Friday, December 12, 2014

महाराष्ट्राचा तामिळनाडु होईल का?आज महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था बघितली, तर शिवसेना व भाजपा यांच्याभोवती राजकारण घुटमळताना दिसते आहे. कालपर्यंत ज्या दोन पक्षांनी आघाडी करून राज्यात पंधरा वर्षे राज्य केले, ते विभक्त होऊन पराभूत झालेत. एकत्र असते तरी पराभूतच झाले असते. पण त्यात दोन पक्षांनी आपसातील मिलीभगत लपवण्यातून अनेक गुंतागुंती निर्माण झाल्या आहेत. भाजपाने गेल्या पाच वर्षात विरोधी राजकारण केले, तर राष्ट्रवादीने सत्तेचे राजकारण केले. पण त्यांचे आतून मेतकुट होते, हे तसे लपून राहिलेले नाही. मात्र दोन वर्षापुर्वी त्याबद्दल आवाज उठवणारेही सध्या त्याबद्दल अवाक्षर बोलत नाहीत. फ़ार कशाला निवडणूक प्रचारातही त्याचा फ़ारसा उल्लेख झाला नाही. म्हणून जसे चालले आहे तसेच चालू राहिल, अशी कोणी अपेक्षा करू नये. त्या निमीत्ताने राजकारणाची जी नवी रचना उभी रहात आहे, त्याचा लोकमतावर काय परिणाम संभवतो, याचा विचार व्हायला हवा. यातून विरोधात कोण व सत्तेत कोणा, असे सवाल आजही विचारले जात आहेत. ज्याप्रकारचे राजकीय डाव मतदानापुर्वी व निकालानंतर शरद पवार खेळले, त्यातून ही गुंतागुंत तयार झाली. पण त्यांनी तरी त्याचा दुरगामी कितीसा विचार केला होता याची शंकाच येते. त्यांना अर्थातच निकालानंतर सेना भाजपा सहज एकत्र येऊ नयेत आणि आपला मित्र असलेल्या भाजपाला सेनेला दबवण्यासाठी कारण मिळावे, म्हणूनच बाहेरून पाठींबा देण्याची खेळी पवार खेळले. हे आता रहस्य उरलेले नाही. दुसरीकडे सत्तेत सेनेला सहभागी करून घेताना तिच्याविषयीची अनास्था भाजपा नेतेही लपवू शकलेले नाहीत. मग याची परिणती काय होऊ शकते? महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा युती व आघाडीत विभागले जाईल काय? की नवी समिकरणे उदयास येतील? पवार यांच्या अशा डावपेचांना इथेच विराम मिळाला असे मानायचे काय?

काहीशी अशीच स्थिती तीन दशकांपुर्वी तामिळनाडू राज्यात निर्माण झाली होती. अण्णादुराई यांच्या निधनानंतर द्रविड मुन्नेत्र कळघमची सुत्रे करूणानिधी यांच्याकडे आली. तोपर्यंत पक्षाच्या प्रचारात सहभागी असले तरी एम जी रामचंद्रन यांना द्रमुकमध्ये नेमके स्थान नव्हते. आपला समकालीन व मित्र म्हणून करूणानिधी यांनी रामचंद्रन यांना राजकारणात व पक्षात आणले. त्यातून द्रमुकला १९७२ च्या निवडणूका सहज जिंकता आल्या आणि पुन्हा तिथे कॉग्रेसचा दारूण पराभव झाला. परंतु रामचंद्रन यांना लौकरच महत्वाकांक्षेने पछाडले आणि त्यांना सामावून घेणे करूणानिधी यांना अशक्य झाले. तेव्हा एकेदिवशी रामचंद्रन यांनी द्रमुक सोडून वेगळी चुल मांडली, ज्याला आजकाल आपण अण्णा द्रमुक म्हणून ओळखतो. रामचंद्रन नवखे होते तसाच त्यांचा पक्षही नवा होता. तेव्हा द्रमुकला संपवायचे उत्तम हत्यार म्हणून कॉग्रेसने या लोकप्रिय अभिनेत्याची पाठराखण केली. त्याच्याशी युती करून लोकसभा निवडणूका लढवल्या. त्यातून रामचंद्रन यांना आपल्या राजकीय ताकदीची प्रचिती आली. मग पुढल्या विधानसभा निवडणूकीत अण्णा द्रमुकने स्वबळावर बहूमत मिळवून कॉग्रेसचे नामोनिशाण पुसायचे काम हाती घेतले. दोन्ही वेळी रामचंद्रन यांच्या कृपेने कॉग्रेसला काही जागा लोकसभा विधानसभेत मिळाल्या आणि बदल्यात करूणानिधी स्थानिक राजकारणात पुरते नामोहरम होऊन गेले. पण या गडबडीत स्वतंत्र व स्वबळावर तामिळनाडूत लढायची इच्छा व शक्तीच कॉग्रेस गमावून बसली. अण्णादुराई व करूणानिधींच्या जमान्यात दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष असलेल्या कॉग्रेसचे तामिळी राजकारणातले स्थान संपुष्टात आले. पुढल्या तीन दशकात मुठभर जागा दोनपैकी एका द्रविडी पक्षाकडून मिळवण्यासाठी आशाळभूतपणे वाडगा हाती घेऊन उभा असणारा पक्ष, अशी कॉग्रेसची तामिळनाडूतील स्थिती होऊन गेली.

