Friday, December 5, 2014

राहुलजी, खुपच उशीर झालाय



लोकसभा निवडणूकीत कॉग्रेसचा दारूण पराभव झाला, त्याला आता सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. त्याच्याही आधी सहा महिने चार महत्वाच्या राज्यात कॉग्रेसची विधानसभा निवडणूकीत पुरती धुळधाण उडाली होती. तेव्हापासून अनेकजण कॉग्रेसचे तारणहार असलेल्या राहुल गांधी यांच्याकडून पक्षाला गाळातून बाहेर काढण्यासाठी अपेक्षेने बघत होते. गेल्यावर्षी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात चार राज्यांच्या विधानसभा निवडणूका झाल्या होत्या. त्यात कॉग्रेस चांगली झुंज देईल अशी अपेक्षा होती. निदान येऊ घातलेली मोदीलाट राहुल गांधी थोपवू शकतील अशी अपेक्षा होती. पण लाट थोपवणे दूरची गोष्ट, राहूलना त्या लाटेला तोड देणेही शक्य झाले नाही. नाकातोंडात पाणी जाऊन घुसमटावे, तशी कॉग्रेसची दुर्दशा होऊन गेली. तेव्हाच रहुल गांधी यांनी रस्त्यावर उतरून पक्षासाठी लढा द्यायला हवा होता. पण उत्तर प्रदेशात दणदणीत पराभव बघितल्यावर राहुल गांधी यांचा उत्साह मावळला होता. २०१२ च्या मध्यास झालेल्या उत्तर प्रदेशच्या निवडणूकीसाठी राहुलनी आपली सर्वच शक्ती पणाला लावली होती. त्याचे कारण राहुलही त्यांच्या भाट तोंडपुज्यांच्या थापांवर विसंबून होते. पंधराव्या लोकसभा निवडणूकीत उत्तर प्रदेशात कॉग्रेसला २० जागा मिळाल्या, त्याचे श्रेय राहुलना देण्याची चमच्यांमध्ये स्पर्धा लागली होती. त्यामुळे आता पुन्हा उत्तर प्रदेश व बिहारमध्ये कॉग्रेस बळकट करून २०१४मध्ये राहुल गांधी स्वबळावर पंतप्रधान होणार; अशी हवा त्यांच्या चमच्यांनी निर्माण केली होती. त्याला खुद्द राहुल जितके फ़सले तितके मतदार फ़सले नव्हते. त्याचेच दुष्परिणाम गेल्या दोनतीन वर्षात दिसून आले आहेत. उत्तर प्रदेशातील २००९ च्या यशानंतर राहुलनी खरेच रस्त्यावर उतरून नेतृत्व केले असते, तर कॉग्रेसच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना नवा हुरूप आला असता आणि वेगळे परिणाम बघायला मिळाले असते.

