Saturday, May 11, 2019

बदलती समिकरणे आणि गणिते

Related image

आकार पटेल नावाचे इंग्रजी पत्रकार आहेत आणि आपल्या मोदी विरोधासाठी प्रसिद्ध पुरोगामी लेखक आहेत. कुठल्याही कारणासाठी मोदी आपल्या राजकारणात यशस्वी होऊ नयेत, म्हणून त्यांनी आजवर आपली लेखणी झिजवलेली आहे. मोदी बदनामीत आपला हिस्सा त्यांनी प्रामाणिकपणे उचललेला आहे. अशा पत्रकाराने ऐन सतराव्या लोकसभेच्या मतदानात अखेरच्या दोन फ़ेर्‍या बाकी असताना लिहीलेला एक लेख, विचार करण्यासारखा आहे. इथे त्यांनी आपला मोदीद्वेष बाजूला ठेवून काहीसे मुक्तचिंतन केलेले आहे. पुन्हा मोदींनी उत्तरप्रदेशात मोठे यश मिळवले आणि बहूतमाने सत्ता मिळवली. तर राजकीय विचार करण्याची प्रणालीच बदलावी लागेल, असे मतप्रदर्शन त्यांनी केलेले आहे. प्रणाली बदलणे म्हणजे डाव्यांनी उजवे होणे, किंवा उजव्यांनी डाव्या विचारधारेनुसार विचार करणे; असा अजिबात नाही. गेल्या दोनतीन दशकात राजकीय अभ्यासक व विश्लेषक ज्या जंजाळात अडकून पडलेले आहेत, त्याचे निकष बदलावे लागतील, असे त्यांचे मत आहे. त्यांचे अभिनंदन एवढ्यासाठीच, की संघाचा प्रचारक वा स्वयंसेवक या ठरलेल्या प्रतिमेच्या पलिकडे जाऊन, एक तरी पुरोगामी मोदींचे आकलन करायला पुढे सरसावला आहे. नेहमीच्या गुळगुळीत झालेल्या व्याख्या आणि कालबाह्य परिमाणांनी सगळीच राजकीय समिकरणे व गणिते उलटून पडलेली आहेत. पण चुकलेली उत्तरे पुन्हा तपासून पहाण्याचा प्रामाणिकपणा किंवा डोळसपणा नसल्याने, बहुतांशी पत्रकार विश्लेषक मागल्या पाच वर्षात हास्यास्पद ठरत गेलेले आहेत. त्यांच्या मूळ आजाराचे आकार पटेल यांनी योग्य निदान केले, हे मान्य करावे लागेल. जातिनिहाय राजकीय पक्ष आणि आघाडीचे युग; या दोन संकल्पना मागल्या तीनचार दशकात हळुहळू आपल्या राजकारणात प्रस्थापित झाल्या. पण आता त्याचा भर ओसरला असला, तरी अभ्यासक मात्र त्याच सुकलेल्या डबक्यात पोहायचा खेळ करीत असल्याची ती कबुली आहे.

‘फ़र्स्टपोस्ट’ नामक संकेतस्थळावर त्यांचा प्रसिद्ध झालेला लेख वाचनीय आहे. पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधानपदी विराजमान व्हायचे असेल, तर उत्तरप्रदेशातून अधिक जागा मिळवायला हव्यात. पण त्यांच्यासमोर गठबंधनाचे मोठे आव्हान उभे आहे. मायावतींचा बहूजन समाज पक्ष आणि अखिलेशचा समाजवादी पक्ष, यांनी अजितसिंग यांच्या राष्ट्रीय लोकदलाला सोबत घेऊन केलेले गठबंधन; मोदी भाजपासाठी नक्कीच आव्हान आहे. त्यापुर्वी उत्तरप्रदेशचे राजकारण चार गटात विभागले गेले होते आणि अवघी ३० टक्के मत मिळवूनही कोणी तिथली सत्ता संपादन करू शकत होता. २०१४ सालात मोदी-शहा यांनी ते संपुर्ण गणितच विस्कटून टाकले. बर्‍याच वर्षांनी तिथे ४० टक्के मतांचा पल्ला पार करून संपुर्ण उत्तरप्रदेश एकहाती पादाक्रांत करताना भाजपाने बेचाळीस टक्के मते मिळवली. ती जातीपातीच्या राजकारणाला छेद देणारी होती. पण त्याची कोणाही राजकीय विश्लेषकाने गंभीर दखल घेतली नाही, की विश्लेषण केले नाही. म्हणूनच २०१७ च्या विधानसभा निवडणूकीत पुन्हा एकदा मोदींनी प्रचंड बहूमताने तिथली राज्यसत्ताही पक्षाला मिळवून दिली. अगदी मायावती व अखिलेशचे आव्हान भाजपाला रोखू शकलेले नाही. पण त्या दोघांनी मिळवलेल्या मतांची बेरीज पन्नास टक्क्यांच्या पलिकडे जाणारी असली, तरी प्रत्यक्ष मतदानात २३ मे रोजी फ़रक पडणार आहे काय? पडला तर गठबंधनाचा प्रभाव मानावा लागेल आणि नाही पडला, तर एकूणच प्रस्थापित राजकीय विश्लेषणाची प्रणाली गुंडाळावी लागणार आहे. कारण मोदी भाजपाने पुन्हा निर्णायक संख्येने उत्तरप्रदेश जिंकला, तर जातीनिहाय मतदान होते वा जातीच्या पक्षालाच मतदान होते, ही समजूत धुळीस मिळवली जाणार आहे. मोदी नावाचे आव्हान फ़क्त राजकीय नसून, ते जातीपलिकडे जाणारे आवाहन होत असल्याची ती साक्ष असेल. परिणामी जातीचे पक्ष व समिकरणे घेऊन विश्लेषण करण्याचा उद्योग बंद करावा लागणार आहे.

