Saturday, May 4, 2019

फ़िल्डमार्शल राजीव शुक्ला

Image result for rahul rajeev shukla

सध्या चालू असलेल्या लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अगत्याने सर्जिकल स्ट्राईक व बालाकोटच्या हवाई हल्ल्याचे श्रेय घेऊन मते मागत होते. त्यामुळे कॉग्रेसचे राहुल गांधींनी उडवलेले राफ़ायल भ्रष्टाचाराचे विमान जमिनदोस्त झाले. जनमानसावर सुरक्षा हा विषय प्रभाव पाडू लागल्याने राफ़ायल गुंडाळून कॉग्रेसलाही सर्जिकल वा एअर स्ट्राईक असे काही तरी सांगून मते मिळवणे भाग झाले. त्यामुळेच मतदानाच्या चार फ़ेर्‍या संपून गेल्यावर कॉग्रेसला आपणही युपीएच्या कारकिर्दीत सर्जिकल व एअरस्ट्राईक केल्याची आठवण झालेली आहे. लगेच मग मोदींचे समर्थक कॉग्रेसवर तुटून पडले आणि पुरावे मागायला लागले. अर्थातच त्याची पुर्वकल्पना असल्याने राजीव शुक्ला या फ़िल्डमार्शल नेत्याने हल्ल्याच्या तारखाही आधीच जाहिर करून टाकल्या आहेत. पण त्या तारखा देताना आधीच एक पुस्ती जोडून ठेवली आहे. आपणही असे हल्ले पाकिस्तानवर केले, पण त्याचे श्रेय घेण्यापेक्षा त्याविषयी गोपनीयता राखलेली होती, असा शुक्ला यांचा दावा आहे. बाकी काहीही असले तरी शुक्ला यांचा हा गोपनीयतेचा दावा कोणालाही मान्य करावा लागेल. भाजपाने सर्जिकल स्ट्राईक किंवा एअरस्ट्राईक असो, त्याचा विनाविलंब गवगवा केला. उलट कॉग्रेसने पाच ते पंधरा हल्ले करूनही बातमी या कानाची त्या कानाला कळू दिली नाही. खुद्द हल्ले करणारे सैनिक, हवाई दल किंवा भारतीय लष्करालाही आपण असा काही हल्ला केल्याचे आठवत नाही. याला गोपनीयता म्हणतात. मजेची गोष्ट अशी, की पंतप्रधान मनमोहन सिंग, संरक्षणमंत्री अन्थोनी, गूहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह चिदंबरम यांना अशा हल्ल्याचा पत्ता लागला नाही. तेव्हाचे सरसेनापती जनरल व्ही. के. सिंग, जनरल सुहाग इत्यादिंनाही त्याचा मागमूस लागला नाही. याला म्हणतात गोपनीयता. बाकीच्यांचे सोडून द्या, राजीव शुक्ला यांनाही ते हल्ले आठवायला किती महिने गेले ना? कारण हल्ला दुय्यम असतो. गोपनीयता मोलाची असते. नाहीतर मोदी सरकार, यांनी हल्ला केला नाही, तर आधी पाकिस्तानच किंचाळत चव्हाट्यावर आलेला होता.

