Saturday, December 6, 2014

मुख्यमंत्री असे का म्हणाले?



केवळ राज्यातील सत्तेतच नाही, आगामी जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुकाही ​शिवसेना व भाजप युती म्हणूनच लढतील. युतीतील प्रश्न मिटविण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. २५ वर्षे एकत्र बसूनच आम्ही युतीतले प्रश्न सोडविले, तसेच यापुढेही करण्यात येईल’, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. शिवसेना सत्तेत सहभागी होण्याचा अंतिम निर्णय झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी स्वत:च पत्रकार परिषद घेऊन त्याची घोषणा केली. त्यात सेनेला किती वा कोणती मंत्रीपदे मिळतील, त्याची घोषणा व्हायची होती. सगळा मामला सत्तावाटपाचा होता. असे असताना तिथे फ़डणवीस यांनी दिर्घकालीन व सर्वंकश युतीची घोषणा करण्याचे कारणच काय? युती इतकी सर्वंकश व दिर्घकालीन करायची होती, तर त्यात कुणाला किती मंत्रीपदे यावर चर्चेची गरजच नव्हती. पण चर्चा त्यावरच झाली आणि घोषणा मात्र दिर्घकालीन युतीची करण्यात आली. ज्यांना विधानसभेच्या पंचवीस वर्षे ठरलेल्या जागावाटपाचे निर्णय पाळता आलेले नाहीत, ते आता कुठल्या आधारावर सगळ्या निवडणूका एकत्र लढवायची भाषा करत आहेत? ते शक्य असते, तर मुळात अशी घोषणा करायला फ़डणवीस यांना आज पत्रकार परिषद घ्यावीच लागली नसती. नवा शपथविधीही करावा लागला नसता. पाच आठवडे आधीच सेनेच्या मंत्र्यांचाही शपथविधी होऊन गेला असता. तो झाला नाही, कारण सगळे गाडे निवडणूकीतल्या जागावाटप या विषयाच्या गाळात रुतून बसले. त्याच्याच परिणामी मग दोन्ही मित्रांनी वेगवेगळ्या व परस्परांच्या विरोधात निवडणूका लढवल्या. एकमेकांची उणीदुणीही काढली. म्हणजेच एकत्र निवडणूका लढवणे पत्रकार परिषदेत घोषणा करण्याइतके सोपे सरळ नाही, हे लक्षात यावे. किंबहूना यापुढे तेच सर्वात मोठे अवघड संकट आहे, याची जाणिव मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यातून दिसते. असे देवेंद्र यांना कशाला वाटते आहे?

विधानसभा निवडणुका परस्पर विरोधात लढल्यानंतरही मतदाराने त्याच दोन मित्रांना पुन्हा एकत्र येऊन सरकार बनवण्याचा आदेश दिलेला होता. पण त्याची पायमल्ली कोणी केली? इतके दिवस राष्ट्रवादीच्या बाहेरील पाठींब्याने फ़ुशारलेल्या भाजपानेच सेनेला वाकुल्या दाखवण्यात धन्यता मानली आणि त्याचा विपरीत परिणाम दिसू लागला, तेव्हा भाजपाला जाग आलेली आहे. कारण या गेल्या सात आठवड्यात भाजपाचाच मतदार व पाठीराखा इतका नाराज झालेला आहे, की स्वबळावर नाराजीला सामोरे जाणेही आता भाजपाला अवघड होऊन बसणार आहे. म्हणूनच नुसत्या सत्तावाटपाची घोषणा करून थांबण्यापेक्षा फ़डणवीस यांनी भविष्यात सर्वच निवडणुकाही एकत्र लढवण्याची ग्वाही देण्याची संधी साधून घेतली. पत्रकारांना त्याचे गांभीर्य लक्षात आलेले नाही. कारण मुख्यमंत्र्यांनी ते वक्तव्य माध्यमांसाठी उच्चारलेले नव्हतेच. त्यांनी आपल्या समोर सज्ज असलेल्या कॅमेरे व वाहिन्यांच्या मार्गे तसे आश्वासन थेट मराठी मतदाराला देण्याची संधी साधली. निकालानंतर मतदाराचा आदेश समजून वागण्यात हयगय झाली. ती पुन्हा होणार नाही. लोकांच्या इच्छेप्रमाणे सेनेला सोबत घेऊनच पुढले राजकारण होईल, असे ते आश्वासन आहे. जनतेचा आदेश एकत्र येण्याचा होता, हे कळायला मुख्यमंत्री वा भाजपाला सात आठवडे कशामुळे लागले? १९ आक्टोबरला निकाल स्पष्ट झाले होते आणि त्यात गेल्या सात आठवड्यात कुठलाही बदल झालेला नाही. मग त्यात उशीरा समजण्यासारखे काय रहस्य होते? अडचण कुठली होती? यशाची झिंग वगळता कुठली अन्य आडचण होती काय? ती नशाच भाजपाला भरकटत घेऊन गेली. जेव्हा खेडोपाडी व गल्लीबोळात आपलाच पाठीराखा त्याबद्दल उघड नाराजी व्यक्त करू लागला, तेव्हा भाजपा नेत्यांची अक्कल ठिकाणावर आलेली आहे. त्याची साक्षच मुख्यमंत्र्यांच्या उपरोक्त विधानातून मिळते.

