Thursday, December 4, 2014

तह केला की शह दिला?



अखेर सव्वा महिना चाललेल्या सकारात्मक बोलण्यातून दोन्ही पक्ष बाहेर पडले आणि सत्तेत युती होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकला. मग त्याचा अर्थ कसा लावायचा? पहिल्या दिवसापासून भाजपा म्हणत होता, की आपल्याला कुणाच्या मदतीची गरज नाही. तर सन्मानपुर्वक सहभाग मिळत असेल तरच सत्तेत जाऊ; अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. शिवाय अशी जाहिर विधाने चालू असल्याने त्यावर गावगप्पा व्हायच्याच. लोकांच्या तोंडाला कोणी कुलूप लावू शकणार नसतो. तुमच्या आपसातल्या गोष्टी जर तुम्ही चव्हाट्यावर येऊन बोलू लागलात, तर त्यासंबंधात लोक अघळपघळ बोलले तर दोष तुमचा असतो. माध्यमांचा नव्हे किंवा शेजारपाजार्‍यांचा नसतो. युतीच्या जागावाटपापासून त्याचे पथ्य सेनेने पाळले नाही किंवा भाजपाने पाळले नाही. एकमेकांवर दबाव आणण्यासाठी त्यांनी सार्वजनिकरित्या बोलण्याचा जो प्रयोग केला, त्यामुळे त्यांच्यातलाच बेबनाव चव्हाट्यावर आणला गेला आणि त्याची लक्तरे धुतली गेली. मग एकुणच सगळे  राजकारण उलटू लागल्यावर तितकी चतुराई करणार्‍या चाणक्यांना अक्कल आली. तिथून मग सत्ता सहभाग किंवा नव्या युतीची चर्चा जाहिरपणे करण्याचा खेळ थांबला. खरे म्हणायचे तर तीच वास्तविक सकारात्मक सुरूवात होती. पण आता चव्हाट्यावर विषय आलेला असल्याने नेमके काय झाले, त्याची चर्चाही चावडी चव्हाट्यावर होण्याला पर्यायच नव्हता. परिणामी मग सेनेला नेमकी किती मंत्रीपदे मिळणार वा सत्तेत कितीसा सहभाग आहे, याच्या गावगप्पा सुरू झाल्या. त्यात माघार कोणी घेतली आणि कोण कशामुळे शरण गेले, असल्या चर्चेला ऊत आला असेल तर नवल नाही. गेले दोन दिवस त्याच बातम्यांनी गदारोळ केला आहे. पुन्हा मग अफ़वांच्याच आधारावर सेनेने शरणागती पत्करली वा सत्तेसाठी सेना लाचार झाल्याचे बोलले जात आहे.

जे काही घडले वा जो सत्तेचा वाटा सेनेला मिळणार आहे, त्याचा कुठलाही तपशील समोर नसताना सत्तेसाठी लाचारी, असा निष्कर्ष काढणे कितपत योग्य आहे? सेनला गृहखाते व उपमुख्यमंत्रीपद मिळणार नसेल, तर ती शरणागतीच आहे, असेही बोलले जात आहे. पण मुळात अशा काही मागण्या सेनेने केल्या होत्या, त्याचा कोणता पुरावा समोर आहे? तर सेनेचे काही नेते असे म्हणत होते, असे उत्तर समोर येते. ह्या नेत्यांना कोणी अटी घालायचा अधिकार सेनेच्या वतीने दिला होता काय? असेल तर त्यांनी तशी मागणी जाहिरपणे करायचे सोडून पत्रकारांशी त्याची कुजबुज कशाला करावी? तशी मागणी भाजपाकडे करून लगेच त्याची माध्यमात वाच्यता करायला काय हरकत होती? तितकी त्या नेत्यांपाशी हिंमत वा प्रामाणिकपणा नसेल, तर त्याचे वक्तव्य विश्वासार्ह ठरत नाही. आज देखील युती होऊ घातल्याचे संकेल मिळत आहेत. पण नेमकी देवाणघेवाण काय, त्याचा कुठलाही तपशील नाही. तो द्यायला दोन्ही पक्ष राजी नाहीत. म्हणजेच कुठल्याही बाजूने निष्कर्ष काढायला आधारच नाही. पण तसे निष्कर्ष काढण्याच्या घाईत समोर दिसते आहे, तेही बघण्याचे भान राजकीय विश्लेषकांना राहिलेले दिसत नाही. अन्यथा घटनाक्रम त्यांना सत्य दाखवू शकला असता. इथे दोन पक्षात महिनाभर कुठे व कसली बोलणी झाली, त्याचा कुठलाही पुरावा समोर नाही. पण शपथविधीच्या आदल्या दिवशी त्यात आमंत्रित म्हणून यायचे आमंत्रण उद्धवना फ़ोन करून अमित शहांनी दिल्याचा तपशील आलेला होता. त्यानंतरचा दुसरा मुद्दा सुरेश प्रभूंची मातोश्रीभेट आणि दोनच दिवसांनी धर्मेद्र प्रधान या केंद्रीय मंत्र्याची मातोश्रीभेट, इतकाच तपशील समोर आलेला आहे. याचा अर्थ काय घ्यायचा? दोन महिन्यात पुन्हा एकदा भाजपाचे नेते मातोश्रीवर पोहोचले हाच महत्वाचा तपशील नाही काय?