मोदी यांच्या राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशामुळे आणि एकूणच राजकीय डावपेचांनी, नुसते प्रस्थापित पक्षांची समिकरणे विस्कटून गेलेली नाहीत. तर राजकारणाचा अभ्यास करणारे व विश्लेषण करणार्‍यांचे विश्वही गोंधळून गेलेले आहे. त्यांच्या मनातील संघ किंवा भाजपाचे हिंदूत्व याच्याही पलिकडे जाऊन घटनांचा अभ्यासही न करण्याचा आळशीपणा उलटला आहे. लालू वा मुलायम म्हणजे यादवांची मते. मायावती वा प्रकाश आंबेडकर म्हणजे दलित मतांचे गठ्ठे. चौटाला किंवा अजितसिंग यांचे लोकदल म्हणजे जाटांची एकजुट मते. किंवा पुरोगामी म्हणजे मुस्लिमांच्या १५ टक्के मतांचा गठ्ठा, असल्या आजवरच्या निकषांना मोदीं-शहांच्या डावपेचांनी पुरता सुरूंग लावला आहे. अगदी बिहार बंगालच्या लहानसहान जाती उपजातींची नेमकी गणिते मांडून व त्यांच्या नगण्य नेत्यांना मोठ्या आघाडीत घेऊन, या जोडीने तोपर्यंत जातीच्या नावावर मजा करणार्‍या प्रादेशिक वा जातिनिहाय नेतृत्वाला शह दिला आहे. अन्यथा उत्तरप्रदेशात ४२ टक्के मतांचा टप्पा गाठून ७३ जागा जिंकणे शक्यच झाले नसते. पाच वर्षापुर्वी मोदींनी बहूमत मिळवले ते हिंदूत्वाच्या घोषणेवर. १५ लाख किंवा २ कोटी नोकर्‍या कुठे आहेत, असल्या बिनबुडाच्या प्रचाराने वृत्तवाहिन्यांचे स्टुडीओ गाजले. पण तळागाळात त्यापैकी काहीही पोहोचत नसते. अशा विखुरलेल्या लहान व उपजातींना मोठ्या छत्राखाली आणल्याने आजवरची जातिय समिकरणे पार बदलून गेली आहेत. अशा लहानमोठ्या विविध जातींचे प्रतिनिधीत्व करताना मोदींनी आपले नेतृत्व भक्कम करून घेतले आहे. पण बहुतांश पुरोगामी विश्लेषक अजून भटजी-शेठजींचा पक्ष म्हणून भाजपाकडे बघत बसले आणि गणिते बदलून गेली. आकार पटेल त्याचीच साक्ष देत आहेत. मायावती व अखिलेश यांना विधानसभेत मिळालेल्या २२+२८ टक्के मतांची बेरीज लोकसभेत झाली नाही, तर अवघे राजकीय विश्लेषण कोसळून पडेल, असे म्हणूनच त्यांनी म्हटले आहे.

