Saturday, May 18, 2019

एका स्वप्नाचा मृत्यू

Image result for kejriwal ashutosh

आज सतराव्या लोकसभेसाठीच्या मतदानाची अखेरची फ़ेरी चालू आहे आणि लागोपाठ एक्झीट पोलही येतील. त्यात कोणाचे काय अंदाज आहेत आणि राजकीय भवितव्य काय आहे, त्याला महत्व नाही. कारण आणखी तीन दिवसांनी खर्‍याखुर्‍या मतांची मोजणी व्हायची आहे. पण ह्या शेवटच्या फ़ेरीपुर्वी शनिवारी एका वाहिनीवर झालेल्या राजकीय भाकितांच्या चर्चेमध्ये आम आदमी पक्षाचे पाच वर्षापुर्वीचे दिल्लीतील उमेदवार जे बोलून गेला, ती बाब कुठल्याही राजकीय अभ्यासक वा विश्लेषकाला चकीत करणारी होती. हा उमेदवार मुळातच पत्रकार आहे आणि बहुतांश भारतीयांना चेहर्‍याने ओळखता येण्याइतका प्रसिद्ध आहे, आशुतोष असे त्याचे नाव असून, मागल्या पाव शतकात त्याने टिव्ही माध्यमात आपले बस्तान बसवलेले होते. पण मागल्या लोकसभेपुर्वी पत्रकारितेला रामराम ठोकून तो राजकारणात उतरला होता. त्याच्यासारखेच अनेकजण अन्य व्यवसायात बसलेले बस्तान सोडून राजकारणात आलेले होते. भ्रष्ट वा अराजकी राजकारणाला नवी दिशा देण्यासाठी अशा अनेकांनी आपले व्यवसाय सोडून राजकारणात उडी घेतली, त्याला आम आदमी पक्ष जबाबदार होता. लोकपाल आंदोलनाने आठ वर्षापुर्वी भारतीय समाजजीवनात एक घुसळण निर्माण केली आणि त्यातून हा पक्ष जन्माला आलेला होता. त्याता आशुतोष, योगेंद्र यादव किंवा प्रशांत भूषण इत्यादींनी झेप घेतलेली होती. त्या पक्षाचा लोकप्रिय चेहरा म्हणून संयोजक झालेल्या अरविंद केजरीवाल यांनी आज तो पक्ष व त्याचे राजकारण कमालीचे हास्यास्पद करून टाकलेले आहे आणि म्हणूनच त्यांच्याशी संबंध आलेल्या अनेकांना आता आपलीच लाज वाटू लागली असेल, तर नवल नाही. आशुतोष यांनी शनिवारी प्रथमच आप विषयी निराशा व्यक्त केली आणि ते एक मेलेले स्वप्न असल्याचे जाहिर करून टाकले. आशुतोषच्या त्या वक्तव्याने क्षणभर टाईम्स नाऊची एन्कर नाविकाकुमार देखील गडबडली. चर्चेत सहभागी झालेले इतर पत्रकारही थक्क झाले होते.

अर्थात अशुतोषलाही ही उशिरा आलेली जाग आहे. कारण त्यांनाही केजरीवाल वापरत होते, तेव्हा त्यांच्यासारख्यांचा घेतला गेलेला बळी यांनीही निमूटपणे बघितला व त्यात सहकार्य केलेले होते. म्हणूनच उपयोग संपल्यावर अशा एकेकाने काढता पाय घेतला, किंवा केजरीवाल यांनी कारस्थान करून त्यांची हाकालपट्टी केलेली आहे. योगेंद्र यादव किंवा प्रशांत भूषण यांची अशीच अवस्था झाली, तेव्हा आशुतोष सत्य दिसत असूनही गप्प राहिले होते. कारण लौकरच व्हायच्या राज्यसभा मतदानात आपला नंबर लागण्याची अपेक्षा त्यांना होती. पण साधी रघुराम राजन अशी नावे पुढे करून अखेरीस केजरीवाल यांनी व्यापारी पैसेवाल्यांना आपचे राज्यसभा सदस्यत्व बाजारू पद्धतीने विकले तेव्हा आशुतोष किंवा विवेक खेतान असल्या अर्धवटांना जाग आली. आपला उपयोग आता केजरीवालना राहिला नाही आणि आपला भूषण योगेंद्र होण्यापुर्वी निसटावे, म्हणून त्या दोघांनी वर्षभरापुर्वी आपला गाशा त्या बदमाशांच्या टोळीतून गुंडाळला. कपील मिश्रा यांनाही बळी देण्यात आल्यावर आशुतोष गप्पच होते. पण राज्यसभेच्या उमेदवारीनंतर त्यांना साक्षात्कार झाला. आज तेच आशुतोष आम आदमी पक्ष म्हणजे एका स्वप्नाचा मृत्यू असे विश्लेषण करत आहेत. गेल्या लोकसभेतील हा आम आदमी पक्षाचा स्टार उमेदवार, येत्या लोकसभेत आम आदमी पक्षाला एकही जागा मिळणार नसल्याचे सांगताना एकूणच केजरीवाल यांच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह लावून गेला आहे. अर्थात त्याचेही कारण आहे. हळुहळू केजरीवाल यांची मानसिक स्थिती पुर्णपणे ढासळली असून, वेडाचारापर्यंत जायची वेळ आली आहे. कारण अजून निकाल लागलले नाहीत, इतक्यात त्यांनी दोन धक्कादायक वक्तव्ये नव्याने केलेली आहेत. म्हणून कुठल्याही तर्कहीन बिनबुडाच्या आरोप व संशयाच्या भोवर्‍यात केजरीवालांसह त्यांचा पक्ष बुडतो आहे.