इतके स्पष्ट देवेंद्र फ़डणवीस यांना जनता व मतदाराशी कशाला बोलावे लागले? त्याचे उत्तर नारायण राणे व राज ठाकरे यांच्या यशानंतरच्या अपयशात शोधावे लगेल. पाच वर्षापुर्वी यशावर स्वार होऊन झिंगल्यासारखे बोलणार्‍या अशा नेत्यांनी त्यांच्याच मतदारांच्या सदिच्छांचा पोरखेळ केला होता. सामान्य जनता किंवा मतदार तुम्हाला संधी देत असतो. कुणावर सूड घ्यायला अथवा कुरघोडी करायला शक्ती पुरवत नसतो. युती तुटली त्याचे खापर भाजपाने शिवसेनेवर फ़ोडले होते. तरी जनतेने भाजपाला साथ दिली होती. तेव्हा सेनेवर मतदाराने रोष दाखवला होता. पण निकालानंतर भाजपाने सूडबुद्धीने सेनेला हिणवण्या खिजवण्याचा अतिरेक केला. तिथेच मग भाजपाच्या मतदाराचाही भ्रमनिरास सुरू झाला. लोकांनी भाजपाला इतके यश दिले, ते लौतुक म्हणून दिले नव्हते. भ्रष्ट सत्ताधार्‍यांना बाजूला करून चांगले सरकार मिळावे, अशी लोकांची अपेक्षा होती. त्यात गरज पडल्यास जुना मित्र असलेल्या शिवसेनेला सोबत घेता येईल, अशीही व्यवस्था मतदाराने केली होती. पण लोक काय सांगतात, त्याकडे साफ़ पाठ फ़िरवून भाजपा नेत्यांनी शिवसेनेला धडा शिकवण्याचा पवित्रा घेतला. त्यासाठी ताळतंत्र सोडून राष्ट्रवादीचा बाहेरून पाठींबाही घेतला. पण त्या सूडबुद्धीचे प्रत्यंतर लौकरच खुद्द मुख्यमंत्र्यांनाही आले आणि त्यांनी त्याची जाहिर कबुली देण्याची सचोटीही दाखवली. राजकीय आयुष्यात कधी नव्हे इतकी टिका आरोप विश्वासमताच्या नंतर वाट्याला आले, असे त्यांनीच ट्वीटरवर सांगुन टाकले. ते दोषारोप एकट्या देवेंद्र यांच्यासाठी नव्हते, तर त्यांच्या नेतृत्वाखालच्या भाजपावर लोकांनी व्यक्त केलेली ती नाराजी होती. त्यातून मग युतीशिवाय लढणे अशक्य असल्याचे भान आले आणि नुसत्या सत्तेसाठी नव्हेतर भविष्यात निवडणूका जिंकण्यासाठी सेनेला सोबत घेण्याची अगतिकता लक्षात आलेली आहे.

अर्थात यशाच्या नशेत झिंगलेल्या अनेक भाजपाच्या उथळ शहाण्यांना त्याचे भान यायला खुप वेळ लागणार आहे. पाच वर्षापुर्वी चढलेली कॉग्रेसच्या संजय झा. संजय निरूपम किंवा सुरजेवाला अशा प्रवक्त्यांची झिंग कुठे अजून उतरली आहे? कॉग्रेसचा दारुण पराभव होऊन सहा महिने होत आले, तरी त्या कॉग्रेस नेते प्रवक्त्यांची भाषा तशीच बेमुर्वतखोर आहे. काही कॉग्रेसजनांना शुद्ध येते आहे. पण दरम्यान भाजपामध्ये तसे अनेकजण नव्याने झिंगत आहेत. त्यांच्याकडून आजकाल दिग्विजयसिंग यांच्या भाषेतली विद्वत्ता आपल्याला ऐकावी लागते आहे. गेल्या चारपाच वर्षात दिग्विजयसिंग वा सुशीलकुमार शिंदे कसे बोलत होते? पुण्याच्या एका कार्यक्रमात गृहमंत्री झाल्यावर शिंदे काय म्हणाले होते? लोक सर्वकाही विसरून जातात आणि पुन्हा कॉग्रेसलाच मते देतात. तेव्हा कुणा मतदाराने त्यांचे बखोट धरले नव्हते. पण वर्षभर नंतर मतदानाची पहिली संधी आली, तेव्हा त्याच शिंदेसह त्यांच्या पक्षाला जमीनदोस्त करून टाकले. हा ताजा इतिहास आहे. पण कालचे शिंदे आणि आजचे भाजपावाले त्यापासून कधी धडा घेत नाहीत. म्हणुन तर इतिहासाची सातत्याने पुनरावृत्ती होत असते ना? सुदैवाने भाजपामध्ये फ़डणवीस यांच्यासारखे वयाने कोवळे पण अतिशय प्रसंगावधानी नेतेही आहेत. त्यामुळे परिस्थितीचे भान त्यांनी दाखवले आहे. युती तुटली आणि एकदम सव्वाशे जागा जिंकल्याचे तात्पुरते यश किती फ़सवे असू शकते, त्याचे भान निदान त्या एका नेत्याला आहे. त्याचीच प्रचिती परवाच्या पत्रकार परिषदेत आली. सर्वंकश युती व एकत्र लढण्याची भाषा मैत्रीच ग्वाही देणारी असण्यापेक्षा भविष्यातल्या संकटाची लागलेली चाहूल आहे. लोकभावनेची पायमल्ली केल्याने पुढल्या काळात आपल्या बळावर इतकेही यश मिळवणे, टिकवणे अशक्य असल्याची ती स्वच्छ कबुली आहे. स्वबळापेक्षा ती दोन महिन्यात संपादन केलेल्या पंगुत्वाची स्विकृती आहे.

No comments:

Post a Comment