दुसरा सर्वात मोठा कालबाह्य सिद्धांत म्हणजे आघाडीचे युग होय. राजीव गांधींची हत्या व कॉग्रेस मोडून पडण्याची प्रक्रीया एकाचवेळी सुरू झाली. त्यानंतर एकपक्षीय बहूमत मिळवू शकेल असा नेता वा पक्षच उरला नसल्याने मध्यंतरीच्या सात निवडणूका आघाडीची गोधडी विणावी लागली होती. पण ती पोकळी भरून काढत पुढे सरकलेल्या भाजपाचे हिंदूत्व तसाच जातीपलिकडला मतदारसंघ निर्माण करू शकते, ही शक्यता कोणी विचारात घेतली नाही. मोदी-शहांनी तेच समिकरण साधले आहे. त्यानी उच्चभ्रूंपासून तळागाळातल्या सर्व जाती संप्रदायांना आपल्या सोबत घेऊन देशाला उभारण्याची संकल्पना या काळात मांडली. जेव्हा महत्वाकांक्षेने भारावलेली पिढी प्रौढ म्हणून पुढे येऊ लागलेली होती. त्यातून २०१४ चा विजय मोदींनी साकारला. पुढली पाच वर्षे सत्ता हाती घेऊन, त्यांनी त्या महत्वाकांक्षेला चुचकारण्यासाठीच कारभार केला आणि त्यातूनच विविध जातीच्या उपजाती अस्मितांच्या शृंखला तुटत गेल्या आहेत हे सत्य बघू शकलेले नाहीत, अशा विश्लेषकांना समाजात व पर्यायाने मतदाराच्या पॅटर्नमध्ये होत गेलेला बदल ओळखता आलेला नाही. म्हणूनच त्यांना मोदी पुन्हा बहूमत मिळवायची भाषा कुठल्या आधारावर बोलतात, त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. पण आकार पटेल यांच्यासारखे काही मुठभर मोदीद्वेषी आहेत, ज्यांना येऊ घातलेल्या भवितव्याची चाहूल लागलेली आहे. त्यातून मग असे काहीसे सांकेतिक मुद्दे पुढे येऊ लागलेले आहेत. जशी जुनी समिकरणे आटोपली आहेत, तसेच जुने हातखंडेही कालबाह्य होऊन गेले आहेत. त्यामुळे बदनामीच्या मोहिमा कामाच्या राहिलेल्या नाहीत, की जनतेच्या वाडग्यात काही रोख भिक घालण्याच्या घोषणाही निकामी होऊन गेल्या आहेत. पण राहुलपासून चिदंमरमपर्यंत लोकांना अजून त्या भ्रमातून बाहेर पडण्य़ाचीही भिती सतावते आहे. अशांचे डोळे २३ मे रोजी थोडेसे किलकिले झाले तरी खुप आहे.

11 comments:

  1. मानसिकतेत बदल हीच यशस्विततेची गुरुकिल्ली आहे. मेरा देश बदल रहा है ।

    ReplyDelete
  2. Was Sir, was. Very true article,. If the walls of castisum will collapse, India will really be a great country. Thanks

    ReplyDelete
  3. बरोबर आहे. पप्पूचे 72000 रुपये चर्चेचा मुद्दा झाले नाहीत. भारतीय मन असल्या पाखंड़ातून निघून पूढे गेले आहे.

    ReplyDelete
  4. उत्तम विश्लेशन,बघुयात 23 ला काय चित्र दिसतं

    ReplyDelete
  5. When you don't get the expected results, check your premises.

    Ayn Rand.

    ReplyDelete
  6. 👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌

    ReplyDelete
  7. All the political analysts work on what is discussed in media and people who are connected to it.they are all the people who are not concerned about earning today. There are two india within india . There is an india which earns daily and worries every day. For them 72000 appeals .
    Need to factor that else shining india happened to give example .

    ReplyDelete
  8. भारतीयांची मानसीकता बदलतेय ! जुने निकष गुंडाळावे लागणार , असे तेवीस मे रोजी सिध्द होईलच !
    भाउ , तुमचा वाचनाचा अवाका , विचार करण्याचा वेगळेपणा मान्य करावाच लागेल. तुम्ही पठडीच्या बाहेर जाउन विचार करता. तुमच्या या वेगळ्या विचारसरणीला त्रिवार वंदन ! तुमच्या या विचारातील वेगळेपणा मुळेच तुम्ही " पुन्हा मोदी का ? " हे पुस्तक लिहू शकलात !
    You are great...

    ReplyDelete