
धर्मांतर हा पुन्हा एकदा आपल्या देशात वादाचा विषय झाला आहे. कारण उत्तर प्रदेशात हिंदू परिषदेने मोठ्या घाऊक प्रमाणात मुस्लिमांचे शुद्धीकरण करून घरवापसॊ नावाची मोहिम हाती घेतली आहे. खरे तर अशा बातम्या क्वचितच कानी येतात. अन्यथा कोणी दलीत आदिवासी सामुहिकरित्या ख्रिश्चन वा इस्लाम धर्मात गेल्याच्या बातम्याच अधिक येत असतात. शिवाय अशा बातम्या थेट आपल्यापर्यंत येत नाहीत. तर हिंदूंचे धर्मांतर झाल्याची बजरंग दल वा हिंदू परिषदेने केलेली तक्रार, म्हणून त्या बातम्या येत असतात. मात्र सध्याचे धर्मांतर उलट्या क्रमाचे आहे. अन्य कुठल्या धर्मातून हिंदू धर्मात कोणी आल्याबद्दल कल्लोळ माजलेला आहे. कारण सामुहिक धर्मांतर झाल्याच्या या बातम्या आहेत. असे अकस्मात घडलेले नाही. विश्वहिंदू परिषदेच्या माध्यमातून ह्या धर्मांतराला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासाठी मुद्दाम प्रयासही चालू आहेत. त्याबद्दल परिषदेचे म्हणणे असे, की हे धर्मांतर नाहीच. पुर्वजांनी धर्म बदलला होता, त्यांचे वंशज आता आपल्या मुळ धर्मात माघारी येत आहेत. म्ह्णूनच त्याला धर्मांतर म्हणू नये, तर त्याला वाट चुकलेल्याने माघारी घरी परतणे मानावे, असे परिषदेने म्हणणे आहे. राजकीय युक्तीवाद म्हणून अ़शी वक्तव्ये ठिक असतात. पण त्याचा व्यवहारी अर्थ वेगळा असतो. कायदेशीर बाबतीत व्यक्ती वा नागरिकाची धर्मानुसारच नोंद होत असल्याने त्याला व्यवहारी अर्थ भिन्न स्वरूपाचा आहे. जे कोणी असे हिंदू धर्मात येतात, त्यातून त्यांच्या आधीच्या धर्माची लोकसंख्या कमी होत असते. म्हणूनच मग त्या धर्माचे नेते त्यावर काहूर माजवतात आणि स्वत:ला अल्पसंख्यांकांचे तारणहार म्हणवणार्यांची तारांबळ उडत असते. मात्र या नव्या मोहिमेने अशा तारणहार सेक्युलर मंडळींची भलतीच गोची होऊन गेली आहे. कारण आजवर हीच मंडळी धर्मांतराचे समर्थक होती.
जोवर हिंदू धर्मातून अन्य कुठल्या धरात कोणी जात असेल, तोवर सेक्युलर मंडळींची तक्रार नसते. म्हणून त्यांना धर्मांतरा़चा अधिकार मान्य होता. पण उलट्या गतीने लोक इतर धर्म सोडून हिंदू होतील वा तशा प्रलोभनांना बळी पडतील, अशी कोणी अपेक्षा केलेली नव्हती. आजच्या जगात कोणी अध्यात्म वा आत्मिक परिवर्तनामुळे धर्म बदलत नसतो. त्याला आमिषे दाखवली जातात आणि लाभ दिले जातात, म्हणून व्यवहारी लाभासाठी अनेकजण धर्म बदलत असतात. मनपरिवर्तन झाल्याने धर्म बदलण्याच्या घटना किरकोळ वा नगण्य असतात. प्रामुख्याने ख्रिश्चन व इस्लाम धर्माकडून संघटितरित्या धर्मांतराचे प्रयास चालू असतात. त्यासाठी धर्मसंस्थाही पुढे असतात. धर्माच्या नावाने निधी गोळा करून अशा प्रयासांना हातभार लावला जात असतो. त्यांच्या तुलनेत हिंदूधर्मात आणायचे उद्योग फ़ारसे होत नाहीत. आमिषे दाखवून धर्मांतर शक्य असते, तर मुळात गरीब गरजू हिंदूंमधून धर्मांतर झालेच नसते. सहाजिकच आजवर बातम्या यायच्या, त्या हिंदूमधून अन्य धर्मात जाणार्यांच्या. झारखंड वा छत्तीसगड असा आदिवासी राज्यात कोणी ख्रिश्चन सामुहिकरित्या हिंदू झाल्याच्या बातम्या येत त्या धर्मांतरीतांचे शुद्धीकरण झाल्याच्या. असे धर्मांतर मुळात आमिषे दाखवून झालेले असल्याने त्याविषयी फ़ारसा गाजावाजा होत नसे. उत्तर प्रदेशात सध्या चालू आहे ती मुस्लिमांची ‘घरवापसी’ आहे. त्यामुळे त्यावरून गदारोळ अपेक्षितच आहे. कारण यातले कोणी नव्याने मुस्लिम झालेले नाहीत. काही पिढ्यांपुर्वी त्यांच्या पुर्वजांनी इस्लाम स्विकारलेला होता किंवा त्यांचे सक्तीनेही धर्मांतर झालेले होते. अलिकडेच पाकिस्तान वा इराकमधील बिगर मुस्लिमांची कोंडी करून सक्तीने त्यांना इस्लाम मान्य करायला लावल्याच्या घटना ताज्या आहेत. तेव्हा इस्लाममध्ये सक्ती नसते, असे म्हणायला अर्थ नाही.