सर्जिकल किंवा एअरस्ट्राईक हे असे युद्धतंत्र आहे, की त्यात ज्याला दुखले त्याला कळू शकते आणि ज्याने हल्ला केला, त्यालाही आपण काय करून बसलो, त्याचा थांग लागत नसतो. तसे नसते तर सर्जिकल स्ट्राईक झाल्यावर राहुल गांधींनी पुरावे कशाला मागितले असते? त्यांच्याच कॉग्रेसचे सरकार असताना असे हल्ले केल्याचे राहुलनाही अजून कळलेले नाही. ते बिचारे राफ़ायलचे विमान-विमान खेळत कशाला बसले असते? ह्याला खरा सर्जिकल स्ट्राईक म्हणतात. ज्यात हानी झाली त्या शत्रूलाही काय नुकसान झाले, त्याचा पत्ता लागत नाही. ज्याने हल्ले केले त्या लष्कराला आपली कामगिरी माहिती नसते. रक्तपात झाल्याचा कुठलाही पुरावा नसतो. हे शक्य आहे काय? आधुनिक विज्ञानाने केलेली प्रगती ज्यांना ठाऊक नाही, त्यांनाच कॉग्रेसच्या दाव्यात त्रुटी सापडू शकते. आजकाल ब्लडलेस सर्जरी करण्याचे तंत्र विकसित झालेले असेल, तर कुठल्याही रक्तपाताशिवाय सर्जिकल स्ट्राईक का होऊ शकणार नाही? असे हल्ले डझनभर झाले, म्हणून पाकिस्तानला तरी कशामुळे कळू शकणार आहे? त्यांचा रक्ताचा थेंबही सांडला गेला नसेल, तर कॉग्रेसकालीन सर्जिकल स्ट्राईकविषयी पाकिस्तान तक्रार तरी कशाला करणार ना? भारताने पुरावे मागितले तर पाकिस्तान कुठला रक्तपात दाखवू शकणार होता? त्यापेक्षा पाकिस्तान गप्प राहिला आणि कॉग्रेसने फ़िल्डमार्शल राजीव शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली पाकमध्ये सहा सर्जिकल स्ट्राईक करून घेतले. गोपनीयता इतकी राखली गेली होती, की भारतीय सुरक्षा दलांनाही त्याविषयी थांगपत्ता लागू दिलेला नव्हता. फ़क्त सोनिया गांधी व राजीव शुक्ला यांनाच असे स्ट्राईक झाल्याचे माहिती होते. मोदींनी निवडणूक प्रचारात सर्जिकल स्ट्राईकचे भांडवल केले नसते, तर अजूनही कित्येक वर्षापर्यंत कॉग्रेसने केलेल्या त्या सहा हल्ल्यांची माहिती जगाला मिळू शकली नसती.

मोदी समर्थकांना किंवा सुरक्षा जाणकारांना यातली महत्वाची बाजू आजवर उमगलेली नाही. राहुल सोनियांचे अत्यंत विश्वासू सहकारी मणिशंकर अय्यर कायम पाकिस्तानची भलावण कशाला करतात? अय्यर हा कॉग्रेसने पाकिस्तानात घुसवलेला भारताचा सर्वात मोठा व मोक्याचा गुप्तहेर हस्तक आहे. तो तिथे जाऊन आणि पाकच्या वरीष्ठ वर्तुळात वावरून महत्वाची माहिती घेऊन येत असतो. मग क्रिकेट आयपीएलचा म्होरक्या राजीव शुक्ला यांना अय्यर ही माहिती देतात आणि शुक्ला आपल्या सर्वजिकल स्ट्राईकचे नियोजन अतिशय गुप्तपणे करीत असतात. किंबहूना शुक्ला व कॉग्रेस यांनीच संगनमताने इमरान खान याला पाकिस्तानचा पंतप्रधान म्हणून मोक्याच्या जागी आणून बसवलेले आहे. जेव्हा नवाज शरीफ़ पंतप्रधान होते, तेव्हा म्हणूनच इमरानखान विरोधी पक्षात बसलेले होते. त्यांना भारताच्या हितार्थ पंतप्रधानपदी आणून बसवण्याचे कारस्थान, हा भारताने केलेला एक सर्जिकल स्ट्राईकच होता. आधीच्या अशाच हल्ल्यात शरीफ़ कधी पंतप्रधानपद गमावून बसले, त्यांनाही कळू शकले नाही. त्याचे खरे श्रेय कॉग्रेसी गोपनीयतेलाच द्यावे लागेल. आपल्या दहा वर्षाच्या काळात युपीए व कॉग्रेसने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची यादी जगासमोर आहे. पण शुक्ला किंवा अन्य कुणा कॉग्रेसजनाने त्याचा थांगपत्ता कुणाला लागू दिला नाही. गुजरातमध्ये इशरत जहानची चकमकीत झालेली हत्या आणि त्यासाठी तिथल्या मुख्यमंत्री व गृहमंत्र्यालाच आरोपी बनवण्याची योजना सर्जिकल स्ट्राईक नाही तर काय होते? सोहराबुद्दीन नावाचा माफ़ीया चकमकीत मारला गेला, त्यामध्ये डझनभर वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांना खुनी ठरवून चालवलेले खटले न्यायालयीन कारवाई होती का? एकामागून एक असे जबरदस्त सर्जिकल स्ट्राईक युपीए सरकारने केले, की त्यातून हिंदू दहशतवादाचे पेकाट मोडण्याची महत्वाची मोहिम पार पाडली गेली ना?

