Tuesday, December 23, 2014

काश्मिर झारखंडातील निकाल काय सांगतात?झारखंड आणि जम्मू काश्मिर विधानसभा निवडणूकांचे निकाल अर्थातच भाजपाला प्रोत्साहन देणारे आहेत, तसे कॉग्रेसला गंभीर इशारा देणारे आहेत. पण त्यातून देशाचे राजकारण कुठल्या दिशेने सरकते आहे असे मानायचे? सात महिन्यापुर्वी देशातल्या सार्वत्रिक निवडणूका अटीतटीने लढवल्या गेल्या होत्या. त्यानंतर जे राजकीय वारे बदलले, तिथून भाजपाचा अश्वमेध सर्वत्र दौडू लागल्याचे म्हटले जात होते. दोन महिन्यांपुर्वी महाराष्ट्र व हरयाणा राज्यात विधानसभात भाजपाने मोठे यश संपादन केल्यावर देशात आता पंतप्रधान मोदींना आव्हानच उरले नाही, असे म्हटले जात होते. त्याच्या तुलनेत ताज्या निकालांचा अर्थ कसा लावायचा? यात जम्मू काश्मिरचे भाजपाने ठेवलेले लक्ष्य खुपच मोठे होते. तिथे स्वबळावर सत्ता संपादनाची कल्पना अवास्तवच होती आणि लक्ष्य कुठलेही असले, तरी ते आपण गाठू शकणार नाही, याची भाजपा नेतृत्वालाही पुर्णपणे खात्री असणार. तरीही मोठे लक्ष्य ठेवून कार्यकर्त्यांना झुंजायला प्रेरणा मिळत असते. म्हणून त्यात काही गैर मानता येणार नाही. पण जाहिर नसलेले खरे उद्दीष्ट गाठले गेले आहे काय? काश्मिरमध्ये भाजपाचे बळ नेहमीच जम्मू भागापुरते मर्यादित राहिले. पण यावेळी मोदींनी स्वत: पुढाकार घेऊन काश्मिर खोर्‍यात लढाई घेऊन जाण्याचे धाडस केले. त्यासाठी त्यांची पाठ थोपटावीच लागेल. मात्र तिथे त्यांना जा्गा जिंकता आल्या नाहीत तरी मिळालेली मते लक्षणिय आहेत. त्यालाही राजकीय यशच म्हणायला हवे. पण दुसरीकडे जम्मू या हिंदूबहूल भागात भाजपा अपेक्षित यश मात्र मिळवू शकला नाही, याकडे काणाडोळा करता येत नाही. जेव्हा तिथल्या विद्यमान सरकारवर मतदार कमालीचा संतप्त झाला होता, तेव्हाच त्याचा लाभ भाजपाला मिळणे शक्य होते आणि म्हणूनच मोदींनी आपली सर्व ताकद तिथे पणाला लावली होती. पण जम्मूतही भाजपाला अपेक्षित यश मिळालेले नाही.