जागावाटपावरून युती तुटली, तेव्हाही त्या कोणी भाजपा नेता थेट चर्चेसाठी मातोश्रीवर गेलेला नव्हता. तिथून मग भाजपा नेत्यांनी मातोश्रीकडे साफ़ पाठ फ़िरवली होती. तर आधीपासूनच सेनेने भाजपावाल्यांनी आपल्या दारी यावे, हाच प्रतिष्ठेचा प्रश्न बनवून ठेवला होता. सन्मानाचा विषय निघतो, तेव्हा कोण कोणाकडे गेला वा जातो, याला महत्व असते. राज्याच्या वा केंद्रीय मंत्रीमंडळाच्या शपथविधीपुर्वी सेनेचे दोन नेते दिल्लीत भाजपा नेत्यांना भेटायला गेलेले होते. त्यानंतर सत्ता सहभागाचा विषय फ़िसकटला, तो आजपर्यंत. ती कोंडी प्रभूंच्या मातोश्रीवर जाण्याने फ़ुटली. केंद्रीय मंत्री व भाजपा नेता म्हणून प्रभू मातोश्रीवर गेले हे विसरता कामा नये. त्यांनी पोषक वातावरण निर्माण केले आणि दुसर्‍याच दिवशी धर्मेद्र प्रधान या केंद्रीय मंत्र्याची मातोश्रीभेट निश्चीत झाल्याच्या बातम्या आल्या. अमित शहां व मोदींचा प्रतिनिधी म्हणून प्रधान मातोश्रीवर गेले, याला कोणाची कोणापुढे शरणागती म्हणायचे? आधी सेनानेते दिल्लीला गेले, त्यात सेनेचा अपमान वा लाचारी असेल, तर आता धर्मेंद्र प्रधान यांनी दिल्लीहून मातोश्रीवर येण्याला भाजपाचा सन्मान म्हणायचे काय? नसेल तर मग कोण आता अपमानित झाले वा कोण सेनेच्या सत्ता सहभागासाठी लाचार आहे? सेनेला कुठली खाती वा मंत्रीपदे मिळतात, हा दुय्यम विषय आहे. जेव्हा विषय प्रतिष्ठेचा बनवला जातो, तेव्हा पदांची महत्ता कमी होऊन कोण कोणापुढे हात पसरतो; याला महत्व येत असते. भाजपा आता बहूमत सिद्ध करण्यासाठी सेनेकडे आला आहे, याला महत्व असून बदल्यात काय मिळाले त्याची किंमत कमी आहे. भाजपाला शरणागत व्हायला भाग पाडल्याची जीत कोणाला बघायची नसेल, तर ठिक आहे. मंत्रीपदांची संख्या वा खात्यांची महत्ता अशा जिद्दीच्या राजकारणात दुय्यम होऊन जातात. म्हणूनच जे घडते आहे त्याला तह म्हणायचे की शह म्हणायचे, ते काळजीपुर्वक समजून घ्यावे लागेल.