पंजाबच्या एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केजरीवाल यांनी आपल्या सुरक्षा रक्षकाकडूनच इंदिराजींप्रमाणे आपला मुडदा पाडला जाईल, असे वादग्रस्त विधान केले. अजून शेवटच्या फ़ेरीचे मतदान संपलेले नसताना दिल्लीतील मुस्लिमांची मते ऐनवेळी कॉग्रेसकडे वळल्याचेही पक्षपाती विधान केलेले आहे. घटनात्मक किंवा राजकीय सभ्यतेला पायदळी तुडवणारी ही विधाने आहेत. कारण दिल्लीचे पोलिस खाते आपल्या हाती नाही आणि केंद्रातील भाजपा सरकारच्या हाती असल्याने आपली सुरक्षा आपल्या विरोधकांच्या हाती आहे. असला आरोप करण्यासाठीचा केजरीवाल यांचा काय पुरावा आहे? आरोप ग्राह्य धरायचा तर सोनिया, राहुल वा प्रियंकांसह इतरही अनेक विरोधी नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील पोलिस व कर्मचारी भाजपाच्या केंद्र सरकारच्याच अखत्यारीतले आहेत. मग त्या प्रत्येकाचा खुन पाडला जाणार आहे का?इंदिराजींची हत्या दोघा पोलिसांनीच केली हे सत्य आहे. पण तेव्हा खुद्द इंदिराजींचेच सरकार होते आणि विरोधी पक्षाच्या हाती दिल्लीच्या पोलिस खात्याची सुत्रे नव्हती. त्यामुळे अशा पातळीवर राजकारण आणण्यातून केजरीवाल यांनी एकूणच भारतीय राजकारणाला नवी दिशा देण्याचे स्वप्न धुळीस मिळवलेले आहे. कारण कुठल्याही मुरब्बी वा बनेल नेत्यापेक्षाही गलिच्छ आरोप केजरीवाल यांनी केला आहे. अर्थातच त्यांच्या निकटवर्ति गोटात दिर्घकाळ राहिलेले असल्याने आशुतोष त्या व्यक्तीला अधिक चांगले ओळखतात आणि त्याची आत्मकेंद्री मनस्थितीही त्यांना चांगलीच परिचित आहे. म्हणूनच केजरीवाल असे का वागतात किंवा बोलतात, त्याचा अंदाज आशुतोष यांनाच असू शकतो. दिल्लीतील मतदानाच्या दोन दिवस आधी केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांच्याच उमेदवार आतिषी यांच्या चारित्र्यहनन करणार्‍या एका पत्रकाचा गाजावाजा केलेला होता. त्याविषयीही आशुतोष यांनी शंका व्यक्त केली

आतिषीच्या चारित्र्याविषयीचा मामला केजरीवाल यांची सर्वात मोठी घोडचुक असल्याचेही या जुन्या सहकार्‍याने सांगितले. कारण त्या आरोपाने खळबळ खुप माजली, पण शेंबड्या पोराचाही त्याच्यावर विश्वास बसला नाही. माध्यमाच्या पलिकडे कोणी त्यांची फ़ारशी दखल घेतली नाही, की कुठली सहानुभूती निर्माण होऊ शकली नाही. कधीकाळी देशातल्या जनतेला नव्या राजकीय दिशा देण्यासाठी राजकीय क्षेत्रात आलेल्या या टोळीने लोकांचा व प्रामुख्याने दिल्लीकरांचा इतका भ्रमनिरास केला आहे, की त्यांची लांडगा आला रे आला, अशी अवस्था झालेली आहे. त्यामुळेच आपली हत्या भाजपा पोलिसांकडून घडवू शकते, असा आरोप केजरीवालांनी केल्यावर आशुतोष यांच्यासारख्या जुन्या मित्राचाही धीर सुटलेला आहे. मुद्दा एका पक्षापुरता नसून लोकभावनेच्या विध्वंसाचा आहे. एकूणच लोकांच्या आशा जागवणार्‍या लोकपाल चळवळीची भयंकर शोकांतिका म्हणायची. मग कधीकाळी त्याच व्यक्तीचे नेतृत्व स्विकारून काम केलेल्या आशुतोष वा अन्य कोणाला स्वत:चीच आता लाज वाटत असेल, तर नवल नाही. कारण कांगावखोरी, नुसत्या आरोपांची आतषबाजी आणि पोरकटपणाला कुठेतरी मर्यादा असते. हाच खेळ केजरीवाल यांनी मागल्या सहा वर्षात अखंड केलेला असल्याने, आता त्यांचे नामोनिशाण भारतीय राजकारणातून पुसले जाणार आहे. मुद्दा एका व्यक्तीपुरता नसतो, तर आंदोलनाच्या ओघात त्यामध्ये ओढल्या गेलेल्या अनेकांचे एक उदात्त स्वप्न असते. ते अपुर्ण राहिले तरी हरकत नसते. पण त्याची निर्घृण हत्या आपल्यातल्याच कोणी केली, तर होणारे दु:ख असह्य असते. केजरीवालना सोडून गेलेल्या अनेक बुद्धीमान, हुशार व जाणत्या लोकांची वेदना नुसती चळवळीपुरती नाही. आज त्यांना आपल्याच बुद्धीची कींवही वाटत असेल. अन्यथा आशुतोष यांच्यासारखा जाणता पत्रकार अशी भाषा बोलला नसता.

