्य आहेत? त्याला सुसंस्कृतपणा म्हणता येणार नाही, वगैरे. पण त्याच्या पुढे जाऊन दादा त्याच संबंधात उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याशी झालेला संवादही सांगून टाकतात. सलगर मुलगी बोलत असताना त्या भाषेविषयी आपण सुप्रियाकडे तिथेच मंचावर तक्रार नोंदवली. पण सुप्रिया म्हणाली, ग्रामीण भागात असलीच भाषा खपते. तेव्हा आपण ताईचे लक्ष मंचावर शरद पवार साहेब असण्याकडे वेधले होते. पण तरीही सलगर मुलगी बोलत राहिली व मुक्ताफ़ळे उधळत राहिली, असेच दादांनी सांगितले आहे. याचा एकत्रित अर्थ काय घ्यायचा? त्यांना त्या बेताल बरळणार्‍या मुलीला झापायचे होते? की मंचावर असूनही असली बेताल वक्तव्ये निमूट ऐकणार्‍या जाणत्या काकांना व चुलत बहिणीला दादा उघडे पाडत होते? वरकरणी दादांचे शब्द त्या मुलीला झापणारे वाटतात. पण त्यात पवार व सुप्रियाचा आलेला संदर्भ वेगळेच संकेत देणारा आहे. पवार घराण्यात दादांकडे नेहमी टग्या उर्मट म्हणून बघितले गेले. अनेक वक्तव्यांसाठी त्यांना टिकेचे घाव सोसावे लागलेले आहेत. पण आपल्यापेक्षाही चुलते व चुलत बहिण अधिक निगरगट्ट असंस्कृत आहेत, असेच दादांना त्यातून जगासमोर आणायचे नव्हते का?

सलगर ज्या भाषेत बोलत होती, ते भले पारावर गावगल्लीतल्या सभेत खपून जाणारे असेल. पण पक्षाचे वरीष्ठ नेते जिथे हजर आहेत, अशा भव्य मोठ्या सभेमध्ये असली भाषा शोभादायक नाही, असेच दादांचे शब्द म्हणतात. पण तॊ एक बाजू झाली. समोरच्या जमावाला तमाशा आवडत असतो. त्यातला चावटपणाही आवडण्याला पर्याय नसतो. पण मंचावरून जे कोणी सादरीकरण करत असतात, त्यांना आपल्यावर मर्यादा राखाव्या लागत असतात. सलगर तिथे कमी पडत असेल, तर तिला रोखणे हे सुप्रियाचे काम होते. कारण ही कोवळी मुलगी सुप्रियानेच शोधून काढलेली आहे. पण तिच्या भाषेवर तिच्यासह सुप्रियाचेही नियंत्रण राहिलेले नाही. एकवेळ त्या चुलत बहिणीलाही माफ़ करता येईल. पण आमचे काका? देशाच्या राजकारणातले एक मान्यवर व्यक्तीमत्व आहेत आणि त्यांनाही त्यात हस्तक्षेप करायची बुद्धी होऊ नये? असेच यातून दादांना सुचवायचे नाही काय? आपल्या मंचावर कोणी बेताल बकवास करीत असेल, तर त्याला रोखणे आयोजकांचे कर्तव्य असते आणि तिथेही कसूर झाली तर मंचावर उपस्थित असलेले वरीष्ठ व नेत्यांनी पुढाकार घेऊन ते काम करायला हवे. पण त्या कर्तव्याला भगिनी सुप्रिया व काका विसरून गेले. मात्र राजकीय मर्यादा व संस्कृतीचे पालन होण्यासाठी आपण प्रयत्न केला, आधी सुप्रियाच्या हे नजरेस आणून दिले आणि तिने कृती केली नाही, तर आपल्या भाषणातून आपण सलगरचे काम उपटले आहेत, असाच आभास दादांना निर्माण करायचा नाही काय? कारण अशा वक्तव्यातील बेतालपणामुळे टाकीचे घाव दादांना पुर्वी सोसावे लागलेले आहेत. उपमुख्यमंत्री असताना त्यांनी एका उपोषणकर्त्याची खिल्ली उडवताना बोललेले शब्द त्यांना प्रायश्चीत्त घ्यायला पुरेसे ठरलेले होते. मंत्रीपदाचा राजिनामा द्यायची पाळीही त्यांच्यावर आलेली होती. कदाचित उरलेले प्रायश्चीत्त दादांनी या ताज्या वक्तव्यातून तर घेतलेले नाही? काकांचे काम उपटून?