इशरत, सोहराबुद्दीन वा तत्सम खटल्यातून सगळे आरोपी निर्दोष सुटले. तरी कॉग्रेसजन सतत हिंदू दहशतवादाचा डंका पिटत असतात ना? कर्नल प्रसाद पुरोहितला मालेगाव स्फ़ोटाच्या खटल्यात पुराव्याशिवाय गुंतवून झालेला एअरस्ट्राईक आपण इतक्यात विसरून गेलो का? कुठलाही पुरावा आज दहा वर्षे उलटून गेल्यावरही कोर्टात सादर होऊ शकला नाही आणि मायदेशी तुरूंगात कर्नल पुरोहित जामिनाशिवाय खितपत पडून राहिला. त्याला ब्लडलेस सर्जरी म्हणजेच सर्जिकल स्ट्राईक नाहीतर काय म्हणावे? अशा बाबतीत कॉग्रेसने पाळलेली गोपनीयता विसरून चालणार नाही. मोदींच्या सर्जिकल स्ट्राईकला आता अडीच वर्षे उलटून गेली आहेत. तेव्हा तात्काळ कॉग्रेसवाल्यांनी पुरावे मागितले होते. कारण त्यांना त्या हल्ल्यात कोणी भारतीय फ़सला नाही याची शंका आलेली होती. सर्जिकल स्ट्राईक त्याला म्हणतात, ज्यात स्वदेशी निरपराध नागरिक हकनाक मारला जातो, किंवा खटल्यात गुंतवला जातो. कसाबला मुंबई शहरात घुसायला देऊन शेकडो निरपराध नागरिकांची कत्तल केली दिली जाते, त्यावरून सर्जिकल स्ट्राईक ओळखायचा असतो. पाकिस्तानी हद्दीत वा प्रदेशात घुसून शत्रूला मारणे म्हणजे सर्जिकल स्ट्राईक कसा असू शकेल? त्यात कोणी भारतीय मारला गेला नाही, की पकडला गेला नाही. कुठे हिंदू दहशतवादाचा डंका पिटला गेला नसेल, तर मोदी सरकारचे एअरस्ट्राईक वा अन्य कुठले हल्ले म्हणजे निव्वळ थापेबाजीच असणार ना? व्ही के सिंग वा सुहाग असल्या जनरल्सना काय कळते? फ़िल्डमार्शल राजीव शुक्ला हा अशा हल्ले प्रतिहल्ल्यातला अंतिम शब्द असतो. अफ़गाणिस्तान वा सिरीयात तालिबान वा बगदादी यांच्या कसे रोखावे आणि संपवावे; त्यासाठी अध्यक्ष ट्रंपही शुक्लांचाच तर सल्ला घेतात ना? तेव्हा मोदी समर्थकांनी युपीएच्या काळात झालेल्या सर्जिकल वा अन्य कुठल्या हल्ल्यावर शंका घेणे बंद करावे आणि शुक्लाच्या पराक्रमाला दाद द्यावी.


14 comments:

  1. मणिशंकर अय्यर हया निवडणूकीत कोठेच दिसले नाही

    ReplyDelete
    Replies
    1. एक आवाई उठली होती, की बालाकोटच्या हल्ल्यात या गृहस्थाला देवाज्ञा झाली. हे महाशय त्यावेळी तिथेच उपस्थित होते. मग या टिनपाटाने जाहीर केले की तो तमिळनाडू मध्ये असून जिवंत आहे. असो त्याची उणीव या वेळी शत्रुघ्न, शुक्ला या सारख्या मंडळीनी भरून काढली .

      Delete
  2. भाऊ पुन्हा मोदीच का ? पुस्तक वाचले .अजून २-३ वेळा वाचावे लागणार आहे. नहरूवाद संपून (आशा आहे )राष्ट्रवादाकडे चाललेले स्थित्यंतर हे लक्षात आले .तुम्ही ३७० ३५आ कलम खरच संपतील का ? मोडी सरकार काश्मीरचा प्रश्न तडीस नेवू शकतील का ? याविषयीची मांडणी करावी .अर्थात 23MAY नंतर . २०१३-१४ मधील विश्लेषण वाहिन्यांवर पाहून मी तुमचा fan झालो होतो पण तुम्ही तिथून गायब झालात आणि पुन्हा निवडणुकीच्या वेळी भेटलात .राजकारणातील गुंतागुंत सोडवताना तुमचे मार्गदर्शन मोलाचे आहे आणि त्यापेक्षा ते स्फूर्ती देणारे आहे . नाहीतर एखादा भ्रमिष्ट व्हायचा.

    ReplyDelete
  3. वा भाऊ, धम्माल आणि कमाल लेखणी!

