Tuesday, December 23, 2014

पाठीराखे आणि नेत्यांमधला फ़रकमंगळवारच्या इतक्या दणदणित यशानंतर भाजपाच्या समर्थक कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव केल्यास नवल नाही. पण ज्यांच्या हाती त्या पक्षाची सुत्रे आहेत, त्यांनी मिळालेल्या मते व यशाने सुखावणे कितपत शक्य आहे? कारण त्यांना पक्षाचे भवितव्य ठरवायचे असते आणि कार्यकर्त्यांना पक्षाचे काम करायचे असते. बाकी समर्थकांना त्यापैकी काहीच काम नसते. त्यांनी यशासाठी टाळ्या पिटायच्या असतात आणि अपयशाच्या नावाने बोटे मोडायची असतात. सर्वसाधारणपणे यशाचे सर्वत्रच कौतुक होते आणि अपयशाला नाके मुरडली जात असतात. कारण जग नुसत्या डोळ्यांना तेव्हा दिसेल, तितकेच बघत असते आणि येऊ घातलेल्या परिस्थितीकडे फ़ारसे कोणाचे लक्ष जात नसते. पण ज्यांच्या वाट्याला ती परिस्थिती भविष्यात येण्याची शक्यता असते, त्याने मात्र तिकडे काणाडोळा करून चालत नाही. तो केलाच तर त्यांची परिस्थिती आजच्या राहुल गांधी यांच्यासारखी होते. दोन वर्षापुर्वी कर्नाटकच्या विधानसभांचे निकाल लागले, तेव्हा कॉग्रेस व राहुल गांधींचे समर्थक कशा भाषेत बोलत होते आणि भाजपाची कशी खिल्ली उडवत होते, त्याचे आज कितीजणांना स्मरण आहे? तेव्हा पाच वर्षे सत्तेत असलेल्या भाजपाचा विधानसभेत धुव्वा उडाला होता आणि तो पक्ष देवेगौडा यांच्या सेक्युलर जनता दलाच्याही मागे तिसर्‍या क्रमांकावर फ़ेकला गेला होता. त्यावेळी त्या यशाचे श्रेय राहुल गांधींच्या कौशल्य व नेतृत्वाला देण्याची समर्थकांमध्ये स्पर्धाच लागली होती. उलट अवघ्या दोन प्रचारसभा कर्नाटकात घेणार्‍या नरेंद्र मोदींना तिथे किंचित्तही प्रभाव कसा पाडता आला नाही, त्याची रसभरीत वर्णने ऐकवली जात होती. जिंकलेल्या वा हरलेल्या जागांच्या त्या समिकरणात कोणी प्रत्येक पक्षाला मिळालेल्या मतांची टक्केवारी ढुंकूनही बघायला तयार नव्हता. म्हणून वर्षभरात आलेल्या लोकसभा निवडणूकीच्या मतदानात राहुल गांधींच्या नेतृत्वाचा बोर्‍या वाजायचे थांबले काय?

कर्नाटकात तेव्हा भाजपामध्ये पुरती दुफ़ळी माजली होती आणि येदीयुरप्पा यांनी वेगळी चुल मांडल्याने मतविभागणीचा फ़टका भाजपाला बसला होता. कॉग्रेसच्या वा देवेगौडांच्या मतांमध्ये क्षुल्लकही वाढ झाली नव्हती. पण भाजपाच्या दुफ़ळीचा लाभ मात्र त्या दोघांनाही मिळाला होता. ती दुफ़ळी लोकसभेपुर्वी मिटवली आणि भाजपाने कर्नाटकात पुन्हा मोठे यश संपादन केले. निव्वळ अधिक जागा जिंकल्या, म्हणजे आपण कर्नाटकातील भाजपाचे वर्चस्व संपवले, अशा भ्रमात कॉग्रेस व देवेगौडा राहिल्याने त्यांना लोकसभेत आपली अब्रु वाचवता आलेली नव्हती. कारण अधिक मते मिळवणारा जिंकत असला, तरी त्याच्या कर्तबगारीपेक्षा विरोधातली मतविभागणी त्याच्या यशातला मोठा निर्णायक घटक असतो. त्यात मतदानाचे वास्तव लपलेले असते. त्याचा अभ्यास केला, तरच मिळवलेल्या यशाला टिकवण्याचे भान येते. अन्यथा पुढल्या वेळी त्याचा बोजवारा उडून जातो. कर्नाटकात कॉग्रेसला सत्ता मिळाली व जागाही मिळाल्या, ती भाजपाच्या नाकर्तेपणाची किमया होती. पण कॉग्रेस त्यालाच आपली ताकद समजून वागली आणि वर्षभरात खरी ताकद समोर आली. म्हणूनच गेल्या मे महिन्यातील भाजपाच्या लोकसभेतील यशानंतरच्या विविध निवडणूकातील त्या पक्षाचे यश किती खरे व टिकावू आहे; त्याचा अभ्यास आवश्यक आहे. कारण त्यावरच पुढल्या काळातील पक्षाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. जम्मू काश्मिर, झारखंड, महाराष्ट्र व हरयाणा या चारही राज्यात भाजपाने मोठे यश, जागा जिंकण्यात संपादन केले हे कोणी नाकारू शकणार नाही. पण खरेच असे यश टिकावू आहे काय, त्याचे उत्तर ठामपणे देता येणार नाही. कारण लोकसभेनंतर त्याला जागा जिंकता आल्या तरी मे महिन्यात मिळवलेली मते टिकवणे शक्य झालेले नाही. म्हणून मग अशा यशाने हुरळुन जाणे कितपत लाभदायक असेल?