नेता जेव्हा आघाडीवरून नेतृत्व करतो, तेव्हा सामान्य अनुयायाला उर्जा मिळत असते. त्याला लढण्याचा हुरूप येत असतो. प्रामुख्याने जेव्हा सामान्य जनता कुठल्या तरी कारणाने अस्वस्थ असते, नाराज असते; तेव्हा नेत्याने तिला दिलासा देण्यासाठी पुढाकार घ्यावा लागतो. जर असा नेता समोर नसेल, तर जो कोणी त्यात पुढाकार घेऊन सरसावतो, त्यालाच जनता आपले नेतृत्व बहाल करत असते. तीन वर्षापुर्वी अशी उत्तम संधी राहुल गांधींना चालून आलेली होती. एका बाजूला विरोधी पक्ष भाजपा व इतर सगळेच राजकारणी उदासिन होते आणि अण्णा हजारे किंवा बाबा रामदेव यासारखे राजकारणबाह्य लोक लोकभावनेचा उदगार बनू लागले होते. ती वेळ साधली असती, तर भाजपाला पुढल्या काळात डोके वर काढता आले नसते आणि केजरीवाल यांच्यासारखा नवा प्रतिस्पर्धी दिल्लीत उभा राहिला नसता. पण राहुल तेव्हा आपल्या भाटांच्या घोळक्यात जयजयकार ऐकण्यात दंग होते आणि दिल्लीतली जनता टाहो फ़ोडून न्यायासाठी आक्रोश करीत होती. आधी त्या लोकक्षोभाला अण्णा हजारे व नंतर केजरीवाल यांनी तोंड फ़ोडले. त्यात एक ठाम भूमिका घेऊन राहुल गांधी पर्याय म्हणून पुढे येऊ शकले असते. पण जनलोकपाल किंवा निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणात बधीरपणाचा कळस कॉग्रेसप्रणित सरकार दाखवत होते तर राहुल जांभया दिल्यासारखे वागत होते. एका वेळी तर शेकडो तरूण लोकांनी राहुल व सोनियांच्या निवासस्थानी दाद मागण्यासाठी धाव घेतली. तेव्हा तरी राहुलनी दिलासा दिल्याप्रमाणे दुखण्यावर फ़ुंकर घालण्याचे सौजन्य दाखवले असते, तरी खुप फ़रक पडला असता. पण कॉग्रेसचा तरुण चेहरा म्हणून पुढे आणलेल्या या शहाजाद्याला तरूणांच्या टाहोकडे ढुंकूनही बघायची इच्छा झाली नाही. त्यामुळेच पुढाकार त्यांच्या हातून निसटला आणि मग त्यांच्यासह कॉग्रेसला सावरताही आले नाही.

आता तेच राहुल आपल्या शतायुषी पक्षाला पुरता डबघाईला आणल्यावर मैदानात उतरले आहेत. त्यांनी अलिकडेच दिल्लीत कुठे कोर्टाच्या आदेशान्वये झोपड्या पाडल्या गेल्यावर, निदर्शनाचा तमाशा केला. महापालिकेने कोर्टाच्या आदेशाचे पालन करीत झोपड्यांवरून बोलडोजर फ़िरवला. तर तिथे पक्षातर्फ़े निदर्शने करण्यात आली. त्यात सहभागी होऊन राहूलनी आवेशपुर्ण भाषण केले. आधी बुलडोझर आपल्या अंगावरून न्यावा लागेल, असे शब्द त्यांनी उच्चारले. त्याचा अर्थ तरी राहुलना कळतो किंवा नाही याची शंका आहे. कारण त्यांच्या शब्दात खरेच प्रामाणिकपणा असता, तर तीन वर्षापुर्वी त्यांच्याच दारात जमलेल्या तरूणतरूणींना पोलिसांचा लाठीमार सोसून जखमी व्हावे लागले नसते. तेव्हाच राहुलनी बाहेर येऊन पोलिसांना रोखायला हवे होते. पोलिसांचा लाठीमार आणि पाण्याचे फ़वारे बुलडोझरपेक्षा वेगळे नसतात. तिथे पाशवी बळाचा वापर होत असतो. मग झोपड्या तोडणे असो किंवा निदर्शकांना रोखण्याची कारवाई असो. राहुलना आपल्या झुंजार नेतृत्वाची साक्ष देण्याची तीच खरीखुरी संधी होती. पण राजकीय संधी आपल्या दाराशी चालून आलेली आहे, याची जाणिवही या नेत्याला झालेली नव्हती. होणेही शक्य नव्हते. कारण कुणीतरी अन्य व्यक्ती वा नेत्याने लिहून दिलेली भाषणे तोंडपाठ करण्याने जमवलेल्या गर्दीकडून टाळ्या मिळवता येत असतात. पण नेतॄत्वाची कसोटी उत्स्फ़ुर्त भाषणात आणि प्रसंग असेल त्याप्रमाणे संधीचा लाभ उठवण्यातून सिद्ध होत असते. राहुलना २०११ आणि २०१२ सालात तशा विपुल संधी मिळालेल्या होत्या. त्यांच्याच इशार्‍याने चालणारे सरकार होते आणि त्याला नमवण्याचे नाटकही छान रंगवता आले असते. गुन्हेगारी सिद्ध झालेल्या लोकप्रतिनिधींना सवलत देणारी अधिसूचना रद्दबातल करण्यातले नाटक जसे यशस्वी झाले, त्याचाच प्रयोग आधी विविध आंदोलनाच्या बाबतीत होऊ शकला असता.