काश्मिर खोर्‍यातील मानला जाणारा महबुबा मुफ़्तींचा पक्ष पीडीपी जम्मूत चंचूप्रवेश करू शकला आहे. काश्मिर खोर्‍यातही अब्दुल्लांचा पक्ष मागे पडताना त्याचा संपुर्ण लाभ मुफ़्तींच्याच पक्षाला मिळाला आहे. पण मग त्याच क्रमाने जम्मूत हिंदूबहूल भागात भाजपाला फ़ायदा मिळायला हवा होता. जसे खोर्‍यातले मतदान बहुतांशी प्रादेशिक पक्षांना कौल देणारे झाले, तसेच जम्मूत खोर्‍यातील पक्षांना प्रतिबंध व्हायला हवा होता. तिथे भाजपा मतदाराला पुर्णपणे आपल्या मागे आणू शकलेला नाही. त्यात गफ़लत झाल्याने भाजपाला दणदणित म्हणावे, असे यश संपादन करता आलेले नाही. निदान सर्वात मोठा पक्ष ठरण्याचे भाजपाचे खरे लक्ष्य होते. पण तेही शक्य झाले नाही. जागा दुप्पट झाल्या, तरी कौल पुन्हा प्रादेशिक पक्षाच्या बाजूने गेला आहे. आणि हीच भाजपाने गंभीरपणे विचार करण्याची बाब असेल. कारण आता देशव्यापी राजकारणात भाजपाला कॉग्रेसचे मोठे आव्हान उरलेले नसून प्रादेशिक पक्ष व अस्मितेचा प्रभाव, हेच भाजपापुढले आव्हान असणार आहे. म्हणूनच हे निकाल त्याच निकषावर अभ्यासावे लागणार आहेत. जम्मूत नेहमी कॉग्रेस व भाजपा अशीच झुंज होत राहिली. यावेळी तिथे कॉग्रेस सपाट होऊन भाजपाला त्याचा लाभ मिळाला. त्या प्रादेशिक पक्ष व अस्मितेचा भाजपाला झालेला अडथळा लक्षात घेतला, मगच झारखंडातील निकालांकडे वळता येईल. या आदिवासी बहूल राज्यात नेहमी भाजपा प्रभावी पक्ष राहिला आहे. कॉग्रेस व भाजपा यांच्या लढाईत अनेक प्रादेशिक पक्षांनी दोन्ही राष्ट्रीय पक्षांची अडचण केलेली आहे. पण मोदींच्या झंजावातासमोर यावेळी प्रादेशिक पक्ष पाल्यापाचोळ्यासारखे उडून जातील, ही अपेक्षा होती. कारण तसे लोकसभा निवडणूक निकालात दिसले होते. तेव्हा मिळालेली मते व यश यांची पुनरावृत्ती विधानसभा निवडणूकीत होऊ शकलेली नाही. बहूमत गाठण्यापुरतेच भाजपाला समाधान मानावे लागणार आहे.

झारखंडात कॉग्रेसच्या पाठींब्याने शिबू सोरेन यांचे पुत्र हेमंत सोरेन मुख्यमंत्री झालेले होते. त्यांच्याच विरोधात भाजपाने तोफ़ा डागलेल्या होत्या. एका बाजूला भ्रष्टाचार व दुसरीकडे घराणेशाही अशी दुनळी बंदूक भाजपाने रोखलेली होती. मोदींच्या प्रचारसभांना मिळालेला प्रतिसाद बघता, भाजपा तिथे सहज बहूमताचा पल्ला पार करून जाईल व प्रथमच या राज्यात एकाच पक्षाचे स्थीर सरकार स्थापन होईल ही सर्वांचीच अपेक्षा होती. पण आपल्या जागा वाढवून बहूमतापर्यंत पोहोचताना भाजपाची दमछाक झाली. काठावरचे बहूमत मिळवण्यासाठीही तिथे लहान पक्षांना भाजपाने सोबत घेतलेले आहे. आणि इतके होऊनही कॉग्रेसचा अस्त होत असताना झारखंड मुक्ती मोर्चा व विकास मंच अशा दोन प्रादेशिक पक्षांनी चांगली मते मिळवली आहेत. प्रामुख्याने ज्या मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना भाजपाने लक्ष्य केलेले होते, त्यांच्या पक्षाने आपले बळ कायम राखले आहे. त्यांना बाहेरून पाठींबा देणार्‍या कॉग्रेसची स्थिती दारूण झालेली आहे. सहाजिकच आणखी एका राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री होणार हे उघड आहे. पण जितक्या आत्मविश्वासाने भाजपा आक्रमक झाला होता, त्याला तितके यश मिळवता आलेले नाही. म्हणूनच ही बाब गंभीर आहे. कारण पक्षाचा पारंपारिक पाया भक्कम असलेली राज्ये आता संपली असून, पुढल्या काळात व्हायच्या विधानसभा निवडणूका भाजपाला बलवान पक्षांना झुंज देण्याच्या आहेत. बंगाल, आसाम, तामिळनाडू, बिहार व उत्तर प्रदेश या प्रांतात विधानसभा व्हायच्या आहेत. जर आपले प्रभावक्षेत्र असलेल्या राज्यात भाजपा मोदी लाटेचा पुरेपुर लाभ उठवू शकला नसेल, तर त्याला प्रतिकुल राज्यातल्या रणनितीचा नव्याने विचार करावा लागणार आहे. किंबहूना जिथे प्रभावक्षेत्र होते, तिथे म्हणजे झारखंड वा जम्मूत प्रयास कुठे तोकडे पडले, त्याचा विचार करणे नक्कीच आवश्यक असेल.