मतदानातील तेच वास्तव असते, जे जागांच्या आकड्यांमागे झाकले जात असते. तिथेच मग पाठीराखे व समर्थकांची दिशाभूल होऊ शकत असते. लोकसभा निवडणूकीत कॉग्रेसचा पराभव जागांमध्ये झालेला सर्वांना दिसला. पण तो २०१४ सालचा पराभव मागल्या काही निवडणूकातून जवळजवळ येत चाललेला कितीजण बघू शकले होते? ज्या नेत्यांच्या हाती शतायुषी कॉग्रेस पक्षाची सुत्रे होती, त्यांनी तरी डोळसपणे तो पराभव बघायला हवा होता. पण २००९ च्या दोनशेहून अधिक जागांनी कॉग्रेस नेत्यांची सुद्धा दिशाभूल केली आणि तिथेच २०१४ च्या पराभवाचा पाया घातला गेला होता. त्या पायावर कोणीतरी कॉग्रेसच्या पराभवाची इमारत बांधायला पुढे यायला हवे होते आणि नरेंद्र मोदींनी नेमकी तीच भूमिका पार पाडली. १९८९ पासून घसरगुंडीला लागलेल्या कॉग्रेसी मतांची टक्केवारी सुधारण्यापेक्षा इतर पक्षातले उमेदवार गोळा करून, किंवा सेक्युलर थोतांडाच्या नावाखाली अन्य पक्षांना सोबत घेऊन सोनियांनी पक्षाला अधिक खड्ड्यात घालण्याचे पाप केले होते. नरसिंहराव किंवा सीताराम केसरी यांची कॉग्रेस स्वबळावर जितक्या जागा मिळवत होते, तितक्याच २००४ सालात सोनियांनी मित्रपक्ष सोबत घेऊन मिळवल्या. पण आघाडीच्या माध्यमातून सत्ता मिळवण्याने मतांची घसरगुंडी झाकली गेली. किंबहूना झाकून ठेवली होती. १९९६ सालात नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेसचा पराभव झाला तेव्हा १४० जागा जिंकताना पक्षाला २८ टक्के मते होती अणि २००९ सालात मित्रांच्या सहाय्याने २०८ जागा जिंकून ‘महान विजय’ संपादन करणार्‍या सोनियांच्या कॉग्रेसनेही २८ टक्केच मते मिळवली होती. पण त्यालाच ‘दिग्विजय’ ठरवण्याच्या स्पर्धेने २०१४ सालात कोणाची नामुष्की झाली? नुसते कॉग्रेस नेतृत्वच गाफ़ील राहिले नाही, अवघा पक्ष बेसावध राहिला आणि आता विरोधी पक्षा इतकीही लायकी शिल्लक उरली नाही.

१९८९ पासून कॉग्रेसच्या मतांमध्ये चाललेली घसरगुंडी कोणी विचारात घ्यायला तयार नव्हता. मिळालेल्या जागा आणि त्याच बळावर लाभलेल्या सत्तेत मशगुल रहाणार्‍यांचे भवितव्य त्यापेक्षा वेगळे असू शकत नाही. याची उलटी बाजू अशी की १९८४ साली भाजपाने प्रथमच निवडणूका लढवताना जनसंघ म्हणून पुर्वी मिळवलेली मतांची टक्केवारी कायम राखली होती आणि पुढल्या प्रत्येक निवडणूकीत त्यात भरच घातली होती. पण सगळे भाजपाला मिळालेल्या जागांची गणती करत बसले. त्यात १९९९ नंतर घटलेल्या जागांमुळे भाजपा संपत असल्याचे अनेकांना वाटले होते. पण ७ टक्क्यावरून २६ टक्क्यांपर्यंत गेलेल्या भाजपाने १८ टक्क्यांपेक्षा कधीच घसरगुंडी होऊ दिली नव्हती. त्यात गेल्या लोकसभेत १२ टक्क्यांची भर पडली आणि थेट भाजपा बहूमतापर्यंत जाऊन भिडला. मते वाढली दुपटीपेक्षा कमीच वाढली पण जागा मात्र थेट अडीच पटीने वाढल्या. असे मतांच्या टक्केवारीचे अजब गणित असते. कारण जिंकलेल्या जागा फ़सव्या असतात. म्हणूनच नुकत्याच झालेल्या चार विधानसभा निवडणूकीत भाजपाला मिळालेल्या जागा, त्याच्या महान यशाचे लक्षण असे वाटणे दिशाभूल ठरू शकते. उलट याच सात महिन्यात भाजपाची लोकसभेनंतरची त्या त्या राज्यातली मतांची टक्केवारी किती वाढली घटली, त्यात त्याचे सामर्थ्य वा दुबळेपण दडलेले असेल. त्याचा अभ्यास पक्षाच्या नेतृत्वाला करावा लागेल. तरच आज दिसणारे यश व त्यातून आलेली सत्ता टिकवणे शक्य होईल. मते वाढली असतील, तर कशामुळे वाढली? मते घटली आणि तरी जागा वाढल्या असतील, तर कशामुळे वाढल्या? असल्या प्रश्नांची उत्तरे शोधणे व त्यानुसार पुढल्या भूमिका व धोरणांचा अवलंब करणे अगत्याचे असते. तो पाठीराख्यांचा वा समर्थकांचा विषय नसून, पक्षाचे भवितव्य घडवणार्‍यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. पुढल्या काही लेखात त्याचीच मिमांसा करायचा प्रयत्न आहे.

No comments:

Post a Comment