प्रश्न आहे तो आजच्या काळात धर्माला जीवनात तितके व्यवहारी स्थान असण्याचा आहे. जिथे अशा मुस्लिमांनी हिंदू धर्म स्विकारला किंवा घरवापसी केली, त्यांच्यावर तशी सक्ती झाली आहे काय? जे समूह वा गट असे घाऊक धर्मांतर करतात, त्यांचे गांजलेपण बघितले, तर त्यांना धर्म तत्वज्ञान वा अध्यात्मापेक्षा जीवनात रोजच्या समस्या महत्वाच्या असतात. त्यावर कोणी उपाय म्हणून मदत करत असेल, तर हे गरजू जगण्यातली अगतिकता म्हणून धर्मही बदलू शकतात. त्यांच्या जगण्यातल्या गरजा सरकार पुर्ण करू शकत नसेल वा त्यांचा धर्म पुर्ण करू शकत नसेल, तर त्यावरून कोणी काहूर माजवण्याचे कारण नाही. जे कोणी कुठल्याही धर्माचे समर्थक आहेत, त्यांनी अशा गरजूंना भेडसावणार्या समस्या सोडवाव्यात आणि त्यांच्या गरजा पुर्ण करायची जबाबदारी उचलावी. मगच आमिषाला बळी पडू नये, असे आग्रह धरावेत. गरजू ज्या कुठल्या धर्माचा असेल, त्याच्या धर्माने वा धर्ममार्तंडांनी त्याची जबाबदारी उचलावी. कारण धर्मतत्वांनी त्या गरीबांची पोटे भरत नाहीत. मग असा गरजू हिंदू असो किंवा मुस्लिम-ख्रिश्चन असो. त्याचे धर्मांतर थोपवण्याचे काम त्याच धर्ममार्तंडांनी हाती घ्यावे; आपापल्या धर्मातील गरजू अगतिक लोकांना शोधून त्यांच्या जीवनावश्यक गरजा पुर्ण करायला त्यांच्याच धर्मसंस्था पुढे आल्या, तर असा त्यांचा अनुयायी कशाला अन्य कुठल्या धर्माच्या आमिषाला बळी पडेल? जगणेच त्याच्या आवाक्यात राहिले नाही, तर धर्मापेक्षा पोटाची आग महत्वाची होते आणि त्याच आगीत धर्म भस्म होऊन जात असतो. कारण धर्म हा जीवंत माणसांसाठी असेल, तर आधी त्याच्या जीवंत रहाण्याची सोय असायला हवी. ती जबाबदारी कुठल्याही धर्माच्या वतीने सरकार उचलू शकत नाही. कारण सरकार सेक्युलर व्यवहारी संस्था आहे. तिच्यावर कुठल्या धर्माला जगवण्याची वा टिकवण्याची जबाबदारी नाही.
अर्थात आमिषाला लोक बळी पडतात आणि अशा धर्मांतराला कायदा विरोध करतो. पण आमिष दाखवले हे कोर्टात सिद्ध करणे अशक्य असते. म्ह्णूनच धर्मांतराचा विषय दिर्घकाळ चिघळलेला आहे. यातून सरकारने मार्ग तरी कसा काढावा? धर्मांतराला आपल्या देशात बंदी नाही. किंबहूना धर्मांतर हा आपला अधिकारच आहे, असे आजवर ख्रिश्चन व मुस्लिम धर्मसंस्था आग्रहपुर्वक सांगत आल्या आहेत. म्हणूनच धर्मांतराला बंदी घालण्यास त्यांचा विरोध आहे, हिंदू संस्थांनी त्यासाठी आग्रह धरला तेव्हा मोठा विरोध झाला होता. आताही मोदी सरकारचे मंत्री व्यंकय्या नायडू यांनी धर्मांतराला बंदी घालणारा कायदा करण्याची तयारी दर्शवली. पण विरोधकच त्याला राजी नाहीत. कारण सरळ आहे. ती भाजपा वा हिंदूत्ववाद्यांची जुनीच मागणी आहे. म्हणजे धर्मांतराला मोकळीक असली पाहिजे. पण ते आपल्या धर्मातून व्हायला नको, असा प्रत्येक धर्ममार्तंडाचा आग्रह आहे. इतर धर्मातून आपल्या धर्मात होणारे धर्मांतर हवे. पण उलटा प्रवाह मात्र असता कामा नये असा आग्रह आहे. त्यातूनच हा वाद उफ़ाळला आहे. थोडक्यात आपले धर्मांतर हा मतपरिवर्तनाचा भाग असतो आणि दुसर्याचे धर्मांतर हे आमिष दाखवून होते, असा सगळ्यांचाच कांगावा आहे. खरे बघितले तर सामान्य माणसाला कुठलाच धर्म कळत नाही. तो आपापल्या समाज व प्रदेशातील चालिरितीने चालत व जगत असतो. जगण्याच्या विवंचनेतून सुटणारा तोल सावरताना त्याची जी तारांबळ उडत असते, त्यात त्याला धर्माचे कौतुक कशाला असेल? तो भरपेट धर्ममार्तंडांचा खेळ असतो. बुद्धीमंतांसाठी तो चर्चेचा झकास खुसखुशित विषय असतो. पोटात आगीचा भडका उडालेल्यांना सर्वच धर्म सारखे असतात. कारण गरीबी व पोटाची भुक हीच खरी सेक्युलर व धर्मनिरपेक्ष वस्तू असते. बाकीच्या सगळ्या चर्चा विरंगुळ्याच्या गप्पा वा जीवघेणा हिंसेचा खेळ असतो.
No comments:
Post a Comment