गेल्या पंचवीस वर्षापासून महाराष्ट्रात असलेली शिवसेना भाजपा युती फ़ुटावी, म्हणून शरद पवार यांनी केलेले प्रयास वाया गेलेले नाहीत. त्यांच्याच प्रयत्नांनी युती संपली. पण आज याच जुन्या मित्रांची राजकीय स्थिती सुदृढ झालेली आहे. त्यांनी एकत्रित निवडणूका लढवल्या असत्या, तर त्यांनी सव्वा दोनशे जागा जिंकल्या असत्या आणि दोन्ही कॉग्रेसला मिळून पन्नासचाही आकडा पार करता आला नसता. म्हणूनच युतीची फ़ुट दोन्ही कॉग्रेसच्या पथ्यावर पडली. पण निकाल पाहिले तर युतीपक्ष परस्पर विरोधात लढल्यानंतरही त्यांच्या मतांची बेरीज पन्नास टक्क्यांच्या घरात जाते आहे आणि जागांची बेरीज १८५ झाली आहे. याचा अर्थ असा आहे, की आता हेच दोन पक्ष राज्याच्या राजकारणात खरे प्रतिस्पर्धी झालेले आहेत. भाजपा पहिल्या क्रमांकावर आलेला असून थोडक्यात त्याचे बहूमत हुकले आहे. शिवसेनेने त्याच्याशी जबरदस्त लढत दिली आहे. दुसर्‍या क्रमांकाने पराभूत झालेले सेनेचे उमेदवार लक्षात घेतल्यास सेना १३२ जागी जोरदार झुंज देणारा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी वा कॉग्रेस त्याच्या जवळपासही फ़िरकु शकलेले नाहीत. पुढल्या राजकीय वादावादीत डावपेच खेळताना पवार यांनी त्याच दोन प्रमुख पक्षांना खेळवल्याचा आव आणला जरूर. पण त्यांच्यातला हा बेबनाव आता त्यांना पुन्हा एकत्र एकदिलाने लढायला उभे करणार नाही. म्हणजेच सत्तेत सहभागी झाले तरी आता सेना व भाजपा युती म्हणून निवडणूका लढण्याची शक्यता नाही. परिणामी सगळे निवडणूकीचे राजकारण त्याच दोन पक्षांच्याभोवती फ़िरणार आणि दोन्ही कॉग्रेसना टिकण्यासाठी एकत्र यावे लागेल किंवा दोनपैकी एका पक्षाच्या वळचणीला जावे लागेल. शिवाय दोन्ही कॉग्रेस एकत्र आल्या, म्हणून त्यांना आपली असलेली मते टिकवणे सोपे उरलेले नाही. म्हणूनच महाराष्ट्राचा तामिळनाडू होण्याची परिस्थिती येऊ शकते.