    ReplyDelete
  4. झणझणीत, हा लेख जर एखाद्या कट्टर काँग्रेस समर्थका समोर वाचून दाखवला तर त्याचा तिळपापड होईल
    (अर्थात उपरोध समजला तर)

    ReplyDelete
  5. Bhau Uttam Nandani kharetar modinchya surgical strike ne congrechi palapal zali pakiPaki peksha congreschich dhavpal jast diste he modiji Che Yash aahe.

    ReplyDelete
  6. जबरदस्त विश्लेषण.

    ReplyDelete
  7. एअर स्ट्राइकमधे " मणिशंकर अय्यर " मारले गेले अशी चर्चा सध्या जोरात चालू आहे. एअर स्ट्राइकच्या वेळेला ते बालाकोटला टेररिस्ट कँपमधे झोपले होते असे बोलले जात आहे. खरे खोटे काय ते माहिती नाही पण वायरल चर्चा चालू आहे.

    ReplyDelete
  8. भाऊ सही
    भारताच्या सुरक्षा बाबतीत मोदी नी उचलेली पावले जगाला प्रचंड क्षमता दाखवून देणारी आहेत कमीत कमी सामुग्री व पैसा सुविधा असताना परिमाणु दहशत दाखवणार्या पाकिस्तान ला चांगलीच चपराक दिली आहे व जगाला भारताची ताकद दाखवली आहे. पण अशिक्षीत असंस्कारी गरिब जाती पाती धर्म पंथ प्रांत यावर विभागलेल्या भारतासारख्या खंडप्राय व मोठी लोकसंख्या असलेल्या देशाला कसे समजवणार?
    मोदी परदेश दौरे करतात या बाबतीत असाच धुरळा सत्तेवर आले व परदेश दौरे करण्यास सुरुवात केली व मिडियावाले मोदी यांच्या परदेशी दौरा ची खिल्ली उडवणारे ची क्लीप परत परत दाखवत तेल ओतत होते...
    भारतात अशिक्षीत जनता खुप आहे.. व अशिक्षीत याच साठी ठेवले गेले आहे..
    याची ऊदाहरणे अॅलर्ट नागरिक सहज आजुबाजुला किंवा अगदी आॅफीस हाॅस्पीटल घरात हाॅटेल मध्ये काम करणार्या अशिक्षीत कामगारला मोलकरीणीला विचारून खात्री करु शकतात.. हे सहज त्यावेळी पण मिडियावाले व खिल्ली उडवणारे काँग्रेसचे दलाल च्या बंबराडींग मुळे म्हणत होते...
    मोदी परदेशात फिरुन घेतायत आणि याचे अनेक दुरगामी फायदे हे समजु शकत नाहीत..
    आता काल परवा पण हेच लोक सहज म्हणत होते आम्हाला 72000 मिळणार आहेत..
    हे डोळस पणे अनुभवले की समजते की भारतीतात कितीही देशहित वादी दिग्गज नेता असला तरी अशा करोडो अशिक्षीत मतदारांनी खुप घात केला आहे व याचा फायदा घेत गांधी घराणेशाही खाओ और खाने दो या तत्वावर दशकानु दशके राज्य करत अशा नागरिकांना गरीब व अशिक्षीत च ठेवले..
    मोदीनी पण अशा वर्गा साठी काही वेगळे करुन या वर्गावर संस्कार करण्यासाठी काही शिक्षण प्रौढ शिक्षणाची संस्कारची दुरगामी योजना राबवली नाही...
    अर्थात भारतीय मतदार चाणाक्ष आहे व बरोबर निर्णय घेते हे बारुद लावून दुर्लक्ष करतात.. पण याचं मुळे कधी कधी भाजप सारख्या विरोधी सरकार येते व परत दोन पाच वर्षे नी आपटी खाते.. याला मोदी अपवाद होतात का? व परत निवडुन आले तर शिक्षण शेतकरी या मुलभुत गरजासाठी आपली कारकीर्द घालवतात का? हे मोदी सारखा दुरदृष्टी व निस्वार्थ डेअरिंगबाज नेताच करु शकतो.. पण जिंकून परत काही टोळक्याच्या नादी लागुन या बेसिक समस्या वर आपली कारकीर्द पणाला लावतात यावरच देशाचे पुढील 40-50 वर्षे चे भारताच्या भविष्याची पाया भरणी करतात हे पहावे लागेल..
    Aks पनवेल

    ReplyDelete
  9. Bhau Torsekat sir, your every article is a golden peace of real political analysis. I surprised that you are coming with very good analysis in every article. Please keep it up and provide the facts to the people. thanks.��

    ReplyDelete
  10. अप्रतिम विश्लेषण
    जबरदस्त विवेचन 👍👍👍👍👍

    ReplyDelete