10 comments:

  1. जास्त हुशार लोकांचा एक प्रोब्लेम असतो....
    आपल्याला वापरले जात आहे, हे त्यांना खुप उशीरा कळते.

    ReplyDelete
    Replies
    1. खुप छान प्रतिक्रिया, अंतर्मुख करणारी

      Delete
  2. भारतीय राजकारणात अशी अनेक उदाहरणे आहेत पैकी आसाम गण परिषद हे उत्तम उदाहरण आहे. त्याकाळी आसामातील तरुणांनी उभारलेली चळवळ अशीच राजकीय शक्ती बनून शासक पण झाली मात्र नंतर उद्देश हीन होऊन तीही लयास गेली. केजरीवाल म्हणजे अण्णा हजारे नावाच्या महावृक्षावर बहरलेली बांडगुळी वेल. त्याच्या आधुनिक विचारांच्या मंत्राला भूलून अनेकांनी आपलं आयुष्य पणाला लावलं आणि त्यांचा अकाली राजकीय मृत्यू झाला. अण्णांच्या चळवळीची कळवळ झाली.लोकांचा भ्रमनिरास होऊन विश्वासार्हता संपली. देशाचं हे फार मोठे नुकसान आहे की ह्यापुढे अशा लोकानुवर्ती चळवळी उभ्या करणे दुरापास्त होईल. अशा भणंग, धूर्त कावेबाज लोकांना समाजापासून दूर अंधार कोठडीत ठेवून मृत्यूची भीक मागत राहण्याची शिक्षा दिली जावी.

    ReplyDelete
    Replies
    1. अण्णा हजारे महावृक्ष? मग तो प्रत्येक निवडणुकीतच बहरतो का?

      Delete
  3. केजरीवालजींचं उपरोक्त विधान ऐकल्यावर मला एक जुना हिंदी सिनेमा आठवला. नाव बहुधा मेरे अपने. विनोद खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा मनाने चांगले पण थोडी गुंडगिरी करणारे युवक असतात. गावातील राजकारणी त्यांना वापरून घेतात. एका स्थानिक राजकारण्याची भूमिका असित सेन यांनी वठवली आहे. एका भाषणात ते म्हणतात,

    अब नेताजी हमारे बीच नहीं रहे, बापूजी भी हमें छोडकर चले गये, पंडितजी भी नहीं रहे, और आजकल हमारी भी तबियत ठीक नहीं रहती...

    ReplyDelete
  4. Pharach surekh vishlesan, waa you are great. Asharcharya watey ki hi mandali buddhiwan kashikay samhaychi. Anna Hajare mhantat ki tyanahi hya mansane phaswile. Dillikar hi phasale. Pan sada srvakal konihi sarvana murkha banwu shakat nahi.

    ReplyDelete
  5. खरय.मोदीजी तर केजरीवाल नामक व्यक्ती अस्तित्वात नाही असच वागतात.

    ReplyDelete
  6. Bhau test for you. Exact seats for NDA and UPA.

    ReplyDelete
  7. Khup chaan bhau shevti jyala tyala aap aaplya karmachi phale miltat pappuni pm VAR khup khalchya patlivarchi Tika KELI Maharashtra madhe pan kahi pappuni aashi Tika KELI pan lokkanna changlech kalte he aaplya lokshahiche vaishistha mhanave lagel AATA nda yenar he nakki phar kahi farak padel aase vatat nahi...bar bar modi sarkar Ani karmanuk karaila raga Ani painter aahe na...

    ReplyDelete
  8. आता मतदान पूर्ण झाले आहे. तेव्हा आपले विश्लेषण आणि अंदाज याबद्दल वाचण्यास उत्सुक आहोत.

    ReplyDelete