कॉग्रेस नामोहरम आणि राष्ट्रवादी बदनाम अशी स्थिती आहे. त्यामुळे आज सत्तेवर असलेल्या भाजपावर लोकांची नाराजी झाल्यास, त्याचा लाभ दोन्हीपैकी एकाही कॉग्रेसला उठवता येणे अशक्य. प्रतिकुल परिस्थितीत मिळालेल्या मतांमुळे शिवसेनेला स्वबळावर लढायची हिंमत यापुढे मिळणार आहे. त्यात मग दोनपैकी एखादी कॉग्रेस सेनेसोबतही जाऊ शकते किंवा दुसरी भाजपासोबत जाऊ शकते. पण अशा कुठल्याही व्यवस्थेमध्ये सेना किंवा भाजपा त्यातले प्रमुख असतील आणि राढ्ट्रवादी वा कॉग्रेसला दुय्यम भूमिका पार पाडावी लागेल. तामिळनाडूत तेच होत आले. आता पुढले राजकारणात महाराष्ट्र त्याच दिशेने जाण्याची दाट शक्यता आहे. कारण कॉग्रेसपाशी सध्या तरी कोणी खंबीर नेता दिसत नाही. राज्यातल्या अपयशानंतर माणिकराव ठाकरे यांनी राजिनामा दिला. पण त्यांच्या जागी दुसरा अध्यक्षही श्रेष्ठी नेमू शकलेले नाहीत की अन्य कोणी नेताही त्याबद्दल आवाज उठवायच्या मनस्थितीत दिसत नाही. कॉग्रेस इतकी नामोहरम झालेली असताना, राष्ट्रवादीला बदलत्या राजकारणात आपले स्थान काय, त्याचा सुगावा खुद्द शरद पवारच लागू देत नाहीत. आपण भाजपाच्या सोबत आहोत, की विरोधात आहोत, असा गोंधळ त्या पक्षामध्ये गेले दोन महिने माजला आहे. इतक्यात पुन्हा निवडणूकीच्या तयारीला लागायचा आदेश साहेबांनी दिला आहे. म्हणजे काय करायचे ते पक्षातल्या कुठल्याच नेत्याला उमजलेले नाही. थोडक्यात कॉग्रेस व राष्ट्रवादी अस्तंगत व्हायच्या मार्गावर असून राज्याचे सर्व राजकारण सेना व भाजपा यांच्यातल्या झुंजीचे होत जाणार आहे. त्यात दोनतीन दशकातल्या तामिळनाडूची झाक दिसू लागली आहे. युती तुटली नसती आणि पवारांनी बाहेरून पाठींब्याचा पुढला खेळ केला नसता, तर अशी स्थिती कदाचित इतक्या लौकर आलीच नसती. तामिळनाडू जसा दोन द्रविडी पक्षांनी व्यापला आहे तसा आता महाराष्ट्राचा राजकीय रंगमंच दोन हिंदुत्ववादी पक्षांनीच व्यापल्याचे चित्र तयार होत चालले आहे.

1 comment:

 1. भाऊ धन्यवाद. मलासुध्दा असेच वाटतें परंतु एक शंका आहे. ह्या द्विधृविय राजकारणाचा दुसरा धृव मनसे असू शकतो का? आत्ता जरी मनसे कमकुवत असेल तरी नंतरचे काय सांगावे ?

  तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये सुचवले आहेच की शिवसेना आणि मनसेने एकत्र यावे. तसे झाले तर मनसेला सुध्दा बळ मिळेल आणि योग्य वेळ आल्यावर दोघे पुन्हा विभक्त होऊन लढतील व पूर्ण राजकीय अवकाश व्यापतील. मग काँग्रेस आणि भाजपला त्यांच्याशीच आलटून पालटून युती आणि आघाडी करावी लागेल.

  ही शक्यता आहे का?

  आपला नम्र,
  अभिजित

  ReplyDelete