भाजपाच्या चांगल्या यशाची अपेक्षा या ताज्या निकालांनी पुर्ण केली नाही. त्याचे कारण मग मोदी जादू संपली असेही सांगितले जाऊ शकते किंवा राजकीय विश्लेषक तसाही अर्थ काढतील. पण त्यात तथ्य नाही, मोदींना लोकांनी देशाचा पंतप्रधान म्हणून स्विकारले होते. तितका दुसरा समर्थ राष्ट्रीय चेहर्‍याचा नेता आज कुठल्याही पक्षापाशी नाही आणि कॉग्रेसपाशी देशव्यापी संघटनेचा ढाचा असला, तरी समर्थ नेतृत्व नाही. म्हणूनच उद्या लोकसभा निवडणूका आल्या, तरी मोदींची जादू कायमच असेल यात शंका नाही. पण भाजपाचे नेते राष्ट्रीय नेतृत्वाची जादू राज्य पातळीवर वापरून विधानसभा जिंकण्याचा खेळ करू बघत आहेत. तिथे त्यांच्या पदरी निराशा येत जाणार आहे. किंबहूना अशा रणनितीतून भाजपा देशभर कॉग्रेसची जागा व्यापत चालल्याची चाहुल लागते आणि कॉग्रेस बनायला उतावळी झाल्याची लक्षणे दिसतात. कुठल्याही पक्षातून लोकांना आणून उमेदवारी देऊन अधिकाधिक जागा जिंकण्याचे हे कॉग्रेसी तंत्र तात्पुरते यश देते. पण परिणामी स्थानिक नेतृत्व मात्र उभे रहात नाही. कॉग्रेसची संघटना त्यातूनच दुबळी होत गेली आणि समर्थ स्थानिक नेतृत्वाच्या बळामुळेच भाजपा शतायुषी कॉग्रेसला सार्वत्रिक निवडणूकीत पराभूत करू शकला. परंतु आपले बळ विसरून कॉग्रेसची भ्रष्ट नक्कल करत निघालेल्या भाजपाला कॉग्रेसच्याच अनुभवातून जावे लागते आहे. समर्थ केंद्रीय नेतृत्वामुळे कॉग्रेसचे प्रादेशिक नेतृत्व दुबळे होत नामशेष झाले व पर्यायाने प्रादेशिक पक्ष व अस्मितेच्या रुपाने कॉग्रेसला आव्हान उभे राहिले. तेच भाजपाचे होते आहे. झारखंड वा काश्मिरात मोदींची जादू चालली नाही. कारण त्यासाठी आवश्यक स्थानिक दांडगे नेतृत्व त्या राज्यात भाजपापाशी नव्हते. महाराष्ट्रातही भाजपाला चेहरा नव्हता, म्हणून त्याचे बहूमत हुकले. पुढल्या काळात लालू, मुलायम, जयललिता, पटनाईक, ममता वा नितीश अशा प्रादेशिक आव्हानांसमोर भाजपाचे काय होईल? मेहबुबा, अब्दुल्ला, मरांडी व सोरेन अशा दुय्यम प्रादेशिक नेत्यांवर मात करता येत नसेल, तर प्रभावशाली प्रादेशिक सुभेदार्‍या कशा मोडल्या जायच्या?

No comments:

Post a Comment