सोलापूरचा कोणी शेतकरी धरण कोरडे पडल्याने तिथे इतर कालव्यातून पाणी सोडावे म्हणून मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसलेला होता. त्याची खिल्ली उडवून देताना एका सभेत अजितदादा म्हणाले होते, आता पाणी नसेल धरणात तर मी जाऊन तिथे लघवी करावी काय? त्यानंतर तो विषय देशव्यापी झालेला होता. त्यावर नुसते लेख अग्रलेखच लिहीले गेले नव्हते. तर दुष्काळी शेतकर्‍यांच्या वेदनांची अवहेलना केली म्हणून टिकेची झोड उठली व व्यंगचित्रेही गाजलेली होती. त्यानंतर काका शरद पवारांनाही पत्रकारांनी छेडलेले होते. त्यांनी नापसंती व्यक्त करताना असे शब्द दिर्घकाळ पाठलाग करतात आणि त्याची मोठी किंमत मोजावी लागते, असे म्हटले होते. तेव्हा आपल्याला भाषा व आक्षेपार्ह शब्दाविषयी जाहिर कानपिचक्या देणारे जाणते काका मंचावर होते आणि ती सलगर नावाची मुलगी भयंकर आक्षेपार्ह शब्दात पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांविषयी व्यक्तीगत शेलक्या शब्दात बोलत होती. याकडे अजितदादांनी लक्ष वेधलेले नाही काय? धरणात लघवी म्हणून आपल्यावर चहूबाजूंनी हल्ले करणार्‍यांना आता ग्लानी आलेली आहे काय? मंचावर असूनही शरद पवार अपशब्दातच फ़ैरी झाडणार्‍या मुलीला रोखत नाहीत, याकडे दादांनी लक्ष वेधलेले नाही काय? अशा बेताल भाषणांची पाठ थोपटणारे आपल्या टगेगिरीपेक्षाही असंस्कृत असभ्य आहेत, हेच दादांना वेगळ्या शब्दात सांगायचे नव्हते काय? तीच क्लिप बारकाईने बघा आणि ऐका. त्यातून दादांना कोणाला झापायचे आहे, ते लपून रहात नाही. ते आपल्या भगिनीला झापत आहेतच. पण मंचावर मुग गिळून गप्प बसलेल्या व बेताल शिव्याशाप ऐकून घेणार्‍या आपल्या जाणत्या काकांचेही कान उपटत आहेत. ह्याचा अर्थ काकांपेक्षा आता पुतण्या मुरब्बी राजकीय नेता झालेला आहे, हे मानावे लागेल. भगिनीस बोले काकास लागे, अशी चलाखी दादाही शिकले म्हणायचे.