निर्भया किंवा जनलोकपाल या विषयात विरोधकांचे कुठे नामोनिशाण नव्हते. राजकारणबाह्य लोकांनी त्याचे नेतृत्व केलेले होते. अशावेळी त्यालाच साजेशा मागण्या घेऊन राहुलनी अल्पांशाने का होईना युपीए सरकारला नमते घ्यायला लावले असते, तरी त्यांची प्रक्षुब्ध बंडखोर तरूण नेता ही प्रतिमा उंचावली असती. मतदाराला मोदी या पर्यायाकडे बघायची गरजही वाटली नसती. तेव्हा उदासिन विरोधी पक्ष, विस्कळीत राजकीय आंदोलने आणि राजकारणबाह्य नेतृत्व यांनी जी भयानक राजकीय पोकळी निर्माण केली, ती व्यापणार्‍याला मोठी संधी होती. कारण बिगर राजकीय नेता त्याचा पुरता लाभ उठवू शकत नव्हता किंवा दिल्लीतले आळसावलेले कुठलेच नेते तितकी उमेद बाळगून नव्हते. त्याचाच लाभ नरेंद्र मोदी यांनी खुबीने उठवला. मोदी इतकेच राहुल दिल्लीच्या राजकीय परिघबाहेरचे होते. तीन वर्षापुर्वी त्यांनी ही राजकीय पोकळी व्यापण्याचा प्रयास करण्यासाठी राजकीय वारश्याच्या गुंत्यातून बाहेर पडायला हवे होते. आपल्या तोंडपुज्या गोतावळ्याला बाजूला करून आखाड्यात उडी घ्यायला हवी होती. तेव्हा ही बुलडोझरची भाषा जादू करू शकली असती. आज सत्ता गमावल्यानंतर तीच भाषा नाटकी व पोकळ झालेली आहे. अजून तरी नव्या सत्ताधारी पक्षाचे गारूड जनमानसावर कायम आहे. म्हणूऩच इतकी टोकाची भाषा राहुलसाठी उपयोगाची नाही. शिवाय दिल्ली़च्या विदानसभा निवडणूका होऊ घातल्या असल्याने त्याला राजकीय चष्म्यातूनच बघितले जाणार आहे. भाषा नुसत्या शब्दांनी प्रभावी होत नाही. ती बोलणारा व त्याचे व्यक्तीमत्व तितकेच आक्रमक असावे लागते. परिस्थिती तशी पोषक लागते आणि बोलणार्‍याला प्रासंगिकता ओळखून शब्दांची पेरणी करण्याचे कौशल्य साधावे लागते. अशा सगळ्याच बाबीत राहुल गांधी यांनी खुप उशीर केला, ही वस्तुस्थिती आहे. ज्याला आपण वरातीमागुन घोडे म्हणतो, त्यातला प्रकार.

1 comment:

  1. पण भाऊ, या घटनाक्रमात तुम्ही मोदींना गृहीत धरलेले दिसत नाहीत. वस्तुस्थितीचे अचूक मूल्यमापन करून विरोधकांना सापळ्यात अडकवायचे आणि स्वजनानाही कळणार नाही अशा चली खेळून विरोधकांना बाहुकंटक डावात मात द्यायची हे त्यांचे कसबही कॉंग्रेसचे पानिपत करण्यास कारणीभूत झालेले नाही काय?

    ReplyDelete