निकालापासून सर्वांचीच अपेक्षा होती की युतीपक्षांनी पुन्हा सत्तेत एकत्र यावे. किंबहूना मतदारानेच तशी स्थिती निर्माण केली होती. पण आपल्याला मिळालेल्या लाटेच्या लाभाने झिंग चढलेल्या भाजपाच्या स्थानिक नेत्यांना इतकी मस्ती चढली होती, की आपल्याला कोणाच्या पाठींब्याची गरज नाही, असे छाती फ़ुगवून सांगितले जात होते. त्यासाठी राष्ट्रवादीच्या बाहेरून पाठींब्याचा देखावाही उभा केला गेला. जेणेकरून सेनेवर सत्तेत सहभागी होण्यासाठी अगतिकता निर्माण व्हावी, हातातोंडाशी आलेला घास जातो अशा भयाने मान खाली घालून सेना निमूट युतीत येण्य़ासाठी भाजपाच्या बंद दारासमोर येऊन ताटकळत उभी रहावी; असा तो डाव होता आणि तोच साफ़ उधळला गेला आहे. आलो तर सन्मानाने, म्हणजे बोलवायला या आणि गरज असेल तर मातोश्रीच्या दारात येऊन उभे रहा; असा पेच उद्धवनी संयमाने उभा केला. तोच शेवटी फ़लदायी ठरला आहे. म्हणूनच जे काही घडताना दिसते आहे, तो शिवसेनेने केलेला तह असण्यापेक्षा सेनेने भाजपाच्या आडमुठेपणाला दिलेला शह म्हणायला हवा. कारण सप्टेंबरच्या मध्यानंतर जागावाटपाची बोलणी फ़िसकटल्यावर पुन्हा भाजपालाच मातोश्रीच्या दारात जाऊन उभे रहावे लागले आहे आणि त्यासाठी थेट दिल्लीच्या प्रतिनिधीला मातोश्रीवर धाडावा लागला आहे. त्यामुळे सेनेच्या पाठींब्याची किंमत किती मिळाली, यापेक्षा पाठींब्यासाठी कोणाला कुणाच्या दारात येऊन उभे रहावे लागले, यानुसार किंमत तपासावी लागेल. तिथे लक्षात येते, की सेनेने तह केला नसून भाजपाला राजकारणात मोठा शह दिला आहे. त्यातून साधले काय व किती, त्याचे स्वतंत्रपणे विवेचन करावे लागेल. अगतिकता कोण कोणाच्या दारात जाऊन उभा रहातो याच्यावर ठरत असते. इथे मंत्रीपदे व खाती मागायला कोणी गेला नव्हता, तर पाठींबा मागायला कोणीतरी मातोश्रीच्या दारात येऊन उभा राहिला, हे विसरून चालेल काय़? (पूर्वार्ध)

3 comments:

  1. Bhau tumcha mhanana ekdam yogya ahe. BJPch shivsene pudhe lachar zala ahe. udhav yanchya mustadi ani chatur netrutvala salam. shah ani modina tyani sapshel adva ghatala ahe.

    ReplyDelete
  2. faar odhataan hot aahe ....
    pan kahi harkat nahi .....
    bhrashtachaar mukt yuti sarkar kaam karel ashi marathi asalyacha falatu abhimaan nasanarya vikasabhimukh marathi manasachi apeksha aahe...

    ReplyDelete
  3. हातातोंडाशी आलेला घास जातो अशा भयाने मान खाली घालून सेना निमूट युतीत येण्य़ासाठी भाजपाच्या बंद दारासमोर येऊन ताटकळत उभी रहावी; असा तो डाव होता आणि तोच साफ़ उधळला गेला आहे. आलो तर सन्मानाने, म्हणजे बोलवायला या आणि गरज असेल तर मातोश्रीच्या दारात येऊन उभे रहा; असा पेच उद्धवनी संयमाने उभा केला. तोच शेवटी फ़लदायी ठरला आहे....... GOOD ANALYSIS.

    ReplyDelete