राजकीय मंचावर किंवा निवडणूक प्रचाराच्या ओघात अनेकदा वक्त्यांचा तोल सुटत असतो, त्याचा नमूना भावी पंतप्रधान म्हणून गुडघ्याला बाशींग बांधून बसलेले राहुल गांधी नित्यनेमाने पेश करीतच आहेत. पण असल्या बेतालपणाला कुठेतरी मर्यादा असावी असे अजितदादांनाही वाटत असेल, तर ते काकांपेक्षाही मुरब्बी झाले म्हणायचे. कारण काका कुठल्या तोंडाने सलगर मुलीला गप्प करणार? एका सभेत त्यांनी अमित शहांना ‘काय उपटायची ती उपटा’ असा प्रेमळ सल्ला स्वत:च दिलेला आहे. हिंदीत बोलताना ‘उखाड फ़ेकना’ याचा अर्थ मराठीतल्या ‘उखाडणे’ यापेक्षा भिन्न आहे. हे पवारांनाही पक्के ठाऊक आहे. पण आजकाल त्यांनाही आपल्या ग्रामीण संस्कृती व भाषेचा काहीसा पुळका आलेला आहे. दोनतीन वर्षापुर्वी त्यांनी ग्रामीण भाषेतला ‘आंधळ्याचा हात’ उच्चारून त्याची ग्वाही दिलेली होती. आताही मतदान संपून दोन दिवस उलटलेले नसताना त्यांनी बारामती गमावली तर यंत्रात गडबड असल्याची शंका घेऊन, आपल्या अस्ताचीच चाहुल लागल्याचे मान्य केले आहे. अशा वक्तव्यातून अंगी मुरलेल्या एकाधिकारशाही व वतनदारी मानसिकतेची साक्षच पवारांनी दिलेली आहे. बारामती मतदारसंघात आपल्याखेरीज अन्य कोणा नेत्याला मते देण्याचा अधिकार जनतेला नसल्याची मस्तीच त्यातून व्यक्त होत नाही काय? इतकीच हमी व खात्री असेल तर पवारांनी एव्हाना बारामतीत कधीच मतदान घेण्याची गरज नसल्याची घटनादुरुस्ती करून घ्यायची होती ना? पवार वा त्यांचे वारसदार पराभुत करण्याची संधी मतदाराला नसेल, तर मतदान तरी कशाला हवे? पण हळुहळू निकालाचा दिवस जवळ येताना पवारांसह त्यांच्या निकटवर्तियांची नशा उतरू लागलेली दिसते. अन्यथा अशी भाषा सलगरपासून सुप्रिया-पवारांपर्यंत अनुभवायला मिळाली नसती. अजितदादा त्याचेच गुण गात आहेत. मात्र समजून घेणार्‍यांना त्यातला इशारा समजू शकेल.

9 comments:

 1. भाऊ तुमच्या अभ्यासपूर्ण लेखांची फार सवय लागली आहे. त्यामुळे रोज त्याची आतुरतेने वाट पाहीली जाते. ज्यांनी बोध घ्यावा ते त्याची किती दखल घेत असतील? याबाबत शंका आहे. त्यांनी खरी दखल घेतली तर किती बरे होईल, त्यांचे आणि देशाचे सुध्दा.

  ReplyDelete
 2. बारामती गमावली तर मतदान यंत्रावर शंका घेताना या ' अजाणत्या राजाने ' अजून एक वाक्याचा उच्चार केला होता. बारामती गमावली तर तेथे ' हिंसाचार ' होईल असेही ते म्हणाले. कालच पंतप्रधान मोदी यांनीही त्यांच्या मुलाखतीत याचा उल्लेख केला होता. म्हणजे बारामती हरलो तर ' धुमशान करावयाची धमकीच तर त्यांनी दिलेली आहे....!!

  ReplyDelete
  Replies
  1. कदाचित संपुर्ण देशभरात हे करण्याचा मोदी विरोधकांनी डाव आखलेला दिसतो.

   Delete
 3. Best article as usual by you. Appropriate analysis, as usual. You exposed these people. Good.

  ReplyDelete
 4. An unknown person like Saxana Salgar gets publicity when that person attacks a well-known person and the stronger the words the more the publicity. An experienced politician ignores such attacks which riles these critics even more.

  ReplyDelete
 5. दि:-१४ मे रोजी दादांनी महाराष्ट्राच्या झ दर्जाच्या पुरोगामी मंडळींच्या आदि पुरूषाच्या विधानाला फाटा देत ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला नसल्याचे सांगुन सुचक पाऊल नक्कीच उचललयं..

  ReplyDelete
 6. उत्तम लेख भाऊ!!

  ReplyDelete